तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात तपशील खालीलप्रमाणे आहे.. 2. तक्रारकर्ता हे स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, चंद्रपूर येथे सिनियर एक्झीक्युटीव्ह या पदावर कार्यरत आहेत. तक्रारकर्त्याने त्याचे कुटूंब तसेच सासु सास-यासह दिवाळीच्या सुटयांमध्ये कोच्ची (केरळ) येथे सहलीवर जाण्याची योजना आखली व त्यानुसार त्यांनी दिनांक 29/10/2016 रोजी चंद्रपूर ते चेन्नई येथे जि.टी.एक्स्प्रेसने प्रवास करून त्यानंतर दिनांक 30/10/2016 रोजी चेन्नई येथुन कोच्ची येथे विमानाने प्रवास करावयाचा व त्यानंतर दिनांक 5/11/2016 रोजी कोच्ची येथून विमानाने चेन्नई येथे येऊन तेथून सहकुटूंब चंद्रपूरला रेल्वेने परतावयाचे तर सासु व सासरे हे चेन्नई येथून कलकत्तामार्गे रांची येथे परततील असे नियोजन केले. 3. उपरोक्त सहलीकरीता एक-दोन महिने आधीपासूनच रेल्वे आरक्षण आणी संलग्न फ्लाईटस् ची उपलब्धता याबाबत माहिती घेवून तक्रारकर्त्याने दिनांक 5/7/2016 आणि दिनांक 8/7/2016 रोजी विमान आणी रेल्वे तिकिटे बुक केली. तक्रारकर्त्याने रेल्वे व विमानाची तिकिटे बुक करतांनाच रेल्वे व विमानाचे प्रवासादरम्यान तीन ते चार तासांचे अंतर राहील याची दक्षता घेऊनच तिकिटे बुक केली होती. तक्रारकर्त्याने दिनांक 5/7/2016 रोजी, चंद्रपूर ते चेन्नई जी.टी.एक्स्प्रेसने सहा व्यक्तिंची व दिनांक 8/7/2016 रोजी परतीच्या प्रवासाकरीता गंगा कावेरी एक्स्प्रेसने चेन्नई ते चंद्रपूर असे चार व्यक्तींचे तसेच तक्रारकर्त्याच्या सासु-सास-यांसाठी कोलकता ते रांची असे क्रियायोग एक्स्प्रेसचे कन्फर्मड तिकिट चंद्रपूर येथून ऑनलाईन बुक केले व त्याचे पेमेंटदेखील चंद्रपूर येथूनच क्रेडीट’डेबिट कार्डच्या माध्यमातून केले व सदर रक्कम तक्रारकर्त्याच्या चंद्रपूर येथील बॅंक खात्यातून कपात झाली. तक्रारकर्त्याने दिनांक 5/7/2016 रोजी, चेन्नई येथुन कोच्ची येथे जाणारे एआय फ्लाईट नं.509 दिनांक 30/10/2016 रोजी सकाळी 10.10 वाजता होते. तसेच दिनांक 5/11/2016 रोजी कोच्ची येथून ए.आय.फ्लाईट क्र.510 ने दुपारी 12.00 विमानाने चेन्नई येथे येण्याचे व तक्रारकर्त्याच्या सासु-सास-यांचे चेन्नई ते कोलकता करीता दुपारी 16.10 वाजता सुटणा-या फ्लाईट क्र.766 चे तिकिट बुक केले. वरील सर्व विमान तिकिटे ही वि.प. कंपनीचे असून ते चंद्रपूर येथून ऑनलाईन बुक केले व त्याचे पेमेंटदेखील चंद्रपूर येथूनच क्रेडीट डेबिट कार्डच्या माध्यमातून करण्यांत आले. 4. दिनांक 24.9.2016 रोजी तक्रारकर्त्याला विरुद्ध पक्षाने अचानक ई-मेल द्वारे कळविले की एअर इंडियाची चेन्नई कोच्ची एअर इंडिया फ्लाईट नंबर 509 ची निर्धारित वेळ जी 30.10.2016 रोजी सकाळी 10.10 वाजताची होती ती बदलून अगोदर सकाळी 8.55 वाजताची करण्यात आली आहे, तसेच तक्रारकर्त्याने कोच्ची ते चेन्नई या दिनांक 5.11.2016 रोजीच्या परतीच्या प्रवासासाठी तिकीट बुक केलेल्या एआय फ्लाईट 510 ची निर्धारित वेळ जी दुपारी 12.00 वाजता होती ती बदलून अगोदर सकाळी 10.45 वाजताची करण्यात आल्याचे कळविले. विरुद्ध पक्षाने विमानांच्या पूर्व नियोजित वेळेत अचानक बदल केल्यामुळे तक्रारकर्त्याला दिनांक 30.10.2016 रोजी पूर्वी केलेल्या रेल्वे रिझर्वेशन नुसार चेन्नई येथे पोहोचून चेन्नई कोच्ची विमान नवीन बदललेल्या वेळेत पकडणे शक्य नव्हते. त्यामुळे तक्रारकर्त्याला आधीच केलेले जीटी एक्सप्रेसचे रिझर्वेशन रद्द करून विमानाच्या नवीन वेळेनुसार रेल्वेचे नव्याने रिझर्वेशन करणे भाग होते. विरुद्ध पक्षाच्या या कृतीमुळे तक्रारकर्त्याचे सहलीचे संपूर्ण नियोजन विस्कळीत झाले. तक्रारकर्ता हा उच्चपदस्थ अधिकारी असल्यामुळे त्यांना सुट्टी करता सतत तडजोड करावी लागते. त्यामुळे तक्रारकर्त्याला विरुद्ध पक्षाने बदललेल्या विमानाच्या नवीन वेळेनुसार योजनाबदलविणे भाग पडले. तक्रारकर्त्याची नियोजित सहल ही दिवाळीच्या जवळपासच्या कालावधीत असल्यामुळे त्यावेळी सर्वत्र जास्त गर्दी असल्यामुळे आणि विरुद्ध पक्षाने सदर सूचना उशिरा दिल्यामुळे तक्रारकर्त्याला एसी टू टायर चे रिझर्वेशन मिळणे कठीण होते. त्यामुळे तक्रारकर्त्या कडे नियोजित सहल रद्द करणे किंवा जास्तीचा खर्च सहन करून एसी टू टायर चे रेल्वे रिझर्वेशन मिळवून विरुद्ध पक्षाने बदलविलेल्या वेळेनुसार चेन्नई येथे पोचून चेन्नई कोच्ची विमान पकडणे हे दोनच पर्याय उपलब्ध होते. तक्रारकर्त्याने नाईलाजाने विरुद्ध पक्ष यांच्या नवीन वेळेनुसार जीटी एक्सप्रेस चे रिझर्व्हेशन रद्द केले व दिनांक 28.9.2016 रोजी, दिनांक 29.10.2016 रोजी च्या राजधानी एक्सप्रेसचे एसी2 टायरचे बुकिंग केले. यासाठी तक्रारकर्त्याला रुपये 1172/- जास्तीचा भुर्दंड सहन करावा लागला. राजधानी एक्सप्रेस ही दिनांक 29.10.2016 रोजी बल्लारशाह येथून सकाळी 8.20 वाजता निघून दिनांक 29.10.2016 रोजी रात्री 20.15 वाजता चेन्नई येथे पोचणार होती. त्यामुळे तक्रारकर्त्याला दिनांक 30.10.2016 रोजीचे विमान बदललेल्या वेळेनुसार पकडणे शक्य होणार होते. परंतु तक्रारकर्त्याला राजधानी एक्स्प्रेसचे प्रीमियम तिकीट जास्तीची रक्कम रू.15,796/- खर्च करून घ्यावे लागले व त्यामुळे तक्रारकर्त्या वर रुपये 8816/- चा ज्यादा भुर्दंड बसला. शिवाय राजधानी एक्सप्रेस ही प्रवासाच्या निर्धारित दिवसापेक्षा एक दिवस आधीच चेन्नई येथे पोचणार असल्यामुळे तक्रारकर्त्याला चेन्नई येथे ‘’जे एल एन मेरिडियन हॉटेल येथे रात्री राहणे भाग पडले व त्याकरता हॉटेलमध्ये राहण्याचा रुपये 3570/- चा भुर्दंड सहन करावा लागला. परत दिनांक 28.9.2016 रोजी विरुद्ध पक्षाने अचानकपणे त्यांची दिनांक 5.11.2016 रोजी दुपारी 16.10 वाजता सुटणारी एआय फ्लाईट नंबर 766 हिची निर्धारित वेळ दुपारी 16:10 ऐवजी ती बदलून 11:50 वाजता झाल्याचे कळविले. परंतु या बदलामुळे तक्रारकर्त्याला नवीन त्रासाला सामोरे जावे लागले, कारण या वेळेनुसार कोच्ची ते चेन्नई विमानातून प्रवास केल्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबियांना चेन्नई कोलकाता हे विमान पकडणे शक्य नव्हते. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 28.9.2016 रोजी विरुद्ध पक्षाच्या कार्यालयात फोन करून चेन्नई कोलकता या विमानाचे तिकीट रद्द केले व स्पाइस जेट या कंपनीचे एस जी 278 हे दुपारी 14.45 वाजता चेन्नई वरून निघणा-या विमानाचे तिकीट बुक केले जेणेकरून तक्रारकर्त्यांच्या सासु-सासर्यांना कलकत्ता येथे विमानाने पोहोचवून रात्री 20.10 वाजता निघणारी कलकत्ता राची ट्रेन पकडणे सुलभ व्हावे. तक्रारकर्ता हे आपल्या कुटूंबियांसमवेत कोच्ची येथे सहलीवर असतांना वि.प.यांचे कार्यालयामार्फत दि.4.11.2016 रोजी दुपारी 16.29 वाजता मोबाईल संदेशाद्वारे सुचीत केले की दि.5.11.2016 रोजीचे कोच्ची चेन्नई हे विमान सकाळी 10.45 वाजता सुटेल. सदर विमानाची वेळ ही सकाळी 11.50 वाजता होती. परत दि.4.11.2016 रोजी रात्री 00.30 वाजता म्हणजे दिनांक 5.11.2016 रोजी, कोच्ची चेन्नई ‘ए आय फ्लाईट क्र.510’’ दुपारी 12.35 ऐवजी सकाळी 10.45 वाजता सुटणार असे बदल झाल्याचे सुचीत केले. 5. वि.प.नी फ्लाईट क्र.510 च्याबदलविलेल्या नवीन वेळेनुसार तक्रारकर्ता हा दुपारी 13.45 वाजता चेन्नई येथे पोहचणार होते व तक्रारकर्त्याचे चेन्नई कोलकाता हे स्पाईसजेट फ्लाईट क्र.278 हे चेन्नईवरून दुपारी 14.45 वाजता सुटणार होते व त्याचे दरवाजे चेकइन करण्याचा वेळ झाल्यामुळे तक्रारकर्त्यास एआय फ्लाईट क्र.510 मधून उतरल्यानंतर स्पाईसजेटचे विमान पकडणे शक्य नव्हते. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर फ्लाईट क्र.510 चे तिकीट रद्द करून शेवटच्या क्षणाला दि.5.11.2016 रोजी पुन्हा 6 जणांचे कोच्ची चेन्नई एसजी 608 सकाळी 10.25 वाजता निघून चेन्नईला 11.35 वाजता पोहचणा-या फ्लाईटचे रू.23,082/- देऊन आरक्षण केले. वि.प.कडून तक्रारकर्त्याला फक्त रू.16,476/- परत मिळाले. वि.प.ने फ्लाईट ची वेळ बदलविल्यामुळे तक्रारकर्त्याला वेळेवर तिकीट रद्द करून नवीन तिकीट बुक केल्यामुळे रू.6,600/- चा विनाकारण भुर्दंड सहन करावा लागला. विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्याला त्याने रद्द केलेल्या विमान प्रवासाचे तिकिटाचे पैसे परत केलेले आहेत परंतु वेळेवर करण्यात आलेल्या विमान प्रवासाच्या वेळेतील बदलामुळे तक्रारकर्ता व त्याच्या कुटुंबियांना अतिशय मानसिक त्रास सहन करावा लागला व केवळ तिकिटाचे पैसे परत केल्यामुळे तक्रारकर्ता व त्याच्या कुटुंबियांना झालेल्या मनस्तापाची नुकसान भरपाई होऊ शकत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने अधिवक्त्यामार्फत दिनांक 31.1.2017 रोजी विरुद्ध पक्ष यांना नोटीस पाठवून शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाईची मागणी केली परंतु नोटीस मिळवूनही नोटीसची पूर्तता न केल्यामुळे तक्रार कर्त्याने मंचासमक्ष तक्रार दाखल करून त्यात मागणी केली की विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक नुकसानापोटी रुपये 18,992/- द्यावेत तसेच त्याला व त्याच्या कुटुंबीयांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई दाखल रुपये 3 लाख व तक्रार खर्च रुपये 25000/- देण्यात यावे अशी विनंती केली. 6. तक्रारकर्त्यांची तक्रार स्विकृत करून विरुध्द पक्ष क्र.1 व2 यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. नि.क्र.10 नुसार वि.प. यांना नोटीस प्राप्त होऊनसुध्दाप्रकरणात उपस्थीत न झाल्यामुळे त्यांच्याविरूध्द दिनांक 18/6/2018 रोजी नि.क्र.1 वर वि.प.क्र.1 व 2 विरूध्द एकतर्फा कारवाईचा आदेश पारीत करण्यांत आला. 7. तक्रारकर्त्यांची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, तसेच तक्रारकर्त्याच्या तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहेत. मुद्दे निष्कर्ष 1. तक्रारकर्ता हे वि.प.क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत काय ? होय 2. वि.प. यांनी तक्रारकर्त्यांना सेवा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? नाही 3. आदेश काय ? अंतीम आदेशानुसार कारण मिमांसा मुद्दा क्रमांक 1 बाबत 8. तक्रारकर्ता दिनांक 5.7.2016 रोजी, चंद्रपूर येथून ऑनलाइन पद्धतीने दिनांक 30.10.2016 रोजी विरुद्ध पक्ष यांच्या एअर फ्लाईट नंबर 509 या विमानाचे चेन्नई ते कोच्ची या प्रवासासाठी,व दिनांक 5.11.2016 रोजी एआय फ्लाईट नंबर 510 ने कोच्ची ते चेन्नई प्रवास व त्यानंतर दिनांक 5.11.2016 रोजी एआय फ्लाईट नंबर 766 चेन्नई ते कलकत्ता विमानप्रवास याकरिता विरुद्ध पक्षयांचेकडून तिकीट बुकिंग केले व त्याकरिता चंद्रपूर येथील तक्रारकर्त्याच्या बँक खात्यातून क्रेडिट कार्डद्वारे रक्कम चुकती करण्यात आली. यासंदर्भात तक्रारकर्त्याने निशाणी क्रमांक 5 वर स्टेट बँकेचे विवरण दाखल केलेले आहे. यावरून तक्रारकर्ता विरुद्ध पक्षांचा ग्राहक आहे हे सिद्ध होते. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत : 9. तक्रारकर्त्याला कुटुंबीयांसमवेत दिवाळीच्या सुट्टीत सहल काढावयाची असल्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 5.7.2016 तसेच दिनांक 8.7.2016 रोजी चंद्रपूर येथून ऑनलाइन पद्धतीने 30.10.2016 चे चंद्रपूर येथून चेन्नई येथे जाण्याकरता एकूण आठ जणांचे रेल्वे रिझर्वेशन व तेथून सलग्न उपरोक्त विमानसेवा द्वारे चेन्नईचा प्रवास करून कोच्ची येथे सहल आटोपून कुच्ची चेन्नई विमानप्रवास व त्यानंतर स्वतःचे कुटुंब घेऊन गंगा कावेरी एक्सप्रेस रेल्वेने चेन्नई चंद्रपूर प्रवास तसेच तक्रारकर्त्याच्या सासू-सासरे साठी चेन्नई ते कलकत्ता विमान प्रवास त्यापुढे कलकत्ता राची येथे क्रियायोग एक्सप्रेस रेल्वे प्रवास यासाठी कन्फर्म तिकिटांचे बुकिंग केलेले होते.परंतु विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्याला अ) ए आय फ्लाईट नंबर 509 दि30.10.2016 या विमानाचे चेन्नई ते कोच्ची या प्रवासासाठी सुटण्याचीवेळ सकाळी 10.10 ची होती ती अगोदर सकाळी 8.55 ला केल्याचे दि. 24.9.2016 रोजी मेलद्वारे सुचीत केले ब) दिनांक 5.11.2016 रोजी एआय फ्लाईट नंबर 510 ने कोच्ची ते चेन्नई प्रवास या परतीच्या प्रवासाची विमान सुटण्याची वेळ 12.00 वाजता होती ती बदलवून सकाळी10.45 ला करण्यांत आल्याचे दिनांक 24.9.2016 रोजी मेलद्वारे सुचीत केले. दिनांक 27.10.2016 रोजी 16.30.23 वाजता एआय फ्लाईट नंबर 510 चे 10.45 वाजताची वेळ सुचीत केली तसेच दिनांक 27.10.2016 रोजीच्या मोबाईल संदेशाद्वारेसुध्दा 10.45 वाजताची वेळ असल्याचे सुचीत केले. परत 4.11.2016 रोजी 11.12.14 वाजता मेलद्वारे सदर विमान 10.45 वाजता सुटणार असे सुचीत केले. यानंतर परत दिनांक 4.11.2016 रोजी 23.47.01 वाजता मेलद्वारे, एआय फ्लाईट नंबर 510 ची वेळ 12.35 अशी बदलल्याचे सुचीत केले. म्हणजेच दिनांक 4.11.2016 रोजी दोनदा व दिनांक 5.11.2016 रोजी एकदा मेलद्वारे एकाच विमानाची वेळ बदलविण्यांत आल्याचे मोबाईल मेसेज तसेच मेल संदेशाद्वारे कळविण्यांत आले. क) दिनांक 28.9.2016 रोजी विरुद्ध पक्षाने दिनांक 5.11.2016 रोजी दुपारी 16.10 वाजता सुटणारी एआय फ्लाईट नंबर 766 हिची निर्धारित वेळ दुपारी 16:10 ही बदलून 11:50 वाजता झाल्याचे कळविले. या बाबत तक्रारकर्त्याने मेल व मोबाईल संदेशांचे स्क्रीनशॉटच्या छायांकीत प्रती नि.क्र.5 वर दाखल केलेल्या आहेत. 10. यावरून विरूध्द पक्षाने उपरोक्त विमानांची पुर्वनियोजीत वेळ बदलविल्याचे तक्रारकर्त्यास वेळेपुर्वीच सुचीत केले होते तसेच ए आय फ्लाईट क्र.ए 510 ची वेळ बदलल्याचेदेखील वेळोवेळी सुचीत केले होते. शिवाय उपरोक्त विमानांच्या पुर्वनियोजीत प्रस्थानाच्या वेळा व नंतरच्या बदललेल्या वेळेत फार तफावत नाही. वि.प.यांनी तक्रारकर्त्यास पाठविलेल्या उपरोक्त विमानांच्या पुर्वनियोजीत वेळा हया “flight times changed due to operational reasons” या कारणास्तव बदलविण्यांत आल्याचे मेलद्वारे तक्रारकर्त्यास सुचीत केलेले आहे व सदर मेल संदेश तक्रारकर्त्यास प्राप्त झाले आहेत. उपरोक्त विमानांच्या पुर्वनियोजीत व बदललेल्या वेळांमध्ये जास्त फरक नाही. त्यामुळे विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिली नसल्याने वि.प. कोणतीही नुकसान भरपाई देण्यांस जबाबदार नाहीत असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 3 बाबत :- 11. मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अंतिमआदेश 1. ग्राहक तक्रार क्र. 155/2017 खारीज करण्यात येते. 2. उभय पक्षांनी आपआपला तक्रारखर्च सहन करावा. |