(द्वारा श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे- मा. सदस्या)
1. तक्रारदारांनी सामनेवाले बिल्डर्स व डेव्हलपर्स यांनी वर्तमानपत्रात दिलेली “भव्य गृहसंकुल योजने” संदर्भातील जाहिरात सामनेवाले यांच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या कार्यालयाच्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता सामनेवाले यांनी सदर बजेट होमबाबत माहिती दिली.
2. तक्रारदारांनी त्याप्रमाणे सामनेवाले बिल्डर्स यांचेकडून 1 RK (250 चौ.फुट.) ही सदनिका मौ. नेवाळी सर्व्हे नं. 82 हिस्सा नं. 6 येथील रक्कम रु. 2,10,000/- एवढया किंमतीची घेण्याचे दि. 04/03/2014 रोजी निश्चित केले.
3. तक्रारदारांनी सामनेवाले यांना सदर सदनिका खरेदीपोटी एकूण रु. 1,05,000/- एवढी रक्कम अदा केली.
4. तक्रारदारांनी सदनिका खरेदीपोटी रक्कम रु. 1,05,000/- सामनेवाले यांचेकडे देऊनही सामनेवाले यांनी इमारतीचे बांधकाम करुन सदनिकेचा ताबा दिला नाही अथवा तक्रारदारांना सदर रक्कम परत दिली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
5. सामनेवाले यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही ते गैरहजर राहिले तसेच त्यांचेतर्फे कोणताही आक्षेप दाखल नाही. त्यामुळे सामनेवाले यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याबाबत मंचाने आदेश पारीत केला.
6. तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, यांचे मंचाने वाचन केले. तक्रारदारांनी त्यांचे लेखी युक्तीवाद हाच तोंडी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दिली. सबब उपलब्ध कागदपात्रांच्या आधारे मंच खालीलप्रमाणे निष्कर्ष काढीत आहेः
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1. | सामनेवाले यांनी सदनिका खरेदीपोटी तक्रारदारांकडून रक्कम स्विकारुनही सदनिकेचा ताबा न देऊन अथवा सदनिका खरेदीपोटी स्विकारलेली रक्कम परत न देऊन तक्रारदारांना त्रुटीची सेवा दिल्याची बाब तक्रारदारांनी सिध्द केली आहे काय? | होय |
2. | तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहेत काय? | होय |
3. | अंतिम आदेश? | निकालाप्रमाणे |
कारणमिमांसाः
7. सामनेवाले यांनी मौ. नेवाळी नाका, ता. अंबरनाथ सिमेतील तसेच ग्रामपंचायत नेवाळी नाका हद्दीतील तलाठी सजा, मौ. कल्याण येथील जमिन मिळकत सर्व्हे नं. 82, हिस्सा नं. 6 विकसित करुन सदर मिळकतीच्या जागेवर “आकृती बिल्डर्स आणि डेव्हलपर्स” या नांवाने “भव्य घरकुल योजना” वृत्तपत्रामधून जाहिर केली. सदर जाहिरातीद्वारे ग्राहकांना चांगल्यादर्जाचे बांधकाम सुखसोई व सुविधांसह तसेच कमीत कमी पैशांमध्ये मिळण्याबाबतचे ब्रोशर प्रसिध्द केले. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये दि. 04/03/2014 रोजी झालेलया समझोता करारानुसार सदर चाळीमधील रुम क्षेत्रफळ 250 चौ.फू. रक्कम रु.2,10,000/- एवढा मोबदला देऊन तक्रारदारांना विक्री करण्याचे ठरले. तक्रारदारांनी सदर रुम खरेदीपोटी सामनेवाले यांना रक्कम रु. 1,05,000/- अदा केल्याबाबतच्या पावत्या मंचात दाखल आहेत. तक्रारदारांनी बँकेचाखातेउतारा दाखल केला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले यांची फर्म नोंदणीकृत नाही तसेच वर नमूद केलेली मिळकत ही शासनाची जागा आहे. सामनेवाले यांना बांधकाम परवानगी प्राप्त झाल्याची कागदपत्रे अदयापपर्यंत तक्रारदारांना दिलेली नाहीत. त्यामुळे सामनेवाले यांनी सदर मिळकतीचे बांधकाम सुरु केले नाही. तक्रारदारांच्या समझोता करारावर सही केलेल्या सामनेवाले बिल्डर्सच्या भागीदार यांना प्रस्तुत प्रकरणात समाविष्ट केले आहे. अन्य भागीदारांचे नांव व पत्तेबाबतची माहिती तक्रारदारांना नाही. तक्रारदारांचा (Hard Money) कष्टाचा पैसा सामनेवाले यांना खोली खरेदीकरीता दिला आहे. सामनेवाले यांचेतर्फे कोणताही आक्षेप दाखल नाही.
8. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे लेखी-तोंडी तक्रारीद्वारे खोलीचा ताबा मिळण्यासाठी तक्रार केली. परंतु सामनेवाले यांनी खोली खरेदीपोटी रक्कम स्विकारुनही सन 2014 पर्यंत इमारतीचे बांधकाम चालू केले नव्हते. सामनेवाले यांनी तक्रारदारांना मिळकतीबाबतची खरी माहिती न देऊन व्यापा-याचा अनुचित पध्दतीचा वापर (Unfair Trade Practice) केला आहे.
9. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे खोली खरेदीपोटी जमा केलेली रक्कम परत देणे न्यायोचित आहे असे मंचाचे मत आहे.
10. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे खोली खरेदीपोटी रु.1,05,000/- एवढी रक्कम जमा केल्याचे तक्रारीतील दाखल पुराव्यावरुन दिसून येते. तसेच सामनेवाले यांनी खोली खरेदीपोटी रकमा स्विकारुनही समझोता कराराप्रमाणे खोलीचा ताबा न देऊन त्रुटीची सेवा दिल्याची बाब स्पष्ट होत असे मंचाचे मत आहे. सामनेवाले यांचेकडून कोणताही आक्षेप दाखल नाही. सबब तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे.
11. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहेः
आ दे श
1. तक्रार क्र. 371/2015 अंशतः मान्य करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना समझोता करारानुसार खोलीचा ताबा न देऊन त्रुटीची सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारदारांनी खोली खरेदीपोटी सामनेवाले यांचेकडे जमा केलेली रक्कम रु. 1,05,000/- (रु. एक लाख पाच हजार फक्त) दि.04/03/2014 पासून 12% व्याजदराने दि. 30/09/2016 पर्यंत दयावी. विहीत मुदतीत अदा न केल्यास दि.01/10/2016 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत 15% व्याजदाराने दयावी.
4. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाकरीता रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) व तक्रारीचा खर्चाची रक्कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) दि. 30/09/2016 पर्यंत दयावी. विहीत मुदतीत रकमा अदा न केल्यास दि. 01/10/2016 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत 9% व्याजदराने दयावी.
5. आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
6. संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.
दिनांक – 18/06/2016.
ठिकाण – ठाणे