द्वारा घोषित - श्रीमती ज्योती पत्की, सदस्य तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराने ऑगस्ट 2008 मध्ये गैरअर्जदाराकडे शॉर्ट टर्म कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी प्रवेश घेतला. त्यावेळेस तक्रारदाराने कॉम्प्युटर कोर्सची फीस गैरअर्जदाराच्या म्हणण्यावरुन भारत मिशनच्या नावाने जमा केली. परंतु त्याची पावती गैरअर्जदाराने दिली नाही. गैरअर्जदाराने ऑगस्ट 2008 ते फेब्रूवारी 2009 पर्यंत फक्त आठ पिरीयडस घेतले. तक्रारदाराने पिरियडच्या अनियमीततेबाबत चौकशी केली. परंतु त्यांनी फॅकल्टी नियुक्त करावयाची आहे व त्यानंतर नियमीत पिरीयड होतील असे सांगितले.त्यानंतर पिरीयड्स झालेच नाहीत म्हणून तक्रारदाराने मार्च 2009 मध्ये गैरअर्जदारास फिस परत मागितली असता त्यांनी इंड्सइंड बँकेचा दिनांक 15/9/2009 चा रु 3000/- चा धनादेश दिला. सदर धनादेश न वटता खाते बंद असल्याच्या शे-यासह परत आला म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून 5100/- ऑगस्ट 2008 पासून 12 टक्के व्याजदराने, मानसिक व शारीरिक त्रासापोटी मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदारास मंचातर्फे पाठविण्यात आलेली नोटीस त्यांना प्राप्त होऊनही ते गैरहजर राहिले म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. मंचानी तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीचे व कागदपत्राचे तसेच शपथपत्राचे अवलोकन केले. तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराने आपल्या तक्रारीमध्ये शॉर्ट टर्म कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी गैरअर्जदाराकडे किती फीस जमा केली याबाबत कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. परंतु गैरअर्जदाराने तक्रारदारास दिनांक 15/9/2009 रोजी दिलेली रक्कम रु 3000/- चा धनादेशाचे अवलोकन केले असता तक्रारदाराने गैरअर्जदारास कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी रक्कम रु 3000/- दिलेले असावेत असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदारास गैरअर्जदाराने दिलेले रु 3000/- चा धनादेश दिलेला असला तरी तो खाते बंद असल्यामुळे परत आलेला आहे हे चेक रिटर्न स्लिपवरुन दिसून येते. त्यामुळे गैरअर्जदाराने तक्रारदाराकडून शॉर्टटर्म कम्प्युटर कोर्ससाठी फीस स्विकारुनही, कोर्स पूर्ण शिकवला नाही तसेच त्यासाठीची रक्कमही परत केली नाही ही गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी ठरते व गैरअर्जदाराने अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्याचे स्पष्अ होते. म्हणून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदाराने या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांचे आत तक्रारदारास रक्कम रु 3000/- दिनांक 15/9/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने द्यावेत व तक्रारीचा खर्च म्हणून रु 1,000/- द्यावेत. (श्रीमती ज्योती पत्की ) (श्रीमती रेखा कापडिया ) (श्रीमती अंजली देशमुख ) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |