निकालपत्र
( पारीत दिनांक :18/12/2013 )
( द्वारा अध्यक्ष(प्रभारी)श्री.मिलींद भि.पवार(हिरुगडे) )
01. अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये गैरअर्जदार यांच्या विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे आहे.
अर्जदार यांनी सदर तक्रार अर्जामध्ये नमुद केले आहे की, ते महिलांच्या विकासाकरीता व आर्थिक मदतीकरीता लघु उद्योग चालवितात व त्याबाबत त्यांनी रीतसर धर्मादाय संस्थेकडे पंजीयन केले आहे. अर्जदार यांनी सन 2008 मध्ये कारखाना उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या त्यात गैरअर्जदार यांचीही निविदा होती व कायद्यानुसार कामाचे कंत्राट गैरअर्जदार यांना देण्यात आले, त्यानुसार दिनांक 30/10/2008 रोजी दोघांनाही मान्य अश्या अटी व शर्तींवर करारनामा-लेख करण्यात आला होता, सदर करार हा रु.16,36,250/- चा होता व अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना रु.6,50,000/- मशिनरी खरेदी करण्याकरीता अग्रिम स्वरुपात दिले होते. ठरलेल्या करारनाम्यानुसार लागणा-या मशिनरी दिनांक 25/1/2010 ला गैरअर्जदाराच्या मुलासोबत सेवाग्राम उद्यमी वनिता मंडळ येथे वेस्टनात गुंडाळुन पाठविल्या. परंतु जेंव्हा लघु कागद कारखाना उभारण्यास सुरवात केली तेंव्हा अर्जदाराच्या लक्षात आले की, गैरअर्जदार यांनी कागद कटाई यंत्र पाठविण्यात आलेले नाही. अर्जदाराने पुढे नमुद केले आहे की, दिनांक 25/1/2010 ला ईतर मशिनरी पोहचविल्यानंतर अर्जदाराने एकुन रु.14,36,250/- गैरर्जदार यांना अदा केल्यानंतरही गैरअर्जदार यांनी संपुर्ण यंत्रे पाठविली नाही. त्याबाबत अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे मौखिकरीत्या वारंवार कळविले असता, थोडयाच दिवसांनी पाठवितो असेच उत्तर देण्यात येत होते, त्यामुळे अर्जदार यांनी दिनांक 20/4/2010 रोजी लेखी पत्र पाठवुन मशीन पाठवावी अशी विनंती केली. सदर पत्राला उत्तर पाठवुन गैरअर्जदार यांनी मशीन उपलब्ध नसल्यामुळे पाठविण्यात आली नाही थोडयाच दिवसांत पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतु गैरअर्जदार यांनी काही दिवसानंतर वेगवेगळी कारण दाखवुन अर्जदाराकडे अतिरीक्त रकमेची मागणी केली व त्यांच्या मागणीनुसार अर्जदार यांनी रु.32,560/- गैरअर्जदार यांच्या प्रतिनिधीकडे रोख स्वरुपात दिले.
अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदार यांनी करारनाम्यानुसार पाणी पुर्तता करणरे यंत्र बसविणे तसेच कारखाण्याचे विद्युत कामे केलेली नाही. त्यामुळे स्वतःच्या खर्चाने सर्व कामे तक्रारकर्त्याला करावी लागली. तसेच गैरअर्जदार यांनी कागद कारखाना कार्यरत करण्यासाठी त्यांचा कुठलाही शिक्षित माणसाला पाठविले नाही किंवा अर्जदारांच्या कुठल्याही कामगारांना प्रशिक्षण दिले नाही. गैरअर्जदार यांनी पेपर कटाई यंत्र पाठविले नसल्यामुळे अर्जदाराला नागपुरहुन पेपर्स कापुन आणावे लागले व त्यामुळे त्याला रु.85,000/- मजुरीचा खर्च आलेला आहे. या सर्व बाबींची माहिती गैरअर्जदाराला पाठविली असता गैरअर्जदार यांनी परत अतिरीक्त रु.1,92,000/- ची मागणी केली. आजतागायत गैरअर्जदार यांनी यंत्र पाठविलेले नाही. त्यामुळे अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली परंतु नोटीस प्राप्त होवुनही गैरअर्जदार यांनी मशिन तर पुरविलीच नाही तर साधे नोटीसला उत्तरही दिले नाही. सदर बाब ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रृटी असुन त्यांनी अनुचित व्यापार प्रणालीचा अवलंब करणारी आहे. त्यामुळे अर्जदारानी गैरअर्जदारांविरुध्द प्रस्तुत तक्रार मंचामध्ये दाखल केली आहे खालील प्रमाणे मागणी केली आहे.
1. गैरअर्जदार यांच्या चुकीमुळे वेळेवर कारखाना सुरु न
झाल्यामुळे झालेले नुकसान रु.50,000/- गैरअर्जदार
यांनी अर्जदार यांना द्यावे.
2. गैरअर्जदार यांनी पेपर कटाई यंत्र न पुरविल्यामुळे
अर्जदाराला नागपुरहुन पेपर्स कापुन आणावे लागले व
त्यामुळे त्याला रु.85,000/- मजुरीचा खर्च आलेला आहे,
सदर खर्च गैरअर्जदार यांनी द्यावा.
3. मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.60,000/- व
प्रकरणाचा खर्च रु.5000/- गैरअर्जदार यांनी द्यावा.
गैरअर्जदार यांना तक्रार नोंदणी करुन नोटीस काढण्यात आली. सदरची नोटीसची गैरअर्जदार यांना बजावणी झाली असे पोष्टाचे पत्र निशाणी 9(b) वर दाखल आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांचेवर नोटीसची बजावणी योग्य प्रकारे झाली आहे हे दिसुन येते. तरीही गैरअर्जदार हे वि.मंचासमक्ष हजर झाले नाही. त्यामुळे गैरअर्जदारा विरुध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा निर्णय मा.मंचाने नि.1 वर पारीत केला आहे.
02. अर्जदाराने तक्रार अर्जातील कथनाचे पुष्ठयर्थ निशाणी 2 कडे 40 कागदपत्रे हजर केलेली आहेत. गैरअर्जदार यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश निशाणी 1 वर पारीत केलेला असल्यामुळे उपलब्ध कागदपत्र, तसेच अर्जदाराची तक्रार, त्यांचे वकीलांचा युक्तिवाद व प्रतिज्ञापत्र यावरुन सदर प्रकरण निकाली करणे करीता ठेवण्यात आले.
अर्जदाराची तक्रार, दाखल केलेले दस्तावेज व वकीलांचा युक्तिवाद यावरुन खालील कारणे व निष्कर्षे निघतात.
-: कारणे व निष्कर्ष :-
5. अर्जदाराने निशाणी 10 नुसार प्रतिज्ञापत्रावर पुरावा दाखल केलेला आहे. गैरअर्जदारा विरुध्द एकतर्फा आदेश असल्याने त्यांना अर्जदाराचे तक्रार विषयक मुद्दे मान्य असल्याचे समजण्यात येते.
6. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे कडुन त्यांचे लघुउद्दोगासाठी आवश्यक असणा-या मशीनची खरेदी करण्याचा करार केला होता व त्या कराराप्रमाणे गैरअर्जदार यांनी काही मशीनही अर्जदार यांना दिल्या, त्यामुळे गैरअर्जदारांचे अर्जदार हे ग्राहक ठरतात.
अर्जदार यांनी त्यांचे उद्दोगासाठी काही मशिनची आवशक्ता होती म्हणुन त्यांनी निविदा मागविल्या होत्या हे नि.क्र.4/1 वरील कागदपत्रावरुन दिसुन येते व त्यापोटी गैरअर्जदार यांनी योग्य अशी निविदा भरलेली होती हे नि.क्र.4/2 वरील कागदपत्रावरुन दिसुन येते. गैरअर्जदार यांची निविदा अर्जदार यांनी मान्य केली व त्यामुळे गैरअर्जदार आणी अर्जदार यांच्यामध्ये करार झाला व त्यामध्ये सर्व व्यवहार कश्याप्रकारे करायचे ते ठरविण्यात आले हे नि.क्र.4/4 ते 4/5 वरुन दिसुन येते. सदर ठरलेल्या व्यवहारापोटी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना रु.2,50,000/- अँडव्हांस रक्क्म दिली हे नि.क्र.4/6 वरुन दिसते तसेच अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना वेळोवेळी रकमा अदा केल्याचे अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये झालेल्या पत्रव्यवहारावरुन दिसुन येते.
मात्र अर्जदार हे गैरअर्जदार यांचे मध्ये वाद निर्माण झालेला आहे तो पेपर कटींग मशीन पुरविण्याबाबत. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये झालेल्या करारामध्ये पेपर कटींग मशीन पुरविण्याबाबत ठरले होते. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सदर पेपर कटींग मशीन पुरविण्यास विलंब करीत होते हे दिसुन यते. नि.क्र.4/13 वरील पत्रांचे अवलोकन करता गैरअर्जदार यांनी सदर मशीन पुरविणा-या मार्केटमधील सप्लायर यांनी ते अद्याप पुरविलेले नाही. त्यामुळे डिसेंबरचे पहिल्या आठवडयात देण्याचे आश्वासन दिले व नंतर सदर मशीन वेळेवर पुरविली नाही म्हणुन माफी सुध्दा मागीतली हे नि.क्र.4/17 वरील कागदपत्रावरुन दिसुन येते. त्यांनतर दिनांक 20/4/2011 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना पुन्हा पत्राने कळवुन सदर मशीन पुरविण्याची मागणी केली व त्याची रक्कम गैरअर्जदार यांना पुर्वीच अदा केली असल्याचे नि.क्र.4/18 वरील पत्रावरुन दिसुन येते. त्यानंतर दिनांक 14/5/2011 रोजी गैरअर्जदार यांनी उन्हाळा व कामगारांचा प्रॉब्लममुळे मशीन देण्यास विलंब होत असल्याचे मान्य केल्याचे नि.क्र.4/19 वरील पत्रावरुन दिसुन येते व त्यानंतर गैरअर्जदार यांनी मेल वरुन उर्वरीत रकमेची अर्जदार यांना मागणी केली. बराच कालावधी पर्यंत वाट पाहुन सुध्दा गैरअर्जदार यांनी पेपर कटींग मशीन पुरविली नाही म्हणुन अर्जदार यांनी दिनांक 14/5/2011 रोजी वकीलामार्फत गैरअर्जदार यांना नोटीस पाठविला व त्यास गैरअर्जदार यांनी उत्तर दिले व उर्वरीत रकमेची मागणी केली जे नि.क्र.4/23 कडे दाखल आहे. पुन्हा अर्जदार यांनी सर्व रक्कम अदा केली असल्याचे व त्याबाबत योग्य तो खुलासा केल्याचे नि.क्र.4/24 वरील पत्रावरुन दिसुन येते. अर्जदार यांनी वारंवार मागणी करुनही गैरअर्जदार यांनी पेपर कटींग मशीन पुरविली नाही व त्यामुळे अर्जदार यांना बाहेरुन पेपर्स कटिंग करुन आणावे लागले व त्याबाबत त्याना अतिरीक्त खर्च सोसावा लागला हे नि.क्र.4/25 ते 4/40 वरील पावत्यांवरुन दिसुन येते. अश्याप्रकारे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना वारंवार मागणी करुनही ठरल्याप्रमाणे मशीनचा पुरवठा केला नाही. गैरअर्जदार यांना अर्जदार यांनी एकुण रु.14,36,250/- अदा केले आहे हे नि.क्र.10 वरील प्रतिज्ञापत्रा वरुन दिसुन येते, यावरुन सर्व रक्कम अदा करुनही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना पेपर कटींग मशीन पुरविली नाही व त्यामुळे दिनांक 25/1/2010 ते ऑक्टोंबर 2010 पर्यंत अर्जदार यांना त्यांचा व्यवसाय सुरु करता आला नाही व त्यामुळे त्यांना रु.50,000/- चे नुकसान झाले, तसेच त्यांना सदर पेपर्स बाहेरुन कटींग करुन आणावे लागले त्याचा अतिरीक्त खर्च रु.85,000/- करावा लागला.
अर्जदाराची सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदार यांना प्राप्त होवुनही त्यांनी वि.मंचासमक्ष हजर होवुन अर्जदार यांनी त्यांच्या तक्रार अर्जात लावलेले आरोप खोडुन काढले नाही किंवा आपले बचावात्मक म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांना अर्जदार यांचे तक्रारीतील आरोप मान्य आहे हे गृहित धरावे लागते.
वरील सर्व परिस्थितीचा विचार करता, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना करारातील अटी व शर्ती नुसार पेपर कटींग मशीन पुरविली नाही जेंव्हा की अर्जदार यांनी सर्व रक्कम गैरअर्जदार यांना अदा केली होती. गैरअर्जदार यांचा सदर व्यवहार हा अनुचित व्यापार प्रथा दर्शविते व वेळेत मशीनचा पुरवठा न करणे ही बाब दुषित व त्रुटीची सेवा ठरते. त्यामुळे गैरअर्जदार यांचे सदर कृतीमुळे अर्जदार यांना झालेले नुकसान व खर्च गैरअर्जदार यांच्याकडुन मिळण्यास अर्जदार पात्र ठरतो असे वि.मंचास वाटते.
7. अशा त-हेने अर्जदार हे आपल्या न्याय हक्कासाठी व मशीन मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे हे सर्व कागदपत्रांवरुन दिसुन येते. मात्र तरीही गैरअर्जदार यांनी त्यास दाद दिली नाही तसेच गैरअर्जदार यांनी वि.मंचाची नोटीस मिळुनही या मंचासमक्ष हजर राहुन आपले म्हणणे मांडण्याची तसदी गैरअर्जदार यांनी घेतली नाही. यावरुन गैरअर्जदार कंपनीची नकारात्मक मानसिकता दिसुन येते.
वरील सर्व विवेचनावरुन मंचाचे स्पष्ट मत आहे की, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दुषित व त्रुटीची सेवा दिली असल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे अर्जदार यांचा कागद कारखाना वेळेत सुरु न झाल्यामुळे झालेले नुकसान रु.50,000/- व पेपर्स कटींगचा अतिरीक्त खर्च रु.85,000/- गैरअर्जदार यांच्या कडुन मिळण्यास अर्जदार पात्र आहे असे मा.मंचाचे स्पष्ट मत आहे.
गैरअर्जदार यांच्या वर्तणुकीमुळे अर्जदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.3000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.2000/- मंजुर करावे असे मंचास न्यायोचित वाटते.
एकंदरीत वरल कारणे व निष्कर्ष यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात न्युनता केली असल्याचे निर्णयाप्रत हे मंच आलेले असल्याने खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// आदेश //
1) अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2) गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना वर नमुद केल्याप्रमाणे
रु.50,000 + रु.85,000/- असे एकुण रु.1,35,000/-
(रु.एक लाख पस्तीस हजार फक्त) व त्यावर तक्रार दाखल
दिनांकापासुन म्हणजेच (दिनांक 13/09/2011) द.सा.द.शे.
10 टक्के दराने संपुर्ण रक्कम अदा होईपर्यंत व्याज अदा
करावे.
3) वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त दिनांकापासुन 30 दिवसांच्या आंत करावे अन्यथा उपरोक्त रक्कम रु.1,35,000/- वर द.सा.द.शे. 10 टक्के ऐवजी द.सा.द.शे.13 टक्के व्याज द्यावे लागेल.
4) गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.3000/- व तक्रारीचा खर्च रु.2000/- द्यावा.
5) आदेश क्र. 4 मधील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त दिनांकापासुन 30 दिवसांच्या आंत करावे
6) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधीतांनी परत
घेवुन जाव्यात.
7) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व
उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात.