Final Order / Judgement | ::: आ दे श ::: ( पारीत दिनांक :07.04.2017 ) आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 ते 4 यांना नोटीस बजावण्यात आल्यावर ते मंचासमोर हजर झाले. परंतु वारंवार संधी देऊनही वेळेवर जबाब दाखल न केल्याने दि. 30/1/2017 रोजी रु. 500/- दंड आकारुन विरुध्दपक्षाला जबाब दाखल करण्याची संधी देण्यात आली. परंतु त्यानंतरही विरुध्दपक्षाने दंड रक्कम न भरल्याने तक्रारकर्तीने दि. 20/3/2017 रोजी अर्ज करुन त्यांना दंड रक्कम स्विकारायची नसल्याचा व युक्तीवाद करण्यास परवानगी मिळण्याचा अर्ज केला. मंचाने यावर विरुध्दपक्षाचे निवेदन मागीतले, पण विरुध्दपक्ष गैरहजर असल्याने त्यांचे तर्फे निवेदन सादर केले गेले नाही. त्यामुळे मंचाने तक्रारकर्तीचा अर्ज मंजुर केला व तक्रारकर्तीचा युक्तीवाद ऐकुन प्रकरण अंतीम आदेशासाठी ठेवण्यात आले. विरुध्दपक्षाने दंड रक्कम न भरल्याने त्यांचा जबाब स्विकारण्यात आला नाही व ते गैरहजर असल्याने युक्तीवादही केला नाही, म्हणून केवळ तक्रारकर्तीची तक्रार, तकारकर्तीने दाखल केलेले दस्त यांचे अवलोकन करुन व तक्रारकर्तीचा तोंडी युक्तीवाद ऐकून काढलेल्या निष्कर्षाचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला. - तक्रारकर्तीने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तक्रारकर्ती ही आकार डाई प्रेसचे मालक कै. कल्पेश शाह यांची ग्राहक असल्याचे व सद्यस्थितीत कै. कल्पेश शाह यांचे वारस विरुध्दपक्ष क्र. 1 ते 4 असल्याचे निदर्शनास येत आहे. विरुध्दपक्षातर्फे या मुद्यावर कोणतेही विरोधी विधान प्राप्त न झाल्याने, तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष क्र. 1 ते 4 यांची ग्राहक असल्याचे ग्राह्य धरण्यात येते.
- तक्रारकर्तीच्या तक्रारीनुसार श्री कल्पेश शाह हे आकार डाई प्रेस या संस्थेचे मालक होते व त्या नावाने व्यवसाय करीत होते. श्री कल्पेश शाह यांचे निधन झालेले असून, विरुध्दपक्ष हे त्यांचे वारस आहेत. तक्रारकर्तीने दि. 12/7/2012 रोजी रक्कम रु. 50,000/- शाह ब्रदर्स अकोला या दलाला मार्फत श्री कल्पेश शाह यांच्याकडे ठेव म्हणून ठेवले. सदरहु रकमेवर श्री कल्पेश शाह यांनी दरमहा दरशेकडा 1.30 प्रमाणे व्याज देण्याचे कबुल करुन, लेटरपॅडवर ठेव चिठ्ठी लिहून दिली. सदर ठेव चिठ्ठी मध्ये असे नमुद करण्यात आले की, तक्रारकर्ती जेंव्हा मुळ रकमेची मागणी करेल, तेंव्हा परत करण्यात येईल. श्री कल्पेश शाह यांनी तक्रारकर्तीला दि. 10/01/2015 पर्यंत नियमितरित्या व्याजाचे भुगतान केले, मात्र त्यानंतर त्यांनी व्याजाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तक्रारकर्ती यांनी चौकशी केली असता, त्यांना असे कळले की, श्री कल्पेश शाह यांचे निधन झाले असून, विरुध्दपक्ष क्र. 1 ते 4 हे त्यांचे कायदेशिर वारस आहेत. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 1 यांना फेब्रुवारी 2016 च्या पहील्या आठवडयात प्रत्यक्ष भेटून, ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेची मागणी केली असता, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी लवकर पैसे देण्याबाबत आश्वासन दिले. परंतु रक्कम दिली नाही, म्हणून तक्रारकर्तीने दि. 27/04/2016 रोजी वकीलामार्फत रजि. नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. नोटीस मिळूनही विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्तीच्या मागणीची पुर्तता केली नाही, त्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्तीची तक्रार मंजुर करण्यात यावी व तक्रारकर्तीला, तिने दि. 12/7/2012 रोजी ठेव म्हणून ठेवलेली रक्कम रु. 50,000/- दि. 10/1/2015 पासून दरमहा दरशेकडा 1.30 प्रमाणे व्याजासह परत करण्याचा विरुध्दपक्षाला आदेश व्हावा, तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 25,000/- व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 10,000/- देण्याचा आदेश व्हावा.
- तक्रारकर्तीचे म्हणणे ऐकल्यावर मंचाने दाखल केलेल्या दस्तांचे अवलोकन केले असता, पृष्ठ क्र. 19 वरील ठेव चिठ्ठीवरुन तक्रारकर्तीने दि. 12/7/2012 रोजी आकार डाई प्रेसचे मयत मालक कल्पेश शाह यांचेकडे पन्नास हजार रुपये गुंतविल्याचे दिसून येते. तसेच या रकमेवर वेळोवेळी तक्रारकर्तीला दर सहा महिन्यांनी रु. 3900/- व्याज दि. 10/1/2015 पर्यंत मिळाल्याचे दिसून येते. या विरोधात विरुध्दपक्षाकडून कुठलेही विरोधी विधान प्राप्त न झाल्याने तक्रारकर्तीच्या तक्रारीत मंचाला तथ्य आढळून येते. सबब तक्रारकर्ती ही आकार डाई प्रेसचे आज रोजीचे मालक / वारसदार विरुध्दपक्ष क्र. 1 ते 4 यांचेकडून तिने गुंतवलेली ठेव रक्कम पन्नास हजार रुपये व्याजासह तसेच प्रकरणाचा खर्च व इतर नुकसान भरपाई मिळण्यास पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे.
सबब अंतीम आदेश येणे प्रमाणे.. - तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे, तक्रारकर्तीला ठेव रक्कम रु. 50,000/- ( रुपये पन्नास हजार फक्त ) दि. 10/01/2015 पासून प्रत्यक्ष रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने, व्याजासह द्यावेत
- विरुध्दपक्ष क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे, तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- ( रुपये पांच हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 3000/- ( रुपये तिन हजार ) द्यावे.
- सदर आदेशाचे पालन, निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत करावे.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या. | |