Dated the 12 May 2016
“ एकत्रित न्याय निर्णय ”
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. वर नमूद केलेल्या 05 तक्रारींमध्ये विरुध्दपक्ष हे सारखेच आहेत तसेच उभयपक्षांतील वादविषय सुध्दा समान आहेत, त्यामुळे कामकाजाच्या सोयीचे दृष्टीने या सर्व तक्रारी एकाच दिवशी निकालासाठी ठेवलेल्या आहेत. तसेच एकत्रित आदेशाद्वारे ही सर्व तक्रार प्रकरणे निकाली काढण्यात येत आहेत ही बाब सर्वप्रथम स्पष्ट करण्यात येते.
2. तक्रारदारांनी सदर प्रकरणांत तक्रारीसोबत पुराव्याचे प्रतिज्ञापत्र (पुरसिस) व लेखी युक्तीवाद व इतर काही आवश्यक कागदपत्रे दाखल केली. वर नमूद केलेल्या सर्व तक्रार प्रकरणांत सामनेवाले यांना जाहिर प्रगटनाव्दारे सुनावणीची नोटीस देऊनही प्रस्तुत सर्व तक्रारींमध्ये सामनेवाले सुनावणीस गैरहजर राहिल्याने सामनेवाले यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारित करणेबाबत मंचाने आदेश केले आहेत. सदर सर्व तक्रारदारांनी कथन केल्याप्रमाणे तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
3. वरील सर्व तक्रार प्रकरणांतील तक्रारदार त्यांच्या तक्रार क्रमांकाखाली दिलेल्या पत्यावर रहातात. सामनेवाले आकृती बिल्डर्स व डेव्हलपर्स पार्टनरशिप फर्म असून श्री.संतोष भानुसे हे त्याचे अधिकृत भागीदार असल्याचे तक्रारदार यांनी नमुद केले आहे. सामनेवाले हे आकृती बिल्डर्स व डेव्हलपर्स या नांवाने इमारत बांधकामाचा व्यवसाय करतात. सामनेवाले यांचा कार्यालयीन पत्ता वर नमुद केल्या प्रमाणे आहे. तक्रारदार म्हणतात सामनेवाले यांनी नेवाळी नाका, मौजे-कल्याण चाळीसाठी, सर्व्हे नं.82, हिस्सा क्रमांक-6 येथील जमिन मिळकतीवर भव्य घरकुल योजने अंतर्गत आकृती बिल्डर्स व डेव्हलपर्स या नांवाने बांधण्यात येणा-या चाळींची भव्य घरकुल योजना आखली, तसेच वर नमुद पत्यावर सामनेवाले यांचेकडून बांधण्यात येणा-या चाळी मधील खोल्या/ गाळे तक्रारदार यांना तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे मोबदल्याच्या किंमतीत विकण्याचे ठरविले. खालील तक्त्याप्रमाणे प्रत्येक तक्रारदार यांनी सदर चाळीमध्ये बांधण्यात येणा-या व तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे आरक्षीत केलेल्या खोल्यांबाबत सामनेवाले यांना रक्कमा अदा केल्या, त्याबाबत सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी पावत्याही दिलेल्या आहेत. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून एकूण मोबदल्याच्या रकमेपैंकी मोठया प्रमाणात रक्कम स्विकारुन तसेच काही तक्रारींमध्ये पुर्ण मोबदल्याची किंवा मोबदल्या व्यतिरिक्त अतिरीक्त रक्कम स्विकारुनही सदर चाळीमधील खोल्यांबाबत तक्रारदार यांच्याशी रितसर व कायदेशीर करारनामा स्वाक्षरित केला नाही,अथवा नोंदवूनही दिला नाही. तक्रारदार यांनी याबाबत सामनेवाले यांचेकडे वारंवार विचारणा केल्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याशी खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे समझोता करार स्वाक्षरीत केला, व सदर समझोता करार केवळ साक्षांकित करण्यात आला, परंतु अदयापपर्यंत सामनेवाले यांनी तक्रारदार यांना, त्यांनी सामनेवाले यांचेकडे आरक्षीत केलेल्या चाळी मधील खोल्यांचा ताबा सदर चाळीचे बांधकाम करुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिला नाही, तसेच तक्रारदार यांनी याबाबत चौकशी केली असता सदर भुखंड शासनाच्या मालकीचा असल्याचे तक्रारदार यांना चौकशी अंती व वृत्तपत्राव्दारे समजले, म्हणून सामनेवाले यांचे विरुध्द तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारी ग्राहक मंचात दाखल करुन तसचे तक्रारदार यांनी सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे जाहिर करावे, व सामनेवाले यांना सदनिका खरेदीपोटी भरलेली रक्क्म व्याजासह सामनेवाले यांनी तक्रारदार यांना परत करावी, व तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे मानसिक त्रासापोटीची रक्कम तसेच न्यायिक खर्चाबाबतची रक्कम इत्यादिची मागणी केली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे बुक केलेल्या खालील तक्त्यात नमुद केलेल्या सदनिकांचा ताबा लवकरात लवकर देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्याचा तपशील खालील प्रमाणे......
अ.क्र. | तक्रार क्रमांक | तक्रारदाराचे नांव | सामनेवाले यांचे नांव | एकूण मोबदला रुपये | तक्रारदाराने सामनेवाले यांना दिलेली रक्कम | सदनिका क्रमांक, इमारत नांव,व एरिया | सामनेवाले यांना एकूण रक्कम दिल्याची तारीख | समझोता कराराची तारीख | तक्रारदार यांनी मागणी केलेली रक्कम |
1. | 180/15 | Shri Mohan Maruti Rokade | Akruti Builders And Developers Through its Authorized Partner Shri. Santosh Shankarrav Bhanuse | 3,20,000/- | 2,31,104/- | भव्य घरकुल योजना,नेवाळी तलाठी सजा, मौजे कल्याण सर्व्हे नं.82, हिस्सा नं.6 1 बीएचके 350 चौरस फुट | ता.26.07.13 | ता.27.02.13 | नुकसानभरपाई रु.100000/- तक्रार खर्च रु.50000/- |
2. | 181/15 | Shri Premchandra Banshilal Agrahari | Akruti Builders And Developers Through its Authorized Partner Shri. Santosh Shankarrav Bhanuse | 2,80,000/- | 1,71,666/- | भव्य घरकुल योजना,नेवाळी तलाठी सजा, मौजे कल्याण सर्व्हे नं.82, हिस्सा नं.6 1 बीएचके 350 चौरस फुट | ता.09.08.14 | ता.16.01.14 | नुकसानभरपाई रु.100000/- तक्रार खर्च रु.50000/- |
3. | 182/15 | Shri Santosh Pandurang Nalawade | Akruti Builders And Developers Through its Authorized Partner Shri. Santosh Shankarrav Bhanuse | 2,10,000/- | 1,60,423/- | भव्य घरकुल योजना,नेवाळी तलाठी सजा, मौजे कल्याण सर्व्हे नं.82, हिस्सा नं.6 1 आरके 250 चौरस फुट | ता.30.09.14 | ता.06.02.13 | नुकसानभरपाई रु.100000/- तक्रार खर्च रु.50000/- |
4. | 183/15 | Shri Ramesh Vaman Kadam | Akruti Builders And Developers Through its Authorized Partner Shri. Santosh Shankarrav Bhanuse | 3,20,000/- | 1,59,446/- | भव्य घरकुल योजना,नेवाळी तलाठी सजा, मौजे कल्याण सर्व्हे नं.82, हिस्सा नं.6 1 बीएचके 350 चौरस फुट | ता.13.10.14 | ता.06.08.14 | नुकसानभरपाई रु.100000/- तक्रार खर्च रु.50000/- |
5. | 184/15 | Shri Anand Krishnan Thangavel | Akruti Builders And Developers Through its Authorized Partner Shri. Santosh Shankarrav Bhanuse | 3,80,000/- | 2,21,662/- | भव्य घरकुल योजना,नेवाळी तलाठी सजा, मौजे कल्याण सर्व्हे नं.82, हिस्सा नं.6 2 बीएचके, 450 चौरस फुट | ता.07.10.14 | ता.04.04.14 | नुकसानभरपाई रु.100000/- तक्रार खर्च रु.50000/- |
4. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाले यांनी त्यांना दिलेले स्किमच्या संदर्भातील कागदपत्रे, सामनेवाले यांना तक्रारदार यांनी अदा केलेल्या रकमे बाबतच्या पावत्या, (छायांकित प्रती )सादर केल्या. व समझोता करारनाम्याची प्रत, तसेच काही तक्रारींमध्ये तक्रारदारांच्या बँकांचे खाते उतारे सादर केलेले आहेत.
5. तक्रारीमध्ये उपलब्ध असलेल्या कागदपत्रांव्दारे मंचाने खालील मुदयांचा तक्रारींच्या निराकणार्थ विचार केला.
मुद्दे निष्कर्ष
अ. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून वरील तक्त्यात नमुद
केल्याप्रमाणे सदनिका विक्रीबाबत मोठयाप्रमाणात रक्क्म
स्विकारुनही तक्रारदार यांना सदर भुखंडावर इमारत बांधुन
तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे बुक केलेल्या सदनिकांचा/खोल्यांचा
ताबा न दिल्यामुळे तक्रारदारांप्रती सदोषपुर्ण सेवा दिली आहे का ?.........................होय.
ब. तक्रारदार सामनेवाले यांचेकडून वरील तक्त्यामध्ये नमुद केल्याप्रमाणे
सदनिका खरेदीपोटी भरलेली रक्कम अंतिम आदेशामध्ये नमुद केल्याप्रमाणे
व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत का ?..........................................................होय.
क. तक्रारदार सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटीची नुकसानभरपाई
व न्यायिक खर्च अंतिम आदेशात नमुद केल्याप्रमाणे मिळण्यास पात्र
आहेत का ?...............................................................................................................होय.
ड. तक्रारीत काय आदेश ?..............................................तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
7.कारण मिमांसा
मुददा अ. तक्रारदार यांनी आकृती बिल्डर्स व डेव्हलपर्स यांच्या तलाठी सजा मौजे-कल्याण सर्व्हे नं.82 हिस्सा नं.6, येथील भव्य घरकुल योजना या स्वस्त घरांच्या विक्री बाबतच्या सामनेवाले यांच्या मौजे-कल्याण येथे बांधण्यात येणा-या भावी प्रकल्पामधील चाळीमध्ये तक्त्यचात नमुद केलेल्या तपशीला प्रमाणे खोल्या आरक्षीत केल्या, त्याबाबत सामनेवाले व तक्रारदार यांच्यात ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांनी वरील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे सामनेवाले यांना सदर चाळीमधील खोलीच्या मोबदल्यापैंकी / मोबदल्याच्या अतिरिक्त रक्कम अदा केली, सामनेवाले यांनी त्याबाबत तक्रारदार यांना दिलेल्या पावत्या (छायांकित प्रती) तक्रारदार यांनी संबंधीत तक्रारीमध्ये निशाणी-1 वर जोडल्या आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे आरक्षित केलेल्या आकृती बिल्डर्स व डेव्हलपर्सच्या बांधण्यात येणा-या चाळीमधील सदर खोल्याबाबतच्या व्यवहारासंदर्भात सामनेवाले यांनी रितसर विक्री करारनामे स्वाक्षरित करुन व नोंदवून देण्याची वेळोवेळी सामनेवाले यांचेकडे मागणी केली, परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्याबाबत सहकार्य न करता केवळ तक्रारदार यांच्याशी सदर चाळीमधील खोल्यांबाबत समझोता करारनामे स्वाक्षरीत केले, व साक्षांकित करुन दिले. सदर समझोता करारनाम्यामध्ये नेवाळी,तलाठी सजा,मौजे-कल्याण सर्व्हे नं.82 हिस्सा नं.6,मिळकतीवर सामनेवाले भव्य घरकुल योजना उभारणार असल्याचे नमुद केले आहे. सामनेवाले व तक्रारदार यांच्यामध्ये सदर आकृती बिल्डर्स व डेव्हलपर्स चाळीमधील आरक्षीत केलेल्या रुमचे क्षेत्रफळ व एकूण मोबदल्याची रक्क्म इत्यादीबाबी वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे नमुद करण्यात आलेल्या आहेत. सदर समझोता करारानुसार सदर मिळकतीवर आकृती बिल्डर्स व डेव्हलपर्स यांनी अन्य कोणाही व्यक्तीबरोबर अन्य कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला नसल्याचे सामनेवाले यांनी नमुद केलेले आहे. तसेच सामनेवाले यांनी काही समझोता करारांमध्ये तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे आरक्षीत केलेल्या खोलीचा ताबा समझोता करारात नमुद केल्याप्रमाणे लवकरात लवकर देण्याचे तक्रारदार यांना कबुल केले आहे,असे असुन देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याशी सदर चाळीमधील खोल्यांच्या विक्रीच्या व्यवहाराबाबत मोठया प्रमाणात रक्कम स्विकारुनही सदर चाळीचे बांधकाम करुन तक्रारदार यांना त्यांनी सामनेवाले यांचेकडे आरक्षित केलेल्या खोलीचा ताबा अदयाप दिलेला नाही, तसेच त्याबाबतची कायदेशीर कागदपत्रे, करारनामा इत्यादी देखील तयार करुन स्वाक्षरित करुन दिले नाहीत, तसेच सदर योजनेसाठी निश्चित केलेला भुखंड हा शासनाच्या मालकीचा असल्याचे तक्रारदार यांना चौकशी अंती व वृत्तपत्राव्दारे समजले ही बाब सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्यापासुन गुप्त ठेवली, व अशा प्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदार यांची फसवणूक करुन तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे सिध्द होते.
मुद्दा क्र.ब- सामनेवाले यांनी अदयापपर्यंत भव्य घरकुल योजने अंतर्गत बांधण्यात येणा-या चाळीचे बांधकाम सुरु केलेले नाही व नाहक इतकी वर्षे तक्रारदारांकडून घेतलेली रक्कम सामनेवाले यांचेकडे अडकून राहिली असल्याने तक्रारदार यांना दुसरीकडे घर घेणेही अशक्य झाले व आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले त्यामुळे तक्रारदार सामनेवाले यांचेकडे वरील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे सदर सदनिका खरेदीपोटी भरलेली संपुर्ण रक्कम तक्रारदार व सामनेवाले यांच्यातील समझोता कराराच्या तारखेपासुन प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंत दरसाल दर शेकडा 12 टक्के व्याजाने सामनेवाले यांचेकडून परत मिळण्यास पात्र आहेत. सदर रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ता.12.07.2016 पर्यंत अदा करावी. ता.12.07.2016 पर्यंत सदर रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदार यांना अदा न केल्यास सदर रक्कम सामनेवाले यांनी समझोता कराराच्या तारखेपासुन प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंत दरसाल दर शेकडा 15 टक्के व्याजाने तक्रारदार यांना परत करावी.
मुद्दा क्र.क- तक्रारीतील सर्व तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या भव्य घरकुल योजनेत स्वस्त दरात घरे मिळण्याच्या अपेक्षेने सामनेवाले यांचेकडे त्यांच्या कष्टाचे पैसे गुंतवले, परंतु सामनेवाले यांनी, सदर प्रकल्प पुर्ण केला नाही. रितसर विक्री करारनामे स्वाक्षरित करुन तक्रारदार यांना त्यांच्या संबंधीत सदनिकांचा ताबाही दिला नाही व अनेकवर्षे सामनेवाले यांचेकडे तक्रारदारांचे पैसे अडकून राहिल्याने तक्रारदार यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागले, तसेच घराच्या वाढत्या किंमतींमुळे अदयाप दुसरीकडे घर घेणेही अशक्य झाल्याने तक्रारदार यांना जो मानसिक त्रास झाला व वकीलाकरवी ग्राहक मंचात प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागली याबाबत, तक्रारदार सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) व न्यायिक खर्चापोटी प्रत्येकी रक्कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) मिळण्यास पात्र आहेत.
सबब प्रस्तुत सर्व प्रकरणांमध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- अंतिम आदेश -
1.तक्रार क्रमांक- 180/2015, क्रमांक-181/2015, क्रमांक-182/2015, क्रमांक-183/2015,
व क्रमांक-184/2015 अंशतः मंजुर करण्यात येतात.
2.सामनेवाले यांनी तक्रारदार प्रती सदोषपुर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3.सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून सदनिका/खोली खरेदीपोटी घेतलेली संपुर्ण रक्कम (तक्त्यात
दर्शविल्याप्रमाणे) तक्रारदार यांना तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे समझोता कराराच्या
तारखेपासुन ता.12.07.2016 पर्यंत दरसाल दर शेकडा 12 टक्के व्याजासह परत करावी,
असे आदेश सामनेवाले यांना देण्यात येतात. ता.12.07.2016 पर्यंत दिलेल्या मुदतीत
सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर रक्कम 12 टक्के व्याजासह परत न केल्यास सदर
संपुर्ण रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदार यांना समझोता कराराच्या तारखेपासुन प्रत्यक्ष
रक्कम अदा करेपर्यंत दरसाल दर शेकडा 15 टक्के व्याजासह परत करावी.
4. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कारण मिमांसेमध्ये नमुद केल्यानुसार झालेल्या मानसिक
त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) व
न्यायिक खर्चापोटी प्रत्येकी रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) आदेश पारित
तारखेपासुन दोन महिन्यांत दयावेत असे आदेश सामनेवाले यांना देण्यात येतात.
5.आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
6.तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.12.05.2016
जरवा/