तक्रारदारातर्फे : वकील, श्री. दिपक लुलीया
सामनेवालेतर्फे : एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सामनेवाले हे इच्छूक प्रवाशांना विमान सेवा पुरविणारी कंपनी आहे, तर तक्रारदार क्रमांक 1 व 2 हे पती व पत्नी असून तक्रारदार क्रमांक 3 व 4 हे त्यांचे अपत्य आहेत. तक्रारदार व त्यांचे कुटूंबाने सामनेवाले यांच्या फ्लॅाईट क्रमांक IX207 दिनांक 25/10/2011 रोजी मुंबई ते तिरुचिरापल्ली प्रवास करण्याचे ठरविले, व त्याप्रमाणे दिनांक 25/10/2011 रोजी प्रवास केला. तक्रारदारांच्यासोबत दोन सुटकेस होत्या. त्या विमान प्रवासाच्या दरम्यान तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे चेक इन बॅगेजमध्ये ठेवलेल्या होत्या.
2. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, तक्रारदार हे तिरुचिरापल्ली येथे उतरल्यानंतर त्यांना त्यांच्या बॅगा आढळून आल्या नाहीत. बरीच चौकशी व धावपळ केल्यानंतर देखील त्या आढळून आल्या नाहीत. त्यानंतर तक्रारदारांनी तशी तक्रार पी.आय.आर. (Property Irregularity Report) सामनेवाले यांच्या तिरुचिरापल्ली येथील अधिकारी यांचेकडे दिली.
3. तक्रारदारांना दुस-या दिवशी म्हणजेच दिनांक 26/10/2011 रोजी सामनेवाले यांचेकडून हरवलेल्या बॅगांबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. तक्रारदार यांचे सर्व कपडेलत्ते व आवश्यक चिजवस्तू गहाळ बॅगेमध्ये असल्याने तक्रारदारांना रुपये 4,500/- खर्च करुन आवश्यक ते कपडे घ्यावे लागले. दरम्यान तक्रारदार सामनेवाले यांचेकडे सतत चौकशी करीत होते.
4. तक्रारदार दिनांक 29/10/2011 रोजी मुंबई येथे परत आले असतांना सामनेवाले यांच्या अधिका-यांनी तक्रारदारांना त्यांची बॅग सापडल्याचे कळविले, व त्या सुपूर्त केल्या. दरम्यान तक्रारदारांनी त्यांच्या बॅगा गहाळ झाल्याने व त्यामधील सर्व चिजवस्तू, कपडेलत्ते वापरता न आल्याने त्यांना बराच मनस्ताप, कुचंबना, गैरसोय व आर्थिक त्रास सहन करावा लागला. तक्रारदारांनी दिनांक 30/11/2011 रोजी वकीलामार्फत सामनेवाले यांना नोटीस दिली व नुकसानभरपाईची मागणी केली. सामनेवाले यांनी त्या नोटीशीला दिनांक 28/12/2011 रोजी उत्तर दिले व तक्रारदारांची मागणी फेटाळली. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांचेविरुध्द प्रस्तुतची तक्रार दिनांक 17/4/2012 रोजी दाखल केली, व रुपये 10,00,000/- नुकसानभरपाई 18 टक्के व्याजासह वसूल होऊन मिळावी अशी दाद मागितली.
5. सामनेवाले यांना प्रकरणाची नोटीस पाठविण्यात आली तरी देखील सामनेवाले हे गैरहजर राहील्याने तक्रारदारांनी नोटीस बजावल्याचे शपथपत्र दाखल केले. पोचपावती प्रकरणात दाखल आहे. त्यावरुन सामनेवाले यांच्याविरुध्द तक्रार एकतर्फा करण्यात आली. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले व त्यामध्ये सर्व घटनाक्रम नमूद केला. तक्रारदार व त्यांचे कुटूंबिय यांना सोसावा लागणारा मानसिक त्रास, कुंचबना व आर्थिक नुकसान यांचा उल्लेख केला.
6. सामनेवाले यांनी हजर होऊन कैफीयत दाखल केली नसल्याने तक्रारदारांची तक्रारीतील कथने अबाधित राहतात.
7. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाई रुपये 10,00,000/- मागितलेली आहे परंतु ही मागणी अवास्तव दिसते. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये त्यांना कपडेलत्ते घेण्याबद्दल रुपये 4,500/- खर्च करावा लागला, ही बाब नमूद केलेली आहे. सामनेवाले यांनी नोटीशीला उत्तर देतांना तक्रारदारांची मागणी मान्य केली होती. परंतु रुपये 4,500/- ची पावतीची मागणी केली. सामनेवाले यांची ही मागणी चूकीची व गैरलागू आहे कारण तक्रारदार आपल्या कुटूंबियासोबत परराज्यात गेले होते व तेथे कपडेलत्त्यांच्या खरेदीकामी रुपये 4,500/- खरेदी करावे लागणे ही बाब सहाजिकच आहे, व ती मागणी वाजवी होती.
8. या व्यतिरिक्त तक्रारदारांची तिरुचिरापल्ली येथील वास्तव्यामध्ये त्यांच्या बॅगा गहाळ झाल्याने बराच मनस्ताप, गैरसोय व कुचंबना झाली. सबब तक्रारदार त्याबद्दल नुकसानभरपाई सामनेवाले यांचेकडून वसूल करण्यास पात्र आहेत. विमान प्रवाशांकडून प्रवासाच्या चेक इन बॅगेजमधील बॅगांबद्दल गहाळ झाल्यास अथवा नुकसान झाल्यास नुकसानभरपाई देण्याबद्दल हेग कराराप्रमाणे तयार करण्यात आलेले नियम 22 व 25 प्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे. त्या सर्व तरतूदींचा व त्यावरील मर्यांदाचा विचार मा. राष्ट्रीय आयोगाने मॅनेजर एअर इंडिया लिमिटेड विरुध्द मेसर्स इंडिया एव्हरब्राईट शिपींग अॅण्ड ट्रेडिंग कंपनी प्रथम अपिल क्रमांक 451/1994 दिनांक 20/4/2001 यामध्ये केलेला आहे. त्यामध्ये बॅग गहाळ झाल्या अथवा नुकसान झाले तर विमान प्रवासी बॅगेतील वजनाच्या प्रती किलो ग्रॅम 20 यू.एस.डॉलर याप्रमाणे नुकसानभरपाई याप्रमाणे नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत असे नमूद केलेले आहे. मा. राष्ट्रीय आयोगाने ती गणना हेग प्रोटोकॉलमधील तरतुद नियम 22 याच्या आधारावर केलेली आहे. प्रस्तुतच्या प्रकरणात तक्रारदारांच्या दोन बॅगा होत्या व प्रत्येक बॅगेचे वजन 15 किलो असे धरले तरी एकूण वजन 30 किलो असे होते, व तक्रारदार 20 यू.एस.डॉलर प्रती किलो ग्रॅम नुकसानभरपाई मिळणेस पात्र होते. परंतु प्रस्तुतच्या प्रकरणात तक्रारदारांच्या बॅगा कायमच्या गहाळ झाल्या नाहीत तर त्या मुंबई विमानतळावर राहील्याने तक्रारदारांना तिरुचिरापल्ली येथे देण्यात आल्या नव्हत्या, त्यातही बॅगा तक्रारदार मुंबई येथे पोहचल्यानंतर त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन नाही की, त्यांच्या बॅगा गहाळ झाल्या अथवा त्यातील चिजवस्तू गहाळ झाल्या होत्या. सबब तक्रारदार त्यांना झालेली गैरसोय, मानसिक त्रास, कुचंबना व अधिकचा खर्च यांचा एकत्रित विचार करुन सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाई अधिक तक्रारीचा खर्च याबद्दल रुपये 50,000/- अदा करावेत असा निर्देश देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत आहे.
9. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 169/2012 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना विमान प्रवासा दरम्यान त्यांच्या बॅगांच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाईबद्दल व तक्रारीच्या खर्चाबद्दल एकत्रित रुपये 50,000/- न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून 10 आठवडयाच्या आत धनादेशाद्वारे अदा करावी असा आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो. अन्यथा मुदत संपल्यानंतर त्या दिवसापासून 9 टक्के व्याज वरील रक्कमेवर अदा करावे.
4. न्याय निर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 05/09/2013
( एस. आर. सानप ) ( ज. ल. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष
एम.एम.टी./-