निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 12/11/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 02/12/2010 तक्रार निकाल दिनांकः- 22/02/2011 कालावधी 02 महिने 20 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. श्री.अजित हबीब तडवी. अर्जदार रा.दत्त मंदिराचे पाठीमागे.प्रभावती नगर, स्वतः जुना पेडगावरोड.परभणी.जि.परभणी. विरुध्द एअरटेल मुंबई ( मोबाईल कंपनी ) शॉप नं.3 व 4. गैरअर्जदार. सह्याद्री हाउसिंग सोसायटी.अपोझीअ सेंट मेरी हायस्कुल. चिंचोली फाटक.मालाड (पश्चिम) मुंबई – 64. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्रीमती.अनिता ओस्तवाल.सदस्या. ) गैरअर्जदार मुंबई एअरटेल मोबाई सेवा कंपनीने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा गैरअर्जदाराचा जुना ग्राहक आहे.त्याचा मोबाईल नं. 9892776890 असा आहे.मुंबई एअरटेल कंपनीने जानेवारी 2008 मध्ये त्यांच्या ग्राहकांसाठी रु.2008 च्या रिचार्जवर 2008 दिवसी व्हॅलीडीटी व रु.2008 चा टॉकटाईम देण्याचा प्लॅन काढला होता.त्यानुसार अर्जदाराने जानेवारी 2008 मध्ये त्याचा मोबाईल रु.2008 नी रिचार्ज करुन घेतला. त्यावेळी त्याला रु.2008 चा पूर्ण टॉकटाईम देण्यात आला, परंतु व्हॅलीडीटी फक्त 999 दिवस देण्यात आली. व नंतर 1009 दिवस व्हॅलीडीटी वाढवुन देण्याचे आश्वासन गैरअर्जदाराने अर्जदारास दिले.तशा आशयाचा SMS देखील अर्जदारास पाठविण्यात आला. सदर 999 दिवस व्हॅलीडीटी 30 ऑक्टोबर 2010 रोजी संपल्यानंतर गैरअर्जदाराने आश्वासन दिल्याप्रमाणे उर्वरित 1009 दिवस व्हॅलीडीटी वाढवुन दिली नाही व अर्जदाराची आऊट गोईंग व इनकमिंगची सुविधा पूर्व कल्पना न देता बंद केली.तदनंतर गैरअर्जदाराच्या ग्राहक सेवा अधिका-याला व्हॅलीडीटी वाढवुन देण्यासाठी अर्जदाराने अनेक वेळा संपर्क साधुन विनंती केली. पुढे दिनांक 03 नोव्हेंबर 2010 रोजी व्हॅलीडीटी वाढवुन न मिळाल्याने व आऊट गोईंग इनकमिंगची सुविधा सुरु न झाल्यामुळे गैरअर्जदाराच्या ग्राहक सेवा अधिकारी व ग्राहक सेवा नोडल अधिकारी यांच्याकडे अर्जदाराने तक्रार नोंदवली.तदनंतर नोडल अधिका-यांनी अर्जदारास मोबाईल रिचार्ज करण्यास सांगीतले. त्यानुसार अर्जदाराने रु.30/- ने मोबाईल रिचार्ज केल्यानंतर देखील अर्जदाराची आऊट गोईंग इनकमिंगची सुविधा सुरु करण्यात न आल्यामुळे दिनांक 07 नोव्हेंबर 2010 रोजी अर्जदाराने पुन्हा गैरअर्जदाराकडे तक्रार नोंदवली.अर्जदाराच्या मोबाईलची इनकमिंग,आऊट गोईंगची सुविधा बंद असतांना व मिसकॉल्स अलर्टची सुविधा घेण्याचे बंद केलेले असतांनाही अर्जदाराच्या मोबाईल मध्ये शिल्लक असलेल्या बॅलेन्स मधून 15 रु. अर्जदाराच्या परवानगी शिवाय कपात केले. अर्जदार हा सहाय्यक अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालय जिंतूर जि.परभणी येथे कार्यरत आहे. कार्यालयाचा दुरध्वनी बंद असल्यामुळे अर्जदाराचा मोबाईल क्रमांक सर्वांना संपर्क साधण्यासाठी देण्यात आलेला आहे.अर्जदाराचा मोबाईल क्रमांक बंद पडल्यामुळे कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण झाला.त्यामुळे अर्जदाराने मंचासमोर तक्रार दाखल करुन अर्जदाराला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल व वरिष्ठ अधिका-यांकडून झालेल्या मानहानी बद्दल गैरअर्जदाराने रक्कम रु.10,00,000/- नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी अर्जदाराने केली आहे. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.3/1 ते नि.3/14 व नि.6 ते नि.8 मंचासमोर दाखल केले. मंचाची नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार मंचासमोर हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरोधात एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.व सदरचे प्रकरण गैरअर्जदाराच्या विरोधात एकतर्फा चालविण्यात आले. अर्जदाराच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा देवुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणेती दाद मिळण्यास पात्र आहे.? अंतिम आदेशा पमाणे.
कारणे मुद्दा क्रमांक 1 अर्जदार हा गैरअर्जदाराचा जुना ग्राहक आहे.त्याने मुंबई एअरटेल कंपनीने जानेवारी 2008 मध्ये जाहिर केलेल्या 2008 च्या रिचार्जवर 2008 दिवस व्हॅलीडीटी व रु.2008 चा टॉकटाईम प्लॅन अंतर्गत अर्जदाराने रक्कम रु. 2008 चे मोबाईल रिचार्ज करुन घेतला होता. त्याला 2008 चा पूर्ण टॉकटाईम देण्यात आला होता, परंतु व्हॅलीडीटी फक्त 999 दिवसाची दिली व 1009 दिवसाची व्हॅलीडीटी नंतर देण्याचे आश्वासन अर्जदारास देण्यात आले होते. 999 दिवसाची व्हॅलीडीटी संपल्यानंतर देखील गैरअर्जदाराने अर्जदारास त्याने दिलेल्या आश्वासना नुसार व्हॅलीडीटी दिली नाही. व अर्जदाराची आऊट गोईंग,इनकमिंग सुविधा बंद केल्यामुळे अर्जदाराच्या कार्यालयीन कामात अडथळा झाला. अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.मंचासमोर दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता अर्जदाराच्या कथनात तथ्य असल्याचे जाणवते,व गैरअर्जदाराने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केलेली नाही.हे ही यावरुन दिसून येते.ग्राहकांना अकृष्ट करण्यासाठी विविध स्कीम मोबाईल कंपन्या जाहिर करतात,परंतु स्कीम प्रमाणे ग्राहकांना सेवा पुरवली जात नाही ही खेदाची बाब आहे. तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब मोबाईल कंपन्या करीत असल्याचेही निर्दशनास येते. सदर प्रकरणात देखील गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा देवुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे दिसून येते.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले.आता प्रश्न उरतो तो फक्त अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे एवढाच अर्जदाराने 1009 दिवस व्हॅलीडीटी देण्याची व नुकसान भरपाई रक्कम रु.10,00,000/- देण्याची मागणी केली आहे.ही मागणी अवास्तव आहे.त्यामुळे अर्जदाराची नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 10,00,000/- देण्याची मागणी मंचास मंजूर करता येणार नाही. मंचाची नोटीस मिळाल्यानंतर गैरअर्जदाराने एक वर्षाची व्हॅलीडीटी वाढवुन दिल्याचे अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेल्या लेखी युक्तिवादात नमुद केले आहे. त्यामुळे 1009 दिवसातून एक वर्षाचा कालावधीची व्हॅलीडीटी वजा करुन उर्वरित दिवसाची व्हॅलीडीटी गैरअर्जदाराने अर्जदारास द्यावी. असा आदेश देणे न्यासंगत होईल व सेवात्रुटीची व त्या अनुषंगाने होणा-या मानसिक त्रासापोटी एकुण रक्कम रु.1,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.500/- अर्जदारास मंजूर करण्यात येऊन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशत मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने निकाल कळाल्यापासून 15 दिवसांच्या आत 1009 दिवसांची व्हॅलीडीटी मधून त्याला देण्यात आलेल्या एक वर्ष कालावधीची व्हॅलीडीटी वजा करुन उर्वरित दिवसांची व्हॅलीडीटी अर्जदारास द्यावी. 3 तसेच गैरअर्जदार निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत सेवात्रुटी व मानसिकत्रासापोटी एकुण रक्कम रु. 1000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.500/- अर्जदारास द्यावी. 4 संबंधितांना आदेशाच्या प्रति मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |