निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार प्रविणकुमार पि. उध्दवराव केंद्रे हा पावडेवाडी नाका नांदेड येथील रहिवासी असून तो सुशिक्षित बेकार आहे. अर्जदार सुशिक्षित बेकार असल्याने पंतप्रधान रोजगार हमी योजने अंतर्गत सन 2007-2008 मध्ये गैरअर्जदार बँकेकडे पंतप्रधान रोजगार हमी योजने अंतर्गत रु.80,000/- ची मागणी केली. अर्जदार हा पंतप्रधान रोजगार हमी योजने अंतर्गत व्यापाराचे प्रशिक्षण घेवून कर्ज मिळण्यास पात्र झाल्यामुळे अर्जदारास रु.73,000/- चे कर्ज मंजूर करण्यात आले. सदर पंतप्रधान रोजगार हमी योजने अंतर्गत मिळालेल्या कर्जापैकी 35 टक्के सबसिडी देण्यात येते व मंजूर झालेले कर्ज 5 वर्षात पूर्ण भरणा करण्याची तरतुद आहे. परंतू गैरअर्जदार बँकेकडून कर्ज मंजूर करण्यासाठी अर्जदाराकडून रु.20,000/- चे डिपॉझिट करुन घेण्यात आले. अर्जदाराने 2 वर्षात सबसिडीची रक्कम वजाजाता उर्वरीत कर्ज रक्कम रु.37,750/- ची परतफेड केली. गैरअर्जदार यांनी बेबाकी प्रमाणपत्र (No Dues Certificate) देण्यात यावे अशी विनंती अर्जदाराने केली असता नंतर देण्यात येईल अशी ग्वाही दिली. दिनांक 09/09/2013 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास उर्वरीत शिल्लक रक्कम रु.21,600/- भरण्यास सांगितले. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जावून स्वतः रक्कमेचा भरणा केला तरी देखील अर्जदारास बेबाकी प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. शेवटी दिनांक 03/12/2013 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास रु.22,196/- च्या वसुलीची नोटीस पाठवली व सदर पैसे भरले नाही तर आपला फोटो वर्तमानपत्रात प्रकाशीत केला जाईल, अशी धमकी दिली. गैरअर्जदाराच्या सदर कृत्यामुळे अर्जदारास शारीरिक व मानसिक त्रास झाला. अर्जदारास वसुलीची नोटीस मिळाल्यानंतर दिनांक 10/12/2013 रोजी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जावून रक्कम भरलेली आहे. अर्जदाराचा फोटो वर्तमानपत्रात प्रसिध्द करु नका व अर्जदारास बेबाकी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी विनंती केली असता गैरअर्जदाराने नकार दिला त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली व मंचास विनंती केली की, अर्जदारास बेबाकी प्रमाणपत्र देण्याचा गैरअर्जदारांना आदेश व्हावा तसेच मानसिक, शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु.5,000/- गैरअर्जदार यांनी देण्याबाबत आदेश व्हावा.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस तामील झाल्यानंतर ते मंचासमोर हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदाराने आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदाराचा युक्तीवाद ऐकला. अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
2. अर्जदार हा PMRY योजनेचा लाभार्थी होता हे गैरअर्जदार यांनी जनरल मॅनेजर, डी.आय.सी. यांना दिनांक 05/05/2007 रोजी लिहिलेल्या पत्राच्या प्रतीवरुन स्पष्ट होते. सदर योजने अंतर्गत अर्जदाराचे खाते क्र. LN 33001270 हे गैरअर्जदार बँकेत होते, हे अर्जदाराने दाखल केलेल्या सदर बँकेच्या स्टेटमेंट(खातेउतारा) वरुन स्पष्ट आहे. अर्जदाराचे म्हणणे आहे की, अर्जदाराने रु.12,000/- सोडून घेतलेली सर्व रक्कम व्याजासहीत सन 2010 मध्येच भरलेली आहे. अर्जदाराने रु.12,000/- भरलेले नाहीत. कारण त्याची रु.12,000/- सबसिडी बँकेत जमा होणार होती व कर्जाची पुर्ण परतफेड होणार होती. तरीपण गैरअर्जदार बँकेने अर्जदारास रु.22,196/- भरणेसाठी दिनांक 03.12.2013 रोजीचे पत्र दिले व डिफॉल्टर म्हणून वर्तमानपत्रात नाव व फोटो देण्याची धमकी दिली. अर्जदाराच्या सदरच्या म्हणणेत तथ्य दिसते कारण गैरअर्जदाराने अर्जदारास तसे पत्र दिनांक 03.12.2013 रोजी दिलेले आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्या त्याच्या खातेउता-याचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट आहेत.
3. अर्जदाराचा दिनांक 29.09.2010 रोजीचा बॅलन्स हा रु.12,012/- एवढाच आहे. तसेच त्यानंतर अर्जदाराने त्याच्या खात्यातून कुठलीही रक्कम काढलेली दिसत नाही. त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराच्या खात्यावर दिनांक 31.10.2010 पासून ते दिनांक 18.02.2013 पर्यंत व्याज व इतर चार्जेस लावलेले आहेत. दिनांक 25.11.2013 रोजी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये अर्जदाराच्या नावाने रु.17,446/- येणे दाखविलेले आहेत. म्हणजेच रक्कम रु. 5,434/- व्याज व चार्जेस लावलेले आहेत. अर्जदाराने गैरअर्जदाराची दिनांक 03.12.2013 ची नोटीस मिळाल्यानंतर दिनांक 10.12.2013 रोजी गैरअर्जदाराकडे रक्कम भरणा केलेली आहे व ‘नो-डयुज प्रमाणपत्र’ मागीतले असता, गैरअर्जदाराने नकार दिलेला आहे असे कथन केलेले आहे व अर्जदाराचे हे कथन गैरअर्जदार यांनी नाकारलेले नाही.
4. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही ते मंचात हजर होऊन त्यांनी त्यांचे म्हणणे मांडलेले नाही. यावरुन त्यांना अर्जदाराच्या तक्रारीतील संपूर्ण कथन मान्य आहे हे स्पष्ट होते. गैरअर्जदाराने अर्जदारास बेबाकी, ‘’नो-डयुज प्रमाणपत्र’’ देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी केली असल्याचे मंचाचे मत आहे व तसे करुन अर्जदारास मानसिक त्रास दिलेला आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत बेबाकी प्रमाणपत्र (No Dues Certificate) दयावे.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्चापोटी रु.2,500/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.