ग्राहक तक्रार क्र. 165/2013
अर्ज दाखल तारीख : 12/11/2013
अर्ज निकाल तारीख: 25/03/2015
कालावधी: 01 वर्षे 01 महिने 09 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. भैरवनाथ नवनाथ खुळे,
वय - 24 वर्षे, धंदा – मजूरी,
रा.सोनारी, ता. परंडा, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. आमोल किराणा स्टोअर्स,
व्दारा – प्रोप्रायटर आमोल किराणा स्टोअर्स सोनारी,
रा. सोनारी, ता. परंडा, जि. उस्मनाबाद.
2. जय अंबे अॅग्रो, व्दारा- मॅनेजर,
(Mfg. of आहूजा आलू पापड), एच-12,
एम.आय.डी.सी. अजंठा रोड, जळगांव,
मु.पो.ता. जि. जळगांव, महाराष्ट्र. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.संतोष सुर्यवंशी.
विरुध्द पक्षकार क्र.1 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.डी.माने.
न्यायनिर्णय
मा.सदस्या श्रीमती विद्युलता जे.दलभंजन.यांचे व्दारा:
अ) 1. अर्जदार भौरवनाथ खुळे हे मौजे सोनारी परंडा जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत. त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 (संक्षिप्त रुपात किराणा स्टोअर्स) आणि विप क्र.2 (जय अंबे अॅग्रो या विरुध्द नुकसान भरपाईची तक्रार दाखल केलेली आहे.
2. विप क्र.1 हे किराणा स्टोअर्स असून त्यांचे सोनारी येथे किराणा दुकान आहे. विप क्र.2 हे आलू पापड या नावाने पापड बनवून पॅकिंग करुन विकणारी कंपनी जळगांव येथे आहे.
3. अर्जदार हा शुध्द शाकाहारी आहे नवरात्रीपासून ते कोजागिरी पोर्णिमेपर्यंत देवीचे उपवास होते त्याने किराणा दुकानातील बटाटयाचे आहूजा आलू पापडाचे प्रत्येकी 100 gm वजनाचे एक प्लेन व एक तिखट असे जय अंबे उत्पादित कंपनीचे बनविलेल बॅच नं. 9, सप्टेंबर 2013 मध्ये पॅकिंग केलेले शुध्द शाकाहारी असणारे दोन पुडे दि.17.10.2013 रोजी रु.40/- देऊन विकत घेतले.
4. अर्जदार हा घरी आला व उपवास असल्याने वर नमूद पापड तेलात तळण्यासाठी तयारी करु लागला पुडा फोडण्याआधी अर्जदाराच्या हे लक्षात आले की किराणा दुकानातून घेतलेल्या प्लेन पापडाच्या आहूजा आलू पापडाच्या पुडयात नाकतोडयाचा ( Grass Hopper) पाय आहे हे पाहिल्यावर अर्जदाराला खूप वाईट वाटले. उपवासासाठी खाणार होता व शुध्द शाकाहारी पापडामध्येच नाकतोडयाचा पाय आहे. या कल्पनेने अर्जदारास मळमळ होऊ लागली. धार्मिक भावना दुखवल्या, धार्मिक श्रध्देला ठेंस पोहचली.
5. अर्जदाराने सदर पापड खाल्ले असते तर आजारी पडला असता. दिवसभर उपाशीपोटी रहावे लागले. सेवा देण्यात टाळाटाळ, हलगर्जीपणा व त्रुटी केलेली आहे या कृत्यामुळे मानसिक, मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला. जिवन मरणाशी निगडीत असल्याने अर्जदाराने पस्तुत तक्रार दाखल करुन नुकसान भरपाई म्हणून रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्त) 15 टक्के व्याजासह तक्रार खर्चापोटी रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) जय अंबे अॅग्रो यांचेकडून मिळावेत अशी विनंती केलेली आहे.
ब) 1. किराणा स्टोअर्स विप क्र. 1 यांना मंचाची नोटीस मिळूनही हजर न राहील्याने मंचाने त्यांचे विरुध्द दि.19/07/2014 रोजी एकतर्फा चौकशीचा आदेश पारीत केला.
क) 1. ‘’ जय अंबे अॅग्रो ’’ विप क्र. 2 यांनी अभिलेखावर म्हणणे दाखल केले आहे. त्यांचे म्हणण्यानुसार तक्रार काल्पनीक व बेकायदेशीर आहे. नामंजूर करावी. सोनारी येथे किराणा स्टोअर्स आहे ही बाब काल्पनीक आहे. किराणा दुकान असल्याचा कोणताही पुरावा नाही. देवीचे उपास होता ही बाब मान्य नाही. नवरात्र सुरवात दि.05/10/2013 रोजी पासून सुरु होऊन दि.13/10/2013 रोजी दसरा या सणाने संपलेली होती अर्जदाराने मंचाकडे सादर केलेला पुडा फोडून पुन्हा मॅन्यूअली बंद केलेला दिसुन येत आहे. जय अंबे अॅग्रो चे पापड उत्पादने ही मशीनवर बंद होतात. अर्जदार व किराणा दुकानदार यांनी संगनमत करुन आलू पापड पुड्यात भेसळ केली व कोणत्याही तज्ञांच्या चाचणीशिवाय स्पष्ट मत मांडून नाकतोडयाचा पाय आहे हे बनवाबनव असून केवळ जय अंबे अॅग्रो यांचेकडून पैसे हडपण्यासाठी संगणमताने केलेली आहे.
2. अर्जदारास उलटया मळमळ असे काहीही झालेले नाही. अर्जदाराने पापड खाल्ला असता तर आजारी पडला असता ही बाब ग्राहय धरता येण्याजोगी नाही. दिवसभर उपाशी राहिला. वगैरे पुराव्या शिवाय ग्राहय धरण्याजोगे नाही. विप ने सेवेत कसलीही त्रुटी केलेली नाही किंवा टाळाटाळ केली नाही. अर्जदाराने जय अंबे अॅग्रो यांच्या अधिकृत विक्रेत्याकडून आलू पापड पुडा हा खरेदी केलेला नाही.
3. आहूजा आलू पापड पुडा हा जसा कंपनी मधून येतो तसा तो दिसत नाही तर बनावट आहे.
4) अर्जदार व किराणा दुकानदार हे एकाच गावातील रहिवाशी आहे. जय अंबे हा त्यांची उत्पादने उस्मानाबाद जिल्हयात विक्री करत नसून उस्मानाबाद जिल्हयात जय अंबे अॅग्रोचा अधिकृत विक्रेता अत्सित्वात नाही. विप ने त्यांची उत्पादने उस्मानाबाद जिल्हयात कधीही विक्री केलेली नाही. प्रस्तुत तक्रार चालविण्याचा अधिकारी मंचास प्राप्त होत नाही. अर्जदाराने असा भेसळ प्रतिबंध कार्यालयाकडे तक्रार करुन योग्य ती फौजदारी प्रकरण दखल करणे अपेक्षित होते केवळ पैसे मिळविण्याच्या दृष्टीने खोटी व बनावट तक्रार तयार केलेली आहे. सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. पुरावे देणे आवश्यक आहे. तक्रार नामंजूर करावी. दिवाणी न्यायालयातील कोर्ट फी वाचवण्याकरीता तक्रारदार ग्राहक होत नसतांना प्रस्तूत न्यायमंचाकडे तक्रार दाखल करुन बेाकायदेशीरपणा केला आहे.
5) तक्रारदार सदर डॅमेजेससाठी दिवाणी न्यायालयात मागणी करु शकतो, तरी अर्जदाराची तक्रार नामंजूर करावी व काम्पेसेटरी कॉस्ट दयावी अशी विनंती ‘’जय अंबे अॅग्रो’’ यांनी केलेली आहे.
ड) अर्जदाराने तक्रारी सोबत पापडपुडे घेतल्याची 40/- ची पावती, विप क्र. 2 चे म्हणणे इत्यादी कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले, युक्तिवाद वाचला, तोंडी युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) अर्जदार यांना देण्यात येणा-या सेवेत विप यांनी त्रुटी केली का ? होय.
2) अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे का ? होय.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
इ) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :
1) अर्जदाराने विप कडून विकत घेतलेल्या बटाटा पापड पुडयामध्ये नाकतोडयाचा पाय दिसला ही प्रमूख तक्रार अर्जदाराचा आहे.
2) विप क्र.2 जय अंबे अॅग्रो यांचे असे म्हणणे आहे की अर्जदाराने जो आलू पूडा घेतलेला आहे तो त्यांच्या कंपनीचा नाही अर्जदाराने घेतलेला आलू पापड पुडा आमची कंपनी उस्मानाबाद जिल्हयात विक्री करीत नाही. विप क्र.9 यांनी तो बनावट तयार करुन विक्री करत असेल.
3) अर्जदाराने प्रकरण दाखल केले त्याच वेळेस विप क्र.1 यांचे कडून विप क्र.2 यांनी उत्पादित केलेला पापड पुडा दाखल केलेला आहे विप क्र.2 यांनी अशी हरकत घेतलेली आहे की अर्जदाराने बनावट पापड पुडा तयार केलेला असेल परंतू सदर दोन्ही पुडे दाखल केलेले मंचाने स्वत: बघितले ते दोन्ही पुडे कंपनीने सिल बंद केलेले आढळून आले. दोन्ही आलू पापड पुडे यांवरील कंपनीने केलेले लिखाण, कंपनीचे नांव, पत्ता, दुरध्वनी क्रमांक व इमेल सारखाच आहे त्यामुळे अर्जदाराने दाखल केलेला आहूजाचा आलू पापड पुडा व विप क्र.2 यांनी दाखल केलेला पापड पुडा एक सारखाच आहे त्यामध्ये कसलाही बदल नाही किंवा तफावत आढळून येत नाही.
4) तसेच विप क्र.2 चे म्हणणे असे आहे की, अर्जदाराने आलू पापड पुडा फोडून नंतर चिटकविलेला आहे परंतू अर्जदाराने सदर विवादीत पापड पुडा फोडून कसा चिटकविला आहे हे सिध्द करुन दाखवलेले नाही फक्त लेखी नमूद केलेले आहे.
5) विप क्र.2 चे पुढे असेही म्हणणे आहे की कसलीही तज्ञाची चाचणी झालेली नाही. अर्जदाराने जर विरुध्द पक्षावर किंवा उत्पादित कंपनीवर भेसळीचा आरोप केलेला आहे तर उत्पादित कंपनीने म्हणणेच विप क्र.2 यांनी सदर पापड पुडयात नाकतोडयाचा पाय नाही हे सिध्द करणे उत्पादित कंपनीचे काम आहे परंतू उत्पादित कंपनीने तसे न करता अर्जदारावर आरोप केलेला आहे हे अनूचित आहे. उलट उत्पादित कंपनीने अर्जदाराबरोबर अनूचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेला आहे.
6) अर्जदाराने विप क्र.2 यांच्या उत्पादित केलेल्या कंपनीचा आहूजा आलू पापडचा पुडा घेतला हे स्पष्ट होते कारण अर्जदाराने सदर पापड पुडा हा सोनारी येथील अमोल किराणा स्टोअर्स मधून खरेदी केल्याची पावती अभिलेखावर दाखल केलेली आहे त्यावरु अर्जदार हा विप क्र.1 चा ग्राहक आहे हे सिध्द होते.
7) विप क्र.2 चे पुढे असे म्हणणे आहे आहे की उपवास दि.05/10/2013 पासून ते दि.13/10/2013 पर्यंत नवरात्र सुरु होऊन विजयादशीमीने संपले होते. परंतू अर्जदाराने सदर उपवास हे नवरात्रीपासून ते कोजागिरी पोर्णिमेपर्यंत देवीचा उपवास केले होते. उपवासाठी म्हणून अर्जदाराने आहूजा कंपनीने उत्पादित केलेले आलू पापड खरेदी केले त्या पापडपुडयात नाकतोडयाचा पाय स्पष्ट दिसत आहे हे मंचाने पाहिलेले आहे त्यामुळे विप क्र. 2 यांनी ग्राहकांना देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केलली हे स्पष्ट होते आणि अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे हे स्प्ष्ट होते त्यामुळे मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विप क्र. 2 जय अंबे अॅग्रो एच -12 एच आय डी सी जि. जळगांव महाराष्ट्र यांनी अर्जदारास नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) आदेश पारीत तारखेपासून 30 दिवसात दयावे.
3) विप क्र. 2 जय अंबे अॅग्रो एच 12 एम आय डी सी जि. जळगांव यांनी अर्जदारास तक्रार खर्चापोटी रक्कम रु.2,000/- ( रुपये दोन हजार फक्त) आदेश पारीत तारखेपासून 30 दिवसात दयावेत.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.