.
आदेश
मा. अध्यक्ष, श्री. सचिन शिंपी यांच्या आदेशान्वये-
- तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली असून त्यात नमूद केले की, विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांचा अँमरोन बॅटरी या नावाने बॅटरी निर्मितीचा व्यवसाय असून विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांचा बॅटरी विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने त्याच्या मालकीचे वाहन स्कॉर्पिओ रजिस्ट्रेशन नंबर MH31-2757 यासाठी विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांनी दिलेल्या आश्वासना नुसार तक्रारदाराने दिनांक 22/4/2016 मध्ये रक्कम रुपये 4900/- देऊन ॲमरोन कंपनीची बॅटरी विकत घेतली. त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांनी बिल देखील दिले, तसेच सदर बॅटरीला 36 महिन्यांची गॅरंटी असल्याचे देखील बिलावर नमूद आहे. सदर बॅटरीमध्ये दोष निर्माण झाल्याने विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांच्याकडे जून 2016 मध्ये सदरची बॅटरी दुरुस्तीसाठी दिली. तसेच त्यामध्ये पुन्हा काही दोष उद्भवल्यास नवीन बॅटरी देण्याची आश्वासन देखील विरुध्द पक्ष क्रं 2 ने दिले होते. त्यानंतर ऑगस्ट 2016 मध्ये सुध्दा पुन्हा बॅटरी मध्ये दोष निर्माण झाल्याने ती बॅटरी पुन्हा विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिली व त्यानंतर पुन्हा जानेवारी 2017 मध्ये बॅटरी मध्ये दोष निर्माण झाल्याने विरुध्द पक्ष यांच्याकडे नवीन बॅटरीची मागणी केली असता, तसेच सदरचे बॅटरीला 36 महिन्यांचे गॅरंटी असतांना देखील विरुध्द पक्षाने बॅटरी बदलवून देण्यास नकार दिला. गॅरन्टी कालावधी मध्ये नादुरुस्ती झालेली बॅटरी बदलवून देण्याची जबाबदारी असताना देखील विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी बॅटरी बदलवून देण्यास नकार दिला. त्यामुळे विरुध्द पक्ष यांना वकिला मार्फत दि. 4/6/2017 रोजी नोटीस पाठवून देखील विरुध्द पक्षाने बॅटरी बदलून दिली नाही. सदरची बाब ही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी असून सेवेतील कमतरता असल्याने विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द सदरचा तक्रार अर्ज दाखल करून सदोष बॅटरी बदलून देण्याची मागणी केली आहे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्हणून रुपये 5,00,000/- व अर्जाचा खर्च म्हणून रुपये 25,000/-ची मागणी केली आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी जवाब दाखल करून असा बचाव घेतला कि, तक्रारदार यांच्याशी विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांचा प्रत्यक्ष संबंध व व्यवहार नाही. विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांच्याकडून त्यांना दिनांक 27/3/2017 रोजी बॅटरी विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांच्याकडून तपासणीसाठी पाठवण्यात आली असता त्या बॅटरीमध्ये कोणतीही दोष नसल्यामुळे तक्रारकर्त्याची बॅटरी तपासणी करून Battery ok & Return या शेऱ्यासह परत पाठवण्यात आले. विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी सेवा देण्यात कोणतीही कमतरता केलेली नसल्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांच्या विरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांनी जबाब दाखल करून असा बचाव घेतला की, तक्रारदार यांनी दिनांक 15/3/2017 त्यांचे वाहन पिंटू नामक ड्रायव्हर सोबत पाठविले असता, बॅटरी मध्ये कमी करंट येऊन बॅटरी चार्ज होत असल्याबाबत तक्रार केली. त्यानंतर बॅटरीची तपासणी केली असता असे दिसून आले की, वाहनातील अल्टरनेटर या मार्ट मध्ये दोष असल्यामुळे बॅटरी योग्य प्रकारे चार्ज होत नव्हती, मुळात बॅटरी मध्ये कोणताही दोष नव्हता. तक्रारकर्त्याच्या वाहनांमधील अल्टरनेटर हा पार्ट खराब झाल्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होत होती, विवादित बॅटरी तपासणीकरिता कंपनीकडे देखील पाठवण्यात आली होती. त्याच दिवशी म्हणजे दिनांक 15/3/2017 रोजी तक्रारदारास दुसरी सर्विस बॅटरी देण्यात आली होती. त्यासाठी रक्कम रुपये 100/- प्रति दिवस भाडे देण्याचे देखील ठरले होते. तक्रारदारास विक्री करण्यात आलेल्या बॅटरी मध्ये कोणताही दोष नसल्याबाबत विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी दिनांक 27/3/2015 रोजी अहवाल देखील पाठवला. त्याबाबत तक्रारदाराला माहिती देऊन देखील नवीन बॅटरी देण्याची मागणी कायम ठेवली. तक्रारदारास दरम्यानच्या काळात दिलेल्या बॅटरीचे एकूण भाडे रुपये 40,200/- तक्रारदाराकडे घेणे आहे. तक्रारदारास दिलेली सर्विस बॅटरी तक्रारकर्त्याने परत केली नाही. तक्रारदारास विक्री केलेल्या बॅटरी मध्ये कोणताही दोष नसल्यामुळे तसेच विरुध्द पक्षाने सेवा देण्यात कमतरता केली नसल्यामुळे सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी मागणी केली आहे.
- तक्रारदारांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकण्यात आला.
- विरुध्द पक्ष यांनी युक्तिवादाबाबतची दि. 25/2/2020 रोजी पूरसिस दाखल केल्यानंतर प्रत्यक्ष युक्तिवादासाठी ते गैरहजर असल्याने सदरचे प्रकरण न्याय निर्णयासाठी ठेवण्यात आले.
6. उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तावेज व त्यांचे वरीलप्रमाणे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
मुद्दे निष्कर्ष
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
निष्कर्ष
- मुद्दा क्रं.1 व 2 बाबत - तक्रारदाराच्या वकिलांचा असा युक्तीवाद आहे की, विरुध्द पक्ष बॅटरी विक्री करताना 36 महिन्यांची गॅरंटी दिलेली असताना या कालावधी दरम्यान बॅटरी मध्ये वारंवार दोष निर्माण झालेला असताना देखील विरुध्द पक्षाने बॅटरी बदलून देण्यास नकार दिला ही बाब अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी असून सेवेतील कमतरता देखील आहे.
8. विरुध्द पक्ष युक्तीवादासाठी गैरहजर असल्याने अभिलेखावर दाखल पुराव्याच्या आधारावर केस न्याय निर्णयीत करणे न्यायोचित ठरते. तक्रारकर्त्यानी विरुध्द पक्ष यांच्याकडून दिनांक 22/4/2016 रोजी रक्कम रुपये 4900/- अदा करून बॅटरी विकत घेतली व सदरच्या बॅटरीला 36 महिन्यांची गॅरंटी होती ही बाब नि.2 (1) वर दाखल बिलावरून स्पष्ट होते. परिणामी तक्रारकर्ता विरुध्द पक्ष यांचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते.
9. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी त्यांच्या जबाबात नमूद केले आहे की, विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी विवादित बॅटरी विरुध्द पक्ष क्रं. 1 यांच्याकडे तपासणीकरिता पाठविली असता दि. 27.03.2017 रोजी तक्रारकर्त्याची बॅटरी तपासणी करून Battery ok & Return या शे-यासह परत पाठविण्यात आली होती. त्याबाबतची जॉबशीट तक्रारकर्त्याने नि.क्रं. 2 (3) वर दाखल केली आहे. त्यामध्ये बॅटरी तपासणीचा अहवाल असून त्याचे अवलोकन केले असता बॅटरीचे व्होल्टेज 10.87 असे तपासणीनंतर नमूद केले आहे. नि.क्रं. 2 वर दाखल गॅरन्टी कार्ड मध्ये नमूद केल्याप्रमाणे अल्टरनेटर जवळ व्होल्टेज 14 व्होल्ट तसेच 12 व्होल्ट इतके असणे गरजेचे असल्याचे नमूद आहे. विरुध्द पक्षाने बॅटरी योग्य असल्याचे नमूद केले असले तरी ही बाब सिध्द करण्याकरिता ज्या तज्ञ व्यक्तीने बॅटरची तपासणी केली त्याचे शपथपत्र विरुध्द पक्षाने आपल्या कथनाच्या समर्थनार्थ दाखल केले नाही. तसेच त्या रिपोर्ट मध्ये तपासणी अंती व्होल्टेज केवळ 10.87 असल्याचे नमूद आहे. परिणामी विरुध्द पक्षाने विवादित बॅटरी योग्य असल्याबाबतचा कोणताही तांत्रिक पुरावा दाखल केला नाही.
10 तसेच विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी त्यांच्या जबाबात असा बचाव घेतला आहे की, तक्रारकर्त्याने बॅटरी तपासणीकरिता पाठविली असता त्या बॅटरी मध्ये दोष नव्हता. तर तक्रारकर्त्याच्या वाहनाच्या अल्टरनेटर मध्ये दोष असल्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होत होती. याबाबत देखील विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी कोणताही तांत्रिक पुरावा दाखल केला नाही. तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास सर्विस बॅटरी रुपये 100/- प्रति दिवस या दराने दिली होती. त्याची भाडयाची रक्कम रुपये 40,200/- तक्रारकर्त्याने दिली नाही असा देखील विरुध्द पक्ष 2 चा बचाव असला तरीही गॅरन्टी कालावधीत बॅटरी मध्ये दोष आढळल्यास ती दुरुस्त करुन देण्याची अथवा बदलून देण्याची विरुध्द पक्षाची जबाबदारी असतांना विरुध्द पक्षाने सदरची बॅटरी बदलून दिली नाही, तसेच पर्यायी दिलेल्या बॅटरी पोटी तक्रारकर्त्याकडून रुपये 40,200/- एवढी अवास्तव भाडयाची मागणी करणे तसेच बॅटरी योग्य असल्याबाबत कोणताही तांत्रिक पुरावा दाखल न करता दोषपूर्ण बॅटरी गॅरन्टी कालावधीत असतांना बदलून न देणे ही बाब विरुध्द पक्षाची अनुचित व्यापार प्रथा व दोषपूर्ण सेवा दर्शविते असे आयोगाचे मत आहे. यास्तव मुद्दा क्रमांक 1 व 2 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी नोंदवित आहोत.
11 मुद्दा क्रमांक 3 बाबत - मुद्दा क्रमांक 1 व 2 चा निष्कर्षावरुन विरुध्द पक्षाने दोषपूर्ण सेवा दिली असल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून विवादीत सदोष बॅटरी बदलून मिळण्याची मागणी केली आहे. सदरचे प्रकरण सन 2017 पासून आयोगा समक्ष प्रलंबित आहे. तक्रारदार तक्रारीत नमूद वाहनाचा सध्या वापर करीत असल्याबाबतचा कोणताही पुरावा दाखल नाही. परिणामी विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास बॅटरीची किंमत रक्कम रुपये 4,900/-, दि.27.03.2017 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज मिळण्यास, तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मिळण्यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला बॅटरीची किंमत रक्कम रुपये 4,900/- व त्यावर दि.27.03.2017 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह द्यावे.
- विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- द्यावे.
- विरुध्द पक्षाने उपरोक्त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 45 दिवसाच्या आत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.