निकालपत्र
( पारित दिनांक :30/05/2015)
( मा. सदस्या, श्रीमती. स्मिता एन. चांदेकर यांच्या आदेशान्वये)
1. त.क.ने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. त.क.च्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा आहे की, त.क. 2 व 3 हे त.क. 1 चे आई-वडील असून त्यांची शेती मौजा धामणगांव (वाथोडा) पोस्ट दहेगांव, तह.जि. वर्धा येथे आहे. त.क. 1 ते 3 च्या मालकी हक्काची शेतीचे विवरण खालीलप्रमाणे आहे.
अ.क्रं. शेत सर्व्हे नं. हेक्टर
प्रविण दिवाकर ठाकरे 41/1 4.22
दिवाकर रामराव ठाकरे 25 1.30
28 2.14
विमल दिवाकर ठाकरे 24 2.25
2. त.क. 1 ने त्याचे मालकीचे सर्व्हे नं. 41/1 8 जुन 2013 ला 2 एकरात कापसाची व 2 एकरात सोयाबीनची पेरणी केली होती व दि. 31.07.2013 रोजी कापूस व सोयाबीनचा पीक विमा काढला. त.क. ने कापूस 2 एकराकरिता रुपये 2020/- व सोयाबीन 2 एकराकरिता रुपये 1029/-रुपये राष्ट्रीय कृषि विमा योजने अंतर्गत पंजाब नॅशनल बँक वर्धा येथे विमा प्रिमियम जमा केले. त्यानुसार कृषि विमा योजने अंतर्गत सर्वसाधारण विमा संरक्षित रक्कम कापसाकरिता रुपये 40,400/- व सोयाबीनकरिता रुपये 29,400/- असे एकूण रुपये 69,800/- नुकसानभरपाई देण्याचे वि.प. क्रं. 1 ते 3 यांनी कबुल केले.
3. त्याचप्रमाणे त.क. क्रं. 2 ने सर्व्हे नं. 25/1 हे आर. 1.30 मध्ये 2 एकरात कापूस पेरला व सर्व्हे नं. 28 आराजी 2.14 मध्ये 2 एकरात कापुस व 1.40 एकरात सोयाबीन पेरले. सदर पेरणी त्याने दि. 08.06.2013 ला केलीव दि. 31.07.2013 ला कापूस व सोयाबीनचा कृषी विमा काढला. त्याकरिता त.क.क्रं. 2 ने कापसाचे रुपये 2020/- व सोयाबीनचे रु. 721/- याप्रमाणे विम्याची रक्कम पंजाब नॅशनल बॅंक, शाखा वर्धा येथे जमा केले. त्यानुसार वि.प.क्रं. 1 ते 3 यांनी राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत विम्याची संरक्षित रक्कम कापसाकरिता रु.40,400/- व सोयाबीनचे रुपये 20,580/- एकूण रुपये 60,980/- कुठल्याही प्रकारे होणा-या नुकसानाकरिता भरपाई म्हणून देण्याचे कबुल केले होते.
4. त.क. क्रं. 3 विमल दिवाकर ठाकरे हीने स्वतःचे मालकीच्या शेतात मौजा धामणगांव शेत सर्व्हे नं.26/1 मध्ये एकूण 2.25 हे.आ. मधील 2.50 एकर शेतीत सोयाबीन दि. 08.06.2013 ला पेरले व त्याचा दि. 31.07.20103 ला कृषी विमा काढला व रु.1287/- विम्याची रक्कम पंजाब नॅशनल बॅंक वर्धा येथे जमा केली. वि.प. क्रं. 1 ते 3 यांनी विम्याची संरक्षित रक्कम रुपये 36,750/-कुठल्याही प्रकारे नुकसान झाल्यास भरपाई देण्याचे कबूल केले होते. सदर त.क. 1 ते 3 यांनी विमा काढल्यानंतर विमा कंपनीचे अधिकारी शेतात पेरलेल्या पिकाची शहानिशा करण्यासाठी आले होते.
5. त.क.ने असे ही कथन केले आहे की, त्यांचे शेतातील पीक हे चांगले होते व त्यातून त्यांना अंदाजे 10 लाख रुपयापर्यंत उत्पन्न होण्याची शक्यता होती. परंतु ऑगस्ट महिन्याच्या 12 तारखेला जास्त पाऊस आल्यामुळे व दि. 17, 18 व 19 ऑगस्ट 2013 ला 72 तास सतत पाऊस आल्याने अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे त.क.च्या शेतातील पीक खरडून व वाहून गेले. तसेच 7-8 दिवस शेतात पाणी साचले होते. त्यामुळे त.क.च्या शेतातील संपूर्ण पीक नष्ट झाले. त.क.ने त्याबाबत तहसिलदार, जिल्हाधिकारी वर्धा तसेच वि.प. कं. 1 ते 5 कडे दि. 12.08.2013 ला तक्रार केली. सदर तक्रारीचे अनुषंघाने नाबार्ड बॅंकेचे अधिकारी यांनी दि. 04.09.2013 रोजी त.क.च्या शेतांची पाहणी करुन पंचनामा केला व त.क. यांचे बयान देखील नोंदविले. तसेच वि.प. क्रं. 1 यांनी शेताचे फोटो देखील काढले होते. त.क. ने वेळोवेळी वि.प. क्रं. 1 ते 7 यांचेकडे पत्र व्यवहार करुन पीक नुकसानबाबत भरपाई मागितली होती.परंतु त.क.ला नुकसान भरपाई मिळाली नाही. म्हणून दि. 08.01.2014 रोजी वकिलामार्फत वि.प. क्रं. 1 ते 4 यांना नोटीस पाठविला असता वि.प.क्रं. 3 यांनी नोटीसचे उत्तर पाठवून सदर वि.प. हे बॅंकिग वित्तीय संस्था असून विमा संबंधीचे व्यवहार करीत नाही. त्यामुळे विमा रक्कम देण्याची त्यांची जबाबदारी नाही असे कळविले. वि.प.क्रं. 1 ते 7 यांनी विम्याची रक्कम न देवून सेवेत त्रृटी केली आहे. म्हणून त.क.ने मंचासमक्ष सदर तक्रार दाखल केली असून तक्रारकर्ता क्रमांक 1 ते 3 यांना अनुक्रमे रु. 69,400/-, रुपये 60,980/- व रु.36,750/- असे एकूण रुपये 1,67,130/- व त्यावर 18 टक्के व्याजदराने दि. 18.08.2013 पासून ते मिळेपर्यंत विम्याची रक्कम वि.प.क्रं. 1 ते 7 यांचेकडून देण्यात यावी, याकरिता विनंती केलेली आहे. तसेच विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्यामुळे त.क.ला झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाकरिता नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी रुपये 10,000/-, नोटीस खर्च रुपये 1000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5000/- असे एकूण 2,03,130/-रुपये वि.प.क्रं.1 ते 7 कडून देण्यात यावे अशी प्रार्थना केलेली आहे. त.क.ने त्याचे तक्रारीचे पृष्ठयर्थ वर्णनयादी नि.क्रं. 4 नुसार 9 दस्त पटलावर दाखल केले आहे.
6. वि.प. क्रं.1 यांनी नि.क्रं.18 वर आपले लेखी उत्तर दाखल केले असून त्यात तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(b), 2(c) व 2(o) नुसार चालू शकत नाही असा प्राथमिक आक्षेप दाखल केला आहे. त्याचप्रमाणे National Agricultural Insurance Scheme (NAIS) ही पूर्वीच्या Comprehensive Crop Insurance Scheme (CCIS) चे सुधारित आवृत्ती आहे असे नमूद केले आहे. वि.प.क्रं. 1 हे NAIS ही स्किम राबविणारी एजन्सी असून ते विमा प्रिमियमचे पैसे राज्य सरकारचे विश्वस्त म्हणून त्यांचेकडे ठेवतात.
7. वि.प.क्रं. 1 ने आपल्या लेखी उत्तरात हे मान्य केले आहे की, त.क.च्या सदर पीक नुकसानीबाबतची माहिती ही त्यांना बॅंके मार्फत नुकसान झाल्याचे 48 तासांत प्राप्त झाली. त.क.च्या तक्रारीच्या आधारे AIC ने पुरामुळे त.क.च्या पीकाच्या झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक ( Individual) तत्वावर Assessment केले. स्किम नुसार अॅग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीने (AIC) ने तक्रारकर्त्यांचे पीक नुकसान Assess करुन त.क. चा विमा दावा Nodal बॅंके मार्फत दि. 5.06.2014 रोजी रुपये 1,24,877/- मंजूर करुन जमा केला. प्रत्येक त.क.ला झालेल्या नुकसानीचे Assessment report व विमा दावा मंजुरी पत्र वि.प.क्रं.1 यांनी आपल्या लेखी उत्तरासोबत नि.क्रं. डी नुसार जोडलेले असून खालीलप्रमाणे प्रत्येक तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूर केला आहे.
Sr.No. | Name of Farmer | Total Area Sown (Ha) | Area Insured (Ha) | Sum Insures(Ha) | Estimated % of Loss | Claim Amount (Rs.) |
1 | Pravin Divakar Thakare | 2.00 | 2.00 | 29400 | 100 | 29400 |
2 | Pravin Divakar Thakare | 2.00 | 2.00 | 40400 | 100 | 40400 |
3 | Vimal Divakar Thakare | 2.50 | 2.50 | 36750 | 50 | 18375 |
4 | Divakar Ramrao Thakare | 2.00 | 2.00 | 40400 | 90 | 18180 |
5 | Divakar Ramrao Thakare | 1.40 | 1.40 | 20580 | 90 | 18522 |
| Total | 9.90 | 9.90 | 167530 | 430 | 124877 |
वरीलप्रमाणे नुकसान Assessment report नुसार AIC ने तक्रारकर्त्यांचा विमा दावा मंजुर करुन त्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली असल्यामुळे वि.प. क्रं. 1 ने सेवेत कोणतीही त्रृटी केली नसून सदर तक्रार खारीज करण्यात यावी असे वि.प. क्रं. 1 ने विनंती केली आहे. (वि.प.क्रं. 1 ने त्यांचे कथनाचे पृष्ठर्थ नि.क्रं. A ते E नुसार दस्ताऐवज दाखल केले आहे).
8. वि.प.क्रं. 2, 4, 5, 6 व 7 ने तयांचे लेखी बयान नि.क्रं. 16 नुसार दाखल केले आहे. वि.प. क्रं. 2, 4, 5, 6 व 7 यांनी सदर तक्रारकर्ते हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (b) नुसार ग्राहक या परिभाषेत येत नाही. तसेच त.क. व सदर वि.प. यांच्यात कोणत्याही प्रकारचे व्यवसाय व्यवहाराचे संबंध नाही. त.क.ने पैसे भरुन सदर वि.प.कडून कोणत्याही प्रकारची सेवा घेतली नसल्यामुळे त्यांच्या सेवेत त्रृटी आहे हे म्हणणे चुकिचे आहे. सदर तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (c) या परिभाषेत येत नाही असा प्राथमिक आक्षेप नोंदविला असून सदर तक्रार खारीज करण्यात यावी असे प्रतिपादन केले आहे.
9. तक्रारकर्त्याचे पीकाचे नुकसानाबद्दल वि.प.क्रं. 2 यांच्याकडे माहिती दिल्यानंतर वि.प.क्रं. 2 यांनी वि.प. 1 यांना दि. 28.10.2013 आणि 23.01.2014 रोजी पत्र देवून त.क.यांना विमा राशी मिळाली नसल्यामुळे त्यांचा स्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली असा अहवाल मागविला होता. परंतु वि.प. 1 कडून त्याबाबत अहवाल प्राप्त न झाल्यामुळे वि.प.चे वागणुकीबद्दल वि.प. क्रं. 5 व 6 यांना दि. 25.02.2014 रोजी पत्र पाठवून कळविण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान वि.प.क्रं. 1 कडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते. तसेच त.क.नी विमा प्रिमियमचे पैसे वि.प.क्रं. 1 कडे जमा केलेआहे. म्हणून शेतक-यांचे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानीचा मोबदला देण्याची जबाबदारी वि.प. क्रं. 1 यांची आहे. वि.प.क्रं. 2, 4, 5, 6 व 7 यांचा प्रिमियम रक्कमेशी व मोबदला रक्कमेशी कोणत्याही प्रकारे संबंध नसतो. त्यामुळे नुकसान मोबदला देण्यास सदर वि.प.नी दिरंगाई किंवा टाळाटाळ केल्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सदर वि.प.नी त्यांचे लेखी उत्तरात नमूद केले आहे. सदर वि.प.नी तक्रारीतील इतर सर्व त.क.चे कथन अमान्य केले आहे व तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्याची विनंती केलेली आहे. सदर वि.प.नी त्यांचे लेखी जवाब सोबत पृष्ठ क्रं. 40 ते 43 वर महाराष्ट्र शासन निर्णयाची सत्यप्रत दाखल केली असून पृष्ठ क्रं. 44, 45 व 46 वर लेखी उत्तरात नमूद वि.प. क्रं.1 ला पाठविलेल्या पत्रांच्या सत्यप्रती दाखल केल्या आहेत.
10. वि.प.क्रं. 3 यांनी आपले लेखी उत्तर नि.क्रं. 22 वर दाखल केले. सदर वि.प.ने त्यांचा सदर प्रकरणाशी व त.क.शी कोणताही संबंध नाही. तसेच वि.प.क्रं. 3 ही बॅंकिंग वित्तीय संस्था आहे. त्यामुळे त.क.चे म्हणणे असे की, सदर विरुध्द पक्षाने त्यांना विमा रक्कम रु.69,800/-, रु.60,980/- व रुपये 36,750/- पिक नुकसानीबाबत देण्याचे कबूल केले हे खोटे असून त्यांचा तक्रारकर्त्यांशी व प्रकरणाशी काहीही संबंध नसल्यामुळे सदर तक्रारीतून त्यांचे नांव वगळण्यात यावे व तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे. वि.प.क्रं. 3 यांनी वर्णन यादी नि.क्रं. 30 नुसार 4 दस्ताऐवज दाखल केले आहेत.
11. तक्रारकर्त्यांनी त्यांचे वतीने त.क.क्रं. 1 प्रविण दिवाकरराव ठाकरे यांचे शपथपत्र नि.क्रं. 23 वर दाखल केले असून नि.क्रं. 26 वर त.क.तर्फे साक्षदार म्हणून अनुक्रमे तुकाराम झोलबाजी इंगळे, त.क.ने नि.क्रं. 27 वर त्याच्या तर्फे साक्षदार क्रं. 3 गुलाब महादेव भोयर यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. नि.क्रं. 38 वर अर्जदार क्रं. 1 याने मंचाचे परवानगीने त्यांचे शपथपत्र दाखल केले. नि.क्रं. 28 वर त.क.ने लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प.नी त्यांचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केले नाही. त.क. व वि.प.क्रं. 1 यांचे वकिलांचा मौखिक युक्तिवाद ऐकण्यात आला. वि.प.क्रं. 2, 4, 5, 6, 7 व वि.प. क्रं. 3 चे वकिल युक्तिवादाच्या वेळी गैरहजर.
12. वरीलप्रमाणे अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी विधानावरुन मंचासमोर खालीलप्रमाणे मुद्दे विचारार्थ काढण्यात आले असून त्यावरील कारणेमिमांसा खालीलप्रमाणे आहे.
अ.क्रं | मुद्दे | उत्तर |
1 | विरुध्द पक्ष क्रं 1 ने तक्रारकर्त्यांचा विमा पॉलिसीप्रमाणे विम्याची रक्कम मंजूर न करुन सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? | नाही |
2 | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? | नाही |
3 | अंतिम आदेश काय ? | खारीज |
-: कारणमिमांसा :-
13. मुद्दा क्रं.1 , 2 व 3 ः- सदर प्रकरणात वि.प. 1 ने तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(b), 2(d) व 2 (o) नुसार चालू शकत नाही याप्रमाणे प्राथमिक आक्षेप नोंदविला आहे. सदर बाबीचा विचार केला असता वि.प.क्रं. 1 यांनीत्यांचे लेखी उत्तरात ते राष्ट्रीय कृषि विमा योजनेची अंमलबजावणी करणारी एजन्सी आहे. वि.प. 1 यांनी आपल्या लेखी उत्तरा सोबत राष्ट्रीय कृषि विमा योजने संबंधी कृषी मंत्रालयाचे दि.16.07.1999 चे प्रपत्र नि.क्रं. A नुसार जोडलेले असून पृष्ठ क्रं. 70 सदर योजनेनुसार दावा निश्चित करणे व देणे ही अमंलबजावणी करणा-या एजन्सी संस्थेची जबाबदारी असल्याचे नमूद केले आहे.
14. त्याचप्रमाणे त.क. क्रं. 1 ते 3 यांनी त्यांचे शेतातील पिकाचा विमा काढून त्याचे प्रिमियमची रक्कम बॅंकेत जमा केली होती हे वादातीत नाही. सदर बाब त.क. यांनी दाखल केलेल्या वर्णन यादी नि.क्रं. 4 नुसार दस्ताऐवज क्रं. 1 व 3 वरुन देखील स्पष्ट होते. यावरुन सदर प्रकरणातील बाब ही विम्याशी संबंधित असून 'विम्याची' सोय पुरविणा-या संस्था (सेवा) या ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(o) मध्ये अंतर्भूत आहे. तसेच त.क. हे विमाधारक आहेत. सदर योजनेचे विमाधारक असल्यामुळे सदर तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (o) नुसार चालू शकत नाही हा आक्षेप तथ्यहिन आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. ग्राहक संरक्षण कायद्यात 2 (d) या कलमा अंतर्गत 'ग्राहक' याचा अर्थ दिलेला आहे. सदर कलमाचे वाचन केले असता व तक्रारीतील तथ्याचे अवलोकन केले असता त.क. यांना विम्याकरिता रक्कम प्रिमियमच्या स्वरुपात अदा केल्याचे स्पष्ट होते व त्यानुसार त.क. हे विमा सेवेचे लाभ मिळण्याकरिता पात्र असल्याचे स्पष्ट होते.त्यामुळे त.क. हे ग्रा.सं.कायद्याच्या कलम 2 (d) (ii) नुसार वि.प.चे ग्राहक आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. प्रकरणातील वाद हा विमा रक्कमे संबंधात आहे. म्हणून सदर प्रकरण मंचाचे अधिकार क्षेत्रात येते. या निष्कर्षाप्रत मंच येते.
15. त.क. क्रं. 1 ते 3 यांनी आपापल्या शेतातील पिकांचा विमा काढला होता व विम्याच्या प्रिमियमची रक्कम बॅंकेत जमा केली हे वादातीत नाही. त्याचप्रमाणे त.क.नी त्यांच्या शेतातील पिकाचे मुसळधार पाऊसामुळे नुकसान झाले याबाबत वि.प. यांना 48 तासांत कळविले हे देखील वादातीत नाही. सदर तक्रारीत त.क.क्रं. 1 ने कापसाची नुकसानभरपाई रु. 40,000/- व सोयाबीनची नुकसान भरपाई रु.29,400/- असे एकूण 69,400/-रुपये त्याचप्रमाणे त.क.क्रं. 2 ने कापसाचे नुकसान भरपाई रु.40,400/- व सोयाबीनसाठी रुपये 20,580/- असे एकूण 60,980/-रुपये आणि त.क.क्रं. 3 ने सोयाबीनची नुकसान भरपाई रु. 36,750/-एकूण रुपये1,67,130/- व्याजासह वि.प.क्रं. 1 ते 7 कडून मिळण्याची मागणी केलेली आहे. वि.प. क्रं. 1 यांचे कथनानुसार राष्ट्रीय कृषि विमा योजनेनुसार कृषि विमा कंपनीने अर्जदारांचे पिकांचे नुकसान निर्धारित (assess) करुन अर्जदारांचा विमा दावा रु.1,24,877/- मंजूर केला व त्यानुसार nodal बॅंकमार्फत दि. 05.06.2014 रोजी अर्जदारांचे खात्यात जमा केले.
सदर बाब ही अर्जदारांनी मान्य केली असून विम्याची रक्कम अर्जदारांच्या खात्यात जमा झाल्याचे वर्णन यादी नि.क्रं.25 नुसार दाखल दस्ताऐवज पृष्ठ क्रं. 112 ते 117 अर्जदारांचे बॅंकेच्या खाते उतारा यावरुन देखील स्पष्ट होते. परंतु अर्जदारांनी त्यांचे नि.क्रं. 38 वरील शपथपत्रात तसेच लेखी युक्तिवादात व तोंडी युक्तिवादात अर्जदार क्रं. 2 यांना संरक्षित विमा रक्कम रुपये 24,278/- व अर्जदार क्रं. 3 यांना संरक्षित विमा रक्कम 18,375/- असे एकूण रुपये 42,653/- मिळाले नाही असे प्रतिपादन केले. यावर वि.प.क्रं. 1 यांचे वकिलांनी दस्ताऐवज Exb-D पृष्ठ क्रं. 90 ते 94 वर मंचाचे लक्ष केंद्रित केले. सदर दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, अर्जदार क्रं. 2 यांचे एकूण 2.40 हे. जमीनपैकी 1 हेक्टर जमीनीवरील कापसाचे पीक पूर्णतः वाहून नष्ट झाल्याचे नमूद केले असून सर्व्हे करणा-या अधिका-यांनी 90% नुकसान झाल्याचा अहवाल पाठविला आहे. त्याचप्रमाणे अर्जदार क्रं. 2 चे सोयाबीनचे पिकाचे नुकसान 50% झाल्याचे सदर सर्व्हे अहवालामध्ये नमूद असल्याने त्यानुसार त्यांचा विमा दावा रक्कम निश्चित करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अर्जदार क्रं.3 विमा दिवाकर ठाकरे हिचे 2.5 हेक्टर शेतातील कापसाचे पिकाचे 50 टक्के नुकसान झाल्यामुळे त्यानुसार विमा रक्कम दिल्याचे दिसून येते. वरील कागदपत्रानुसार तक्रारकर्त्यांस योग्य प्रकारे विमा रक्कम देण्यात आल्याचे स्पष्ट होते.
सदर बाबींचा खुलासा युक्तिवादा दरम्यान मंचासमक्ष करण्यात आला असता तक्रारकर्त्यांचे वकिलांनी सदर विमा रक्कम मिळण्यासाठी अर्जदारांस करावयास लागलेल्या कष्ट व मानसिक व शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई वि.प.कडून मिळण्याकरिता मंचास विनंती केली.
16. प्रकरणात अर्जदारांचे विमा दाव्याचा विचार केला असता वि.प. क्रं. 1 ने त्यांस विम्याची रक्कम एकूण रुपये 1,24,877/- यापूर्वीच दिल्याचे सिध्द होते. त्याचप्रमाणे अर्जदारांस मिळालेली विमा रक्कम ही विमा योजनेनुसार बरोबर व योग्य आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. नि.क्रं. Exh- D चे अवलोकन केले असता असे दिसून येते की, वि.प.क्रं. 1 यांची अर्जदारांचे विमा दाव्याची Note ही दि. 05. मे 2014 ची असल्याचे दिसून येते. त्यानुसार त्यांनी अर्जदरांचे खात्यात विमा रक्कम जमा केली आहे. तसेच वि.प. यांनी त.क. यांचा विमा दावा देण्यास नाकारल्याचे कुठेही दिसून येत नाही. परंतु त.क.नी सदर तक्रार ही दि. 18.03.2014 रोजी म्हणजे आधीच दाखल केली होती. त्यामुळे वि.प.क्रं. 1 ने त्याचे सेवेत त्रृटी केली असे म्हणता येणार नाही. वि.प.क्रं. 1 ने दावा निश्चित होताच विम्याची रक्कम वेळेत अर्जदारांचे खात्यात जमा केली आहे. म्हणून वि.प. च्या कृत्यामुळे तक्रारकर्त्यांना शारीरकि व मानसिक त्रास झाला असे म्हणता येणार नाही. त्यामुळे त.क. हे त्यांचे मागणीप्रमाणे मानसिक, शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई तसेच सदर तक्रारीचा व नोटीसचा खर्च मिळण्यास पात्र नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येते.
आदेश
1 तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात येते.
2 मा. सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात.
3 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात.