तक्रारदारातर्फे अॅड. कटारिया हजर
जाबदेणारांतर्फे अॅड. प्रशांत पाटील हजर
********************************************************************
निकाल
पारीत दिनांकः- 31/05/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांना दिल्ली येथे ऑफिसच्या कामासाठी जायचे होते, म्हणून त्यांनी जाबदेणार किंगफिशर एअरलाईन्स, पूर्वीची एअर डेक्कन चे दि. 9/10/2006 रोजीचे पुणे ते दिल्ली असे दोन तिकिटे त्यांच्या व त्यांचा मित्र बकुल सिंग यांच्याकरीता काढली व त्याच दिवशी परतीच्या प्रवासाचेही तिकिटे काढली. सदरच्या तिकिटांकरीता तक्रारदारांनी त्यांच्या क्रेडीटकार्डाद्वारे रक्कम रु. 4124/- जाबदेणारांना दिले व ते जाबदेणारांना मिळाले. त्यानुसार जाबदेणारांनी दि. 28/2/2007 रोजीच्या जाण्याच्या व दि. 5/3/2007 रोजीच्या येण्याच्या तिकिटाचे कन्फर्मेशन दिले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या प्रोग्राममध्ये झालेल्या बदलामुळे त्यांना त्यांचा प्रोग्राम रिशेड्युल्ड करावा लागला व त्यानुसार त्यांनी दि. 6/4/2007 रोजीचे पुणे ते दिल्ली व दि. 15/4/2007 रोजीचे दिल्ली ते पुणे असे तिकिट काढले व जाबदेणारांनी ते कन्फर्म केले. तक्रारदारांचा दि. 6/4/2007 रोजीचा पुणे ते दिल्लीचा प्रवास याच तिकिटावर समाधानकारक झाला. परंतु दि. 15/4/2007 रोजीच्या परतीच्या प्रवासावेळी तक्रारदार एअरपोर्टवर बोर्डिंग पास घेण्यासाठी गेले असता, जाबदेणारांचे कर्मचारी श्री साहिल मल्होत्रा यांनी तक्रारदारांना 10 मिनिटे थांबण्यास सांगितले. तक्रारदार वाट पाहून पुन्हा काऊंटरवर बोर्डिंग पास घेण्यासाठी गेले असता, त्यांच्याकडे दि. 15/4/2007 रोजीचे तिकिट नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. याच तिकिटावर तक्रारदारांनी दि. 6/4/2007 रोजीचा पुणे ते दिल्लीचा प्रवास केला, हे तक्रारदारांनी बर्याच वेळ जाबदेणारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता जाबदेणारांनी त्यांच्याकडे दि. 6/4/2008 रोजीच्या बोर्डिंग पासची मागणी केली, परंतु हा पास घरीच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी घरुन फॅक्सने सदरचा बोर्डिंग पास मागवून घेण्याचे ठरविले. जाबदेणारांनी जो फॅक्स नंबर दिला होता, ती मशिन बंद होती, शेवटी त्यांनी स्पाईस जेटच्या ऑफिसमध्ये सदरचा बोर्डिंग पास मागवून घेतला. तो दाखविल्यानंतरही जाबदेणारांच्या कर्मचार्यांनी तक्रारदारांना बोर्डिंग पास दिला नाही व त्यांना रक्कम रु. 5000/- खर्च करुन नविन तिकिट खरेदी करण्यास सांगण्यात आले. तक्रारदारांजवळ एवढी रक्कम नसल्यामुळे त्यांना रेल्वेने जावे लागले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याजवळ फक्त रक्कम रु. 700/- शिल्लक होते व त्यापैकी रक्कम रु. 687/- हे तात्काळ तिकिटासाठी खर्च केल्यानंतर त्यांच्याकडे फक्त रु. 13/- शिल्लक राहीले व त्यामध्ये त्यांना दोन दिवस प्रवास करावा लागला. या सर्वामुळे त्यांना बराच मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 5,00,000/- नुकसान भरपाईपोटी, रक्कम रु. 10,000/- तक्रारीच्या खर्चापोटी व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, मा. कर्नाटका हायकोर्टाच्या आदेशानुसार “किंगफिशर एरलाईन्स लि.” चे नाव बदलून “किंगफिशर ट्रेनिंग अँड एव्हिएशन सर्व्हिसेस लि.” असे झाले आहे व “डेक्कन एव्हिएशन लि.” चे नाव बदलून “किंगफिशर एरलाईन्स लि.” असे झालेले आहे. प्रस्तुतची तक्रार ही मुदतबाह्य आहे, त्यामुळे ती नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार ही जाबदेणारांकडून पैसे उकळण्यासाठी केलेली आहे, कारण तक्रारदारांनी स्वत:च सदरचे तिकिट रद्द केले होते व जाबदेणारांनी त्यांना रक्कम रु. 2062/- परत केले होते. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी त्यांचा मित्र बकुल सिंग यांच्याकरीता तिकिट खरेदी केलेले नव्हते, त्यांनी एकच तिकिट आणि तेही त्यांच्याच नावे खरेदी केले होते. दि. 5/5/2007 रोजीच्या प्रमाणपत्रावरुन तक्रारदारांच्या नावासहित श्रीमती निधी जैन असल्याचे दिसून येते. जाबदेणारांनी एअरपोर्टवरील फॅक्स मशिन बंद करुन ठेवली होती, हे त्यांना मान्य नाही. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांकडे क्रेडीट कार्ड आहे त्यामुळे तक्रारदार दोन दिवस उपाशी राहिले, हे तक्रारदारांचे म्हणणे चुकीचे आहे. तसेच तक्रारदारांनी त्यांच्या बिझनेसच्या कामासाठी तिकिट खरेदी केले होते, म्हणजे त्यांनी व्यावसायिक कारणासाठी तिकिट खरेदी केले होते म्हणून ते ‘ग्राहक’ नाहीत. जाबदेणार तक्रारदारांचे इतर आरोप अमान्य करीत प्रस्तुतची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी एअर डेक्कन या कंपनीचे तिकिट स्वस्त असल्यामुळे दिल्ली येथे जाण्या-य़ेण्याचे तिकिट खरेदी केले. हे तिकिट त्यांनी स्वत:करीता व त्यांचे सहकारी श्री बकुल सिंग यांच्याकरीता दि. 9/10/2006 रोजी क्रेडीट कार्डाद्वारे खरेदी केले व त्याकरीता रक्कम रु. 4,124/- जाबदेणारांना दिले, परंतु त्यांच्या बिझनेस प्रोग्राममध्ये काही बदल झाल्यामुळे त्यांना हे तिकिट रद्द करुन दि. 6/4/2007 रोजी पुण्याहून दिल्ली येथे जाण्याकरीता व दि. 15/4/2007 रोजी दिल्ली येथून पुण्यास येण्याकरीता नविन तिकिट काढावे लागले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा दि. 6/4/2007 रोजीचा प्रवास व्यवस्थित झाला परंतु दि. 15/4/2007 रोजी परतीच्या प्रवासाच्या वेळी जाबदेणारांनी त्यांना बोर्डिंग पास दिला नाही. यासाठी तक्रारदारांनी दि. 9/10/2006 रोजी बुक केलेल्या तिकिटाची प्रत दाखल केली. त्यावर तक्रारदारांचे नाव पुनित जैन, बुकिंगची तारीख 9/10/2006, दिल्ली ते पुणे, प्रवासाची तारीख दि. 15/4/2007 , रविवार , वेळ 11.15 ही सर्व माहिती लिहिलेली आहे. ई-तिकिट असूनसुद्धा जाबदेणारांनी तक्रारदारांना बोर्डिंग पास दिला नाही, अशी तक्रारदारांची तक्रार आहे. परंतु जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबासोबत जी कागदपत्रे दाखल केली आहेत त्यावरुन तक्रारदारांच्या क्रेडीट कार्डच्या खात्यामध्ये दि. 30/4/2007 रोजी त्यांनी रक्कम रु. 2062/- रिफंड म्हणून जमा केल्याचे दिसून येते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सदरचे पत्र हे त्यांना लिहिलेले नाही, त्यावर त्यांचे किंवा एअरलाईन्स कंपनीचे नाव लिहिलेले नाही. त्याचप्रमाणे त्यावर प्रवासाची तारीख नमुद केलेली नाही, त्यामुळे त्यांना हे पत्र मान्य नाही. सदरच्या कागदपत्राची पाहणी केली असता, असे दिसून येते की, हे पत्र प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये श्री अहमद, केएफए/बीएलआर/सेल्स यांनी सुनिल/ केएफए/बीएलआर/गेस्ट कमीटमेंट यांना दि. 17/4/2009 रोजी पाठविलेले आहे. मंचाच्या मते या पत्रावर जरी तक्रारदारांचे नाव नसले किंवा प्रवासाची तारीख नमुद केलेली नसली तरी केएफए म्हणजे किंगफिशर एअरलाईन्स हे समजून येते. त्याचप्रमाणे सदरच्या पत्रामध्ये ज्या PNR नंबर (DA07033398) करीता रिफंड केलेले आहे तो नंबर व तक्रारदारांनी दाखल केलेल्या तिकिटावरील PNR नंबर हा एकच असल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी दि. 9/10/2006 रोजीच्या ई-तिकिटाची प्रत दाखल केलेली आहे व जाबदेणारांनी 30/4/2007 रोजी वर नमुद केलेल्या PNR नंबरसाठी रक्कम रक्कम रु. 2,062/- तक्रारदारांच्या क्रेडीट कार्ड नं. 4346772003020764 मध्ये रिफंड केलेली आहे आणि सदरचे ट्रान्झॅक्शन यशस्वी असल्याचेही या पत्रामध्ये नमुद केले आहे. जाबदेणारांचा ट्रान्झॅक्शन हे नंतरचे आहे. जाबदेणारांनी सदरची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी त्यांना रक्कम मिळाली किंवा नाही याबद्दल काहीही उल्लेख केलेला नाही. यावरुन तक्रारदारांनी स्वत:च तिकिट रद्द केले होते व यासाठी जाबदेणारांनी त्यांना रक्कम रु. 2,062/- परतही केलेले आहेत, हे सिद्ध होते. त्यामुळे तक्रारदारांना जाबदेणारांनी दि. 15/4/2007 रोजी बोर्डिंग पास दिला नाही, ही त्यांची तक्रार चुकीची आहे, असे मंचाचे मत आहे.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.