तक्रारदारातर्फे :- वकील -अँड. एन. जी. तुपे.
सामनेवालेतर्फे :- वकील –अँड. आर.व्ही. पाटील.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार मोगरा ता. माजलगांव जि. बीड येथील रहिवाशी असून त्याचा मुलगा गोविंद याच्या नावे गट नंबर 19 मौजे मोगरा येथे 8 हे 75 आर जमीन आहे. तक्रारदार स्वत: सदर जमीनीची मशागत करुन उत्पन्न घेतो. सदरील जमीन ही पाट-बागायत आहे.
सामनेवाले नं. 1 चे सामनेवाले नं. 2 हे अधिकृत विक्रेते आहेत. सन 2003 सालासाठी तक्रारदाराने तारीख 5/7/2003 व ता. 7/7/2003 रोजी एकूण अजित 555 लॉट नं. 11310 कापूस बियाणे लागवडीसाठी खरेदी केले होते व योग्य ती मशागत करुन लागवड केली. सदरची लागवड ही 3 एकर क्षेत्रात केली होती.
त्यानंतर उगवण योग्य त्या प्रमाणात झाली. परंतू सर्व झाडांची उंची एक सारखी नव्हती. 15 टक्के झाडे ठेंगणी होती व त्यांना कुठलीही फळधारणा झाली नाही. तसेच इतर झाडांना फक्त 10 ते 15 बोंडे लागली. जी वास्तविक 250 ते 300 पर्यंत जावयास पाहिजे होती. याशिवाय कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे सदर कापसाची जात ही खोड व पानावर मध्यम लव असलेले आहे; परंतू प्रत्यक्षात 30 टक्के झाडांच्या पानावर व खोडावर लव आढळली नाही. त्यामुळे संपूर्ण कापसाचा लॉट हा वाया गेला व काहीही उत्पन्न त्यापासून मिळाले नाही. संकरित कापसाच्या झाडामध्ये असलेला सारखेपणा व जोम आढळला नाही.
त्यामुळे तक्रारदाराचे एकरी उत्पादन कमीत कमी 15 क्विंटल प्रमाणे एकूण तीन एकरचे 45 क्विंटल नुकसान झाले. यावर्षी शासनाने रु. 2500/- हमी भाव कापूस एकाधिकार योजनेखाली जाहीर केला होता. त्यामुळे तक्रारदाराचे कंपनीने भेसळयुक्त बियाणे पुरवल्यामुळे वरील भावाप्रमाणे रक्कम रु. 1,12,500/- चे नुकसान झाले. मशागतीचा खर्च रु. 20,000/- वाया गेला. मानसिक त्रास झाला. त्याबाबत तक्रारदार सामनेवालेकडून रु. 20,000/- तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु. 5,000/- 10 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे.
विनंती की, तक्रारदारास सामनेवालेकडून नुकसान भरपाईपोटी रु. 1,57,500/- 10 टक्के व्याजासह देण्याबाबत आदेश व्हावा.
सामनेवाले यांनी त्यांचा लेखी खुलासा तारीख 27/10/2004 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तसेच कृषी अधिकारी यांच्या चौकशी कमेटीचा निष्कर्ष त्यांनी नाकारलेला आहे. पिकाची उंची ही सिंचनाच्या अभावामुळे किंवा मशागतीच्या अभावामुळे कमीजास्त होवू शकते. सदर तक्रारीतील आक्षेपाबाबत तक्रारदाराचा कोणताही पुरावा नाही, त्यामुळे तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
सामनेवाले नं. 2 यांनी त्यांचा लेखी खुलासा तारीख 27/10/2004 रोजी दाखल केला. तक्रारदाराच्या तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. सामनेवाले हे अधिकृत विक्रेते असल्याचे व तक्रारदाराने बियाणे खरेदी केल्याचे सामनेवालेंना मान्य आहे. सदरचे बियाणे हे सिलबंद पाकीटातून तसेच पाकीटावर योग्य ती संपूर्ण माहिती पाहून व नोंदी ठेवूनच विक्री केलेले आहे. तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
सदरची तक्रार तारीख 30/5/2006 रोजी तत्कालीन न्याय मंचाने रदृ केली होती. सदर आदेशाविरुध्द तक्रारदार हे मा. राज्य आयोग, परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांचेकडे प्रथम अपील नं. 1441/06 चे तारीख 25/7/2006 रोजी दाखल केले होते. त्याचा निकाल तारीख 05/07/2010 रोजी झाला असून सदरचे अपील फेरचौकशीसाठी पाठविण्यात आलेले आहे व त्यानुसार सदरचे अपील तारीख 16/9/2010 रोजी फेरचौकशीसाठी बोर्डावर घेण्यात आले आहे. तक्रारदार व सामनेवाले नं. 2 यांना रजिस्टर पोष्टाने नोटीसा पाठविल्या. सामनेवाले नं. 1 हे न्याय मंचात तारीख 16/9/2010 रोजी हजर झाले. तक्रारदार व सामनेवाले नं. 2 यांची नोटीस त्यांनी घेतली परंतू ते न्याय मंचात हजर झाले नाही व त्यांनी सदर तक्रारीसंदर्भात कोणताही पुरावा सादर केलेला नाही, त्यामुळे न्याय मंचाने ग्राहक संरक्षण कायदा-1986, दुरुस्ती कायदा-2003 चे कलम-13(2)(सी) प्रमाणे गुणवत्तेवरती तक्रार निकाली काढण्याचा निर्णय न्याय मंचाने घेतला.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाले नं. 1 चा खुलासा, शपथपत्र, सामनेवाले नं. 1 चे साक्षीदार प्रदिप माणिकराव मोरे, संशोधन अधिकारी, अजित सिड्स लि. औरंगाबाद, निशाणी- 17 यांचे शपथपत्र, सामनेवाले नं. 2 चा खुलासा व शपथपत्र, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. सामनेवाले नं. 1 यांच्या दाखल कागदपत्रांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पुरावा दयावयाचा नाही, अशी पुरसीस दाखल केली. तक्रारदाराचा व सामनेवाले नं. 1 व 2 चा एकत्रित युक्तिवाद यांचे सखोल वाचन केले.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराचा मुलगा गोविंद यांच्या नावाने गट नं. 19 मोगरा येथे शेतजमीन आहे. तक्रारदाराच्या नावाने सदरची शेतजमीन नाही. तसेच यासंदर्भात गोविंद दादाराव इंगळे यांचे शपथपत्र दाखल नाही.
तक्रारदाराने कपाशीचे बियाणे सामनेवाले नं. 1 ने उत्पादित केलेले विकत घेतलेले आहे व सदरचे बियाणे वरील शेतजमीनीत लागवड केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
यासंदर्भात कपाशीची लागवड झाल्यानंतर उगवण चांगली झालेली आहे त्याबदल तक्रारदार समाधानी आहे परंतू फळधारणा व्यवस्थीत झाली नाही व त्यामुळे तक्रारदारांना योग्य ते उत्पन्न मिळू शकलेले नाही. यासंदर्भात तक्रारदाराने कृषी अधिकारी बियाणे समिती यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी तारीख 16/12/2003 रोजी तक्रारदाराच्या शेतावर भेट दिलेली आहे. तक्रारदाराने वरील बियाण्याची लागवड कोणत्या तारखेला केली त्याबाबतचा कुठलाही उल्लेख केलेला नाही. तथापि, सामनेवालेने त्यांच्या युक्तिवादात सदर लागवडीची तारीख 07/07/2003 अशी नमूद केलेली आहे. कंपनीच्या गुणधर्माप्रमाणे कपाशी अजित-555 पिकाचा कालावधी लागवडी पासून 165 ते 180 दिवसांचा आहे. यासंदर्भात लागवड ता. 7/7/2003 व पाहणीची तारीख 26/12/2003 या कालावधीत 170 दिवस पूर्ण झाले होते.
तसेच तक्रारदाराने पिक पाहणी निष्कर्ष दाखल केलेला आहे. त्या संदर्भात पिक पाहणीच्यावेळी हजर असलेल्या कोणत्याही संबंधीत अधिका-याचे शपथपत्र दाखल केलेले नाही. जेव्हा की, सामनेवाले यांनी सदरचा निष्कर्ष पूर्णपणे नाकारलेला आहे. तसेच यासंदर्भात सामनेवाले नं. 1 चे साक्षीदार श्री प्रदीप मोरे, संशोधन अधिकारी अजित सिड्स लि. औरंगाबाद रा. उस्मानपुरा औरंगाबाद यांचे नि. 17 चे शपथपत्राचे अवलोकन केले असता प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी ते तक्रारदाराच्या शेतावर हजर होते व त्यांनी डॉ. बेग कृषी अधिकारी यांना जायमोक्यावर पिकाच्या पाहणीची माहिती लिहून घेण्याची विनंती केली. परंतू त्यांनी तसे न करता त्यांच्या सरांना विचारुन अहवाल तयार करतो. त्यांच्या विश्वासावर अवलंबून राहून सामनेवालेचे प्रतिनिधी निघून गेले.
अशी विधाने आलेली असतांना तक्रारदाराने सदर साक्षीदाराची उलटतपासणीही घेतलेली नाही. याबाबत सामनेवाले नं. 1 यांची निष्कर्ष अहवालास जोरदार हरकत आहे. सदर निष्कर्ष अहवाल वरील प्रमाणे शाबीत न झाल्याने त्याबाबतचा कोणताही पुरावा तक्रारदाराचा नाही, त्यामुळे बियाणे दोषयुक्त असल्याची बाब स्पष्ट होवू शकलेली नाही. तसेच सदरचा अहवाल हा कृषी आयुक्त, कृषी संचालनालय, पुणे यांच्या परिपत्रकानुसार नसल्याची सामनेवाले नं. 1 ची हरकत आहे. यासंदर्भात दाखल असलेल्या परिपत्रकाचे अवलोकन केले असता त्यातील मार्गदर्शनाप्रमाणे कृषी अहवाल हा जायमोक्यावर झालेला दिसत नाही. तसेच पिक पाहणी पंचनामा देखील नाही. केवळ निष्कर्ष देण्यात आलेला आहे. तो सदर परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही झालेली नसल्याने ग्राहय धरणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
तक्रारदाराने नांदेड येथील असिस्टंट कॉटन ग्रेडर यांचे अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ऑफीसर यांनी दिलेल्या पत्राची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. त्याचे शपथपत्र दाखल केलेले नाही.
कागदपत्रे ही केवळ दाखल करुन शाबीत होत नाहीत तर ती शाबीत करण्यासाठी सदर कागदपत्रांच्या संदर्भात योग्य तो पुरावा सादर करण्याची जबाबदारी कागदपत्र दाखल करणाराची असते. त्याप्रमाणे जर योग्य कार्यवाही झालेली नसेल तर ती कागदपत्रे पुरावा म्हणून वाचता येणार नाहीत. प्रस्तुत प्रकरणात अशीच परिस्थिती असल्याने भेसळयुक्त बियाणे विकल्याने तक्रारदारांना उत्पन्न कमी आले, ही बाब सिध्द करण्याची पूर्ण जबाबदारी तक्रारदाराची असतांना त्याबाबतचा कोणताही सक्षम पुरावा नसल्याने सदरचे विधान स्पष्ट होवू शकलेले नाही, असे न्याय मंचाचे मत आहे. पर्यायाने तक्रारदारांना तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे कोणतीही नुकसान भरपाई देणे उचित होणार नाही, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार रदृ करण्यात येत आहे.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
चुनडे/- स्टेनो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड