(घोषित दि. 23.11.2010 व्दारा सौ.ज्योती ह.पत्की, सदस्या) या तक्रारीची हकीकत थोडक्यात खालील प्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने जुना जालना येथील योगेश्वरी नगरमधे असलेल्या प्लॉट क्रमांक 38/1 वर घर बांधण्यासंदर्भात गैरअर्जदार श्री अलियास आब्रहम याचेसोबत दिनांक 16.04.2010 रोजी करार केला होता. गैरअर्जदार आलियास आब्रहम याने त्याच्या घराचे 775 चौरस फुटाचे बांधकाम त्यासाठी लागणारे साहित्य व मजुरीसह प्रति चौरस फुट रुपये 340/- प्रमाणे करुन देण्याचे मान्य केले होते. कराराप्रमाणे त्याने गैरअर्जदाराला बांधकामासाठी वेळोवेळी रुपये 1,46,000/- उचल दिली होती. अशा प्रकारे गैरअर्जदाराने बांधकामा संदर्भात कराराप्रमाणे ठरलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम मिळूनही 30 % काम देखील पुर्ण केले नाही आणि अगाऊ उचल मिळावी म्हणून दिनांक 03.06.2010 पासून काम बंद केले. गैरअर्जदाराने अगोदरच जास्त उचल घेतलेली असून त्याने काम बंद करु नये अशी त्याने गैरअर्जदाराला वारंवार विनंती केली. परंतू त्याने काम सुरु केले नाही. म्हणून त्याने दिनांक 30.06.2010 रोजी गैरअर्जदाराला रजिस्टर्ड पोस्टाने पत्र पाठवून काम सुरु करण्याची विनंती केली. परंतू त्यानंतरही त्याने काम सुरु केले नाही. गैरअर्जदाराने काम अर्धवट ठेवल्यानंतर ते काम स्वत: त्यालाच पुर्ण करुन घ्यावे लागले. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदाराने कामासाठी अतिरिक्त उचल घेतलेली रक्कम रुपये 66,000/-, अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी लागलेला खर्च रुपये 15,000/-, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- आणि इतर खर्च रुपये 5,000/- असे एकूण रुपये 96,000/- गैरअर्जदाराकडून मिळावेत. गैरअर्जदारास मंचातर्फे पाठविलेली नोटीस “Unclaimed” अशा शे-यासह विनातामील परत आली. म्हणून गैरअर्जदाराला वर्तमानपत्रातून जाहीर नोटीस (नि.9) देण्यात आली. परंतू गैरअर्जदार मंचासमोर उपस्थित झाले नाहीत. त्यामुळे गैरअर्जदाराचे विरुध्द सदर तक्रार एकतर्फी चालविण्यात आली. तक्रारदाराच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी आहे काय ? होय 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदाराने स्वत: युक्तीवाद केला. तक्रारदाराने दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारदाराने गैरअर्जदारासोबत बांधकाम करुन देण्याबाबत केलेल्या कराराची प्रत (नि.3/8) दाखल केली आहे. सदर करारावरुन असे दिसून येते की, गैरअर्जदार अलियास आब्रहम हे मेरी माता कन्स्ट्रक्शन या नावाने बांधकाम करुन देण्याबाबत गुत्तेदारी करतात. सदर कराराद्वारे गैरअर्जदाराने तक्रारदाराचे बांधकाम प्रति चौरस फुट रुपये 340/- प्रमाणे करुन देण्याचे कबुल केले होते हे स्पष्ट दिसून येते. बांधकामासाठी तक्रारदाराने गैरअर्जदाराला दिनांक 24.04.2010 रोजी पावती नि.3/1 द्वारे रुपये 50,000/-, दिनांक 08.05.2010 रोजी पावती नि.3/2 द्वारे रुपये 20,000/- आणि त्याच दिवशी पावती नि.3/3 द्वारे रुपये 30,000/- तसेच दिनांक 21.04.2010 रोजी पावती नि.11/4 द्वारे रुपये 26,000/- दिल्याचे स्पष्ट दिसून येते. अशा प्रकारे तक्रारदाराने गैरअर्जदाराला बांधकामासाठी एकूण रुपये 1,26,000/- दिल्याचे दिसते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदाराने त्याचे बांधकाम केवळ 30% केले. तक्रारदाराचे सदर म्हणणे गैरअर्जदाराने मंचासमोर उपस्थित राहून खोडलेले नाही आणि तक्रारदाराच्या म्हणण्यावर अविश्वास दाखवावा असे कोणतेही कारण नाही. त्यामुळे ही बाब सिध्द् होते की, गैरअर्जदाराने करारानुसार तक्रारदाराचे बांधकाम पुर्ण न करता केवळ 30 % बांधकाम करुन पुढील बांधकाम करण्यास नकार दिला. वास्तविक तक्रारदाराने त्यास बांधकामासाठी आगाऊ उचल म्हणून रुपये 1,46,000/- एवढी रक्कम दिलेली होती. अशा परिस्थितीत गैरअर्जदाराने तक्रारदाराचे बांधकाम अर्धवट अवस्थेत सोडणे योग्य नव्हते. गैरअर्जदाराने तक्रारदाराचे बांधकाम अर्धवट सोडून त्रुटीची सेवा दिलेली आहे असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. तक्रारदाराने त्यास गैरअर्जदाराकडून एकूण रुपये 96,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. त्यापैकी रुपये 66,000/- अतिरिक्त उचल असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. परंतू गैरअर्जदाराने तक्रारदाराकडून घेतलेली रक्कम रुपये 1,26,000/- आणि त्याने केलेले 30 % बांधकाम या बाबींचा विचार केला तर गैरअर्जदाराने तक्रारदाराचे एकूण 79,000/- एवढया रक्कमेचे बांधकाम केल्याचे दिसून येते. त्यामुळे गैरअर्जदाराने तक्रारदाराकडून एकूण रुपये 47,000/- अतिरिक्त उचल घेतल्याचे स्पष्ट दिसून येते. म्हणून तक्रारदार गैरअर्जदाराकडून रुपये 47,000/- अतिरिक्त उचल, त्रुटीच्या सेवेबद्दल रुपये 5,000/-, मानसिक त्रासापोटी रुपये 2,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- असे एकूण रुपये 54,500/- मिळण्यास पात्र आहे असे आमचे मत आहे. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- गैरअर्जदाराने तक्रारदारास अतिरिक्त उचल घेतलेली रक्कम रुपये 47,000/-, त्रुटीच्या सेवेबद्दल रक्कम रुपये 5,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 2,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 500/- असे एकूण रक्कम रुपये 54,500/- (रुपये चोपन हजार पाचशे फक्त) निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावेत.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |