(श्रीमती मंजुश्री खनके, मा. सदस्या यांचे आदेशांन्वये)
- आ दे श -
(पारित दिनांकः 06/08/2016)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 प्रमाणे सदर तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारकर्त्याने दि. 14.06.2014 ला विरुध्द पक्षाकडुन मॉडयुलर किचन करिता साइझ 8 X 17X 22 च्या व पुल आऊट साईज 8 x 22 x 24 साइज रु. 10,000/- ला खरेदी केल्या. त्यावेळी विरुध्द पक्षाने त्या ट्रॉल्या उत्तम दर्जाच्या असुन कधीच काळया पडणार नाही असे मौखीक आश्वासन दिले. परंतु खरेदी केल्यानंतर 2 महिन्यातच त्या ट्राल्या काळया पडू लागल्या व त्यावरील लेअर पॉलीश निघत असल्यामुळे त्या निकृष्ट दर्जाच्या आहेत. हे लक्षात आल्यानंतर दि.14.10.2014 ला विरुध्द पक्षासोबत संपर्क करुन त्या ट्राल्या वापस घेऊन पैसे रोख किंवा चेक चे स्वरुपात परत करण्याची विनंती केली. परंतु विरुध्द पक्षाने ट्राल्याही परत घेतल्या नाही व पैसेही परत केले नाही. त्यामुळे तक्रारकर्ताने त्या दुकानातुन परत आणल्या आणि त्यानंतरही वारंवार फोन करुन विनंती केली. परंतु पैसे परत न केल्याने कायदेशीर नोटीस दि. 21/10/2014 ला पाठविली. परंतु त्याचा स्विकार विरुध्द पक्षाने केला नाही. म्हणुन शेवटी नाइलाजाने तक्रारकर्त्याने मंचासमोर तक्रार दाखल केली. व भरणा केलेली रक्कम रु. 10,000/- ही 18% व्याजदराने परत मिळावी. तसेच तक्रारीचा खर्च रु. 2,000/- व झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाची रक्कम रु. 4,000/- मिळावी अशी प्रार्थना केलेली आहे.
2. तक्रारकर्ताने तक्रारीसोबत केलेला अर्ज, नोटीस, पावती, लिफाफा, डिलीवरी बिल, ट्रालीचे फोटो इ. कागदपत्र दाखल केलेली आहेत.
3. मंचामार्फत विरुध्द पक्षाला नोटिस पाठविला असता विरुध्द पक्ष हजर झाले परंतु पुरेशी संधी देऊनही लेखी उत्तर दाखल न केल्याने त्यांचे विरुध्द विनालेखी जबाब आदेश पारीत करण्यात आला त्या नंतर विरुध्द पक्षाने मंचात हजर होऊन विनालेखी जबाब आदेश रद़्द करुन प्राथमिक आक्षेपासह लेखीउत्तर दाखल केले व तक्रारकर्त्याचे तक्रारीतील संपुर्ण कथन अमान्य केले. तक्रारकर्त्याने जानून बुजून खोटे बोलून ख-या बाबी लपवुन ठेवल्याचे नमुद केले. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडुन सहा ट्रॉल्या एक पुल आऊट परत घेण्यास नकार दिल्याचे अमान्य केले. तसेच त्या योग्य दर्जाच्या असून दुरुस्त करुन देण्यास तयार असल्याचे नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने खोटी केस दाखल करुन वि. प. चे 20 वर्षापासुनची व्यवसायातील असलेली ख्याती संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच त्या ट्राल्या तक्रारकर्त्याकडुन दोन महिन्यात डॅमेज झाल्याचे नमुद केले आहे. परंतु विरुध्द पक्षाकडुन पैसे वसुल करण्याच्या दुष्ट हेतुने तक्रार दाखल केली असल्याने ती खारीज करण्याची विनंती केली आहे.
4. त्यानंतर तक्रारकर्त्याने व विरुध्द पक्षाने लेखी युक्तीवाद दाखल व मंचाने तोंडीयुक्तिवाद ऐकला तसेच अभिलेखावरुन कागदपत्राच्या अवलोकन केले असता. मंचाचे निष्कर्षाथ मुद्दे खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1. विरुध्द पक्षाचे सेवेतील न्युनता दिसून येते काय ? होय.
2. तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मागण्यांस पात्र आहे काय ? अंशतः स्वरुपात.
3. आदेश ? अंशतः मंजूर.
-// कारणमिमांसा // –
5. मुद्दा क्र.1 बाबतः- मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे असे निदर्शनास आले की, तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्षाकडुन रु. 10,000/- च्या ट्राल्या घेतल्याचे दाखल बिलावरुन दिसुन येते. तसेच त्याच बिलावरुन विरुध्द पक्षाने त्या वापस आल्याचे व पैसे सकाळी देण्याचे असे लिहुन दिल्याचे दि.14/10/2014 तारखेस नमुद केल्याचे दिसुन येते. तसेच ट्रॉलीचे फोटो यावरुन स्टील रॉडचे पॉलीश उखडण्याचे स्पष्टपणे दिसुन येत आहे. तसेच तक्रारकर्त्याने त्या ट्रॉल्या परत करण्यासाठी दुकानात आणूनही त्या परत न घेतल्याने तक्रारकर्त्यास घरी न्याव्या लागल्या त्यासाठी दोन वेळा ने-आण करण्यासाठी भाडेखर्च करावा लागला तसेच अजूनही परत न घेतल्याने दुस-या ट्रॉल्या घेऊन किचनचे उर्वरित काम पूर्ण करावे लागले. तसेच ट्रॉल्या फिटींगचे पैसेही दोनवेळा द्यावे लागले असा तोंडी युक्तिवाद तक्रारकर्त्याकडून करण्यांत आला. याउलट विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून पैसे वसुल करण्याचे वाईट हेतूने सदरची तक्रार केली असून ट्रॉल्या या चांगल्या कंपनीच्या असून त्यात तक्रारकर्त्याने म्हटल्याप्रमाणे कुठलीही त्रुटी नाही, असे लेखीउत्तरात व युक्तिवादात नमूद केले आहे. परंतु तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या फोटोवरुन पॉलिश उखडलेले दिसत असुनही विरुध्द पक्षाने त्यावर कुठलेही भाष्य केले नाही. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पावतीवर ट्रॉल्या परत मिळाल्याचे व पैसे परत करण्याचे मान्य करुनही आजपावेतो पैसे परत केले नाही किंवा त्याबाबतचा कुठलाही कागदोपत्री पुरावा अभिलेखावर आणलेला नाही.
यावरुन असे स्पष्ट होत आहे की, ट्रॉल्यांमध्ये दोष होता आणि तो विरुध्द पक्षाला मान्य असल्यामुळे त्याने त्या परत आल्याचे लिहून दिले होते. तसेच ट्रॉल्याची किंमतही परत करण्याचे आश्वासन देऊनही ते आजपावेतो पूर्ण न करणे हीच विरुध्द पक्षांच्या सेवेतील न्युनता आहे, हे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असे नोंदविले आहे.
6. मुद्दा क्र.2 बाबतः- मुद्दा क्र. 1 च्या निष्कर्षाच्या अनुषंगाने विरुध्द पक्षांच्या सेवेतील न्युनता सिध्द होत असल्याने मुद्दा क्र. 2 नुसा निश्चितच तक्रारकर्ता हा मागणी प्रमाणे दाद मिळण्यांस पात्र आहे. त्यानुसार ट्रॉल्यांची किंमत रु.10,000/- द.सा.द.शे.9% व्याजासह परत
मिळण्यात यावी. तसेच तक्रारकर्त्यास दोन वेळा दुकानात ट्राल्यांची ने-आण करावी लागली तसेच फिटींगचाही खर्च दोनवेळा करावा लागला. त्यामुळे निश्चितच आर्थीक, शारीरिक, मानसिक त्रास तक्रारकर्त्यास करावा लागला, त्यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थीक त्रासाची भरपाई म्हणून रु.2,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळण्यांस तक्रारकर्ता पात्र आहे. करीता मंच खालिल प्रमाणे आदेश करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास ट्रॉलीची किंमत रु.10,000/- दि.14.06.2014 पासुन प्रत्यक्षात रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह परत करावे
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाच्या नुकसान भरपाई दाखल
रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे.
3. वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासून
30 दिवसांचे आंत करावी.
4. उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
5. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.