अॅड नितीन एस. सावंत तक्रारदारांतर्फे
जाबदेणार एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्यक्ष
** निकालपत्र **
दिनांक 31 जुलै 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या एअर होस्टेस अकॅडमी मध्ये सन 2007-2008 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश घेतला. तक्रारदारांना डी जी पी एन – ए डी एम 07- 257 देण्यात आला होता. प्रवेश प्रक्रीया पुर्ण करतांनाच दिनांक 28/6/2007 रोजी पावती क्र. 443 अन्वये तक्रारदारांनी रुपये 35,000/- भरले. त्यानंतर दिनांक 16/8/2007 रोजी तक्रारदारांनी रुपये 76,000/- पावती क्र. 773 अन्वये जाबदेणारांकडे भरले. कोर्स एक वर्षांचा होता, कोर्स पूर्ण झाल्यावर चांगल्या पगाराची नोकरी मिळेल असे तक्रारदारांना सांगण्यात आले. तक्रारदार प्रशिक्षणास नियमित हजर होते. प्रात्यक्षिके पूर्ण केली होती. प्रशिक्षण कालावधी पूर्ण होण्याआधी मे व जुन सन 2008 मध्ये जाबदेणार यांनी परीक्षा घेतली. त्यानंतर परीक्षेचा निकाल पाठवून, प्रमाणपत्र देऊन, नोकरीला लावण्याचे आश्वासन जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिले. फेब्रुवार सन 2009 मध्ये तक्रारदारांनी परीक्षेचा निकाल व प्रमाणपत्राबाबत वारंवार जाबदेणारांकडे चौकशी केली असता निकाल दिल्ली वरुन येत असल्यामुळे उशीर होतो, आल्यानंतर कळविण्यात येईल असे जाबदेणारांनी सांगितले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार अद्यापपर्यन्त परीक्षेचा निकाल व प्रमाणपत्र जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिला नाही. जुन 2009 मध्ये अचानक पुणे येथील प्रशिक्षण केन्द्र जाबदेणारांनी बंद केले. माहितीपुस्तकातील नमुद बाबींचे पालन केले नाही. नोकरी दिली नाही. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 30/3/2010 रोजी जाबदेणारांविरुध्द पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. फौजदारी केस चालू आहे. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 4/1/2011 रोजी जाबदेणारांना नोटीस पाठविली. परंतु उपयोग झाला नाही. तक्रारदारांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले. शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून नुकसान भरपाई पोटी रुपये 4,00,000/- मागतात. मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये 50,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 20,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या One Year Diploma in Aviation and Hospitality Management या कोर्ससाठी बॅच क्र. 011/07 मध्ये प्रवेश घेतला होता हे दाखल आयकार्ड वरुन स्पष्ट होते. कोर्स पुर्ण झाल्यानंतर 100 टक्के जॉबची गॅरंटी जाबदेणार यांनी दिली होती ही बाब माहितीपत्रकावरुन स्पष्ट होते. तक्रारदारांनी प्रवेश प्रक्रीया पुर्ण करतांनाच दिनांक 28/6/2007 रोजी पावती क्र. 443 अन्वये जाबदेणारांकडे रुपये 35,000/- भरले. त्यानंतर दिनांक 16/8/2007 रोजी तक्रारदारांनी रुपये 76,000/- पावती क्र. 773 अन्वये जाबदेणारांकडे भरल्याची पावती मंचासमोर दाखल करण्यात आलेली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार यांनी कोर्स घेतला, मे व जुन सन 2008 मध्ये जाबदेणार यांनी परीक्षा घेतली, परंतु परीक्षेचा निकाल तक्रारदारांना कळविला नाही, प्रमाणपत्र दिले नाही. त्यामुळे तक्रारदारांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले. जॉब देखील दिला नाही. ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. त्यामुळे शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी दाखल म्हणून तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून भरलेली रक्कम रुपये 1,11,000/- तक्रार दाखल दिनांक 21/04/2011 पासून 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
** आदेश **
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणारक्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना 1,11,000/- दिनांक 21/04/2011 पासून 9 टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम अदा होई पर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
[3] जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1000/- अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.