(मंचाचे निर्णयान्वये, अधि. वर्षा जामदार, मा. सदस्या) (पारीत दिनांक :22.03.2011) 1. अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये दाखल केली आहे. अर्जदार ही मय्यत तुकाराम भिवाजी गणवीर यांची विधवा पत्नी आहे. मय्यत तुकाराम भिवाजी गणवीर हे डब्लु.सी.एल.दुर्गापूर येथे कार्यरत होते. त्यांच्या मृत्युनंतर मिळणारी जीपीएफ व इतर देय रक्कम अर्जदार व मय्यत तुकारामच्या पहिल्या घटस्फोटीत पत्नीपासून झालेले दोन मुल प्रमोद व विजय गणवीर यांनी आपसात वाटून घेतले. अर्जदार बाईच्या हिश्याला मिळालेली रक्कम अर्जदार बाईच्या बचत खाते क्र.13522 यामध्ये जमा करण्यात आले. हे खाते गै.अ.च्या शाखेत आहे. अर्जदार बाईनी दि.23.8.10 रोजी रुपये 5000/- स्वतःच्या खात्यातून काढण्याकरीता विड्राल फार्म कॅश काऊंटरवर जमा केला. परंतु, गै.अ.बँकेच्या कॅशीअरने अर्जदारास पैसे देण्यास नकार दिला. अर्जदार बाईने बँकेच्या शाखा व्यवस्थापकास विचारपूस केली असता, रेवंता तुकाराम गणवीर, प्रमोद तुकाराम गणवीर व विजय तुकाराम गणवीर यांनी अर्जदार बाईच्या खात्यात जमा असलेल्या रकमेवर त्यांचा अधिकार असल्याचे सांगितले असून, त्या आशयाचा नोटीस बँकेस पाठविला आहे व त्यामुळे गै.अ.ने अर्जदार बाईस रक्कम देण्यास नकार दिला. रेवंता तुकाराम गणवीर ही मय्यत तुकाराम गणवीर यांची घटस्फोटीत पत्नी आहे. अर्जदार बाईने डब्लु.सी.एल कडून तिच्या हिश्याला मिळालेली रक्कम सदर खात्यात जमा केली होती. अर्जदार बाईला उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे सदर खात्यात जमा असलेल्या रकमेवर ती अवलंबून आहे. गै.अ. किंवा इतर कोणालाही अर्जदार बाईला सदर खात्यातून रक्कम काढण्यास मनाई करण्याचा अधिकार नाही. तसेच, मय्यताचे घटस्फोटीत पत्नी व मुलांना नोटीसचा आधार घेवून अर्जदाराच्या खात्या संबंधी देवान-घेवाण करण्यास अडथळा निर्माण करण्याचा कोणताही अधिकार नाही. गै.अ.कडे खात्यातील रक्कम अर्जदार बाईस न देण्याबद्दल कोणत्याही सक्षम कोर्टाचा मनाई हुकूम किंवा स्थगनादेश नाही. त्यामुळे, नोटीसचे आधारे अर्जदार बाईची रक्कम अडवून ठेवणे व ती रक्कम काढण्यास मनाई करणे, ही गै.अ.ने केलेली सेवेतील न्युनता आहे. तसेच, गै.अ.ने अवलंबलेली अनुचीत व्यापार पध्दती आहे. अर्जदार बाईला रक्कम न मिळाल्यामुळे तिने दि.9.9.10 रोजी अधि.पी.एम.आवारी मार्फत रजिस्टर्ड पोहचपावतीसह नोटीस पाठवून रक्कम विड्रा करण्यामध्ये अडथळा निर्माण करु नये, असे कळविले. सदर नोटीस मिळूनही गै.अ.ने नोटीसची दखल घेतली नाही. त्यानंतर पुन्हा अर्जदार बाई गै.अ.कडे असलेल्या तिच्या खात्यातील रक्कम काढण्याकरीता गेली असता, ती रक्कम देण्यात आली नाही. गै.अ.च्या या कृत्यामुळे अर्जदाराला शारिरीक, मानसिक, व आर्थिक ञास सहन करावा लागला. त्यामुळे नुकसान भरपाई रुपये 5000/- देण्याचा आदेश गै.अ.विरुध्द व्हावा व अर्जदार बाईस आलेला केसचा खर्च रुपये 5000/- गै.अ.वर लावण्यात यावा, या मागणीसह गै.अ.ने अवलंबलेली व्यापार पध्दती ही अनुचीत व्यापार पध्दती असून ती न्युनतापूर्ण सेवा ठरविण्यात यावी व अर्जदार बाईला तिच्या खात्यातील रक्कम काढण्यास अडथळा करुन नये असा आदेश पारीत करण्यात यावा, अशी मागणी अर्जदार बाईने केली आहे. अर्जदाराने नि.4 नुसार 4 दस्ताऐवज दाखल केलेले आहेत. 2. अर्जदाराची तक्रार दाखल करुन गै.अ.विरुध्द नोटीस काढण्यात आला. गै.अ.ने हजर होऊन नि.11 नुसार आपले लेखी बयान दाखल केले. गै.अ.चे म्हणणे नुसार अर्जदार बाईचे नावे खाता क्र.13552 हा गै.अ.च्या शाखेमध्ये आहे व त्यामध्ये दि.14.5.10 पर्यंत अर्जदार बाईने रुपये 39,577/- जमा करण्यात आले आहेत. दि.18.8.10 ला श्रीमती रेवंता तुकाराम गणवीर, प्रमोद तुकाराम गणवीर व विजय तुकाराम गणवीर यांनी त्यांचे वकील श्री प्रशांत गोळे, नागपूर यांचेमार्फत गै.अ.यांना नोटीस पाठवून असे कळविले की, मय्यत तुकाराम गणवीर यांची कायदेशीर वारस हे असून त्यांच्या मृत्यु नंतर मिळणा-या पैशावर अर्जदार बाईचा कोणत्याही प्रकारचा हक्क नाही. म्हणून अर्जदार बाईस तुमचा हक्क सिध्द करण्यासाठी सक्षम न्यायालयातून आदेश घेवून या असे गै.अ.ने सांगितले. अर्जदार बाईने असे न करता वास्तविकता लपवून ठेवून सदर मंचासमोर खोटी तक्रार दाखल केली. अर्जदार श्रीमती रेवंता तुकाराम गणवीर, प्रमोद तुकाराम गणवीर व विजय तुकाराम गणवीर यांना सुध्दा तक्रारीत जोडणे अत्यंत गरजेचे होते, परंतु जाणून-बुजून त्यांना सदर तक्रारीत जोडण्यात आलेले नाहीत. अर्जदार बाईच्या या कृत्यावरुन असे सिध्द होते की, अर्जदार बाई मय्यत तुकाराम गणवीर यांची विधीवत पत्नी नाही, म्हणून त्यांना तक्रारीमध्ये पक्ष केलेले नाही. अर्जदार बाईने गै.अ.समोर तिचा हक्क दर्शविणारे कुठलेही दस्ताऐवज पेश केले नाही, तसेच मय्यत तुकाराम यांचे मृत्युनंतर अर्जदार बाईस देण्यात यावे, म्हणून त्यांना नामांकितही केले नाही. त्यामुळे, सदर तक्रार खोटी असून खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी मागणी गै.अ.ने केली आहे. गै.अ.ने नि.13 नुसार 3 दस्ताऐवज दाखल केलेले आहेत. 3. अर्जदाराने नि.16 नुसार दाखल केलेले शपथपञ गै.अ.ने नि.15 नुसार लेखी बयान हेच पुरावा समजण्यात यावे अशी दाखल केलेली पुरसीस, अर्जदार व गै.अ. यांचे वकीलांनी केलेल्या तोंडी युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष काढण्यात येतात. @@ कारणे व निष्कर्ष @@ 4. गै.अ.ने ही बाब मान्य केली कि, अर्जदार बाईला दि.30.8.10 रोजी रुपये 5000/- स्वतःच्या खात्यातून काढण्याकरीता विड्रॉअल फॉर्म कॅश कॉउन्टरवर जमा केला असता, तिला रक्कम देण्यास नकार देण्यात आला. गै.अ.ने असे करण्याचे कारण की, रेवंता तुकाराम गणवीर, प्रमोद तुकाराम गणवीर, आणि विजय तुकाराम गणवीर ह्यांनी गै.अ.ला नोटीस पाठवून अर्जदाराचा त्या पैसावर हक्क नसल्याचे कळविले. मुळात खाते हे अर्जदाराच्या नावाचे आहे, त्यामुळे तिस-या व्यक्ती व्दारे गै.अ.ला खात्या संबंधी सुचना देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दुसरे गै.अ.ने तिस-या व्यक्तीच्या नोटीसचा आधार घेऊन अर्जदार बाईला पैसे देण्यास नकार कोणत्या नियमा अंतर्गत दिला ? अर्जदार बाईचे खात्यावर फक्त अर्जदार बाईचा फक्क आहे. त्यामुळे, तिने सांगितल्या शिवाय किंवा तिची कुठल्या कर्जाची रक्कम थकीत असल्या शिवाय गै.अ. अर्जदार बाईला तिच्या खात्यातील व्यवहारा संबंधी बंधन आणू शकत नाही. त्यामुळे, अर्जदार ही मय्यत तुकाराम गणवीर ची विधीवत पत्नी आहे किंवा नाही त्याचा संबंध खाते व्यवहाराशी येत नाही. गै.अ.ने रेवंता गणवीर व त्यांच्या दोन मुलांच्या नोटीस प्राप्ती नंतर अर्जदार बाईला वारस हक्क असल्याचा सक्षम न्यायालयातून आदेश आणण्याबाबत सांगितले. परंतु, गै.अ.कडे रेवंता गणवीर व इतर दोन मुंल ह्यांचा हक्क असल्याचे सिध्द करायला सांगितले नाही, तशी मागणी केल्याचेही नमूद नाही. उलटपक्षी, फक्त नोटीसच्या आधारे त्यांची बाजू ग्राह्य धरुन अर्जदाराला स्वतःच्या खात्यातील पैसे काढण्यास नकार दिला. अर्जदार बाईच्या खात्यात मय्यत तुकाराम गणवीर यांच्या नावाने असलेल्या मियादी जमा झाली किंवा नाही, अर्जदार बाईचा हक्क आहे किंवा नाही, तसेच हे सांगण्याचा हक्क रेवंता बाईला आहे किंवा नाही, ह्या सर्व बाबींची शहानिशा करुन योग्य न्यायालयाकडून आदेश प्राप्त करुन जर गै.अ.कडे कुणी दाखल केला असता, तर त्यावर विचार करण्याजोगे होते. परंतु, तसे कुठलेही संयुक्तीक कारण व त्याला ठोस आधार नसतांना गै.अ.ला अर्जदाराच्या खात्यातील कुठलाही व्यवहार थांबविण्याचा हक्क नाही. त्यामुळे, गै.अ. अर्जदाराला स्वतःच्या खात्यातून रक्कम काढण्या संबंधी दिलेला नकार हा न्युनतापूर्ण सेवे मध्ये मोडतो. गै.अ.च्या ह्या कृतीमुळे अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासासाठी गै.अ. जवाबदार आहे. त्यामुळे, अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे, ह्या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असून, खालील आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) गैरअर्जदाराने, अर्जदाराला तिचे खाते क्र.13522 मधील रक्कम काढण्यास अडथळा करु नये. (2) गैरअर्जदाराने, अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 3000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे. (3) तक्रारीचा खर्च रुपये 1000/- गैरअर्जदाराने, अर्जदाराला द्यावा. (4) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member | |