::: नि का ल प ञ::: मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष १. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस, ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार, सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. २. तक्रारदार शेती व अर्चना पोल्ट्री फार्म नावाने व्यवसाय करतात. सामनेवाले क्र. २ यांचे प्रतिनिधी सामनेवाले क्र. ३ यांनी सामनेवाले क्र. १ यांचेकडून पाणी थंड करण्याची मशीन तक्रारदार यांना पुरविण्यासाठी दिनांक २३.११.२०१५ रोजी प्रस्ताव दिला. सदर प्रस्तावाप्रमाणे सामनेवाले क्र. ३ यांनी तक्रारदारास बँक ऑफ इंडिया नवरगाव शाखा येथे कर्ज मिळण्याकरिता अहवाल तयार करुन दिला. कर्ज मंजूर होणेपुर्वी कुलिंग मशिनसाठी सामनेवाले क्र. १ यांच्या खात्यामध्ये रक्कम रु. १,००,०००/- भरावे, असे सामनेवाले क्र. ३ यांनी तक्रारदारास सांगितले. जर कर्ज मंजूर झाले नाही तर, सदर मशीन सामनेवाले क्र. ३ अन्य व्यक्तीस विक्री करुन सदर रक्कम तक्रारदारास अदा करतील असेही सांगितले. त्याप्रमाणे दिनांक ०९.१२.२०१५ रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. १ यांच्या खात्यामध्ये रक्कम रु. १,००,०००/- जमा केले. सामनेवाले क्र. ३ यांनी प्रोजेक्ट अहवाल व्यवस्थित तयार न केल्याने कर्ज नामंजूर झाले. तोपर्यंत कुलिंग मशिन देखील आली नव्हती. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. ३ यांच्याकडे रक्कम रु. १,००,०००/- परत करण्याची विनंती केली. त्यावर सामनेवाले क्र. ३ यांनी तक्रारदाराकडून रक्कम रु. १०,०००/- ची मागणी केली, तक्रारदार यांनी नाईलाजास्तव रक्कम रु. ५,०००/- सामनेवाले क्र. ३ यांना अदा केले व उर्वरित रक्कम सामनेवाले क्र. १ यांच्याकडून रक्कम प्राप्त झाल्यानंतर अदा करण्याचे ठरले. त्यानंतर वेळोवेळी सामनेवाले क्र. १ ते ३ यांना विनंती करूनही तक्रारदारास रक्कम रु. १,००,०००/- परत न केल्याने तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वकिलामार्फत दिनांक ०४.१०.२०१६ रोजी नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. परंतु नोटीस प्राप्त होऊनही सामनेवाले यांनी रक्कम परत न केल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करून सामनेवाले यांनी सदर रक्कम तसेच शारिरीक, मानसीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी दंडात्मक रक्कम तक्रारदारांस अदा करावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे. ३. सामनेवाले क्र. १ ते ३ यांना मंचाची नोटीस पाठविली असता, हजर न राहिल्याने त्यांचेविरुद्ध तक्रार एकतर्फा चालविण्यात आली. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत. ४. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात. मुद्दे निष्कर्ष १. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिद्ध करतात काय ? होय २. सामनेवाले क्र. १ ते ३ तक्रारदारास नुकसानभरपाई अदा करण्यास पात्र आहेत काय ? होय ३. आदेश ? अंशतः मान्य कारण मिमांसा मुद्दा क्र. १ व २ : ५. सामनेवाले क्र. १ सामनेवाले क्र. २ व ३ यांच्या माध्यमातून व्यवसाय स्थापन केल्याची बाब निर्विवाद आहे. सामनेवाले क्र. १ व २ यांच्या सुचनाप्रमाणे सामनेवाले क्र. ३ यांनी तक्रारदार यांच्याकडून रक्कम रु. १,००.०००/- सामनेवाले क्र. १ यांच्या खात्यामध्ये जमा केल्याबाबत कागदोपत्री पुरावा दाखल आहे. तसेच सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारास थंड पाण्याचे मशीनबाबत करार करून पूर्तता न केल्याची बाबही सिद्ध होते. सामनेवाले क्र. ३ यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु. १०,०००/- पैकी रक्कम रु. ५,०००/- सामनेवाले क्र. १ यांचेकडून रक्कम रु. १,००,०००/- परत तक्रारदार यांना आणून देणेसाठी घेऊनदेखील अद्याप सदर रक्कम तक्रारदार यांना प्राप्त झालेली नाही. सामनेवाले क्र. १ यांनी, न्यायोचित आक्षेपाशिवाय, करारातील अटी व शर्तीचा भंग केल्याची बाब तक्रारदार यांनी सिद्ध केली आहे. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदारास रक्कम अदा न केल्याने तक्रारदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला ही बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिद्ध होते. सामनेवाले क्र. १ यांनी तक्रारदारास, कराराप्रमाणे, सेवेबाबत हेतुतः निष्काळजीपणा करुन, अटी व शर्तीचे पालन न केल्याची बाब सिद्ध होते. तक्रारदारानी लेखी आक्षेप सादर करूनही सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी आगावू रक्कम अदा करण्याबाबत कोणतीही उपाययोजना न केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिध्द होते. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ओ) अन्वये “सेवा” या संज्ञेची व्याप्ती पाहता करार सेवेबाबतची तक्रार मंचाकडे दाखल करता येते, असे न्यायतत्व आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार वर नमूद निष्कर्षावरून, सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदारास कराराबाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिध्द झाल्याने व परिणामी तक्रारदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला आहे, ही बाब सिध्द झाल्याने मुद्दा क्रं. १ व २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. ३ : ६. मुद्दा क्रं. १ व २ वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश १. ग्राहक तक्रार क्र. १३८/२०१६ अंशतः मान्य करण्यात येते. २. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी, वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदार यांना कराराप्रमाणे, ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार, सेवासुविधा पुरविण्यात कसुर केल्याची बाब जाहीर करण्यात येते. ३. सामनेवाले क्र. १ यांनी, करार रक्कम रुपये १,००,०००/- दिनांक ०९.१२.२०१५ पासून अदा करेपर्यंत द.सा.द.से. १२% व्याजासह तक्रारदार यांना अदा करावी. ४. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी, वैयक्तिक व संयुक्तीकपणे, कराराबाबत सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने, तक्रारदार यांना झालेल्या मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. ५०,०००/- वैयक्तिक व संयुक्तीकपणे या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात तक्रारदार यांना अदा करावे. ५. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. श्रीमत श्रीमती. कल्पना जांगडे श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ (सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या) |