(निकालपत्र मिलिंद सा.सोनवणे, अध्यक्ष यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
पारित दि.17/03/2015
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 (यापुढे संक्षेपासाठी ‘ग्रा.स.कायदा’) च्या कलम 12 नुसार सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदारांचे म्हणणे थोडक्यात असे की, त्यांनी दि.20/7/2013 रोजी रात्री 10.45 वाजेच्या सुमारास त्यांची मोटार सायकल क्र.एम.एच.15 सी.झेड. 1832 सामनेवाल्यांच्या मार्फत ट्रॅव्हल्सने पुणे येथे पाठविली. सामनेवाल्यांनी त्यासाठी रु.550/- इतकी रक्कम आकारली. ज्या वेळी मोटारसायकल ट्रॅव्हल बसच्या डिक्कीत ठेवण्यात आली, त्यावेळी तेथे देखील जागा पाहता त्यांनी सामनेवाल्यांना मोटारसायकल व्यवस्थीत जाईल किंवा नाही, याबाबत विचारणा केली असता त्यांनी नुकसान झाल्यास भरपाई देवु असे आश्वासित केले होते. मात्र ज्यावेळी दुस-या दिवशी मोटारसायकल पुणे येथे प्राप्त झाली त्यावेळी त्यांचा मुलगा योगेश यास लक्षात आले की, पेट्रोलची टाकी व इतर अनेक ठिकाणी मोटारसायकलला स्क्रॅचेस उमटलेले होते. त्यात त्यांचे सुमारे रु.5000/- इतके नुकसान झाले. ती नुकसान भरपाई त्यांनी सामनेवाल्यांकडून मागितली असता सामनेवाल्यांनी ते केवळ एजंट आहेत, नुकसान भरपाई बस मालकाकडून मागावी, अशी भुमिका घेत एकमेकांकडे जबाबदारी ढकलली. त्यामुळे तक्रारदारांनी केलेल्या सेवेतील कमतरतेपोटी रु.5000/- नुकसान भरपाई व्याजासह मिळावी. शारिरीक, मानसिक त्रास, नोटीस व इतर खर्चापोटी रु.20,000/- मिळावेत, अशी मागणी तक्रारदारांनी मंचाकडे केलेली आहे.
3. तक्रारदार यांनी तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ दस्तऐवज यादी नि.5 लगत सामनेवाल्यांना पाठविलेली नोटीस, त्याची पोहोच पावती, मोटार सायकल पाठविण्याचे रु.550/- मिळाल्याची पावती, तसेच दस्तऐवज यादी नि.22 लगत वृत्तपत्राचे कात्रण व मोटार सायकलला झालेल्या नुकसानीचे फोटो इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. सामनेवाला क्र.1 यांनी जबाब नि.13 दाखल करुन प्रस्तुत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते, त्यांची ट्रॅव्हल सेवा देण्यासाठी कोणतीही बस नाही. प्रवासी वाहतूक करणे हा त्यांचा व्यवसाय नाही. तो व्यवसाय करणा-या व्यक्तींचे ते एजंट आहेत. त्यामुळे तक्रारदार त्यांचे ग्राहक नाहीत. ट्रॅव्हल गाडीचा मालक व चालक यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. गाडीसोबत कोण जातो, काय चीज वस्तु नेतो हे पाहण्याची त्यांना गरज अथवा आवश्यकता नाही. त्यांच्या ऑफीस समोरुन प्रवासी चढत अथवा उतरत नाहीत. प्रवासी व गाडी मालक या मधील दुवा व एक मध्यस्थ आहेत. संबंधीतांची गरज पाहून ते संपर्क साधून देतात व त्या संपर्काचा निव्वळ मोबदला ते घेत असतात. त्यामुळे तक्रारदारांना सेवा देण्याशी त्यांचा संबंध नाही. तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा, अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
5. सामनेवाला क्र.2 व 3 नोटीस मिळूनही मंचात हजर न झाल्याने त्यांच्या विरुध्द प्रस्तूत तक्रार अर्ज एकतर्फा चालविण्यात यावा, असे आदेश दि.15/3/2014 रोजी करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी ते आदेश रु.200/- इतक्या कॉस्टला अधीन राहून रद्द करुन घेतले होते. मात्र ती कॉस्ट त्यांनी दि.19/8/2014 पावेतो न भरल्यामुळे त्यांच्या विरुध्द करण्यात आलेले एकतर्फा आदेश रद्द झालेले नाहीत. सर्व सामनेवाल्यांना पुरावा देण्याची संधी देण्यात आली होती. मात्र दि.21/2/2015 पावेतो त्यांनी पुरावा न सादर केल्यामुळे त्यांचा पुरावा बंद करण्यात आला.
6. तक्रारदारांचे वकील अॅड.जाधव यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. सामनेवाले युक्तीवादासाठी हजर नसल्यामुळे त्यांचा युक्तीवाद ऐकण्यात आलेला नाही.
7. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
- तक्रारदार सामनेवाल्यांचे ग्राहक
आहेत काय? होय.
- सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा
देण्यात कमतरता केली काय? होय.
- आदेशाबाबत काय? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र.1 बाबतः
8. प्रवासी व्यवसाय करण्याचा आपला व्यवसाय नाही. आपल्या कार्यालयासमोरुन कोणतेही प्रवासी बसविले जात नाहीत अथवा कोणतेही सामान बस मध्ये ठेवण्यात येत नाही, आपण केवळ एक मध्यस्थ असून प्रवासी व गाडीमालक यांना जोडणारा केवळ एक दुवा आहे, असा बचाव सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा जबाब नि.13 यात घेतलेला आहे. मात्र सामनेवाल्यांचा हा बचाव स्विकारता येणार नाही. तक्रारदारांनी दस्तऐवज यादी नि.5/3 ला सामनेवाला क्र.1 यांच्या कार्यालयाचा शिक्का असलेल्या व्हिजिटींग कार्डच्या मागे तक्रारदारांची मोटारसायकल क्र.एम.एच.15 सी झेड 1835 भाडे रु.550/- सह पुणे येथे पोहोचविण्यासाठी मिळाले, असे हस्तलिखित स्वरुपात लिहून दिलेले आहे. ते पैसे त्यांनी जबाबदारीसह स्विकारलेले आहेत, असे देखील त्यात नमूद आहे. सामनेवाला क्र.2 व 3 यांनी देखील सामनेवाला क्र.1 यांच्याप्रमाणे मोटारसायकल बसच्या डिक्कीत ठेवण्याची भुमिका बजावलेली आहे, असा तक्रारदारांचा शपथेवर पुरावा आहे. तो त्या सामनेवाल्यांनी आव्हानित केलेला नाही. परिणामी तक्रारदार हे सर्व सामनेवाल्यांचे ग्राहक आहेत, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
9. मुद्दा क्र.1 च्या निष्कर्षासाठी केलेल्या चर्चेवरुन ही बाब समोर आलेली आहे की, सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांकडून दि.20/7/2013 रोजी रु.550/- स्विकारुन मोटार सायकल क्र.एम.एच.15 सी झेड 1835 पुणे येथे पोहोचविण्याची जबाबदारी स्विकारलेली आहे. सामनेवाला क्र.2 व 3 यांनी देखील ती जबाबदारी पार पाडण्याची भुमिका बजावलेली आहे. या पार्श्वभुमीवर आपण एजंट आहोत, आपले कोणतेही वाहन नाही, आपण कोणतीही सेवा देत नाही, हा सामनेवाल्यांचा बचाव कदापि स्विकारला जाऊ शकत नाही. तक्रारदारांची मोटारसायकल पुणे येथे व्यवस्थीत पोहोचली नाही, याबाबत तक्रारदारांनी दाखल केलेल्या छायाचित्रांच्या झेरॉक्स स्पष्टपणे दर्शवितात की, त्या वाहनाला ठिकठिकाणी स्क्रॅचेस पडलेले आहेत. याचाच अर्थ सामनेवाल्यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.2 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.3 बाबतः
10. मुद्दा क्र. 1 व 2 चे निष्कर्ष स्पष्ट करतात की, तक्रारदार सर्व सामनेवाल्यांचे ग्राहक आहेत व सामनेवाल्यांनी तक्रारदारांची मोटारसायकल पुणे येथे व्यवस्थीतरित्या न पोहोचवून तक्रारदारांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. त्यामुळे मोटारसायकलवर पडलेल्या स्क्रॅचेसच्या नुकसानीपोटी रु.5000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. त्याचप्रमाणे झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.2000/- तक्रार अर्जाचा खर्च रु.1000/- मिळण्यासही तक्रारदार पात्र आहेत, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.3 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. सामनेवाला क्र.1 ते 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांना रक्कम रु.5000/- अदा करावेत. ती रक्कम अदा न केल्यास त्यावर आदेश दिनांकापासून द.सा.द.शे.10% व्याज अदा करावे.
2. सामनेवाला क्र.1 ते 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2000/- व अर्ज खर्चापोटी रक्कम रु.1000/- अदा करावेत.
3. उभय पक्षास निकालाच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.
नाशिक.
दिनांकः17/3/2015