::निकालपत्र::
(पारीत व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष )
(पारीत दिनांक–09 जानेवारी, 2017)
01. तक्रारकर्त्याने मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष अग्रवाल कोचींग क्लॉसेस व त्याचे कार्यकारी संचालक यांचे विरुघ्द अनुचित व्यापारी पध्दती आणि सेवेतील कमतरता या आरोपा वरुन ही तक्रार दाखल केली आहे.
02. तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याला आकाश व अर्चित या नावाची 02 मुले असून आकाश 11 व्या वर्गात आणि अर्चित 10 व्या वर्गात शिकत आहेत. विरुध्दपक्ष क्रं-1) अग्रवाल कोचींग क्लॉस असून, विरुध्दपक्ष क्रं-2) त्याचा कार्यकारी संचालक आणि विरुध्दपक्ष क्रं-3) संचालक आहे. विरुध्दपक्ष हे इयत्ता-8, 9 आणि 10 व्या वर्गाचे कोचींग क्लॉस घेत असतात. विरुध्दपक्षानीं वर्तमानपत्रात जाहिरात देऊन काही योजना सांगितल्या, ज्यानुसार जे विद्दार्थी 9 व्या व 10 व्या वर्गाच्या कोचींग क्लॉसेस मध्ये संपूर्ण विषयात एकाच वेळेस 02 वर्षासाठी दाखला घेतील, त्यांना रुपये-37,000/- भरावे लागतील. तसेच दाखल्याचे वेळी ऑगस्ट-2011 मध्ये रुपये-12,333/- आणि दुसरा हप्ता एप्रिल-2012 मध्ये रुपये-12,333/- या प्रमाणे रकमा भराव्या लागतील आणि शेवटचा हप्ता ऑगस्ट-2012 मध्ये भरावा लागेल. जे विद्दार्थी फक्त 9 व्या वर्गाच्या कोचिंग क्लॉस मध्ये दाखला घेतील त्यांना रुपये-17,000/- भरावे लागतील आणि जे कोणी एकमुस्त रुपये-17,000/- भरतील, त्यांना 10 टक्के सुट मिळेल म्हणजेच त्यांना रुपये-15,300/- एवढीच रक्कम भरावी लागेल. परंतु ही रक्कम 02 हप्त्यांमध्ये भरावयाची असल्यास त्याप्रमाणे प्रतीहप्ता रुपये-8075/- या प्रमाणे रकमेचा भरणा करावा लागेल.
तक्रारकर्त्याने आपल्या मुलगा अर्चितचा दाखला विरुध्दपक्षाच्या कोचींग क्लॉस मध्ये ऑगस्ट-2011 मध्ये घेतला. तक्रारकर्त्याने त्याचा मुलगा अर्चित जैन याचे 9 व्या वर्गाच्या कोचिंग सत्र-2012-2013 साठी रुपये-15,300/- दिनांक-20/08/2011 रोजी विरुध्दपक्ष क्रं-1) चे कार्यालयात नगदी जमा केले. त्याने त्या रकमेची पावती विरुध्दपक्षाकडे मागितली परंतु ती देण्यात आली नाही,त्यावेळी त्याला असेही सांगण्यात आले की, धनादेशाव्दारे दिलेल्या रकमेचीच ते पावती देतात.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्षाचे कोचींग क्लॉस मध्ये जे विद्दार्थी दाखला घेतात, त्यानांच संपूर्ण विषयाच्या नोटस रुपये-450/- मध्ये ते विकतात. तक्रारकर्त्याने सुध्दा आपल्या मुलासाठी रुपये-450/- देऊन नोटस विकत घेतले होते. तक्रारकर्त्याचा मुलगा अर्चित जैन याची 8 व्या वर्गाची परिक्षा मार्च-2012 मध्ये झाली परंतु परिक्षेत त्याला पुरेसे गुण मिळाले नाही, त्यामुळे त्याला खूप आर्श्चय वाटले. त्याने जेंव्हा विरुध्दपक्ष संस्थे मध्ये भेट दिली, तेंव्हा त्याला असे आढळून आले की, प्रत्येक वर्गा मध्ये विद्दार्थ्यांची प्रचंड संख्या असल्यामुळे त्यांचेकडे कोणीही लक्ष देत नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने मुलाचा कोचींग क्लॉस बदलण्याचा विचार केला व विरुध्दपक्षाकडे त्याचा मुलगा अर्चित जैन याचे 9 व्या वर्गासाठी भरलेली रक्कम रुपये-15,300/- परत मागितली परंतु त्यावेळी त्याला सांगण्यात आले की, त्याला फक्त रुपये-5000/- परत मिळतील. त्याने विरुध्दपक्ष क्रं-2 शी भेटण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला परवानगी देण्यात आली नाही तसेच मागितलेली रक्कम पण दिली नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केला म्हणून त्यांना नोटीस पाठविण्यात आली परंतु ती न स्विकारल्यामुळे परत आली. म्हणून या तक्रारीव्दारे त्याने विरुध्दपक्षां कडून रुपये-15,300/- व्याजासह परत मागितले असून नुकसान भरपाई व खर्च पण मागितलेला आहे.
03. विरुध्दपक्षानीं आपला लेखी जबाब मंचा समक्ष दाखल केला. त्यांनी लेखी जबाबा मध्ये नाकबुल केले की, त्यांनी कुठल्याही वर्तमानपत्रात कोचींग क्लॉस संबधी तक्रारकर्ता म्हणतो त्या प्रमाणे जाहिरात दिली होती. तक्रारकर्त्याचा मुलगा आकाश याने विरुध्दपक्ष संस्थेत कोचींग क्लॉससाठी प्रवेश घेतला होता हे कबुल केले परंतु हे नाकबुल केले की, दुसरा मुलगा अर्चित याने 9 व्या वर्गाच्या कोचींग क्लॉस साठी प्रवेश घेतला होता, त्यामुळे ही बाब पण नाकबुल केली की, तक्रारकर्त्याने त्यासाठी विरुध्दपक्षा कडे रुपये-15,300/- जमा केले परंतु त्याची पावती देण्यात आली नाही. परंतु विरुध्दपक्षाने हे मान्य केले की, तक्रारकर्ता त्यांच्या संस्थेत नंतर आला होता व त्याचा मुलगा अर्चित याचा प्रवेश रद्द करण्याची मागणी करीत होता, त्यावेळी त्याला सांगण्यात आले की, त्याच्या अर्चित नावाच्या मुलाने त्यांच्या संस्थेत कधीच प्रवेश घेतलेला नव्हता, त्यावेळी तक्रारकर्त्याने त्यांना शिवीगाळ करुन धमकी दिली होती, त्यावरुन त्याचे विरुध्द पोलीस स्टेशनला फीर्याद पण दाखल करण्यात आली होती. जेंव्हा की, तक्रारकर्त्याचा मुलगा अर्चित याने विरुध्दपक्ष संस्थेत कोचींग क्लॉससाठी प्रवेशच घेतला नव्हता, तेंव्हा पैसे परत करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तसेच विरुध्दपक्ष कुठल्याही विद्दार्थ्याला यशाची हमी कधीच देत नाही व प्रत्येक विद्दार्थ्याला स्वतःच्या मेहनतीने गुण मिळवावे लागतात. अशाप्रकारे तक्रार नामंजूर करुन ती खारीज करण्याची विनंती केली.
04. तक्रारकर्त्याचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला तसेच दाखल दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
::निष्कर्ष::
05. ज्याअर्थी विरुध्दपक्षानीं त्यांच्या कोचिंग क्लॉस मध्ये तक्रारकर्त्याचा मुलगा अर्चित याच्या 09 व्या वर्गाचे कोचिंगसाठी प्रवेश घेतल्याची बाब नाकारलेली आहे, तेंव्हा सर्वात प्रथम हे पाहावे लागेल की, तक्रारकर्त्याचा मुलगा अर्चित याचा खरोखरच विरुध्दपक्ष संस्थेत प्रवेश घेण्यात आला होता किंवा नाही. जरी तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, अर्चितचा प्रवेश घेण्यासाठी त्याने रुपये-15,300/- विरुध्दपक्ष संस्थे मध्ये भरले होते, तरी त्या बद्दलची रसीद आमचे समोर दाखल करण्यात आलेली नाही.
06. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याने रसीद मागितली होती परंतु ती विरुध्दपक्षाने दिली नव्हती. त्याचे असेही म्हणणे आहे की, विरुध्दपक्षाने त्याला असे सांगितले होते की, धनादेशाव्दारे दिलेल्या रकमेचीच ते फक्त पावती देतात. तक्रारकर्त्याच्या या विधानावर विश्वास ठेवणे कठीण वाटते कारण तक्रारकर्ता हा कोणी अशिक्षीत इसम नाही, जो पावती न घेता रोख रक्कम दुस-या इसमाला देईल. या व्यतिरिक्त जर विरुध्दपक्षाने त्याला असे सांगितले होते की, पावती फक्त धनादेशाव्दारे दिलेल्या रकमेचीच देण्यात येते, तर त्याला सुध्दा प्रवेश फी धनादेशाव्दारे देता आली असती, ती रक्कम रोख देण्यासाठी कुठलीही घाई नव्हती.
07. तक्रारकर्त्या तर्फे पुढे असा युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारकर्त्याने त्याचा मुलगा अर्चित याचे नोटस विकत घेण्यासाठी रुपये-450/- भरले होते व त्याची पावती विरुध्दपक्षाने दिली होती, ज्यावरुन विरुध्दपक्षाचे हे म्हणणे खोटे ठरते की, तक्रारकर्त्याच्या अर्चित नामक मुलाने त्यांच्या संस्थेत कधीच प्रवेश घेतला नव्हता, त्या पावतीची प्रत अभिलेखावर दाखल आहे, तिचे निरिक्षण केले असता असे दिसून येते की, त्यावर कोणाचीही स्वाक्षरी नाही किंवा विरुध्दपक्ष संस्थेचा कार्यालयीन शिक्का त्यावर नाही, ज्यावरुन हे दाखविता येईल की, ती पावती विरुध्दपक्ष संस्थेनी दिली होती. ती पावती विरुध्दपक्षाने पूर्णपणे नाकबुल केली असल्याने तिची सत्यता सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारकर्त्यावर येते, जी त्याने पार पाडलेली नाही. जरी असे गृहीत धरले की, विरुध्दपक्षाने ते राबवित असलेल्या योजनेची जाहिरात वर्तमानपत्रात दिली होती, तरी त्यावरुन हे सिध्द होत नाही की, तक्रारकर्त्याने त्याचा मुलगा अर्चित याचे कोचिंग क्लॉससाठी विरुध्दपक्ष संस्थेत रुपये-15,300/- भरुन प्रवेश निश्चीत केला होता.
08. जो पर्यंत हे सिध्द होत नाही की, तक्रारकर्त्याने त्याचा मुलगा अर्चित याचे कोचींग क्लॉससाठी विरुध्दपक्षाला पैसे देऊन त्यांची सेवा घेतली होती, तो पर्यंत त्यांच्या मध्ये “ग्राहक” आणि “सेवा पुरविणारे” हे संबध प्रस्थापित होत नाहीत आणि म्हणून ही तक्रार ग्राहक मंचा समोर “ग्राहक तक्रार” म्हणून चालविणे योग्य नाही. तक्रारकर्ता हे सिध्द करण्यास अपयशी ठरला
की त्याने त्याचा मुलगा अर्चित याचे कोचिंग क्लॉससाठी विरुध्दपक्ष संस्थेत प्रवेश घेतला होता, ज्यासाठी त्याने विरुध्दपक्षा कडे रुपये-15,300/- जमा केले होते, या पुराव्या अभावी ही “ग्राहक तक्रार” म्हणून ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नाही.सबब आम्ही तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
1) तक्रारकर्ता श्री सुधिर निर्मलकुमार जैन यांची तक्रार विरुध्दपक्ष अग्रवाल कोचिंग क्लॉसेस तर्फे निर्देशक श्री जगदीश अग्रवाल आणि इतर-02 यांचे विरुध्दची खारीज करण्यात येते.
2) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
3) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.