RAJNA DADASAHEB KOLEKAR filed a consumer case on 09 Jun 2015 against AHILYADEVI HOLKAR SAHKARI PATSASNTHA in the Satara Consumer Court. The case no is CC/13/1993 and the judgment uploaded on 09 Sep 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 193/2013.
तक्रार दाखल दि.14-11-2013.
तक्रार निकाली दि.9-6-2015.
सौ.रंजना दादासाहेब कोळेकर,
रा.प्लॉट नं.12, समता पार्क,
शाहुपुरी, सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. अहिल्यादेवी होळकर सह.पतसंस्था मर्या.
सातारा.
2. श्री.विनायक गणपत मोरे, चेअरमन.
3. श्री.महेश शंकर केंडे, व्हा.चेअरमन.
4. श्री.अशोक बाबुराव शेडगे, संचालक.
5. श्री.प्रकाश मारुती खरात, संचालक.
6. श्री.सागर बबन धायगुडे, संचालक.
7. श्री.संतोष मारुती शिंदे, संचालक.
8. सौ.गिताबाई शंकर जानकर, संचालक,
सर्व रा. द्वारा अहिल्यादेवी होळकर सह.पतसंस्था मर्या.
571 मंगळवार पेठ, सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.एस.एस.मुंढेकर.
जाबदार 1 ते 7 तर्फे– अँड.डी.एच.पवार.
जाबदार क्र.8- एकतर्फा आदेश.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य यानी पारित केला
1. तक्रारदार हिने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
तक्रारदार या प्लॉट क्र.12, समता पार्क, शाहुपुरी, सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी आहेत. प्रस्तुत तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेत भविष्यकालीन तरतूद व बचत या दृष्टीने खालील कोष्टकात नमूद केलेप्रमाणे मुदतठेव दामदुप्पट योजनेत रक्कम गुंतवली होती व आहे.
अ.क्र. | पावती क्र. | ठेव ठेवलेची तारीख | ठेवीची रक्कम रु. | मुदत संपलेची तारीख | मुदतीअंती मिळणारी रक्कम रु. |
1 | 1825 | 10-3-2007 | 12,605/- | 3-9-2013 | 25,210/- |
वर नमूद ठेवपावतीची मुदत दि.3-9-2013 रोजी संपलेली आहे. मुदतपूर्ण झालेल्या वरील ठेवपावतीची रक्कम तक्रारदारानी वारंवार जाबदारांची भेट घेऊन मागणी केली परंतु जाबदारानी तक्रारदाराना खोटी कारणे सांगून उडवाउडवीची उत्तरे देऊन ठेव रक्कम देणेचे टाळले. सदर रकमेची तक्रारदाराना अत्यंत आवश्यकता होती व आहे. त्यामुळे तक्रारदारानी वारंवार जाबदारांकडे जाऊन सदर रकमेची मागणी केली असता आज देतो, उदया देतो अशी उडवाउडवीची उत्तरे जाबदारानी दिली आहेत व ठेव रक्कम अदा केलेली नाही, त्यामुळे तक्रारदारानी दि.23-9-2013 रोजी वकीलांतर्फे नोटीस देऊन विषयांकित ठेव रक्कम परत करणेबाबत कळविले असता जाबदार क्र.2 ने जाणीवपूर्वक नोटीस स्विकारली नाही तर इतर जाबदारानी नोटीस स्विकारुनही नोटीसीतील मागणीनुसार तक्रारदाराना रक्कम अदा केली नाही व नोटीसीला उत्तरही दिलेले नाही, त्यामुळे जाबदारानी तक्रारदारांची ठेव रक्कम परत न दिल्याने तक्रारदारास दिल्या जाणा-या सेवेत जाबदारानी कमतरता केली आहे, सदोष सेवा दिली आहे. सबब जाबदाराकडून विषयांकित ठेवीची रक्कम सव्याज परत मिळणेसाठी तक्रारदाराने सदर तक्रारअर्ज मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने सदर कामी जाबदारांकडून ठेवपावतीची मूळ रक्कम रु.12,605/-, त्याची दामदुप्पट रक्कम रु.25,310/-(रु.पंचवीस हजार तीनशे दहा मात्र) द.सा.द.शे.14 टक्के व्याजदराने वसूल होऊन मिळावेत, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- जाबदाराकडून मिळावेत, तसेच अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- जाबदाराकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदारानी सदर कामी नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 कडे मूळ ठेवपावती, नि.5/2 कडे तक्रारदाराने जाबदारास पाठवलेली नोटीस, नि.5/4 कडे जाबदार क्र.1 याना पाठवलेली नोटीस त्यांनी स्विकारलेची पोस्टाची पावती व नि.5/5 कडे जाबदारानी तक्रारदाराचे नोटीसीस दिलेली उत्तरी नोटीस, नि.11 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.15 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने सदर कामी दाखल केली आहेत.
4. सदर कामी यातील सर्व जाबदाराना मंचातर्फे रजि.पोस्टाने नोटीसा पाठवणेत आल्या. सर्व जाबदाराना नोटीसा बजावलेबाबत पोस्टाच्या पावत्या नि.8, नि.10 ते नि.14 व नि.19 ते 29 कडे प्रकरणी दाखल आहेत. यातील जाबदार 8 याना नोटीस मिळूनही ते मंचात गैरहजर असलेमुळे मंचाने त्यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारित केला. जाबदार क्र.1 ते 7 तर्फे अँड.डी.एच.पवार यानी हजर होऊन त्यानी त्यांचे वकीलपत्र नि.16 कडे दाखल केले असून नि.15 कडे तक्रारदाराचे अर्जास म्हणणे, त्याचे पृष्टयर्थ नि.18 कडे प्रतिज्ञापत्र, नि.17 सोबत पुराव्याची कागदपत्रे, त्यामध्ये सन 2012 ते 2013 चा ऑडिट अहवाल, सन 2012-13 मधील ठेवीची यादी, सन 2006-2007 मधील ठेव खतावणी व ग्रा.त.क्र.265/09 मधील निकालप्रत इ.कागदपत्रे दाखल केली असून नि.23 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.24 कडे पुराव्याची कागदपत्रे, नि.27 कडे लेखी युक्तीवाद, नि.28 कडे जाबदार 1 तर्फे पुराव्याचे कागद, पोलिसांची जप्ती यादी, मुदतठेव रजि.क्र.1 पाने, मुदतठेव रजि.नं.2 पाने 1 ते 20 इ.कागदपत्रे दाखल केली असून त्यांचा आक्षेप पहाता तक्रारदारांची ठेव संस्थेकडे जमा नाही. तक्रारदाराचे ठेव ठेवतेवेळी सदर जाबदार हे संस्थेचे संचालक नव्हते. ठेवपावतीची रक्कम मान्य व कबूल नाही. ठेवीदाराचे पती संस्थेत संचालक असलेने त्यानी तक्रारीतील ठेवपावती तयार केली परंतु पैसे मात्र जमा केले नाहीत. तक्रारदारानी कधीही पैशाची मागणी संस्थेकडे केलेली नव्हती. ठेव रक्कम भरणा पावती तक्रारदारानी प्रकरणी दाखल केलेले नाही. संस्थेच्या संपूर्ण रेकॉर्डला या ठेवपावतीची नोंद नाही, त्याचप्रमाणे तक्रारदारानी दाखल केलेली ठेवपावती ज्या पुस्तकातून दिली त्या क्रमांकाच्या ठेवपावतीचे पुस्तकच अस्तित्वात नाही त्यामुळे प्रस्तुत तक्रारदारानी बनावट पावती दाखल केली आहे त्यामुळे तक्रार फेटाळावी असे आक्षेप नोंदवले आहेत.
5. तक्रारदारांची तक्रार, प्रकरणी दाखल केलेले पुरावे व जाबदारांचे आक्षेप व प्रकरणी दाखल पुरावे व त्यांचा आशय पहाता सदर प्रकरणाचे न्यायनिर्णयासाठी आमचेपुढे खालील मुद्दे उपस्थित होतात-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदाराना त्यांची मुदत पूर्ण झालेली ठेवीची
रक्कम वारंवार मागणी करुनही तक्रारदाराना परत न करुन
सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. सदर कामी जाबदारांनी त्यांचे आक्षेप पुराव्यानिशी शाबित
केले आहेत काय? नाही.
4. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
6. कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 4-
6.1- प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार ही प्रकरणी दिलेल्या पत्त्यावर शाहुपुरी सातारा येथे रहाते. तिने भविष्यकालीन बचतीच्या हेतूने जाबदार पतसंस्थेत नि.5/1 प्रमाणे न्यायनिर्णय कलम 1 मधील तपशीलाप्रमाणे रु.12,605/- ची ठेव 78 महिने मुदतीने ठेवली होती. मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु.25,310/- इतकी होती. जाबदार ही आर्थिक संस्था असून संस्थेच्या भांडवलवृध्दीसाठी जनतेकडून ठेवी स्विकारते व ती मुदतीनंतर सव्याज परत करणेचे वचन संबंधित ठेवीदर ग्राहकास देते असा त्यांचा सेवा व्यवसाय आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत जाबदारानी विषयांकित ठेवीबाबत तक्रारदाराना ठेव पावती क्र.1825 ने तक्रारदार हिची ठेव रक्कम स्विकारुन तशी ठेवपावती दिली आहे. सदर ठेवपावती ही उभयतामधील करारच असतो. या व्यवहारावरुन तक्रारदार ही जाबदारांची ग्राहक असल्याचे निर्विवादरित्या शाबित होते व वरील विषयांकित ठेवीची मुदत पूर्ण झालेनंतर होणारी संपूर्ण रक्कम रु.25,210/- (रु.पंचवीस हजार दोनशे दहा मात्र) ची रक्कम प्रस्तुत जाबदारांकडे वारंवार मागणी करुनही तक्रारदाराना परत न करुन जाबदारानी तक्रारदाराना सदोष सेवा दिलेचे निर्विवाद स्पष्ट होते, त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
6.2 - तक्रारदारांचे ठेवीबाबत प्रस्तुत जाबदारानी तक्रारदारांचे अर्जास आक्षेप घेऊन तक्रारदारानी विषयांकित ठेव संस्थेकडे कधीही ठेवलेली नव्हती, सदरची पावती बोगस आहे, विषयांकित पावती ज्या ठेवपावती पुस्तकातून दिली ते पुस्तक जाबदाराकडे जमा नाही. अशा प्रकारचे पुस्तकच अस्तित्वात नाही. तक्रारदारांचे पती हे संस्थेत संचालक असलेने त्यानी सदरची पावती खोटेपणे बनवून घेतली आहे. सदरची पावती करताना पैसे जमा केलेबाबत कोणतीही कौंटरस्लीप तक्रारदारानी दाखवलेली नाही. ज्या सिरीजच्या ठेव पुस्तकातून विषयांकित पावती दिलेचे दिसते ते पुस्तक अस्तित्वात नाही त्यामुळे तक्रारदारांचा अर्ज फेटाळून लावणेत यावा, तसेच सदर कामातील संचालक हे संस्थेचे संचालक नव्हते असेही त्यानी कथन केले आहे, या अनुषंगाने सदर जाबदारानी नि.28 कडे मुदतठेव रजिस्टर 1994 ते 2006 अखेरच्या लेजरचे उतारे हजर केले आहे, त्या उता-याचे अवलोकन केले असता दामदुप्पट लेजर पा.क्र.46 ते 55 या पावत्यांचे अवलोकन केले असता असे दिसते की, पा.क्र.49 ते 55 अखेरच्या ठेवपावत्या या 1800 क्रमांकापासून सुरु होणा-या ठेवपावती पुस्तकातून दिलेचे दिसून येते. जाबदाराकडील लेजर बुकावर नोंद असलेल्या ठेवपावत्यांचे क्रमांक अनुक्रमे 1802, 1810, 1818, 1819, 1935 या ठेवपावत्यांची नोंद असून त्या जाबदारांचे रेकॉडसदरी दामदुप्पट लेजर बुकास नोंद आहेत. त्यानंतर दामदुप्पट लेजर बुक पान क्र.46, 49 वर अनुक्रमे ठेवपावती क्र.1951, 1952, 1953, 1954 या ठेवपावत्यांच्या नोंदी आहेत व प्रस्तुत तक्रारदार ठेवीदाराचा ठेवपावती क्र.1825 हा आहे म्हणजेच प्रकरणी दाखल दामदुप्पट ठेवपावती लेजर बुकाच्या पान क्र.50 ते 55 वरील ठेवपावत्यांच्या नंबरच्या शृंखलेतील तक्रारदारांची दामदुप्पट ठेवपावती आहे हे निर्विवादरित्या शाबित होते व त्यापुढील 1900 क्रमांकापासून सुरु होणारे दामदुप्पट ठेवपावती पुस्तक आहे हे जाबदारानी सादर केलेल्या पान क्र.46 ते 49 वरील लेजर बुकावरुन दिसते. त्यामुळे तक्रारदाराना ज्या ठेवपावती पुस्तकातून ठेवपावती दिली ती खोटी आहे. अशा क्रमांकाचे ठेवपावती पुस्तकच अस्तित्वात नव्हते हा जाबदारांचा आक्षेप खोटा ठरतो हे जाबदारांचे दाखल पुराव्यावरुनच शाबित होते. तसेच ठेव ठेवलेचे काळात प्रस्तुत जाबदार संचालक नव्हते हे पण जाबदारानी तत्कालीन वेळेची वैधसंचालक यादी दाखल करुन पुराव्यानिशी शाबित केलेले नाही. त्याबाबतचा कोणताही ठोस पुरावा त्यानी मंचात दाखल केलेला नाही त्यामुळे त्यांचा वरील आक्षेप सुध्दा खोटा ठरतो. एकूणच जाबदारानी त्यांचे आक्षेप पुराव्यानिशी शाबित केलेले नाहीत त्यामुळे मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही नकारार्थी देतो.
6.3- वरील पुराव्याचा विचार करता प्रस्तुत तक्रारदार हिने जाबदार संस्थेकडे विषयांकित दामदुप्पट ठेव ठेवली होती त्यामुळे तक्रारदाराचे मागणीप्रमाणे प्रस्तुत तक्रारदार हिचा अर्ज अंशतः मंजुरीस पात्र असून जाबदाराकडून प्रस्तुत तक्रारदाराना ठेवपावती क्र.1825 ची मूळ ठेव रु.12605/- तिची दामदुप्पट रक्कम रु.25,310/-(रु.पंचवीस हजार तीनशे दहा मात्र) त्यावर दि.4-9-2013 पासून द.सा.द.शे.8% दराने संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंतच्या होणा-या संपूर्ण व्याजासह मिळणेस व मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचेखर्चापोटी रु.5,000/- मिळणेस तक्रारदार पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत मंच येत आहे त्यामुळे मुद्दा क्र.4 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
7. वरील सर्व कारणमीमांसा व विवेचन यास अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतात-
आदेश
1. तक्रारदार हिचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदारानी तक्रारदाराना त्यांची मुदत पूर्ण झालेली ठेवीची रक्कम वारंवार मागणी करुनही तक्रारदाराना परत न करुन सदोष सेवा दिली आहे असे घोषित करणेत येते.
3. प्रस्तुत जाबदार क्र.1 ते 8 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांची दामदुप्पट ठेवपावती क्र.1825 वरील दामदुप्पट रक्कम रु.25,210/- (रु.पंचवीस हजार दोनशे दहा मात्र) त्यावर दि.4-9-2013 पासून द.सा.द.शे.8% दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंतच्या होणा-या संपूर्ण व्याजासह आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयात तक्रारदाराना अदा करावी.
4. प्रस्तुत जाबदारानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
5. प्रस्तुत जाबदारानी सदर आदेशाचे दिलेल्या मुदतीत पालन न केलेस तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये जाबदाराविरुध्द दाद मागू शकतील.
6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.9-6-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.