::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 19/03/2016 )
आदरणीय अध्यक्षा श्रीमती एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, . .
तक्रारकर्त्याने त्याचे घरासंबंधीचे फर्निचर व गृहउपयोगी सामान हे भटींडा ते अकोला येथे आणण्याकरिता विरुदपक्षाकडे दि. 18/06/2015 बिल नं. बीएल/एलडीएच-2015/300420 अन्वये बुक केले. सदर सामानाची बुकींग करतेवेळी, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास आश्वासन दिले की, सदर सामान हे सुरक्षित तसेच तज्ञ कामगारांच्या देखरेखीखाली पोहचविण्यात येईल. सदर आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारकर्त्याने कन्साईनमेंट नं. एलडीएच001645 प्रमाणे विरुध्दपक्षाला बुक केले व त्याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला रु. 87,001/- सर्व्हीस चार्जेस दिले. सदर सामानाची पॅकींग करतेवेळी एकूण 148 नग फर्निचर सामान तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला हस्तांतरीत केले व सर्व सामान व्यवस्थीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सदर सर्व सामान हे नाजुक व महागडे असल्यामुळे, हे सर्व सामान सुरक्षीत व चांगल्या स्थितीत पोहचवावे, असे विरुध्दपक्षाला सुचित केले. त्यानंतर सर्व सामान अकोला येथे तक्रारकर्त्यास हस्तांतरीत करतेवेळी, त्या फर्निचरची पुर्ण मोडतोड झाल्याचे तक्रारकर्त्याच्या लक्षात आल्याबरोबर, तक्रारकर्त्याने तात्काळ या बद्दलची सुचना विरुध्दपक्षाला दिली व सामान हस्तांतरीत करणाऱ्या अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळेस विरुध्दपक्षाने दि. 28/06/2015 रोजी त्यांचे सुनिल शर्मा नामक इसमाला वरील सर्व बाबींचे निरीक्षण करण्यासाठी पाठविले व त्यांनी फर्निचरचे मोडतोड झाल्याचा अहवाल दिला. त्यानंतर झालेल्या नुकसानी बाबत विरुध्दपक्षाला वारंवार टेलिफोनव्दारे तसेच ईमेलव्दारे कळविले. परंतु विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या कोणत्याही कथनाकडे लक्ष दिले नाही. विरुध्दपक्षाच्या कृत्यामुळे तक्रारकर्त्याचे महागडे फर्निचर पुर्णत: मोडतोड झाले असून, त्यामुळे तक्रारकर्त्याचे जवळपास रु. 3,00,000/- चे नुकसान झाले आहे. तक्रारकर्त्याने त्यांचे वकीलामार्फत दि. 17/7/2015 रोजीची नोटीस दि. 20/07/2015 रोजी विरुध्दपक्षाला पाठविली, परंतु सदर नोटीसला विरुध्दपक्षाने कोणतेही उत्तर दिले नाही व नुकसान भरपाई सुध्दा दिली नाही. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्ष यांनी सेवेमध्ये न्युनता व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असे घोषीत करण्यात यावे. तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रु. 10,00,000/-, तक्रारकर्त्याने भरलेले सेवा शुल्क रु. 87,001/- तसेच फर्निचरची मोडतोड केली म्हणून रु.3,00,000:- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला द्यावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 12 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्दपक्ष यांनी आपला लेखीजवाब, शपथेवर दाखल केला त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन असे नमुद केले आहे की,…
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दिलेले सर्व सामान ज्या स्थितीत दिले होते, त्याच स्थितीत अकोला येथे पोहचते करण्यात आले आहे. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याची तक्रार, पलंगाबाबत व आलमारी बाबत होती. या शिवाय कोणत्याही सामानाबाबत तक्रारकर्त्याने तक्रार केली नव्हती. तक्रारकर्त्याचा पलंग हा तक्रारकर्त्याने 8/9 वर्षापुर्वी विकत घेतला असून, तो पलंग जुना व जिर्ण झालेला होता व जागोजागी स्क्रॅचेस होते, त्या बद्दल पॅकींग लिस्ट म्हणजे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या कागदपत्रामध्ये नमुद आहे. तसेच लाकडी अलमारी ही सुध्दा 8 ते 9 वर्ष जुनी असून संपुर्णत: वापरलेली होती. त्या बद्दल सुध्दा पॅकींग लिस्ट मध्ये नमुद केलेले आहे. तक्रारकर्त्याचे सामान भटींडा ते अकोला येथे आणल्या गेले व हे अंतर 1000 कि.मी पेक्षा जास्त आहे. परंतु तरीही सर्व सामान व्यवस्थीत पॅकींग करुन आणण्यात आले होते. तरी पण रस्त्यांच्या बिकट परिस्थिती नुसार कितीही चांगली पॅकींग केली तरी 1000 कि.मी. च्या ट्रान्सपोर्टटेशन मध्ये थोडीफार नॅचरल विअर टिअर होईलच, ही बाब तक्रारकर्त्यास सामान बुक करण्या अगोदरच सांगण्यात आली होती. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या संपुर्ण सामानाचा विमा चोलामंडलम् एम.एस.जनरल इंशुरंस कंपनी लि., इंदोर व्दारे केलेला होता, त्यांची मरीन कार्गो ओपन पॉलिसी नं. 2455/00002829/000/02 अशी होती. त्यामुळे सदर विमा कंपनीस तक्रारकर्त्याच्या तक्रारीबद्दल कळविण्यात आले व त्यानंतर विमा कंपनीने त्यांचे सर्व्हेअर मेसर्स व्ही.एन. आर. इन्शुरन्स सर्वेअर ॲन्ड लॉस असेसर श्री रवि पहलाजानी यांनी तक्रारकर्त्याच्या सामानाचे निरीक्षण केले व त्याचा डिटेल सर्व्हे रिपोर्ट दिला. सर्वेअरने स्वत: मेसर्स स्टाईल्स पा नागपुर यांच्या कार्यालयास भेट दिली व त्यांच्या पत्राबाबत चौकशी केली, त्यावेळी स्टाईल्स पा नागपुर यांनी असे सांगितले की, तक्रारकर्त्याने किंगसाईज अलमारी व बेड हे दोन्ही मे. स्टाईल्स पा नाशिक येथील त्यांच्या दुकानावरुन विकत घेतले होते व आता ते आउटडेटेड झालेले असून, त्यांची रिपेअरी कंपनी करु शकत नाही. सर्व्हेअरने त्यांच्या रिपोर्टमध्ये, दोन्ही सामानाचे काही किरकोळ भाग क्रॅक झाले होते, त्या बद्दल सर्वे रिपोर्ट दिला असून दोन्ही सामान रिपेरी करिता लागणारा खर्च असेस करुन रक्कम रु. 6,000/- नुकसानीचा सर्व्हे रिपोर्ट दिला. तक्रारकर्त्याने सदर सामानाच्या दुरुस्तीचा कोणताही प्रयत्न न करता 8 वर्षा पुर्वी विकत घेतलेले लाकडी फर्निचर ज्याची सध्या डिप्रिशियेबल व्हॅल्यू नगण्य येते, त्याचा अवाजवी व अवाढव्य क्लेम करुन खोटी केस दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने सदर तक्रारीमध्ये चोलामंडलम् हया इन्शुरन्स कंपनीला पार्टी न करता विरुध्दपक्षाविरुध्द अवाजवी व अवाढव्य क्लेम दाखल केलेला आहे. तक्रारकर्त्याने दोन्ही सामानाचे कोणतेही खरेदीचे बिल रेकॉर्डवर दाखल केलेले नाही. तक्रारकर्त्याने कोणकोणत्या सामानाची मोडतोड झाली, हया बद्दल तक्रारीत कुठेही नमुद केलेले नाही. तक्रारकर्त्याने सामान किती रुपयास विकत घेतले होते व ते कोणते सामान आहे, या सर्व बाबी मंचासमोर लपविल्या आहेत. सामानाची डिलेवरी दिल्यानंतर तक्रारकर्त्यास सामानाची पोच मागीतल्यानंतर जबरदस्तीने मोटार रिसीटच्या मागे स्वत:च्या हाताने लिहून अलमारीचे तिन दरवाजे व पलंग व सामान डॅमेज झाल्याबद्दल लिहले आहे. इंशुरंस कंपनीचे सर्व्हेअर व कंपनीचे सुनिल शर्मा सामान पाहण्यासाठी आले असता, त्यांना इन्स्पेक्शन करण्यास टाळाटाळ करण्यात आली तक्रारकर्त्याने स्वत:च्या हाताने विरुध्दपक्षाच्या इसमास त्यांचे सामान डॅमेज झाल्याबद्दल लिहून सही करुन दिली. तक्रारकर्त्याने सदरहू सामान दुरुस्ती करिता कोणत्या अकोला येथील कारपेंटरला दाखविले व त्याला किती खर्च येवू शकतो, किंवा तक्रारकर्त्याचे किती नुकसान झाले, ह्या बद्दल कोणतेही कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचा दावा सर्वस्वी चुकीचा व खोटा असून तो खारीज होण्यास पात्र आहे.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने लेखी युक्तीवाद दाखल केला व विरुध्दपक्षाने तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणातील तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष यांचा लेखी जबाब, उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ता यांचा लेखी युक्तीवाद व विरुध्द पक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलेाकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला तो येणे प्रमाणे
सदर प्रकरणात उभय पक्षात वाद नसलेल्या बाबी खालील प्रमाणे आहेत,
विरुध्दपक्ष हे ट्रान्सपोर्टव्दारे घरगुती फर्निचर व घरगुती सामान मालाची ने-आण करण्याचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्यास त्याचे घरासंबंधी फर्निचर व गृहउपयोगी सामान हे भंटीडा ( पंजाब ) ते अकोला ( महाराष्ट्र ) येथे आणणे असल्यामुळे, त्याने ते विरुध्दपक्षाकडे दि. 19/6/2015 रोजीच्या बिल पावतीनुसार बुक केले होते व त्यापोटीचे भाडे विरुध्दपक्षाने रु. 87,001/- इतके आकारले व ती रक्कम तक्रारकर्त्याकडून स्विकारली होती. सर्व सामानात एकूण 148 नग फर्निचर होते. उभय पक्षामध्ये या बद्दल वाद नाही की, सर्व सामान अकोला येथे तक्रारकर्त्याला हस्तांतरीत करतेवेळी वरील सामानापैकी
- 3 Door Almirah (Style Spa make) व
- King size Bed (Style spa make)
हे सामान डॅमेज झाले होते. या डॅमेज सामानाचा विरुध्दपक्षाचे मेसर्स VNR इन्शुरन्स सर्व्हेअर आणि लॉस असेसर श्री रवि पहलाजानी यांनी सर्वे केला होता.
तक्रारकर्त्याचा असा युक्तीवाद आहे की, तक्रारकर्त्याचे हे सामान खुप महाग होते व त्याची पुर्णत: मोडतोड झाली आहे. शिवाय विरुध्दपक्षाने सदर संपुर्ण सामानाचा विमा ( मरिन कार्गो ओपन पॉलिसी) काढला होता. परंतु याची माहीती तक्रारकर्त्यास दिलेली नव्हती. सदर सर्व्हेअरने केलेले असेसमेंट हे चुकीचे आहे. विरुध्दपक्षाने हे सामान निष्काळजीपणे हाताळल्यामुळे सदर नुकसान झाले, कारण विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचे महागडे सामान सुरुक्षीत व योग्य पॅकींग करुन त्याची वाहतुक करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु सामानाची तोडमोड झाली, ही विरुध्दपक्षाची सेवा न्युनता आहे.
विरुध्दपक्षाच्या मते असे आहे की, तक्रारकर्त्याचे हे सामान जुने व त्यावर आधीच स्क्रॅचेस होते. शिवाय भटींडा ते अकोला हे अंतर 1000 कि.मी. पेक्षा जास्त आहे व भारतातील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे, त्यामुळे कितीही व्यवस्थीत पॅकींग केले तरी थोडेफार नॅचरल विअर टियर क्रमाप्राप्त आहे व ही बाब तक्रारकर्त्यास सांगीतली होती. सर्व्हेअरने सर्व्हे रिपोर्ट मध्ये प्रत्येक बाब नमुद करुन नुकसानीचे असेसमेंट केल्यामुळे तक्रारकर्त्याच्या फर्निचरचे नुकसान हे रु.. 6000/- या किमतीचे आहे. तसेच ते सामान रु. 6000/- पेक्षा कमी किंमतीत दुरुस्त होवु शकते.
अशा प्रकारे उभय पक्षामधील वाद नसलेल्या बाबी, युक्तीवाद व त्यानुसार दाखल केलेले सर्व दस्त यांची पाहणी केल्यानंतर मंचाचे मत असे आहे की, तक्रारकर्ता हा अशा परिस्थितीत विरुध्दपक्षाचा ग्राहक होतो. विरुध्दपक्षाने त्यांच्या व्यवसायानुसार प्रवासाचे अंतर व रस्त्यांची बिकट स्थिती लक्षात घेवूनच तक्रारकर्त्याकडून सामान हे भटींडा ते अकोला येथे आणण्याकरिता बिलानुसार रु. 87,001/- इतकी रक्कम भाडे म्हणून घेतली होती. त्यामुळे या कारणामुळे सामान तुट-फुट झाले, हा विरुध्दपक्षाचा बचाव योग्य नाही. तक्रारकर्ते यांनी तक्रारीत सर्व सामान मोडतोड झाले म्हणून रु. 3,00,000/- इतकी रक्कम विरुध्दपक्षाकडून मागीतली आहे. परंतु विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या दस्तांवरुन असे निश्चित होते की, मोडतोड झालेले दोन नग आहेत. एक 3 Door अलमारी व एक किंग साईज बेड, त्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीत मागणी केलेली रक्कम संयुक्तीक नाही. या दोन मालाची जी तुटफुट झाली, त्यापोटी विरुध्दपक्षाने सर्व्हेअर मार्फत असेसमेंट हे रु. 6000/- इतके काढले आहे. ही रक्कम कशी योग्य नाही, या बद्दल तक्रारकर्ते यांनी युक्तीवाद केला. त्यानुसार मंचाच्या मते असे आहे की, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या ह्या सर्व सामानांची Marine Cargo Open Policy ही मात्र रु. 6,00,000/- इतक्या रकमेची काढली होती. सदर पॉलिसीनुसार Insured हे विरुध्दपक्ष असल्यामुळे, तक्रारकर्ते यांना याची माहीती नसणे स्वाभाविक होते. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी इन्शुरन्स कंपनीला पक्ष केले नाही, यात काही मंचाला वावगे आढळत नाही. सदर पॉलिसीनुसार तुटफुट सामानाचे Basis of Valuation हे Market Value इतके, असे नमुद आहे व तक्रारकर्त्याच्या वरील दोन तुटफुट झालेल्या सामानाची अस्सल किंमत किती आहे? हे जरी रेकॉर्डवर दाखल नसले तरी दाखल असलेल्या Packing List वर ( जी उभय पक्षाला मान्य आहे ) सदर 3 Door Almirah ची किंमत रु. 1000/- इतकी त्यात नमुद आहे व King Size Bed ची किंमत रु. 26,000/- इतकी नमुद आहे. तसेच त्याला स्क्रॅचेस होते, असे सुध्दा पॅकींग लिस्ट वरुन दिसून येते. परंतु विरुध्दपक्षाच्या सर्व्हेअरने सर्व्हे रिपोर्ट मध्ये कारणे जी नमुद केली, ती योग्य नाही व पॉलिसीच्या अट शर्ती नुसार नाही. सदर सर्व्हे रिपोर्ट मध्ये सर्व्हेअरचे असे कथन आहे की, वरील सामान हे तक्रारकर्त्याने नाशिक येथुन खरेदी केले होते व ते आता आऊट डेटेड झालेले आहे. शिवाय M/s. Style Spa Nagpur या वस्तु दुरुस्त करु शकत नाही, परंतु या वस्तु अकोल्यातील कारपेंटर दुरु करु शकतो, हे मंचाला पटलेले नाही. त्यामुळे दुरुस्ती किंमतीवरुन सदर तुटफुट सामानाचे असेसमेंट करणे योग्य नाही. म्हणून विरुध्दपक्षाचा सर्व्हे रिपोर्ट विचारात घेता येणार नाही. सबब पॉलिसीनुसार तुटफुट झालेल्या सामानाची किंमत व सेवा न्युनतेबद्दलची नुकसान भरपाई, तसेच प्रकरणाचा न्यायिक खर्च, विरुध्दपक्ष तक्रारकर्त्यास देण्यास बाध्य आहे, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
म्हणून अंतीम आदेश पारीत करण्यात येतो तो खालील प्रमाणे
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष यांनी, सेवेमध्ये कमतरता व न्युनता दर्शवून अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे घोषीत करण्यात येवून, विरुध्दपक्षाने, तक्रारकर्त्याच्या मोडतोड झालेल्या फर्निचरची किंमत एकूण रु. 27,000/- ( रुपये सत्ताविस हजार ) इतकी रक्कम द.सा.द.शे. 8 टक्के व्याजदराने दि. 14/08/2015 (प्रकरण दाखल दिनांक ) पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदाई पर्यंत व्याजासहीत तक्रारकर्त्यास द्यावी.
- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5,000/- ( रुपये पाच हजार ) व सदर प्रकरणाचा न्यायिक खर्च म्हणून रु. 3000/- ( रुपये तिन हजार ) द्यावे.
- सदर आदेशाचे पालन, निकालपत्राची प्रत मिळाल्याच्या दिनांकापासून 45 दिवसाच्या आंत करावे.
5. सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.