::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 10/10/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रं. 2 याच्या माध्यमातुन गैरअर्जदार क्रं. 1 यांच्याकडून मौजा – मोरवा सर्व्हे नं. 194/1 प्लॉट क्रं. 62 आराजी 165 चौ.मी. जागेचे क्षेञफळ 2098 चौ. फु. 50 रु प्रति फुट याप्रमाणे प्लॉटची एकूण किंमत 104939/- रु. अर्जदाराला प्लॉटची विक्री करण्याचा सौदा केला. सदर सौदा दि. 31/10/05 रोजी झाला. अर्जदाराने वेळोवेळी प्लॉटची मासीक किस्त प्रमाणे एकूण रु. 80,000/- गैरअर्जदार क्रं. 1 यांना दिले आहे. गैरअर्जदार क्रं. 2 ने ईसारपञामध्ये साक्षिदार म्हणून सही केली आहे. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी दि. 31/10/06 पर्यंत किंवा त्यापूर्वी प्लॉटची उर्वरित रक्कम घेवून प्लॉटची विक्री करुन देणे आवश्यक होते परंतु दोन्हीही गैरअर्जदारांनी सदर प्लॉटची विक्री करुन देण्यास अर्जदाराला टाळाटाळ करीत राहीले. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांना दि. 23/10/2012 व 27/11/2012 रोजी लेखीपञ पाठवून प्लॉटची विक्री करुन देणे किंवा घेतलेली रक्कम परत करणे असे कळविले. परंतु गैरअर्जदाराने त्या पञांवर काहीही दखल घेतली नाही. सबब अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदार क्रं. 1 यांनी घेतलेले पैसे 80,000/- रु. दि. 05/10/06 पासून 18 टक्के व्याजासह गैरअर्जदारानी संयुक्तपणे अथवा वैयक्तिक अर्जदाराला देण्याचे आदेश दयावे. अर्जदाराने पुढे अशी मागणी केली आहे कि, अर्जदाराला झालेल्या शारिरीक, मानसिेक ञासापोटी नुकसान भरपाई तसेच तक्रारीचा खर्च देण्याचे आदेश दयावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हजर झाले व गैरअर्जदार क्रं. 1 ने नि. क्रं. 17 वर त्याचे लेखीबयाण दाखल केले. गैरअर्जदार क्रं. 1 ने त्याच्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदारासोबत कोणताही प्लॉट विक्रीचा करार केला नाही व रक्कम स्विकारली नाही. गैरअर्जदार क्रं. 2 हा गैरअर्जदार क्रं. 1 चा एजंट नाही. सदर तक्रार अर्जदाराने 7 वर्षाचे नंतर कुठलेही कारण नमुद न करता दाखल केली आहे. अर्जदाराने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असून गैरअर्जदार क्रं. 1 ला नाकबुल आहे. गैरअर्जदार क्रं. 1 ने अशी मागणी केली आहे कि, सदर तक्रार खर्चासह खारीज करावी.
4. गैरअर्जदार क्रं. 2 ने आपले लेखीउत्तर नि. क्रं. 15 वर दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रं. 2 ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार क्रं. 2 चा गैरअर्जदार क्रं. 1 शी काहीही संबंध नाही व त्यांना ओळखतच नाही. अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज खोटे व बनावटी असून गैरअर्जदार क्रं. 2 ला ते अमान्य आहे. गैरअर्जदार क्रं. 2 चे अर्जदाराशी चांगले संबंध असल्यामुळे आधीपासून लिहीलेल्या इसारपञावर अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 कडून साक्षिदार म्हणून सही घेतली. गैरअर्जदार क्रं. 2 च्या समोर अर्जदाराचा कोणत्याही प्लॉटच्या विक्री संबंधात व्यवहार झाला नव्हता व अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 2 समोर कोणतीही रक्कम अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 1 ला दिली नव्हती. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक नाही. अर्जदाराने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असून गैरअर्जदार क्रं.2ला नाकबुल आहे. गैरअर्जदार क्रं. 2 ने अशी मागणी केली आहे कि, सदर तक्रार खर्चासह खारीज करावी.
5. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 1 चा ग्राहक आहे काय ? होय.
2) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 2 चा ग्राहक आहे काय ? नाही.
3) सदर तक्रार मुदतीत दाखल आहे काय ? नाही.
4) आदेश काय ? अंतीम आदेशा प्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
6. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रं. 2 यांच्या माध्यमातुन गैरअर्जदार क्रं. 1 याच्याकडून मौजा – मोरवा सर्व्हे नं. 194/1 प्लॉट क्रं. 62 आराजी 165 चौ.मी. जागेचे क्षेञफळ 2098 चौ. फु. 50 रु प्रति फुट याप्रमाणे प्लॉटची एकूण किंमत 104939/- रु. अर्जदाराला प्लॉटची विक्री करण्याचा सौदा केला. सदर सौदा दि. 31/10/05 रोजी झाला. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि. क्रं. 5 वर दस्त क्रं. अ- 1 वरुन सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
7. अर्जदाराने दाखल केलेल्या नि. क्रं. 5 वर दस्त क्रं. अ- 1 वरुन असे दिसते कि, गैरअर्जदार क्रं.2 ने इसारपञावर साक्षिदार म्हणून सही केलेली आहे व गैरअर्जदार क्रं. 2 ने अर्जदाराकडून कोणताही मोबदला घेतला नाही तसेच तक्रारीत वर्णित केलेल्या प्लॉटचा कोणताही व्यवहार अर्जदारासोबत केलेला नसून गैरअर्जदार क्रं. 2 हा अर्जदाराचा ग्राहक नाही असे सिध्द होते . सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
8. अर्जदाराने तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदाराला प्लॉटची विक्री करण्याचा सौदा केला. सदर सौदा दि. 31/10/05 रोजी झाला. अर्जदाराने वेळोवेळी प्लॉटची मासीक किस्त प्रमाणे रु. 80,000/- गैरअर्जदार क्रं. 1 यांना दिले आहे. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी दि. 05/10/06 पर्यंत किंवा त्यापूर्वी प्लॉटची उर्वरित रक्कम घेवून प्लॉटची विक्री करुन देणे आवश्यक होते परंतु गैरअर्जदार क्रं. 1 हे सदर प्लॉटची विक्री करुन देण्यास अर्जदाराला टाळमटाळ करीत राहीले. व अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदार क्रं. 1 यांनी प्लॉटची विक्री करुन न दिल्यामुळे गैरअर्जदार क्रं. 1 यांनी घेतलेले पैसे 80,000/- रु. दि. 05/10/06 पासून 18 टक्के व्याजासह गैरअर्जदाराने संयुक्तपणे अथवा वैयक्तिक अर्जदाराला देण्याचे आदेश दयावे. यावरुन असे निष्पन्न होते कि, सदर तक्रार दाखल करण्याचे कारण दि. 05/10/06 रोजी घडले. अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दि. 20/08/13 रोजी दाखल केलेली आहे. सदर तक्रार कलम 24 अ (1) ग्राहक सरंक्षण कायदा 1986 मधील नमुद असलेल्या मुदतीचे बाहेर असल्यामुळे मुद्दा क्रं. 3 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
9. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2) उभयपक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
3) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 10/10/2014