नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः वरील दोन्हीही तक्रारदार यांच्या तक्रारी या अजित सिड्स लिमिटेड यांनी उत्पादीत केलेल्या बाजरी बियाण्यातील दोषाबाबत असून विरुध्द पक्ष हे तेच असल्यामुळे व तक्रारीचे स्वरुप सारखेच असल्यामुळे पुनुरुक्ती टाळण्यासाठी दोन्हीही तक्रारी या एकाच आदेशाव्दारे निकाली काढण्यात येत आहेत. त्यातील नमुद केलेले निशाणी क्रमांक हे तक्रार क्र.70/11 मधील आहेत.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना सदोष व निकृष्ट दर्जाचे बियाणे विकून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला म्हणून नुकसान भरपाई मिळणेकरीता तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारी दाखल केल्या आहेत.
3. तक्रारदार यांची थेडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी आपल्या अजनाड बंगला ता.शिरपूर जि.धुळे येथील शेत गट क्र.203/1 क्षेत्र 2 हे. व गट नं.203/2 मध्ये विरुध्द पक्ष क्र.1 अजित सिड्स कंपनी यांनी उत्पादीत केलेले बाजरी नं.35 या वाणाचे बियाणे विरुध्द पक्ष क्र.2 अग्रवाल ट्रेडर्स यांचेकडून विकत घेऊन पेरणी केली. पेरणीचे वेळी डी.एपी. खत 50 किलो वापरण्यात आले. त्यानंतर 1 महिन्याने 100 किलो युरीया दिला व वेळोवेळी निंदणी, टुपणी इ. आंतरमशागत केली. सदर पिक 3 महिन्याचे होऊनही ते निसवले नाही व त्यात दाणे भरले नाहीत. त्यामुळे त्यांनी जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली.
4. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, सदर अर्जावर बियाणे तक्रार निवारण समितीने दि.10/02/2011 रोजी प्रत्यक्ष शेतावर येऊन पाहणी केली व आपला अहवाल दिला आहे. त्यात सर्वसाधारण 17 ते 18 टक्के कणसात दाणेच भरले नाहीत तसेच इतर कणसातील दाण्यांची संख्या विरळ असल्याने शेतक-याचे मोठया प्रमाणावर नुकसान होईल असे मत नोंदवले. यावरुन बियाणे निकृष्ट व सदोष होते हे स्पष्ट झाले.
5. तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की, अजित सिड्स यांनी जाहिरात करुन बाजरी 35 हे. बियाणे उत्कृष्ट असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांनी सदर बियाणे खरेदी केले होते.
तक्रार क्र.70/11 व तक्रार क्र.71/11
परंतू सदर बियाणे निकृष्ट असल्यामुळे त्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. सर्व विरुध्द पक्ष यांनी सदोष बियाणे विकून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे समितीच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.
6. तक्रारदार यांनी शेवटी सदर बियाण्यांमुळे नुकसान भरपाई म्हणून सर्व विरुध्द पक्ष यांचेकडून बियाणे खरेदीची रक्कम रु.420/- एकरी उत्पन्न 12 क्विंटल व बाजार भाव रु.1200/- या दराने 24 क्विंटलचे रु.28,800/- मशागतीचा खर्च रु.10,000/-, बाजरी कापणी ई. रु.5000/-, चारा आला नाही त्याचे रु.15,000/- व मानसिक त्रासापोटी रु.35,000/- असे एकूण रु.94,220/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
7. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.4 वर शपथपत्र, तसेच नि.5 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार 5 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.5/1 वर पंचनामा, नि.5/2 वर खरेदी पावती, नि.5/3 वर पावती, नि.5/4 वर फोटो आणि नि.5/5 वर 7/12 उतारा दाखल केला आहे.
8. अजित सिड्स कं. यांनी आपले लेखी म्हणणे नि.11 वर दाखल करुन तक्रारदार यांनी लागवडीचे क्षेत्र 2 हे. हे जास्तीचे दाखवून दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तक्रारदार यांनी बियाणे दि.19/11/10 रोजी खरेदी केलेचे दिसून येते. मात्र पेरणी दि.17/11/10 रोजी केल्याचे नमुद आहे. यावरुन तक्रारदाराने त्यांचे बियाणे पेरलेचे दिसून येत नाही त्यामुळे तक्रार फेटाळणेस पात्र आहे असे म्हटले आहे.
9. अजित सिड्स यांनी पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार यांनी 17 टक्के ते 18 टक्के कणसात दाणे भरले नाहीत हे कारण चुकीचे व दिशाभुल करणारे आहे. कारण दि.10/02/11 रोजी पिक परिस्थिती पंचनामा झाला तो कालावधी हा कणसात दाणे भरण्याचा कालावधी होता. तो संपुर्ण झालेला नव्हता. कारण जानेवारी आणि फेब्रुवारी 2011 मध्ये वातारवरणामध्ये स्थिरता नव्हती. त्यामुळे हवामानात थंडीचे व उष्णतेचे प्रमाण कमी-जास्त रहात होते. त्याचा परिणाम पिकावर झालेला आहे. त्यास सामनेवाला यांना जबाबदार धरता येणार नाही. त्याचबरोबर शेतीची वेळोवेळी मशागत, हवामान, खतांच्या मात्रा, सिचंनाचा योग्य वापर याही गोष्टी योग्य उत्पादनासाठी महत्वाच्या आहेत. यावरुनही स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी उत्पादन घेवून सामनेवाले यांचे विरुध्द खोटी तक्रार दाखल केली. शेवटी तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती केली आहे.
10. अजित सिड्स यांनी पुढे असे म्हटले आहे की, कंपनीने बियाणे बाजारात वितरीत करण्यापुर्वी बियाणे कायदयाप्रमाणे सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे व बियाणे बाजारात
तक्रार क्र.70/11 व तक्रार क्र.71/11
वितरीत केलेले आहे. त्यास बियाणे सदोष व निकृष्ट दर्जाचे म्हणणे हे सामनेवाले यांना मान्य नाही.
11. अजित सिड्स यांनी तक्रारदार यांनी परिच्छेद 7 मध्ये सर्व मजकूर अमान्य करुन तक्रारदारास फक्त 15 किलो बाजरी झाली हे खोडसाळपणाने दाखवल्याचे म्हटले आहे. शेवटी तक्रार रद्द करावी अशी त्यांनी विनंती केली आहे.
12. विरुध्द पक्ष क्र.2 आग्रवाल ट्रडर्स यांनी आपले लेखी म्हणणे नि.12 वर दाखल करुन अजित सिड्स यांनी दिलेल्या खुलाशाप्रमाणे सर्व म्हणणे नाकारले आहे व तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
13. विरुध्द पक्ष क्र.3 अशिष सिड्स यांनी आपले लेखी म्हणणे नि.3 वर दाखल करुन अजित सिड्स व आग्रवाल ट्रेडर्स यांनी दिलेल्या खुलाशाप्रमाणेच सर्व म्हणणे नाकारले आहे व तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
14. तक्रारदार यांची तक्रार विमा कंपनीचे म्हणणे व दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारांना निकृष्ट दर्जाचे बियाणे विकून
सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
2. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
3. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
15. मुद्दा क्र.1 – तक्रारदार यांनी अजित सिड्स यांनी निष्कृष्ट दर्जाचे बाजरीचे बियाणे तयार करुन व विरुध्द पक्ष क्र.2 यांनी ते तक्रारदार यांना विक्री केले आहे हे सिध्द करण्यासाठी स्वतःची शपथपत्रे व जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने दिलेल्या अहवालाची प्रत दाखल केली आहे. आम्ही सदर पंचनाम्याचे अवलोकन केले आहे. सदर पंचनामा नि.5/1 वर आहे. त्यात जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने दि.30/02/10 रोजी प्रत्यक्ष पाहणी करुन आपले मत नोंदवले आहे ते खालील प्रमाणे आहे.
तक्रार क्र.70/11 व तक्रार क्र.71/11
16. आज रोजी सदर प्लॉटची पाहणी केली असता सर्वसाधारण 17 ते 18 टक्के कणसात दाणेच भरलेले नाहीत. इतर कणसात दाणे भरण्याची व पक्वतेची प्रक्रिया करीत आहे. परंतू कणसातील दाण्याची संख्या विरळ असल्यामुळे शेतक-याचे मोठया प्रमाणावर नुकसान होईल असे समितीचे मत आहे. कणसातील दाणे पक्व होतील. मात्र दाणे वाढण्याची शक्यता नाही परिणामी उत्पन्नात वाढ होणार नाही. उत्पन्नात फार घट होईल असे समितीचे मत आहे.
17. सदर पंचनाम्याच्या वेळी बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनीधी हजर होते. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सदर अहवालावरुन सदरचे बियाणे सदोष होते असा निष्कर्ष निघतो. कारण 18 टक्के कणसांना काहीच दाणे भरले नव्हते व इतर कणसात अत्यंत तुरळक दाणे भरले होते. त्यामुळे बियाण्यांमध्ये आवश्यक प्रक्रिया करण्यात आली नव्हती किंवा योग्य प्रकारे जेनिटीक प्रक्रिया झाली नव्हती हे सिध्द होते. अजित सिडस् तर्फे अॅड.मुंडे यांनी सदर अहवालामध्ये बियाण्यात दोष होता असा उल्लेख नाही. तसेच धुळे भागात जादा थंडी पडल्यामुळे परागीकरण झाले नाही त्यामुळे कमी दाणे भरले आहेत असा युक्तीवाद केला. तसेच कमी दाणे भरणेत खताची मात्रा, जमिनीची प्रत, हवामान इ. अनेक घटक कारणीभुत आहेत. त्यामुळे बियाण्यात दोष होता असे म्हणता येणार नाही असे म्हटले आहे.
18. तक्रारदार तर्फे अॅड. विशाल भट यांनी तक्रारदार यांच्या प्लॉटची तपासणी झाली त्यावेळी अजित सिड्सचे प्रतिनधिी हजर होते. त्यामुळे त्यांना अहवाल मान्य नव्हता व बियाणे चांगले होते हे सिध्द करण्यासाठी त्यांनी सदर बियाण्यांमध्ये सॅम्पल तपासणीसाठी घेऊन त्याबद्दलचा अहवाल दाखल करणे आवश्यक होते. परंतू त्यांनी त्यासाठी बियाणे प्रयोगशाळेत पाठवणेसाठी उपलबध करुन दिले नाही. या संदर्भात त्यांनी मा.सर्वोच्च न्यायालय यांनी मे.महाराष्ट्र हायब्रीड सिड्स कं.लि. विरुध्द अलवलापती चंद्रा रेड्डी व इतर एस.सी अॅण्ड नॅशनल कमशिन कंझुमर लॉ केसेस (1999-2005) या न्यायिक दृष्टांताचा आधार घेतला आहे.
19. आम्ही वरील न्यायिक दृष्टांताचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्यात मा.सर्वोच्च न्यायालय यांनी असे तत्व विषद केले आहे की, उत्पादकांनी किंवा वितरकांनी त्यांनी विक्री केलेले बियाणे चांगले होते हे सिध्द करावयाचे असे तर त्यांनीच मंचापुढे अर्ज देवून त्याच लॉटचे बियाणे प्रयोगशाळेकडे पाठवण्यासाठी विनंती करावयास पाहिजे.
20. तसेच तक्रारदार यांनी मा.महाराष्ट्र राज्य आयोग यांनी अपिल क्र.2281/2006 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ विरुध्द धरमसिंग ठाकूर आणि अपिल नं.1252/2006 निंबकर सिड्स विरुध्द सुर्यकांत टकले हे न्यायिक दृष्टांत दाखल केले आहेत. त्यामध्ये देखील बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल कंपनीस मान्य नसेल तर सदर अहवाल
तक्रार क्र.70/11 व तक्रार क्र.71/11
चुकीचा आहे, अयोग्य आहे या संदर्भात दुसरा तज्ञांचा अहवाल देणे आवश्यक आहे असे म्हटले आहे.
21. प्रस्तुत दोन्ही तक्रारीमध्ये अजित सिड्स यांनी वरील प्रमाणे कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे कृषि क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश असलेल्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे अजित सिड्स व इतर यांनी तक्रारदारांना सदोष बियाणे विक्री केले होते या मतास आम्ही आलो आहोत म्हणून मुद्दा क्र.1 उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
22. मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांनी अजित सिड्स यांच्याकडून सदर बियाण्यांमुळे नुकसान भरपाई म्हणून सर्व विरुध्द पक्ष यांचेकडून बियाणे खरेदीची रक्कम रु.420/- एकरी उत्पन्न 12 क्विंटल व बाजार भाव रु.1200/- या दराने 24 क्विंटलचे रु.28,800/- मशागतीचा खर्च रु.10,000/-, बाजरी कापणी ई. रु.5000/-, चारा आला नाही त्याचे रु.15,000/- व मानसिक त्रासापोटी रु.35,000/- असे एकूण रु.94,220/- मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांचे सदोष बियाणेमुळे नुकसान झाले आहे हे निश्चित करुन तक्रारदार यांनी त्यांना मागील वर्षी मिळालेल्या उत्पनाबद्दल पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे प्रती एकरी 12 क्विंटल उत्पन्न येते व बाजार भाव रु.1200/- होता हे मान्य करता येणार नाही. विरुध्द पक्ष यांनीही उत्पन्न किती येऊ शकते याबद्दल पुरावा दिलेला नाही. आम्ही धुळे जिल्हयातील बाजरीचे सर्वसाधारण उत्पादन व बजारभावाची माहिती घेतली असता एकरी 10 क्विंटल उत्पन्न येते असे समजते. तसेच बजारभाव सर्वसाधारणपणे रु.900/- ते रु.1100/- असा मिळतो. त्यामुळे तक्रारदार यांना झालेले नुकसान पुर्णपणे 18 टक्के व उर्वरित पिकात 40 टक्के घट गृहीत धरुन उत्पनाच्या 60 टक्के घट बियाण्यामुळे आली असे गृहित धरुन तक्रारदार प्रत्येकी 6 क्विंटल प्रमाणे व बाजारभाव रु.1000/- धरुन 6000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारदार मानसिक त्रासापोटी रु.2000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.1000/- मिळणेस पात्र आहेत.
23. मुद्दा क्र.3 - वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज क्र.70/11 व तक्रार क्र.71/11 अंशतः मंजूर करण्यात येत आहेत.
2. विरुध्द पक्ष अजित सिड्स लिमिटेड यांनी तक्रार अर्ज क्र.70/11 व तक्रार अर्ज क्र.71/11 मधील तक्रारदारांना प्रत्येकी रक्कम रु.6000/- व या आदेशाच्या प्राप्ती पासून 30 दिवसाच्या आत द्यावेत.
तक्रार क्र.70/11 व तक्रार क्र.71/11
3. विरुध्द पक्ष अजित सिड्स लिमिटेड यांनी वरील आदेश क्र.2 मधील मुदतीत रक्कम न दिल्यास दोन्ही तक्रारदार सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख दि.06/04/11 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र राहतील.
4. विरुध्द पक्ष अजित सिड्स लिमिटेड यांनी तक्रार अर्ज क्र.70/11 व तक्रार अर्ज क्र.71/11 मधील तक्रारदारांना प्रत्येकी मानसिक त्रासापोटी रु.2000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.1000/- या आदेशाच्या प्राप्ती पासून 30 दिवसाच्या आत दयावेत.
5. मुळ निकालपत्र तक्रार क्र.70/11 मध्ये ठेवण्यात यावे व त्याची प्रत तक्रार क्र.71/11 मध्ये ठेवण्यात येत आहे.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे