ग्राहक तक्रार क्र. 112/2013
अर्ज दाखल तारीख : 08/08/2013
अर्ज निकाल तारीख: 06/01/2015
कालावधी: 01 वर्षे 04 महिने 29 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. अमित विकास गपाट,
वय-25 वर्षे, धंदा – शिक्षण,
रा.इंदापुर, ता. वाशी, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. व्यवस्थापक, अमित ब्रिजलाल मोदाणी,
ट्रु मोटर्स, मध्यवर्ती कारागृहासमोर,
औरंगाबाद रोड, उस्मानाबाद,
वितरक होंडा मोटरसायकल. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य..
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.डी.जरंगे,
विरुध्द पक्षकार तर्फे विधीज्ञ : श्री.एस.व्ही.नन्नवरे.
निकालपत्र
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
1) विरुध्द पक्षकार (विप) मोटरसायकल विक्रेत्याने विकत घेतलेल्या मोटरसायकलचे पासींग न करुन देऊन सेवेत त्रूटी केल्यामुळे भरपाई मिळणेबददल तक्रारकर्त्याने (तक) ही तक्रार दिलेली आहे.
2) तकचे तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात असे की विप याचे ट्रू मोटर्स नावाचे होंडा मोटरसायकलचे वितरण शोरुम आहे. तक यास मोटरसायकलची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी विपकडे जाऊन‘होंडा शाईन’ या मोटरसायकलबददल चौकशी केली. विप याने वाहनाची एकूण किंमत रु.57,940/- सांगितली त्यामध्ये रजिष्ट्रेशनचा खर्च व इतर खर्च समावीष्ठ होते. तकने एच.डी.एफ.सी. बँकेकडून कर्ज घेतले. तसेच स्वत:ची काही रक्कम घालून रु.57,940/- विप यांना दी.02/08/2012 रोजी दिले त्याबददल विपने पावती दिलेली आहे. विप यांनी वाहनाची पासिंग आठ दिवसात करुन देतो असे सांगितले त्यामुळे तक वाहन घेऊन पुणे येथे गेला.
3) तक यांनी त्यांनंतर विपकडे वाहनाचे पासिंगबाबत विचारले. विप यांनी वाहन उस्मानाबाद येथे आणण्यास सांगितले. तकने वाहन उस्मानाबाद येथे आणले. विपने त्याच्याकडून फॉर्म भरुन घेतला व तो विभागीय परिवहन कार्यालय उस्मानाबाद येथे गेला. त्यानंतर विप यांनी वाहनाचे पासिंग झाले असून वाहनाचा नंबर व आरसी बुक एक महिन्यानी येईल असे सांगितले तथापि वाहनाचे आर.सी. बुक तककडे आले नाही. वाहनाचा नंबर देखील विपने कळविला नाही. तकने विचारणा केली असता विप यांनी त्याबाबत टाळाटाळ केली. तसेच वाहनाचे पासिंग झाले नसून पुन्हा पासिंगसाठी वाहन आणण्यास सांगितले त्याप्रमाणे तकने वाहन आणले व विभागीय परीवहन कार्यालयात नेले. पासिंग झाल्याचे विपने सांगितले. पुन्हा एक दिड महिन्याने तकने नंबरबाबत विचारण केली पण विपने टाळाटाळ केली. परीवहन कार्यालयात पासिंग न झाल्याचे तकला समजले त्याबाबत विपला विचारले असता त्याने तकला आर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. वाहनाचे पासिंग करुन देण्याची जबाबदारी असतांना विपने सेवेत त्रूटी केली आहे. तकला त्याबददल दंडही भरावा लागला. तकने दि.12/06/2013 रोजी विपला नोटीस पाठविली पण उपयोग झाला नाही. त्यामुळे विपने वाहनाचे पासिंग करुन दयावे तसेच झालेल्या मानसिक,शारीरिक, आर्थीक व शौक्षणीक नूकसानीपोटी रु.80,000/- दयावेत व तक्रारीचा खर्च रु.5,000/- द्यावेत यासाठी ही तक्रार दाखल केली आहे.
4) तकने तक्रारीसोबत ता.02/08/2012 चे इन्हाईस, इंन्शूरंन्सची कव्हर नोट, ता.12/06/2013 चे नोटीसीची प्रत हजर केलेली आहे.
5) नोटीस मिळाल्यानंतर विपने ता.04/09/2013 रोजी श्री.नन्नवरे वकीलामार्फत म्हणणे देण्यास मुदत मागणीचा अर्ज दिला. त्यानंतर दि.03/10/2013 रोजी म्हणणे देण्यास मुदत मागणीचा अर्ज दिला.त्यानंतर दि.18/10/2013 रोजी म्हणणे देण्यास मुदत मागणीचा अर्ज दिला तो अर्ज दि.07/12/2013 रोजी नामंजूर झाला व नो से आदेश पारीत झाला. त्यानंतर तक यांचा तोंडी युक्तिवाद ऐकला मात्र विप व त्यांचे वकील गैरहजर राहीले.
6) तक्रारीतील कथन व दाखल कागदपत्रे यांचेवरून आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात. त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणासाठी दिलेली आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1) विप यांनी सेवेत त्रूटी केली आहे का ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे का ? होय.
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा.
मुद्दा क्र. 1 व 2
7) तक यांनी आपले प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे, दि.02/08/2012 चे इन्हाईस दाखल केलेले आहे. त्याप्रमाणे होंडा शाईन गाडीची मुळ किंमत रु.46,599/- होती. 12.05 टक्याने टॅक्सची रक्कम रु.5,824/- होते अशी किंमत रु.52,424/- दाखविली आहे. रजिष्ट्रेशन चार्जस रु.3,729/- दाखविले आहेत. इन्शुरंन्स चार्जस रु.1,286/-, हायपोथीकेशन चार्जेस रु.100/- व स्मार्टकार्डसाठी रु.400/- असा वर खर्च रु.5,515/- दाखविला आहे. अशी एकूण किंमत रु.57,940/- मिळाल्याबददल विपने सही करुन दिलेली आहे. इन्शुरन्स कव्हरनोट प्रमाणे प्रिमियम रु.1,286/- तकचे नावाने ता.02/08/2012 रोजी भरल्याचे दिसते. तकने विपला दि.12/06/2013 रोजी पाठविलेल्या नोटीसीची प्रत हजर केली असून पोहोच पावती सुध्दा हजर केली आहे. विपने नोटीसीला उत्तर दिल्याचे दिसत नाही तसेच या मंचातसुध्दा तक्रारीला म्हणणे दाखल केलेले नाही.
8) विपने तककडून ता.02/08/2012 रोजीच रजिष्ट्रेशन चा खर्च वसूल केला. तसेच स्मार्टकार्डसाठी रु.4,00/- घेतले. तथापि विपने मोटरसायकलचे रजिष्ट्रेशन करुन दिल्याचे दिसुन येत नाही. तकचे म्हणणेप्रमाणे ता.02/08/2012 रोजी वाहन घेतल्यानंतर तो वाहनासह पुण्याला निघून गेला. तथापि विपचे सांगण्यावरुन दोनदा वाहन घेऊन उस्मानाबादला आला. दोन्ही वेळेस वाहन रजिष्ट्रेशनसाठी परिवहन कार्यालयात नेण्यात आले व पासिंग झाल्याचे विपने तकला सांगितले. तथापि प्रत्यक्षात वाहनाचे पासिंग झालेले नाही. तकचे या म्हणण्यास विपने नकार दिलेला नाही. यावरुन विपने रजिष्ट्रेशनसाठी तककडून पैसे घेऊन विकलेल्या वाहनाचे रजिष्ट्रेशन न करुन देऊन सेवेत त्रूटी केली हे उघड होत आहे. तकनेच वाहन रजिष्ट्रेशनसाठी आणले नाही असा कोणताही बचाव विपने घेतलेला नाही. त्यामुळे तक अनुतोषास पात्र आहे म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
1) तकची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विपने तकच्या मोटरसाकलचे स्वत:चे खर्चाने ताबोडतोप रजिष्ट्रेशन करुन दयावे.
3) विपने तकला मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.5,000/-(रुपये पाच हजार फक्त) दयावे.
4) विपने या तक्रारीचा खर्च म्हणून तकला रु.2,000/-(रुपये दोन हजार फक्त) दयावे.
5) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.