जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 353/2011
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-05/08/2011.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 24/09/2013.
श्रीमती शोभाबाई ज्ञानेश्वर पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,
रा.सावरखेडे, ता.पारोळा,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. कृषि अधिकारी,
1.कृषि अधिकारी कार्यालय, पारोळा,
1.ता.पारोळा,जि.जळगांव.
2. व्यवस्थापक,
नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि,
साईबाबा मार्केट, केळकर मार्केट जवळ,
बळीराम पेठ,जळगांव,ता.जि.जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.सतीश तुकाराम पवार वकील.
विरुध्द पक्ष क्र. 1 तर्फे प्रतिनिधी हजर.
विरुध्द पक्ष क्र. 2 तर्फे श्री.एस.व्ही.देशमुख वकील.
निकालपत्र
श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमाधारक मृत्यु झाल्यानंतर त्याचा विमा क्लेम देण्याचे नाकारुन दिलेल्या सेवेतील त्रृटी दाखल प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदाराचे पती ज्ञानेश्वर भिमराव पाटील यांचे नावावर मौजे सावरखेडे,ता.पारोळा,जि.जळगांव येथे गट नंबर 130/1 क्षेत्र 0 हे 30 आर शेतजमीन होती. मौजे सावरखेडे गांवी दि.22/07/2007 रोजी सकाळी 7.00 वाजता दगडाची ठोकर लागल्याने ते मयत झाले. महाराष्ट्र शासनाच्या व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत अपघातामुळे मिळणा-या दाव्यास पात्र असल्याने शासन परिपत्रकात नमुद अट क्र. 1 ते 5 प्रमाणे लागणारे संपुर्ण कागदपत्रे तक्रारदाराने जोडुन विमा क्लेम विरुध्द पक्ष क्र. 2 चे मुंबई कार्यालयाकडे पाठविले. त्यानंतर विरुध्द पक्ष विमा कंपनीचे मागणीनुसार क्लेम क्र.260300/47/08/969000006 मध्ये दि.21/04/2008 चे पत्रानुसार योग्य ती कागदपत्र पुर्तता करुन रजिष्ट्रर पोष्टाने पाठविले तथापी विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदाराने कागदपत्रांची पुर्तता केली नसल्याचे कारण देऊन फाईल बंद करण्यात येत असल्याचे कळवुन विमा क्लेम देण्याचे नाकारले. तक्रारदाराने आवश्यक त्या कागदपत्रांसह दाखल केलेला विमा क्लेम विमा कंपनीने चुकीचे कारण दर्शवुन देण्याचे नाकारुन तक्रारदारास सदोष सेवा दिलेली आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह मंजुर करण्यात यावा व विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार हिला रक्कम रु.1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- अशी एकुण रक्कम रु.1,50,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावेत व तक्रार अर्जाचा संपुर्ण खर्च मिळावा अशी विनंती तक्रारदाराने तक्रार अर्जातुन केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या.
4. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी याकामी म्हणणे दाखल केलेले असुन तक्रारदाराचे प्रकरण शे.अ.वि.यो.सन 2006-07 खंडीत कालावधी (15 जुलै,2006 ते 14 जुलै,2007) मधील असुन तहसिलदार कार्यालय, पारोळा यांचेमार्फत विमा कंपनीकडे सादर करण्यात आलेले आहे. सदर कालावधीमध्ये कंपनीने त्रृटी काढलेल्या असुन त्या त्रृटी 7/12 मुळ, 6 क, 8 अ कार्यालयाकडुन कंपनीकडे सादर करण्यात आले आहे त्यावर कंपनीने कार्यवाही करावी. तसेच सदर प्रकरण जुने असल्यामुळे मा.तहसिल कार्यालय,पारोळा व विमा कंपनीकडुन या प्रकरणाची माहिती घ्यावी अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.1 यांनी केलेली आहे.
5. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. मयत ज्ञानेश्वर भिमराव पाटील हे शेतकरी होते तसेच ते शेती करीत होते व त्यांचा दि.22/07/2007 रोजी अपघातात मृत्यु झाला हे कथन विरुध्द पक्षास मान्य नाही तसेच त्याबाबतचा कोणताही पुरावा तक्रारदाराकडे नाही. मयत ज्ञानेश्वर ज्या वेळी अपघाताने मयत झाला त्यावेळी विमा पॉलीसी अस्तित्वात नव्हती त्यामुळे विमा कंपनीची कोणतीही नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी येत नाही. तक्रारदाराने विमा कंपनीकडे क्लेम दाखल केल्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दिलेला नाही. तक्रारदाराने मागणी केल्याप्रमाणे कोणत्याही रक्कमा देण्यास विरुध्द पक्ष जबाबदार नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा व प्रस्तुतकामी केलेला खर्च तक्रारदाराकडुन मिळावा अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.2 यांनी केलेली आहे.
6. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे, व उभयतांचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
1. तक्रारदार हे विरुध्द पक्षांचे ग्राहक आहेत काय ? होय.
2. विमा कंपनीने तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी केली
आहे काय ? होय.
3. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे अंतीम आदेशानुसार
7. मुद्या क्र. 1 - तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक होतात काय, याबाबत तक्रारदाराने तक्रार अर्जातुन ती मयत ज्ञानेश्वरची पत्नी असल्याचे कथन केलेले असुन नि.क्र.3 लगत दाखल रेशन कार्डचे छायाप्रतीवर नमुद नाव व कुटूंबप्रमुखाशी असलेले नाते यावरुन मयत ज्ञानेश्वरची तक्रारदार ही पत्नी असल्याचे तसेच मयताचे तक्रार अर्जासोबत दाखल दि.17/09/2007 रोजीचे वारस दाखल्यानुसार शोभाबाई ज्ञानेश्वर पाटील ही वारस असल्याचे स्पष्ट होते. यास्तव तक्रारदाराचे पती हे विरुध्द पक्षाचे ग्राहक होते व ग्राहक संरक्षण कायदा,1986 च्या कलम 2(1)(ब)(v) च्या तरतुदीनुसार मयत ग्राहकाचे वारस म्हणुन तक्रारदार हया विरुध्द पक्षाच्या ग्राहक ठरतात. सबब मुद्या क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
8. मुद्या क्र. 2 - विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी याकामी हजर होऊन तक्रारदाराचे पती ज्ञानेश्वर हे शेतकरी असल्याबाबत शंका उपस्थित करुन तसे कागदपत्री पुरावाही नसल्याचे म्हटले आहे. तथापी विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी याकामी हजर होऊन विरुध्द पक्ष क्र. 2 विमा कंपनीने ज्या त्रृटी काढलेल्या होत्या त्यांची पुर्तता केलेली असुन 7/12 उतारा मुळ प्रत, 6 क, 8 अ कंपनीकडे सादर केलेली असुन त्यावर कंपनीने कार्यवाही करावयाची आहे असे नमुद केले आहे. तसेच तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत अकस्मात मृत्युची खबर दाखल केली असुन मयत ज्ञानेश्वर हा रस्त्याने जात असतांना सावरखेडा गावी त्यास दगडाची ठोकर लागल्याने व खाली पडल्याने बेशुध्द अवस्थेत घरी नेले असता पाणी पाजले नंतर तो घरी मयत झाला असे नमुद आहे., यावरुन तक्रारदाराचे पतीचा अपघाती मृत्यु झाल्याचे स्पष्ट होते. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत हक्काचे पत्रक गा.नं.6 दाखल केले असुन ज्ञानेश्वर भिमराव पाटील हे दि.22/7/2007 रोजी मयत झाल्याने त्यांचे मयत वारस नमुद केले आहे त्यात तक्रारदाराचे नांव पत्नी या सदरी नमुद आहे. तक्रारदाराचे पती ज्ञानेश्वर भिमराव पाटील यांचे नांवे गट क्र.130/1 सावरखेडे,ता.पारोळा या गांवी शेतजमीन असल्याचे व ज्ञानेश्वर हे मयत झाल्यानंतर वारस म्हणुन शोभाबाई ज्ञानेश्वर पाटील यांचे नाव लागले असल्याचेही दाखल 7/12 उता-यावरुन स्पष्ट होते. तक्रारदाराने दाखल केलेला तलाठी यांनी दिलेला मौजे सावरखेडे गावातील खाते क्र.10 नुसार नमुद असलेला भुमापन क्र.130/1 चे क्षेत्र ज्ञानेश्वर भिमराव पाटील यांचे नांवे असल्याचे स्पष्ट होते. उपरोक्त विवेचनात नमुद केलेप्रमाणे तक्रारदार यांचेकडे योग्य ते सर्व कागदोपत्री पुरावे असतांनाही विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारदाराचा विमा क्लेम चुकीचे कारण दर्शवुन बेकायदेशीररित्या नाकारल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी शासन निर्णयाने त्यांना नेमून दिलेली कामे वेळेवर व व्यवस्थीत केलेली असल्याने त्यांनी सेवेत कमतरता केली असे म्हणता येणार नाही. सबब मुद्या क्र. 2 चा निष्कर्ष विरुध्द पक्ष क्र. 2 करिता आम्ही होकारार्थी देत आहोत.
9. मुद्या क्र. 3 - तक्रारदाराने याकामी तक्रार अर्जातुन विमा रक्कम रु.1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- अशी एकुण रक्कम रु.1,50,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावेत अशी विनंती केलेली आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी जरी त्यांची भुमिका याकामी व्यवस्थीत पार पाडली असली तरी विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारुन सेवेत त्रृटी केलेली आहे. परिणामी शासन निर्णयाप्रमाणे रु.1,00,000/- विमा रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र ठरते. कोणतेही संयुक्तीक कारणाशिवाय विमा दावा नाकारल्यामुळे रक्कम रु.1,00,000/- वर प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल तारखेपासुन द.सा.द.शे.9 टक्के व्याज मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे आमचे मत आहे. तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी रु.50,000/- मागणी केली आहे तथापी आमचे मते तक्रारदार ही मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- मिळणेस आमचे मते पात्र आहे. सबब वरिल विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो.
2. विरुध्द पक्ष क्र. 2 नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि. यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/-(अक्षरी रक्कम रु.एक लाख मात्र) तक्रार दाखल दि.05/08/2011 पासुन द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि. यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासा दाखल रु.15,000/- (अक्षरी रक्कम रु.पंधरा हजार मात्र ) व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- (अक्षरी रु.तीन हजार मात्र ) या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 24/09/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.