:: निकालपत्र ::
(पारीत व्दारा श्रीमती स्मिता निळकंठ चांदेकर, मा.सदस्या)
(पारीत दिनांक– 22 नोव्हेंबर, 2018)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्षा विरुध्द सदोष बॅटरी दिल्या संबधाने दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 हे अजंता मॅन्युफॅक्चरींग कंपनी असून ती ओरेव्हा नावाने बॅटरीवर चालणा-या दुचाकी वाहनाचे उत्पादन करते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 यांनी उत्पादीत केलेली बॅटरीवर चालणारी ओरेव्हा बाईक विरुध्द पक्ष 2 यांचेकडून इलेक्ट्रानिक बाईक मॉडेल नंबर 500 बॅटरीसहीत दिनांक 10/03/2016 रोजी रुपये 44,015/- देऊन खरेदी केली. सदर बाईकला चार बॅट-या लागत होत्या व त्या विरुध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्यास दिल्या त्यांचा क्रमांक 75401015, 75391015, 75411015, 75381015 असुन विरुध्द पक्षाने सदर बॅट-या ह्या 1 वर्षाच्या वॉरन्टी सहीत दिलेल्या होत्या.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने सदर वाहन खरेदी केल्यानंतर 2 ते 4 दिवसांनी लक्षात आले की, विरुध्द पक्ष 2 यांनी दिलेल्या हमीनुसार दुचाकी वाहनाचे चारही बॅटरी पुर्ण चार्ज करुन सुध्दा बाईक 60 ते 70 कि.मी. चालत नाही, म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 2 यांना दाखविले असता त्यांनी बनवाबनविचे उत्तरे देऊन काही दिवसानंतर सदर वाहन 60 ते 70 कि.मी. चालेल अशी हमी दिली. तक्रारकर्त्याचे सदर वाहन 10 ते 20 कि.मी. च्या वर चालत नव्हते त्यामुळे सदरचे वाहनातील बॅटरी दुरुस्तीकरीता विरुध्द पक्ष 2 यांच्याकडे घेऊन गेले असता सदर वाहनातील चारही बॅटरी फुगुण आलेल्या दिसल्या. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 2 यांच्याकडे वाहनातील चारही बॅटरी 1 वर्षाच्या वॉरन्टी आतील असल्याने बदलवून देण्याची विनंती केली. तक्रारकर्त्याने ज्या उद्देशाने वाहन खरेदी केले होते ते साध्य झाले नाही व सदर वाहनातील बॅट-या ह्या सदोष होत्या व त्या पूर्णतः चार्ज होत नव्हत्या आणि वाहन हे जास्त कि.मी. चालू शकत नव्हते. विरुध्द पक्ष 2 यांनी बॅटरी बदलवून न दिल्याने व बॅट-या दुरुस्ती करण्याबाबतची कोणतीही दखल न घेतल्यामुळे शेवटी तक्रारकर्त्याने वकीलामार्फत दिनांक 08/08/2016 रोजी विरुध्द पक्षाला नोटीस पाठविली सदर नोटीसचे उत्तर विरुध्द पक्ष 2 यांनी दिले, परंतु वाहनातील बॅट-या बदलवून दिलेल्या नाहीत किंवा वाहन सुध्दा बदलवून दिले नाही, व त्याला दोषपूर्ण सेवा दिली असल्याने तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन विरुध्दपक्षां विरुध्द पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
तक्रारकर्त्याने दिनांक 10/03/2016 रोजी खरेदी केलेली इलेक्ट्रानिक बाईकची चार बॅटरी परत घेवून नविन चार बॅटरी बदलवून देण्यात याव्या किंवा वाहनाची रक्कम रुपये 44,015/ 9 टक्के व्याजासहित परत करावी. तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,50,000/- देण्यात यावेत तसेच तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- विरुध्दपक्षांकडून मिळावी अशी विनंती केली आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) व 2) तर्फे मंचासमक्ष एकत्रित लेखी उत्तर दाखल करण्यात आले. त्यांनी लेखी उत्तरात नमुद केले की, विरुध्द पक्ष 1 यांनी उत्पादीत केलेली ओरेव्हा बाईक बॅटरीवर चालणारी असून बॅटरी पुर्णतः चार्ज झाल्यानंतर सदर बाईक साधारणतः 60 ते 70 कि.मी. चालते अशी जाहिरात केलेली होती तसेच तक्रारकर्त्याने गाडी बॅटरीसहीत घेतल्याबाबत वाद नाही, परंतु वाहन खराब झाल्यास वाहन बदलून देण्याची हमी दिलेली होती हे कथन खोटे व बनावटी असल्याने अमान्य केले आहे. विरुध्द पक्षा 1 व 2 ने पुढे असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याने गाडी एकदाही सर्व्हिसिंगकरीता आणली नाही. गाडी दर दोन महिन्यांनी सर्व्हिसिंगकरीता आणणे आवश्यक होते. विरुध्द पक्ष 2 हा स्वतः दिनांक 16/06/2016 रोजी तक्रारकर्त्याच्या गावी जाऊन गाडी सर्व्हिसिंगकरीता आणण्याची सूचना दिली. त्यानंतरही तक्रारकर्त्याने एक महिण्यांनी गाडी सर्व्हिसिंगकरीता आणली. तक्रारकर्त्याने आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ बॅट-या चार्ज केल्याने बॅटरी फुगून दोष निर्माण झालेला आहे. तक्रारकर्त्याला गाडी व बॅटरीसोबत बॅटरीचा वापर व उपयोगाबाबतचे माहिती दर्शिका देण्यात आले होते. तक्रारकर्त्याला गाडी घेतानां सुध्दा माहिती दर्शिकामध्ये नमूद केल्याप्रमाणे बॅटरीज किती विज दाबात चार्जींग करायच्या, किती वेळ चार्जींग करायची, आवश्यकतेपेक्षा अधिक काळ चार्जींग केल्यास बॅटरी खराब होतात याबाबत सर्व आवश्यक सुचना विरुध्द पक्षाने समजावून सांगितल्या होत्या. तक्रारकर्त्याने माहिती पुस्तिकेतील सुचनांचे पालनाकडे दुर्लक्ष करुन आपल्या मनमानीने दोन हजार किलोमिटर गाडी चालवून सदरहू गाडी व बॅटरीजचा वापर केला व बॅटरीज खराब केल्या व दिनांक 30/07/2016 रोजी विरुध्द पक्ष 2 चे सर्व्हिस सेंटरला जमा केली. त्यात विरुध्द पक्ष 1 व 2 यांचा कोणताही दोष नाही. तक्रारकर्त्याच्या गाडीत कुठलाही किरकोळ दोष आढळला त्यावेळी विरुध्द पक्षाकडे लेखी तक्रार वा तोंडी तक्रार केलेली नाही. तक्रारकर्त्याने सदर वाहन बेजबाबदार पणाने वापर केल्यामुळे जर दोष निर्माण झाला असेल तर विरुध्द पक्ष 1 व 2 हे मुळीच जबाबदार नाहीत तसेच तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून रक्कम हडपण्याकरीता खोटी व बनावटी तक्रार दाखल केली असल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्द पक्ष 1 व 2 ने केली आहे.
04. तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारीचे पृष्टयर्थ पृष्ट क्रं-13 वरील वर्णन यादीनुसार एकूण-03 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये तक्रारकर्त्याने पाठविलेली कायदेशीर नोटीस, विरुध्दपक्षाचे नोटीसला दिलेले उत्तर, इन्व्हाईस कम डिलीवरी चालान इत्यादी छायाकिंत प्रतीचा समावेश आहे.
05. विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 यांनी पृष्ट क्रं 33 वर जोडलेल्या वर्णन यादीनुसार इन्व्हाईस कम डिलीवरी चालान, वाहन सर्व्हिस रिपोर्ट, अटी व शर्ती दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपत्र, विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 यांचे लेखी उत्तर, उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्त्याचे वकील यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. युक्तिवादाचे वेळी विरुध्द पक्ष 1 व 2 चे वकील गैरहजर, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे.
:: निष्कर्ष ::
07. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 अजंता मॅन्युफॅक्चरींग कंपनीने उत्पादीत ओरेव्हा बाईक हे बॅटरीवर चालणारे दुचाकी वाहन विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांचेकडून दिनांक 10/03/2016 रोजी रुपये 44,015/- ला खरेदी केले हे वादातीत नाही. सदर बाईक सोबत विरुध्द पक्ष 2 ने तक्रारकर्त्यास चार बॅट-या दिल्या त्यांचा क्रमांक 75401015, 75391015, 75411015, 75381015 आहे व बॅट-यावर 1 वर्षाच्या वॉरन्टी कालावधी होता ही बाब देशील उभय पक्षांमध्ये विवादास्पद नाही. तक्रारकर्त्याने वर्णन यादीतील पृष्ठ क्रमांक 13 नुसार बाईक खरेदीच्या बीलाची छायाकिंत प्रत दाखल केली आहे त्यावरुन ही सदर बाब सिध्द होते.
08. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे विरुध्द पक्षाने सदर बाईक साधारणतः 60 ते 70 कि.मी. चालते अशी जाहिरात केलेली होती, परंतु सदर वाहन खरेदी केल्यानंतर दोन-चार दिवसांनी त्याच्या असे लक्षात आले की, चारही बॅटरी पूर्ण चार्ज करुन देखील बाईक 10 ते 20 कि.मी. च्या वर चालत नव्हती, त्यामुळे त्याने विरुध्द पक्ष 2 यांचेकडे तक्रार केली असता विरुध्द पक्ष 2 यांनी बनावाबनविचे उत्तर देऊन काही दिवसांनी सदर वाहन 60 ते 70 किलोमिटर चालेल असे सांगितले, परंतु काही दिवसानंतरही सदर वाहन विरुध्द पक्षाने हमी दिल्यानुसार चालत नसल्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाकडे बॅटरी दुरुस्ती करीता घेऊन गेले असता वाहनातील चारही बॅटरी फुगुण आलेल्या दिसल्या. त्यामुळे त्याने चारही बॅटरी बदलवून देण्याची विनंती केली. विरुध्द पक्ष 2 यांनी सदर बॅट-या बदलवून देण्यास नकार दिला. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार वाहनातील चारही बॅट-या ह्या सदोष होत्या व खराब झाल्यामुळे त्या बदलवून देणे ही विराध्द पक्ष 1 व 2 यांची जबाबदारी होती. विरुध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्यास बॅटरी बदलवून न देऊन सेवेत त्रृटी केली आहे.
09. याउलट विरुध्द पक्ष 1 व 2 यांचे म्हणण्यानुसार गाडी खरेदी केल्यानंतर तक्रारकर्त्याने दर दोन महिन्याने ती सर्व्हिसींगकरीता आणणे आवश्यक होते, परंतु तक्रारकर्त्याने एकदाही गाडी सर्व्हिसींगकरीता आणली नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष 2 ने दिनांक 16/06/2016 रोजी तक्रारकर्त्याला गाडी दुरुस्तीकरीता आणण्याची सुचना दिली. त्यानंतरही तक्रारकर्त्याने एक महिन्याने गाडी सर्व्हिसींगकरीता आणली त्यावेळी बॅट-या फुगून खराब झाल्या होत्या. विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ बॅट-या चार्ज केल्याने त्या खराब झाल्या. तक्रारकर्त्याला गाडी सोबत बॅटरीचा वापर व उपयोगाबाबत माहिती दर्शिका देण्यात आले होते, त्यामध्ये बॅटरी चार्जींग व वापराच्या सुचना नमूद असून बाईक खरेदीच्या वेळी तक्रारकर्त्याला सदर सुचना तोंडी सांगण्यात आल्या होत्या तरी देखील तक्रारकर्त्याने तोंडी सुचनेकडे दुर्लक्ष करुन गाडी दोन हजार किलोमीटर चालविली. तक्रारकर्त्याच्या बेजबाबदार वापरामुळे बॅटरीज मध्ये दोष निर्माण झाला असल्याने विरुध्द पक्ष 1 व 2 त्याकरीता जबाबदार नाहीत व त्यांनी सेवेत त्रृटी केली नाही.
10. तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारीचे पृष्ठर्थ पृष्ठ क्रमांक 38 वर साक्ष पुरावा दाखल केला आहे. विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ने पृष्ठ क्रमांक 33 वरील वर्णन यादीनुसार तक्रारकर्त्याच्या वाहनाच्या सर्व्हिसींग रिपोर्ट ची छायाकिंत प्रत दाखल केली आहे. सदर रिपोर्टचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याच्या बाईकची पहिली सर्व्हिसींगची तारीख दिनांक 10 जुन, 2016 नमूद असून तक्रारकर्त्याने सर्व्हिसींगकरीता गाडी आणली नसल्याबाबत नोंद आहे. त्यानंतर दिनांक 19/07/2016 रोजी तक्रारकर्त्याने गाडी तपासणीकरीता आणली असता चारही बॅटरी संपूर्ण फुगण्याची माहिती प्रत्यक्ष दिली असे नमूद आहे. सदर दस्ताऐवजावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने गाडी मार्च- 2016 मध्ये घेतली असता तीन महिन्याने म्हणजेच दिनांक 10 जुन, 2016 रोजी पहिली सर्व्हिसींग होती ती तक्रारकर्त्याने केलेली नाही. परंतु विरुध्द पक्ष 2 ने स्वतः घेतलेल्या नोंदीनुसार दिनांक 19/07/2016 रोजी तक्रारकर्त्याच्या गाडीच्या चारही बॅटरी फुगल्या होत्या व सदर बाब विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ला माहित झाली होती. विरुध्द पक्ष 2 ने दिलेल्या दिनांक 10/03/2016 चे बीलानुसार बॅटरीची वॉरन्टीचा कालावधी एक वर्षाचा होता म्हणजेच वॉरन्टी कालावधीत सदर बॅटरी खराब झाल्या ही बाब स्पष्ट होते. विरुध्द पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे सदर बॅटरीचा अयोग्य वापर केल्यामुळे तसेच तक्रारकर्त्याच्या बेजबाबदारीने बॅट-या खराब झाल्या. विरुध्द पक्ष 1 व 2 ने त्याबाबत अभिलेखावर शपथपत्र दाखल केले नसून कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा किंवा तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही. त्यामुळे केवळ पहिली सर्व्हिसींग न केल्यामुळे बाईकच्या चारही बॅटरी खराब झाल्यात असे म्हणता येणार नाही.
11. विरुध्द पक्षाने पृष्ठ क्रमांक 36-37 वर वॉरन्टी कार्डची छायाकिंत प्रत दाखल केली आहे. त्यामध्ये वॉरन्टीच्या अटी व शर्ती नमूद केलेल्या आहेत त्यात अट क्रमांक 2, 7,8,10 व 11 खालीलप्रमाणे नमूद केलेल्या आहेत.
TERMS & CONDITIONS
1………………..
2 The right to determine whether a battery needs repair, rectification, free
replacement rests with the company.
3 ………………………..
4 ……………………….
5 …………………………
6 …………………………
7 The charging system & electrical circuit of the vehicle shall be checked by
the company authorized personnel or dealer before finalizing settlement of
any warranty claim.
8 All liabilities under this warranty shall cease if the battery is bulged and;
- Transferred to a third party or any other vehicle.
- Used in any application other than that specified in the company’s application chart.
- Found to have additive dopes or anything else other than distilled water added to the electrolyte.
- Damaged due to fitment of additional accessories in vehicles other than fitment.
- Out of warranty period.
9 ………………
10 This warranty does not cover;
- Damaged to the battery caused by accident, fire, faulty electrical system, improper handling, services of the battery by unauthorized dealer/ auto electricians, willful abuse, destruction of fire, collision, theft or recharging.
- Bulding & Breakage of container and cover or breakage / deformation of terminal due to mechanical shock like hammering.
- Battery fitted in any other application.
11 Adjudication & settlement of claim will take one week as the battery has
To be tested for the reported failure.
वॉरन्टी कार्ड वर नमूद वरील अट क्रमांक 8 व 10 मधील नमूद कारणांमुळे विरुध्द पक्ष 1 व 2 हे बॅटरी बदलवून देवू शकत नाहीत हे ठोस पुराव्याअभावी विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 सिध्द करुन शकले नाही. विरुध्द 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला Willful abuse स्वतःहून बेजबाबदारपणे वापर केल्याने बॅट-या खराब झाल्या हे देखील पुरावा व शपथपत्राद्वारे सिध्द केलेले नाही. विरुध्द पक्ष क्रमांक 2 ने तक्रारकर्त्याच्या दिनांक 08/08/2016 ला त्याचे वकीलामार्फत पाठविलेल्या उत्तरात तो सब डिलर असून मुख्य डिलर कडून गाडी आणून विकण्याचे काम करीत असतो, त्यामुळे तो कंपनीच्या वरिष्ठांना कळवून माहिती प्राप्त करुन तसे 1 महिन्यात तक्रारकर्त्याला कळविण्यात येईल असे नमूद केले आहे, परंतु विरुध्द पक्षाने त्याबाबत कोणताही खुलासा त्याचे लेखी उत्तरात केलेला नाही व तसे तक्रारकर्त्याला कळविल्याचे दिसून येत नाही.
वास्तविकतः वॉरन्टी कार्डवर नमूद अटीनुसार विरुध्द पक्ष 2 ने विरुध्द पक्ष 1 कंपनीला कळवून त्यानुसार बॅट-या कंपनीकडून तपासुन त्यातील दोषाचे कारणानुसार बदलवून देणे आवश्यक होते, परंतु विरुध्द पक्ष 1 व 2 ने तसे केल्याचे दिसून येत नाही. तक्रारकर्त्याच्या वाहनातील बॅट-या वॉरन्टीच्या कालावधीत खराब झाल्या व विरुध्द पक्ष 1 व 2 ने त्या बदलवून दिल्या नाही हे अभिलेखावरुन स्पष्ट होते, त्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ने तक्रारकर्त्याला बॅट-या बदलवून न देवून सेवेत त्रृटी केली आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्ष 1 व 2 यांचेकडून चारही सदोष बॅटरी बदलवून नविन बॅटरी तक्रारकर्त्याला दिल्याचे दिनांकापासून 1 वर्षाची वॉरन्टीसह मिळण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत मंच येते.
11. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून घेतलेले वाहन हे बॅटरीवर चालणारे असल्यामुळे बॅटरी अभावी ते चालूच शकणार नाही तसेच सदर वाहन बंद स्थितीत असल्यामुळे विरुध्द पक्षाने बॅट-या बदलवून सदर वाहन सुरु करुन देणे आवश्यक होते, परंतु तसे विरुध्द पक्षाने केलेले नाही. विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटीमुळे तक्रारकर्ता बाईकचा योग्य प्रकारे उपभोग घेवू शकला नाही, त्यामुळे त्याला निश्चितच शारिरीक व मानसिक त्रास झाला आहे. सदर त्रासापोटी तक्रारकर्त्याला रुपये 5,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये 3000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याच्या वकीलांनी युक्तिवादात सांगितल्यानुसार तक्रारकर्त्याची बाईक बॅटरी अभावी बंद अवस्थेत आहे. अश्या परिस्थितीत जर नविन बॅटरी दिल्यामुळेही तक्रारकर्त्याची बाईक इतर बिघाडामुळे पुर्ववत सुरु झाली नाही तर नविन बॅटरी बदलवून दिल्यामुळे ही तक्रारकर्ता त्याच्या बाईकचा उपयोग घेऊ शकणार नाही. त्याकरीता विरुध्द पक्ष 1 व 2 जबाबदार असल्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष 1 व 2 यांचेकडून विनामुल्य नविन बॅटरीज तथा बाईकची तपासणी करुन त्यात बिघाड असल्यास तो बिघाड दुरुस्तीकरुन बाईक चालू स्थितीत (Road Worthy) घेण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने बाईक घेतल्यापासून चार महिने वापर केला आहे. त्यामुळे बाईक दुरुस्त होणे शक्य नसल्यास विरुध्द पक्ष 1 व 2 ने बाईक व बॅटरी परत घेवून तक्रारकर्त्याला बाईकची मुळ किंमत रुपये 39,300/- चे 70% रक्कम म्हणजेच रुपये 27,510/- तक्रारकर्त्याला परत करावी या निष्कर्षाप्रत मंच येते.
12. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
::आदेश::
(01) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याच्या वाहनातील बॅट-या नविन 1 वर्षाच्या वॉरन्टीसह कोणतेही शुल्क न घेता बदलवून सदर वाहन (Road Worthy) सुरु करुन द्यावे.
अथवा
तक्रारकर्त्याची बाईक/वाहन दुरुस्त (Road Worthy) होणे शक्य नसल्यास विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी बाईक व बॅटरी परत घेवून तक्रारकर्त्याला बाईकची मुळ किंमत रुपये 39,300/- चे 70% रक्कम म्हणजेच रुपये 27,510/- तक्रारकर्त्याला परत करावी.
(03) विरुध्दपक्ष 1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-3,000/-(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) तक्रारकर्त्याला द्यावेत.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष (1) व (2) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 45 दिवसांचे आत करावे.
(05) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(06) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.