जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन.
--------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १२६/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०६/०७/२०११
तक्रार निकाली दिनांक – २९/०१/२०१३
विनोद वसंत सोनार
वय ३५ (विवाहीत)
व्यवसाय – नोकरी
रा. सिव्हील हॉस्पिटल कॉलनी,
गणपती रोड, जि.धुळे. .............. तक्रारदार
विरुध्द
अंबिका मोबाईल गॅलरी
क्लॉथ स्टोअर्स, धुळे.
मालक – संदीप अग्रवाल
वय – ४०,
पत्ता – जमनालाल बजाज रोड, धुळे. ...........विरुध्द पक्ष
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – स्वतः)
(विरुध्दपक्ष तर्फे – अॅड.डी..बी. अग्रवाल)
निकालपत्र
सौ.एस.एस. जैन, सदस्याः विरूध्द पक्ष यांनी तक्रारदार यास खराब मोबाईल देवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी विरूध्द पक्ष यांचेकडुन नोकरीच्या अत्यावश्यक सेवेसाठी मायक्रोमॅक्स कं.चा मॉडेल नं.२९० मोबाईल (दोन सिम) (ई.एम.आय. नं. ९१०५६०२२२६६३१, ९१०५७६०२२२४९) दि.०१.०६.२०११ रोजी त्या दुकानातून मालक श्री. संदीप अग्रवाल यांचेकडून रू.२१००/- ने रोखीने घेतला असून त्यांनी एक वर्षाची गॅरन्टी व वॉरन्टी तोंडी स्वरूपात सांगितली होती. दिनांक ०२.०६.२०११ रोजी त्या मोबाइलला आऊटगोईंग बंद झाले ही तक्रार विरूध्द पक्ष यांना तक्रारदारने सांगितली असता त्यांनी नेटवर्क प्रॉब्लेम आहे असे सांगितले. तक्रारदार परत २-३ दिवसांनी दुकानदारकडे गेले असता युनिनॉर या सिमकार्डला प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांनी गॅलरीत पाठविले. तक्रारदार गॅलरीत गेले असता कागदपत्रांची चौकशी करून त्यांनी सिमकार्डला कुठल्याही प्रकारचे आऊटगोईंग रोखले नाही असे सांगून दुस-या मोबाईल मध्ये सिमकार्ड टाकून ते सुरळीत व व्यवस्थित चालू असल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदार परत विरूध्द पक्ष यांचे दुकानात गेला असता दुकानदारने मोबाईल ची सेटिंग बिघडली आहे असे सांगून मोबाईल स्वतः कडे ठेवून घेतला. तक्रारदार रोज विरूध्द पक्ष यांचे दुकानावर मोबाईल मागणेसाठी जात होता. तेव्हा काहीना काही कारणे सांगून विरुध्द पक्ष मोबाईल देणे टाळत होते.
३. त्यानंतर दि.१७.०६.२०११ रोजी विरूध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना सेटिंग दुरूस्त करून दिली असे सांगून मोबाईल परत दिला. तक्रारदार यांनी घरी गेल्यावर कॉल्स केले असता परत पुर्वीचाच प्रॉब्लेम आल्याने ते परत विरूध्द पक्ष यांचेकडे गेले असता विरूध्द पक्ष यांनी तक्रारदारास मोबाईलला सॉफटवेअर टाकावे लागेल असे सांगून मायक्रोमॅक्स कं.च्या सर्व्हिस स्टेशनला पाठविले.
४. तक्रारदाराने दि.१७.०६.२०११ रोजी कंपनीच्या सर्व्हिस स्टेशनला ५.१५ वाजता मोबाईल जमा केला तेव्हा त्यांनी ५.३० वाजता सॉफटवेअर टाकले असे सांगुन मोबाईल तक्रारदार यांना परत केला. तक्रारदार यांनी तेथूनच ५-६ कॉल्स केले असता तोच प्रॉब्लेम (आऊट गोईंग बंद होणे) येवु लागल्याने ते परत विरूध्द पक्ष यांचेकडे गेले व आपली तक्रार सांगितली. विरूध्द पक्ष यांनी सर्व्हीस स्टेशनला फोन लावून त्यांच्याशी बोलणी केली व तक्रारदार यांना सर्व्हिस स्टेशनला परत जावून मोबाईल जमा करावा असे सांगितले. तक्रारदाराने सर्व्हिस स्टेशनला जावून मोबाईल जमा केल्यावर त्यांनी जमा केल्याच्या पावतीवर तक्रारदार यांना सही करण्यास सांगितले. तक्रारदार यांनी पावतीवर वॉटर डॅमेज असे वाचले असता मारलेला रिमार्क मान्य नाही, कारण मोबाईल पाण्यात पडलेला नाही किंवा पाणी लागेल असा कुठेही ठेवलेला नाही असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी विरूध्द पक्ष यांचेकडे जावून त्यांना सर्व्हिस स्टेशनची पावती दाखविली असता विरध्द यांनी मी काहीही करू शकत नाही. यापुढे दुकानात येवू नये असे स्पष्टपणे सांगूण अपमानास्पद वागणूक दिली. तसेच माझे बील साधे आहे. त्यामुळे माझे काहीही होऊ शकत नाही असेही सांगितले. श्री. रविंद्र शिवदास सोनार यांचा समक्ष मोबाईल जमा केला होता.
५. तक्रारदार यांना विरूध्द पक्ष यांनी खराब मोबाईल दिला तसेच दुरूस्तीसाठी फिरवाफिरव केली. तसेच मोबाईल चांगला आहे असे सांगून नंतर अचानक वॉटर डॅमजचे कारण दिले. मोबाईल बिल पावती बनावट देऊन बिलात फसवणुक केली. त्यामुळे मानसिक व शारिरिक त्रासापोटी विरूध्द पक्ष यांचेकडून रू.२५,०००/- देण्याचा आदेश व्हावा ही विनंती केली आहे.
६. तक्रादार यांनी आपले म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.६ वर अंबिका मोबाईल गॅलरीचे मोबाईल घेतल्याचे बील, नि.७ व ८ वर जॉब कार्ड, इत्यादी कागदपत्रे दाखल केले आहे.
७. विरूध्द पक्ष यांनी आपला खुलासा नि.११ वर दाखल केला आहे. त्यात त्यांनी सदर अर्जास जरूरी पक्षकार सामील नाही. अर्जातील विषय उत्पादन सदरील जाबदेणारचे नाही. जाबदेणार फक्त संबंधीत उत्पादन विक्रेता आहे. त्याबाबतची सेवा देणे विषयी जाबदेणारची नाही. उत्पादित संस्था सदरील अर्जास सामील नाही. त्यामुळे सदरील अर्ज प्रथमदर्शनी रदद होण्यास पात्र आहे.
८. विरूध्द पक्ष यांनी पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार याने जाबदेणार कडून मोबाईल विकत घेतला त्यावेळेस सदरचा मोबाईल हा कंपनीकडून ओके टेस्टेड पूर्ण तयार चालू स्थितीत होता. सदरच्या मोबाईलवरून आऊटगोईंग कॉल होत नाहीचा मजकूर खोटा व लबाडीचा आहे. मुळतः तक्रारदारास मोबाईल वापराबाबतचे ज्ञानाची महिती नव्हती व नाही दि.०२.०६.२०११ रोजी तक्रारदार याने मोबाईलला आऊटगोईंग कॉल बंद आहे अशी तक्रार केलीच नाही. युनिनॉर कंपनीच्या सिमकार्डला प्रॉब्लेम आहे, तसेच तक्रारदारला गॅलरित पाठविेले चा सदर मजकूर खोटा व लबाडीचा आहे, तो मान्य नाही. मोबाईलची एक वर्षात गॅरंटी व वॉरंटी तोंडी स्वरूपात सांगितल्याचे कथन खोटे व लबाडीचे आहे. मोबाईल सेटिंग बिघडली आहे महणून मोबाईल स्वतःकडे ठेवून घेतला, दि.१७/०६/२०११ रोजी मोबाईल परत केला, पुन्हा प्रॉब्लेम झाला, पुन्हा तक्रार केलाचा मजकूर खोटा व लबाडीचा आहे.
९. तक्रारदारने कंपनीच्या सर्व्हिस स्टेशनला मोबाईल जमा केला व त्यांनी मोबाईल वॉटर डॅमेज आहे असे लिहिले ते बरोबर होते व आहे. मोबाईल विरूध्द पक्ष यांचे कडे जमा केला होता व त्याचे साक्षीदार रविंद्र शिवदास सोनार आहे. खराब मोबाईल दिला चा मजकुर खोटा व लबाडीचा आहे. शेवटी तक्रारदारचा अर्ज खर्चासह रदद करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
१०. तक्रारदार यांची तक्रार, विरूध्द पक्ष यांचा खुलासा व युक्तीवाद ऐकल्यानंतर व दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्दे उत्तर
१. तक्रारीस नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज
या तत्वाची बाधा येते काय? नाही.
२. विरूध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत
त्रृटी केली आहे का? होय.
३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतीम आदेशाप्रमाणे.
४. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
११. मुद्दा क्र.१ विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या खुलाशात तक्रारीत जरूरी पक्षकार सामील नाही. अत्पादित संस्था सदरील अर्जात सामील नाही. या तत्वाची बाधा येते. विरूध्द पक्ष केवळ संबंधीत उत्पादन विक्रता आहे. तक्रार प्रथमदर्शनी रदद होणेस पात्र आहे असे नमूद केले आहे. परंतु उत्पादकाला पक्षकार म्हणून सामिल केले नाही तरी उपभोक्त्याचा उत्पादकाशी बांधिलकीचा करार नसल्याने उत्पादक आवश्यक पक्षकार होवू शकत नाही. त्यामुळे तक्रारीत आवश्यक पक्षकार करणे आवश्यक नाही असे आम्हांस वाटते. या संदर्भात आम्ही – ब्ल्यु चिप इंडिया विरूध्द डॉ. चंद्रशेखर पाटील (२००७) सी.पी.जे. ६९ (एन.सी) या वरीष्ठ कोर्टाच्या न्यायनिवाडयाचा आधार घेत आहोत. त्यात पुढीलप्रमाणे तत्व विषद केलेले आहे.
Defective – Liability of dealer vis-à-vis manufacturer -Impleadment of parties – Goods developed problems during warranty period – Dealer held liable – cotation. Liability for refund that of manufacturer, who was not impleaded party- Rejected complainant had no priority of contract with manufacturer. Its joinder not at need necessary. Liability up held.
वरील निवाडयातील तत्व पाहता तक्रारीस नरॅन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येत नाही असे आम्हास वाटते. म्हणून मुदृा क्र.१ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१२. मुद्दा क्र.२ तक्रारदार यांनी विरूध्द पक्ष यांचेकडून दि.०१.०६.२०११ रोजी मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल रू.२१००/- रोख देवून खरेदी केला. सदर मोबाईलची एक वर्षाची गॅरन्टी व वॉरन्टी असल्याचे विरूध्द पक्ष यांनी सांगितले होते. सदर मोबाईल गॅरंटी/ वॉरंटी कालावधीत असलेने तक्रारदार मोबाईल बिघडल्यामुळे दुरूस्त करून घेणेसाठी विरूध्द पक्ष यांचेकडे गेला असता त्यांनी तक्रारदारास गॅलरीत पाठवले. तेथे तक्रारदाराला मोबाईल सुरळीत व व्यवस्थित सुरू असल्याचे सांगितले. सदर हकीकत तक्रारदारने विरूध्द पक्ष यांना सांगितली असता त्यांनी मोबाईल स्वतःकडे ठेवून घेतला.
१३. त्यानंतर विरूध्द पक्ष यांनी तक्रारदारला दि.१७.०६.२०११ रोजी मोबाईल सेटिंग दुरूस्त करून दिली असे सांगून परत दिला. परंतु तक्रारदारने घरी आलेवर, कॉल्स केल्यावर परत पुर्वीचाच प्रॉब्लेम येत असल्याचे त्यांना लक्षात आले. तक्रारदारने विरूध्द पक्ष यांचेकडे जावून प्रॉब्लेम सांगितला असता त्यांनी तक्रारदारास कंपनीच्या सर्व्हिस स्टेशन गॅलरीत पाठवले. तक्रारदारने दि.१७.०६.२०११ रोजी सर्व्हिस स्टेशनचा ५.१५ वाजता मोबाईल जमा केला असता सॉफटवेअर टाकून, प्रॉब्लेम येणार नाही असे सांगून सर्व्हिस स्टेशन वाल्यांनी त्यांना ५.३० वाजता परत दिला.
१४. तक्रारदारने परत ५ ते ६ कॉल्स करून पाहिल्यावर त्यांना परत तोच प्रॉब्लेम आलेने ते विरूध्द पक्ष यांचेकडे गेला असता विरूध्द पक्ष यांनी तक्रारदारास पुन्हा सर्व्हिस स्टेशनला मोबाईल जमा करण्यास सांगितले. तक्रारदारने सर्व्हिस स्टेशनला मोबाईल जमा केला व पावतीवर सही करतांना त्याचेवर वॉटर डॅमेज असे वाचले असता समजले, म्हणून सदर रिमार्क मान्य नसल्याने पावतीवर लिहून दिले. तक्रारदारने सदर पावती विरूध्द पक्ष यांना दाखविली असता विरूध्द पक्ष यांनी स्पष्टपणे ते काहीही करू शकत नाही असे सांगितले.
१५. यावरून असे दिसून येते की, मोबाईल वॉरंटी कालावधीत असतांना सुध्दा विरूध्द पक्ष यांनी त्याची दुरूस्तीची जबाबदारी सर्व्हिस स्टेशनची आहे महणून नाकारली आहे. वास्तविक विक्रेत्याने वॉरंटी कालावधीत मोबाईलची तक्रार आल्यानंतर तो स्वतः सर्व्हिसिंगसाठी पाठवणे आवश्यक असते. वस्तू विक्री केल्यानंतर वॉरंटी कालावधी पावेतो (एक वर्ष) त्यांच्या दुरूस्तीची जबाबदारी विक्रेत्याची असते. या ठिकाणी विरूध्द पक्ष यांनी मोबाईल दुरूस्ती करण्याची जबाबदारी स्विकारलेली नाही व तसे आपल्या खुलाश्यातही मान्य केलेले आहे. आमच्या मते मोबाईलची तक्रार आल्यानंतर तो वॉरंटी कालावधीत दुरूस्त करून न देवून विरूध्द पक्ष यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रृटी केली आहे. महणुन मुदृा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१६. मुद्दा क्र.३ तक्रारदार यांनी विरूध्द पक्ष यांचे कडून मानसिक व शारिरिक त्रासापोटी रू.२५,०००/- मिळावे अशी विनंती केली आहे. या परिस्थितीत तक्रारदार यांनी विरूध्द पक्ष यांना सदरचा मोबाईल परत दयावा. तक्रारदार यांना विरूध्द पक्ष यांचेकडून मोबाईलची किंमत रू.२,०००/- व त्यावर मोबाईल नादुरूस्त झाल्याची तारीख ०२/०६/२०११ पासून सदर रक्कम देईपावेतो ९ टक्के दराने व्याज दयावे. तसेच मानसिक त्रासापोटी रू.५००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.५००/- मिळण्यास पात्र आहे असे आम्हास वाटते.
१७. मुद्दा क्र.४ वरील विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. तक्रारदार यांनी विरूध्द पक्ष यांना सदरचा मोबाईल परत दयावा.
३. विरूध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना मोबाईलची किंमत रू.२,०००/- व त्यावर मोबाईल नादुरूस्त झाल्याची तारीख ०२/०६/२०११ पासून सदर रक्कम देईपावेतो ९ टक्के दराने व्याज दयावे.
४. विरूध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रू.५००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्या प्राप्ती पासून ३० दिवसाच्या आत द्यावेत.
(सौ.एस.एस.जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.