व्दारा - श्री. एस़्.बी.धुमाळ: मा.अध्यक्ष
ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :-
1) दि.07/03/2001 रोजी तक्रारदार सामनेवाला यांच्या विमानाने मुंबई ते न्यूयार्क लंडनमार्गे असा प्रवास केला. त्यासाठी आवश्यक ते Taxes (कर) तक्रारदारांनी दिले होते. दि.07/03/2001 रोजी मुंबई येथून त्यांनी त्यांच्या बरोबर एक प्रवासी साहित्याची बॅग घेतलेली होती. सदरच्या प्रवासी साहित्याची बॅग Check in Baggage म्हणून सामनेवाला यांच्या विमानात ठेवण्यात आली. तक्रारदार न्यूयॉर्क येथील JFK विमानतळावर पोहचले तेव्हा त्यांची प्रवासी साहित्याची बॅग आलेली नव्हती. त्या बॅगेचा टॅग क्रं.106676 असा होता. तक्रारदारांच्या विमान प्रवासाच्या तिकीटाचा क्रं.098-441775820-3 असा होतो. प्रवासी साहित्याची बॅग न्यूयॉर्क विमानतळावर न मिळाल्यामुळे तक्रारदारांनी ताबडतोब सामनेवाला यांच्याकडे तक्रार करुन Baggage हरवल्यासंबंधीचा फॉर्म भरुन दिला. न्यूयॉर्क येथून तक्रारदार पुढच्या प्रवासासाठी रवाना झाले परंतु त्यांची प्रवासी साहित्याची बॅग तोपर्यंत आलेली नव्हती.
2) दि. 13/03/2001 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला यांना पत्र पाठवून त्यांच्या निदर्शनास आणले की, त्यांची प्रवासी साहित्याची बॅग दि.09/03/2001 रोजी त्यांच्याकडे पाठविण्यात आली त्यावेळी त्या बॅगेचे सील तुटलेले होते व त्यातील महत्वाचे साहित्य गहाळ झाले होते. गहाळ झालेल्या प्रवासी साहित्याची यादी तयार करुन तक्रारदारांनी फॅक्स मॅसेजव्दारे एअर स्टेशन मॅनेजर, एअर इंडिया, न्यूयॉर्क यांच्याकडे पाठविली. दि.20/09/2001 रोजी तक्रारदारांनी पुन्हा सामनेवाला यांना ते पत्र फॅक्सव्दारे पाठविले. परंतु, सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम सेटल करण्याबाबत काहीच प्रतिसाद दिला नाही. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या बॅगेतून गहाळ झालेल्या साहित्याची किंमत 1355 यूएस डॉलर्स म्हणजेच रु.70,000/- होती. प्रवासी साहित्याची बॅग गहाळ झाल्याने तक्रारदारांना अत्यंत गैरसोय सहन करावी लागली. दैनंदिन व्यवहाराच्या वस्तू त्यांना विकत घ्याव्या लागल्या व त्यासाठी त्यांना रु.70,000/- खर्च करावे लागले. सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरतेमुळे तक्रारदारांची प्रवासी साहित्याची बॅग गहाळ झाली असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई दिली नाही म्हणून तक्रारदारांनी या मंचासमोर तक्रार अर्ज दाखल करुन सामनेवाला यांनी तक्रारदारांना रु.1,60,000/- द्यावेत असा सामनेवाला यांना आदेश करावा अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे. तसेच, तक्रारदारांनी योग्य ते न्यायाचे हुकुम व्हावेत अशी विनंती केलेली आहे.
3) सामनेवाला 1 ते 3 यांनी एकत्रित कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार हे ‘एअर लंका’ या विमान कंपनीचे कर्मचारी आहेत. Indian Airlines Reciprocal List मध्ये तक्रारदारांचे नाव असल्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना विमानाचे तिकीट फुकट दिले होते. तक्रारदारांनी फुकट विमान प्रवासाची सवलत घेवून सदरचा विमान प्रवास Privileged Category मधून केलेला होता. त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या तरतूदीप्रमाणे ग्राहक नाहीत. सबब तक्रार अर्ज रद्द होण्यास पात्र आहे.
4) सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे तक्रार अर्जास कारण JFK आंतरराष्ट्रीय विमानतळ न्यूयॉर्क येथे घडले. सदर विमानतळावरुन लाखो प्रवासी प्रवास करतात व त्यांच्या प्रवासी साहित्याची ने-आण अमेरिकन अधिका-यांच्या देखरेखीखाली केली जाते. तक्रार अर्जास कारण न्यूयॉर्क येथे घडले असल्यामुळे या मंचास सदरचा तक्रार अर्ज चालविण्याचा अधिकार नाही.
5) आपल्या वरील म्हणण्यास बाधा न आणता सामनेवाला यांनी असे म्हटले आहे की, तक्रारदारांच्या बरोबर त्यांची प्रवासी साहित्याची बॅग JFK आंतरराष्ट्रीय विमानतळ न्यूयॉर्क येथे आलेली नहती ती बॅग दि.09/03/2001 रोजी तक्रारदारांना परत करण्यात आली. सदरची बॅग उघडण्यात आली होती व त्यातील महत्वाच्या वस्तू गहाळ झाल्या असा तक्रारदारांनी दि.13/03/2001 च्या पत्रात आरोप केलेला आहे. तथापि, तक्रारदारांनी गहाळ झालेल्या साहित्याची किंमत रु.70,000/- होती हे दाखविण्यासाठी काहीच कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. जर प्रवासी साहित्याच्या बॅगेचे सील उघडले होते तर तशी बॅग तक्रारदारांनी का ताब्यात घेतली याचा खुलासा तक्रारदारांनी केलेला नाही. तक्रारदारांनी सदरची बॅग काहीही लेखी आक्षेप न घेता स्विकारली व त्यानंतर 4 दिवसांनी सामनेवाला यांच्याकडे तक्रार केली.
6) सामनेवाला यांनी तक्रार अर्जातील मजकूर नाकारला असून त्यांच्या सेवेत कसलीही कमतरता नाही असे म्हटले आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रार अर्ज खर्चासहित रद्द होण्यास पात्र आहे.
7) तक्रारदारांनी दि.19/04/2005 रोजी सामनेवाला यांना एक प्रश्नावली सादर करुन त्याची उत्तरे देण्यास सांगितली. त्यामध्ये सामनेवाला हे IATA चे सदस्य आहेत का? सामनेवाला यांनी IATA चे Baggage Rules स्विकारलेले आहेत का? तक्रारदार हे इंडियन एअरलाईन्सच्या नोकरीमध्ये असताना एअर इंडियाचे विमान चालवित होते काय? तसेच फ्री तिकीटाचा वेगळा नमुना आहे का? इत्यादी प्रश्न विचारले. सुरुवातीला सदर प्रश्नावलींची उत्तरे सामनेवाला यांच्या असिस्टंट मॅनेजर श्रीमती पी.एम.लकडावाला यांनी दाखल केलेली होती. परंतु प्रश्नावलीला दिलेली उत्तरे शपथपत्रावर दिलेली नव्हती म्हणून तक्रारदारांनी सामनेवाला यांच्या विरुध्द कार्यवाही करण्यासाठी सेक्शन 13 नुसार अर्ज दाखल करुन सामनेवाला विरुध्द कार्यवाही करण्याची विनंती केली. सदर अर्जास सामनेवाला यांना कारणे दाखवा नोटीस पाठविल्यानंतर सामनेवाला यांच्या वकिलांनी श्री. आर.एच.जाधव, श्रीमती पी.एम.लकडावाला, श्री.एन.चंद्रशेखरन यांचे शपथेवर लेखी म्हणणे दाखल करुन प्रश्नावलीला उत्तर दिले.
8) सामनेवाला यांनी दि.08/10/2007 रोजी पुरसीस दाखल करुन एअर इंडिया लि.ही नॅशनल एविएशन कं.ऑफ इंडिया लि. मध्ये विलीन झालेली असून त्यासंबंधी Gov. of India Ministry of Corporate Affairs यांच्या दि.22/08/2007 च्या आदेशाची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. तसेच, Asst. Registrar of Co. NCT of Delhi & Haryana यांच्या दि.27/08/2007 च्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने तक्रारदारांनी तक्रार अर्जात दुरूस्ती करण्याची परवानगी मागितली व त्याप्रमाणे मूळ सामनेवाला 1 ते 3 एअर इंडिया लि. व इतर 2 यांची नावे कमी करुन त्या ऐवजी नॅशनल एविएशन कं.ऑफ इंडिया लि.दिल्ली, नॅशनल एविएशन कं.ऑफ इंडिया लि. मुंबई, द सिनीअर मॅनेजर बॅगेज सर्व्हिसेसयांची नावे सामनेवाला 1 ते 3 म्हणून नमूद करण्यात आली.
9) सामनेवाला यांनी प्रश्नावलीला दिलेल्या उत्तरावरुनच विमान तिकीट डॉकेटवर प्रवासी साहित्य हरवल्यास विमान कंपनीची जबाबदारी मर्यादित स्वरुपाची असते त्या नियमांची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी त्यांच्या कैफीयतीबरोबर Warsaw Convention च्या प्रवासी साहित्यसंबंधीच्या नियमांची प्रत दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी दि.07/09/2008 च्या अर्जासोबत Property Irregularity Report ची छायांकित प्रत, एअर इंडियाच्या Baggage संबंधी अटी शर्ती इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदारांनी दि. 30/09/2009 रोजी यादीसोबत त्यांनी दि. 03/08/2001 रोजी आवश्यक त्या गोष्टी खरेदी केल्या त्या एकूण 116.75 यूएस डॉलर्सच्या बिलाची छायांकित प्रत तसेच सामनेवाला यांच्या Reciprocal List वरील व्यक्तिंच्या नावाची यादी दाखल केलेली आहे.
10) तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदारांनी लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तसेच, सामनेवाला यांनीही लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदारांच्या वतीने अडव्होकेट रश्मी मन्ने व सामनेवालातर्फे अडव्होकेट विजय बडगुजर यांचा तोंडी युक्तिवाद ऐकला.
11) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात :-
मुद्दा क्रं.1 – तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीप्रमाणे ग्राहक आहेत काय?
उत्तर– होय.
मुद्दा क्रं.2 – तक्रारदार हे सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे हे सिध्द करतात काय?
उत्तर–होय.
मुद्दा क्रं.3 – तक्रारदारांना सामनेवाला यांच्याकडून तक्रार अर्जात मागितल्याप्रमाणेरु.1,60,000/- वसूल करता येतील काय? व तसेच अन्य दाद मागता येईल काय?
उत्तर –अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा :-
मुद्दा क्रं. 1 – सामनेवाला यांनी त्यांच्या कैफीयतीमध्ये तक्रारदारांनी मुबई ते न्यूयॉर्क हा विमान प्रवास सामनेवाला यांच्या विमानातून केलेला होता ही बाब मान्य केली आहे. तथापि, सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी सदरचा प्रवास फुकट केला होता कारण, तक्रारदारांचे नाव Indian Airlines Reciprocal च्या यादीमध्ये समाविष्ट होते. त्यामुळेच त्यांना असा फुकट प्रवास करता येत होता. तक्रारदारांनी सामनेवाला यांची सेवा फुकट वापरल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 2(0) “Service does not include the rendering of any service free of charge.” प्रमाणे तक्रारदार ग्राहक नसल्यामुळे सदरचा तक्रार अर्ज रद्द होण्यास पात्र आहे असे म्हटले आहे.
तक्रारदारांच्या वतीने असे सांगण्यात आले की, तक्रारदारांनी सामनेवाला यांच्या विमानातून फुकट प्रवास केलेला नाही. सामनेवाला यांनी आपल्या कैफीयतीमध्ये स्पष्टपणे मान्य केलेले आहे की, दरम्यानच्या काळात तक्रारदार हे ‘एअर लंका’ यांच्याकडे अधिकारी म्हणून काम करीत होते व सामनेवाला यांच्या Reciprocal यादीमध्ये तक्रारदारांच्या नावाचा समावेश असल्यामुळे ‘फ्री’ एअर तिकीट सवलत देण्यात आली. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत त्यांच्या विमान प्रवासाच्या तिकीटाची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. त्यामध्ये “Free” असे नमूद केलेले आहे. सामनेवाला यांच्या असिस्टंट मॅनेजर श्रीमती पी.एम.लकडावाला यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यामध्ये तक्रारदार हे ‘एअर लंका’ चे कर्मचारी असून कदाचित ते इंडियन एअरलाईन्सचे कर्मचारी असतील पण प्रत्यक्ष त्यांना या बाबत काहीच माहिती नाही असे म्हटले आहे. जरी विमान प्रवासाचे तिकीट तक्रारदारांना दिले असले तरी तक्रारदारांनी विमान प्रवासाचे कर(Taxes)भरले हे सामनेवाला यांना मान्य आहे. वरील गोष्टी विचारात घेता तक्रारदारांनी सामनेवाला यांच्या विमान प्रवासाची सेवा फुकट वापरली असे म्हणता येणार नाही. सबब तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीप्रमाणे ग्राहक आहेत असे म्हणावे लागते त्यामुळे मुद्दा क्रं.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 – तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे दि.07/03/2001 रोजी सामनेवाला यांच्या विमानातून मुंबई ते न्यूयॉर्क असा प्रवास केला. मुंबई येथे त्यांनी त्यांची प्रवासी साहित्याची बॅग घेतली होती व सदर बॅग Check in म्हणून सामनेवाला यांच्या विमानात ठेवली. तक्रारदार हे न्यूयॉर्क येथील JFK आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले तेव्हा त्यांची प्रवासी साहित्याची बॅग विमानात मिळाली नसल्यामुळे त्यांना देण्यात आली नाही. तक्रारदारांनी ताबडतोब सामनेवाला यांच्याकडे याबाबतीत तक्रार करुन सामनेवाला यांचा Property Irregularity Report भरला. तक्रारदारांना न्यूयॉर्क येथून ताबडतोब पुढे जाणे भाग होते त्यामुळे तक्रारदार ताबडतोब दूस-या ठिकाणी गेले. गहाळ झालेल्या बॅगेमध्ये त्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तू होत्या. बॅग गहाळ झाल्यामुळे तक्रारदारांची अत्यंत गैरसोय झाली त्यामुळे त्यांना दैनंदिन वापराच्या वस्तू नव्याने खरेदी कराव्या लागल्या. त्यानंतर दि.09/03/2001 रोजी त्यांची प्रवासी साहित्याची बॅग परत करण्यात आली. त्यावेळी सदरच्या बॅगेचे सील उघडले असल्याने व बॅगेतून महत्वाच्या वस्तू गहाळ झाल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आले. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या गहाळ झालेल्या वस्तू सत्तर हजार किंमतीच्या होत्या व त्या गहाळ झालेल्या वस्तूची यादी सामनेवाला यांच्याकडे पाठविली व त्याबाबतीत नुकसान भरपाईची मागणी केली परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या मागणीस प्रतिसाद दिला नाही. तक्रारदारांनी सामनेवाला यांच्या विमानातून दि.07/03/2001 रोजी प्रवास केला व तक्रारदार JFK विमानतळावर उतरले त्यावेळी तक्रारदारांची एक बॅग (प्रवासी साहित्याची बॅग) सदर विमानातून आलेली नव्हती ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. त्यानंतर दि.09/03/2001 रोजी तक्रारदारांची बॅग परत दिल्याची बाब सुध्दा सामनेवाला यांना मान्य आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सदरच्या बॅगेचे सील तुटून बॅग उघडलेली होती व काही महत्वाच्या वस्तू हरवल्या होत्या. तक्रारदारांच्या प्रवासी साहित्य बॅगेचे सील उघडले होते व काही वस्तू हरवल्या हा तक्रारदारांचा आरोप सामनेवाला यांनी स्पष्टपणे नाकारलेला नाही. वरील वस्तुस्थिती विचारात घेता तक्रारदारांनी सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे हे सिध्द केलेले आहे असे म्हणावे लागते. सबब मुद्दा क्रं.2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्रं.3 – तक्रारदारांनी सामनेवाला यांच्याकडून नुकसान भरपाई म्हणून रु.1,60,000/- ची मागणी केलेली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या प्रवासी साहित्याच्या बॅगेतील गहाळ झालेल्या वस्तूंची किंमत रु.70,000/- इतकी आहे. त्या सामानाची यादी तक्रारदारांनी सामनेवाला यांना दिली परंतु सामनेवाला यांनी नुकसान भरपाई दिली नाही. बॅगेतून गहाळ झालेल्या वस्तू तक्रारदारांच्या दैनंदिन वापराच्या असल्यामुळे सदरच्या वस्तू तक्रारदारांना रु.70,000/- ला विकत घ्याव्या लागल्या असे तक्रारदारांचे म्हणणे असून तक्रारदारांनी सदरच्या विकत घेतलेल्या वस्तूंच्या बिलाची छायांकित प्रत या कामी हजर केलेली आहे ती एकूण 116.78 यूएस डॉलर्स आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या महत्वाच्या व दैनंदिन गरजेच्या वस्तू असणारी प्रवासी साहित्याची बॅग JFK आंतरराष्ट्रीय विमानतळावर न मिळाल्यामुळे त्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यासाठी त्यांना नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी मुंबई येथून विमान प्रवास सुरु करतेवेळी त्यांच्या प्रवासी साहित्याच्या बॅगेत असणा-या मौल्यवान वस्तूसंबंधी डिक्लरेशन दिलेले नव्हते व त्यासाठी जादा आकारही(Charge) सामनेवाला यांना दिलेले नव्हते. सामनेवाला यांच्या वकिलांनी Warsaw Convention व The Carriage by Air Act मधील प्रवासी साहित्य हरवल्यास किंवा नुकसान झाल्यास विमान कंपनीची जबाबदारी मर्यादित असते या बाबतची तरतूद निदर्शनास आणली. Warsaw Conventionव The Carriage by Air Act तरतुदीनुसार जर प्रवाशांनी त्यांच्या बॅगेतील मौल्यवान वस्तूसंबंधी डिक्लरेशन केले नसल्यास व त्या संबंधी जादा आकार सामनेवाला विमा कंपनीस दिले नसतील तर सदरचे प्रवासी साहित्य गहाळ झाल्यास किंवा नुकसान झाल्यास विमान कंपनीची नुकसान भरपाईची जबाबदारी मर्यादित असून ती प्रत्येक किलोमागे फक्त 20 अमेरिकन डॉलर्स इतकी असते. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी त्यांच्या गहाळ झालेल्या वस्तूंची यादी सामनेवाला यांना दिली. त्या यादीमध्ये एकूण साधारण 10 वस्तू गहाळ झाल्याचे नमूद केलेले असून गहाळ झालेल्या वस्तूंचे वजन अंदाजे 7 किलोग्रॅम होईल व त्याप्रमाणे सामनेवाला विमा कंपनीची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी मर्यादित राहील. सामनेवाला यांच्या वकिलांच्या म्हणण्याप्रमाणे याकामी सामनेवाला यांची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी जास्तीत जास्त रु.7,000/- पर्यंत येते.
या प्रकरणात तक्रारदारांनी विमान प्रवास सुरु होण्यापूर्वी त्यांच्या Check Baggage मधील वस्तूसंबंधी डिक्लरेशन सामनेवाला विमा कंपनीला दिलेले नव्हते. तसेच, जादा आकारही(Charges) विमा कंपनीला दिलेले नव्हते. तक्रारदारांनी गहाळ झालेल्या वस्तूंची यादी व वर्णन सामनेवाला यांना दिलेले आहे त्यावरुन तक्रारदारांच्या गहाळ झालेल्या वस्तूंचे वजन जास्तीत जास्त 10 कीलाग्रॅमपर्यंत होते असे म्हणता येईल. Warsaw Convention व The Carriage by Air Act प्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांना गहाळ झालेल्या वस्तूंबद्दल नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल. तक्रारदारांना त्यांची प्रवासी साहित्याची बॅग JFK येथील विमानतळावर न मिळाल्यामुळे मानसिक त्रास झाला व गैरसोय सहन करावी लागली असे म्हटले आहे. तक्रारदारांच्या Check in Baggage मध्ये त्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तू होत्या व त्या वस्तू गहाळ झाल्यामुळे नक्कीच मानसिक त्रास झाला असेल. तसेच, दि.09/03/2001 रोजी त्यांची प्रवासी साहित्याची बॅग परत करण्यात आली त्यावेळी त्या बॅगेचे सील उघडल्याचे आढळले व बॅगेमधील महत्वाच्या वस्तू गहाळ झाल्याचे आढळून आले. सामनेवाला यांच्या सेवेतील गैरसोयीमुळे तक्रारदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला असे दिसते. तक्रारदारांना झालेला मानसिक त्रास व गैरसोयीबद्दल सामनेवाला यांनी तक्रारदारांना रु.10,000/- नुकसान भरपाई द्यावी असा आदेश करणे योग्य होईल. तसेच, या अर्जाच्या खर्चापोटी सामनेवाला यांनी तक्रारदारांना रु.2,000/- द्यावेत असा आदेश करणे न्यायाच्या दृष्टीने योग्य होईल. सबब मुद्दा क्रं. 3 चे उत्तर त्याप्रमाणे दण्यात येईल.
वर नमूद केलेल्या कारणावरुन तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येवून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आ दे श
1) तक्रार अर्ज क्रं.9/2003 अंशतः मंजूर करण्यात येतो.
2) सामनेवाला 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या वा संयुक्तरित्या तक्रारदारांना त्यांच्या गहाळ झालेल्या साहित्याबद्दल नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.10,000/-(रुपये दहा हजार फक्त) द्यावेत.
3) तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासापोटी व गैरसोयीपोटी नुकसान म्हणून रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) व या अर्जाच्या खर्चापोटी रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
4) या आदेशाचे पालन सामनेवाला यांनी या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे.
5) सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभयपक्षकारांना देण्यात यावी.