जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2011/49 प्रकरण दाखल तारीख - 21/02/2011 प्रकरण निकाल तारीख – 03/06/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्री.विनोद पि.यादवराव जेकुलवार, वय वर्षे 30,धंदा शेती, रा. वजरा पो.उमरी बाजार ता.किनवट जि.नांदेड जि.नांदेड. अर्जदार. विरुध् 1. आगार प्रमुख, एस.टी.महामंडळ (महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ) नांदेड. 2. विभागीय नियंत्रक, गैरअर्जदार एस.टी.महामंडळ(महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ) नांदेड. अर्जदारा तर्फे - अड.अ.व्हि.चौधरी. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील – अड. एस.एल.कापसे. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख,सदस्या) अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराचे लग्न दि.23 मे 2010 रोजी टेका मांडवा ता. जिवती जि.चंद्रपूर येथे सकाळी 10.45 मी. संपन्न होणार होते, म्हणुन अर्जदाराने त्यांच्याकडील लग्नाच्या वराती मंडळीकरीता महामंडळाच्या बसची आवश्यकता असल्यामुळे अर्जदाराने दि.3 मे 2010 रोजी गैरअर्जदाराच्या कार्यालयात म्हणजेच किनवट आगारात बस मिळण्यासाठी सविस्तर अर्ज केला होता. रितसर अर्ज केल्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 आगार प्रमुख किनवट यांनी अर्जदाराला अनामत रक्कम रु.17,000/- जमा करण्यास सांगीतले व त्याच वेळेस त्यांनी 30 रुपये किलोमिटर प्रमाणे तुम्हाला भाडे आकारण्यात येईल असे सांगीतले. त्यानुसार त्याच दिवशी अर्जदाराने रु.17,000/- गैरअर्जदाराकडे अनामत म्हणुन जमा केले. दि.23 ते 2010 रोजी सकाळी 5.00 वाजता गैरअर्जदार यांनी बस क्र. एमएच-20/8404 ही गाडी आनंद नामदेव धुर्वे ( बी.नं.20198) या चालकासह वजरा येथे पाठवीली व उन्हाळयाचे दिवस असल्यामुळे तसेच लग्न सकाळी 10.45 ला असल्यामुळे वजरा येथून सकाळी 5.30 वाजता अर्जदाराकडील व-हाडी मंडळी ज्यामध्ये महिला व पुरुष व लहान मुलांचा समावेश होता ही टेकमांडवाकडे निघाली. सकाळी 5.30 वाजता वजरा येथून निघालेली गाडी गड चांदोरीपासून 10 कि.मी.अंतरावर बंद पडली गाडी बंद पडली ती जागा ही जंगल सदृश्य होती. गाडी बंद पडली त्याच वेळेस गाडीतून प्रचंड प्रमाणात धूर निघत होता. त्याचे वेळी गैरअर्जदार क्र. 1 आगार प्रमुख यांना कळवीले परंतु त्यांच्याकडुन कोणताही प्रतीसाद मिळाला नाही. त्यानंतर अर्जदारानेच गाडी दुरुस्तीसाठी लागणारे सामान व मॅकेनिकला आणले. मॅकेनिकला लागणारे सामान हे रु.98/- चे झाले, परंतू मॅकेनिकला दुरुस्ती खर्च म्हणुन रु.1,000/- अर्जदारासच द्यावे लागले. त्यानंतर बस चालू झाली परंतू ती लवकर गरम होत होती, तिचा वेगही 20 कि.मी. ताशी पेक्षाही कमी होता, त्यामुळे गाडीतील पाणी सुध्दा वारंवार बदलावे लागत होते, त्यासाठी लागणारा रु.1,000/- खर्च सुध्दा अर्जदारासच करावा लागला. गाडीचा वेग हा अतीशय मंद असल्यामुळे अर्जदाराने वेळेचे भान ठेऊन लगेचच दुसरी गाडी मागवून घेतली, जेणे करुन कमीत कमी अर्जदारास त्यांच्या स्वतःच्याच लग्नास वेळेवर पोहोचता येईल. सदरील गाडीसाठी अर्जदारास रु.6,000/- खर्च आला. अर्जदार तसेच त्याचे मामा इत्यादी महत्वाचे लोक हे दुस-या गाडीने समोर निघून गेले. परंतू उर्वरित लोक हे याच बसने प्रवास करत लग्नाच्या ठिकाणी म्हणजेच टेका मांडवा येथे दुपारी 12.30 वाजता पोहोचले. याचाच अर्थ त्यांना 10.45 चे लग्न बस खराब झाल्यामुळे मिळाले नाही. टेका मांडवा येथे पोहोचल्यानंतर सदरील नादुरुस्त बस बाबत अर्जदाराने आगार प्रमुखांना कळवीले व त्यांना दुसरी बस देण्याची विनंती केली. परंतू त्यांनी टाळाटाळ केली व ते अर्वाच्य भाषेत बोलले. व-हाडी मंडळी ही अर्जदारासोबत संध्याकाळी 5.30 वाजता टेका मांडवा येथून परतीच्या प्रवासास पुन्हा सदर बसमध्ये निघाली. परतीच्या प्रवासात सुध्दा गाडीचा वेग मंद होता व गाडी वारंवार गरम होत असल्यामुळे त्याचे पाणी बदलण्याचा खर्च रु.1,000/- पुन्हा अर्जदारासच करावा लागला. सदरील बसमुळे चार तासाच्या प्रवासाला आठ तास लागले व सदरील बस वजरा येथे रात्री 1 वाजून 25 मिनिटांनी पोहोचली. ज्यामुळे बसमधील सर्व प्रवाशांना तसेच अर्जदारास आर्थीक,मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला. यावेळेस सुध्दा बसचा वेग ताशी 20 कि.मी पेक्षा जास्त नव्हता. सदरील बाब ही चालक आनंद नामदेव धुर्वे यांनी स्वतः अर्जदारास लेखी स्वरुपात लिहून दिली व याची नोंद सुध्दा त्यांनी गैरअर्जदाराच्या कार्यालयास रजिस्टारमध्ये केली. सदरील नादुरुस्त बस ज्याचे किलोमिटर मापक यंत्रही चालत नव्हते अशी गाडी आगार प्रमुखाने लग्नासारख्या महत्वाच्या कार्यास उपलब्ध करुन दिल्यामुळे अर्जदारास व त्याच्या सर्व नातेवाईकांस आर्थीक, शारिरीक व मानसिक त्रास झाला. सदरील त्रासाबाबत अर्जदाराने आगार प्रमुख किनवट यांना सांगीतले असता त्यांनी अर्जदारास उध्दट वागणूक दिली. सदरील घटनेबाबत तसेच झालेल्या आर्थीक व मानसिक त्रासाबाबत तसेच अनामत रक्कम रु.17,000/- चा हिशोब घेण्याबाबत अर्जदार हे वारंवार आगार प्रमुख किनवट यांना भेटले, तसेच त्यांना याबाबत लेखी अर्ज सुध्दा दिले, परंतु त्यांनी काहीएक ऐकून न घेता टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अर्जदारांने गैरअर्जदार यांना दि.14/09/2010 रोजी कायदेशिर नोटीस पाठविली सदर नोटीस गैरअर्जदार यांना मिळाली परंतू नोटीस मिळूनही गैरअर्जदार यांनी अर्जदारास कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे एकंदरीत वरील सर्व परिस्थितीवरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास अत्यंत चुकीची सेवा व निष्काळजीपणाची वागणूक दिली आहे. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, कराराप्रमाणे गैरअर्जदारांनी सुविधा न देता नाहक त्रास दिल्यामुळे नुकसान भरपाई रु.25,000/- देण्याचे आदेश करण्यात यावेत. दि.03/05/2010 रोजी स्विकारलेली अर्जदार यांची रक्कम रु.17,000/- यामधील उर्वरित रक्कम व त्याचा हिशोब गैरअर्जदारांनी अर्जदारास देण्याबाबत आदेश देण्यात यावेत. तसेच आर्थीक, मानसिक व शारीरिक त्रासाबद्यल नुकसान भरपाई रु.50,000/- अर्जदार व दावा खर्च रु.5,000/- देण्याचे आदेश करण्यात यावेत. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले, त्यांचे म्हणणे असे की, अर्जाच्या परिच्छेद क्र. 5 मधील मजकूर खोटा आहे. ज्या ठिकाणी गाडी ब्रेक डाऊन झाली त्या ठिकाणी जंगल सृष्टी होती व तेथे असलेल्या विहीरीचे पाणी मोफत पिण्याला व गाडीत टाकायला मिळाले. अर्जदाराने दुसरा मॅकेनिक मागविण्याची गरज पडली नाही तो अर्धा तास वगळता प्रासंगीक करार पुर्ण केलेला आहे. अर्जदारास दुसरी चांगली बस देण्याची व्यवस्था करण्यात आली असती पण तसे काही झालेले नाही आगार प्रमुख अर्वाच्य भाषेत बोलण्याचा प्रसंग आलेला नाही. सदरी नादुरुस्त अथवा ताशी 20 कि.मी. वेगाने धावणारी असती तर करार धारक व त्याचे व-हाडी सदर बस क्र.एमएच 20 डी 8404 ने परतीचा प्रवास केले नसते. ती बस तेथेच सोडली असती. परतीचा प्रवास करार धारक व त्यांच्या व-हाडी मंडळीने त्याच बसने केलेला आहे. वजरा (बु) ते टेका मांडवा हे अंतर 210 कि.मी. चे आहे पण रस्ता हा घाट रस्ता आहे सरळ रस्त्यास नियमाप्रमाणे पाच तास लागतात. घाट रस्ता असल्यामुळे दिड ते दोन तास जास्त लागतात. रस्त्यात व-हाडी मंडळीनी परत येते वेळेस जागो जागी चहाफराळासाठी, पाणी पिण्यासाठी गाडी थांबविल्यामुळे, गाडी नियोजित वेळे पेक्षा दिड तास उशीरा परत पोहोचली. अर्जदारास आर्थीक व मानसिक त्रासाशी काही संबंध नाही जेवढे कि.मी. प्रवास झाला त्या हिशोबानेच आकरणी करण्यात आलेली आहे. किनवट आगार प्रमुखानी अर्जदारास उध्दट वागणुक दिलेली नाही. सदर प्रासंगीक करारातील हिशोब दि.31/05/2010 रोजी पुर्ण झालेला असून करार धारकास परतावा घेऊन जाण्याबाबत समक्ष सांगूनही परतावा रक्कम घेण्यास नकार दिला आणि निघून गेले व कोर्टातून वसुली करतो अशी धमकी दिली. आगार प्रमुखाच्या कचेरीत चार ते पाच वेळेस जाऊन गोंधळ घालून शिवीगाळ करुन महामंडळाच्या कामात अडथळा घातला व आगार प्रमुखावर राजकीय व्यक्तिकडुन दबाव आणण्याचा प्रयत्न केला. अर्जदाराची मागणी ही कोणत्याही नियमास धरुन नाही व व खोटे आरोप करुन खोटा खर्च दाखवीणे अत्यंत अयोग्य आहे. अर्जदाराने त्यांचे वकीला मार्फत दि.14/09/2010 रोजी पाठविलेल्या नोटीसीचे उत्तर लेखी स्वरुपात दि.04/10/2010 रोजी देण्यात असून त्याची पोच पावती गैरअर्जदाराकडे आहे. अर्जदार हे राज्य परिवहन महामंडळा विरुध्द खोटे आरोप करत आहेत. त्यांचा हेतू रा.प.कडुन पैसे उकळणे असा दिसतो. गैरअर्जदार यांनी अर्जदारास चुकीची सेवा,सेवेत त्रुटी असे कृत्य केलेले नाही. म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज हा बिन बुडाचा सुड बुध्दीने केलेला असल्यामुळे तो खर्चासह फेटाळण्यात यावा. अर्जदारास प्रासंगीतक करारावर घेतलेल्या बससाठी भरलेली पुर्ण रक्कम परत मिळावी व फुकटातच प्रवास खर्च निघून जावा या हेतून तक्रार दिलेली आहे,असे दिसते. सदर प्रासंगीक करारातील बसचे रेडीएटर होज पाईप फाटल्यामुळे गड चांदुर घाटात फक्त अर्धा तास वेळ मार्गस्त होण्यास लागले. अर्जदाराची तक्रार खोटी व बिनबुडाची असल्यामुळे ती खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1, 2 यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून खालील मूददे उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय? होय. 2. गैरअर्जदार यांचे सेवेतील त्रुटी अर्जदाराने सिध्द केली आहे काय? होय. 3. अर्जदार हे नुकसान भरपाई मागण्यास पात्र आहेत काय? होय. 4. काय आदेश? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्या क्र.1,2 व 3. अर्जदार यांनी गैरअर्जदार राज्य परिवहन महामंडळ यांचेकडुन लग्नाचे व-हाड नेणे आणणेसाठी किरायाने बस केलेली होती. याबद्यल उभयपक्षात दुमत नसल्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत याबद्यल वाद नाही. म्हणुन मुद्या नं.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. दि.23/05/2010 रोजी अर्जदाराने त्याचे लग्नासाठी बस किरायाने केलेली होती ती दि. 3 मे रोजी अर्जदाराने अर्ज करुन रु.17,000/- गैरअर्जदार यांचेकडे जमा केले होते. दि.23/05/2010 रोजी गैरअर्जदार यांनी बस क्र. एमएच 20/8404 ही गाडी आनंद नामदेव धुर्वे या चालकासोबत सकाळी 5.00 वाजता वजरा पो.उमरीबाजार ता.किनवट जि.नांदेड येथे पाठवली व 5.30 वाजता व-हाडासह गाडी टेका मांडवा ता.जिवती जि.चंद्रपुर येथे निघाली अर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे गाडी वज-यापासुन निघाली व दहा कि.मी.अंतरावर बंद पडली व त्यातुन खुप धुर निघाला. त्यामुळे व-हाडी मंडळी चिंतातूर झाली. सदरची जागा ही जंगलमय होती. याबाबतची माहीती गैरअर्जदार क्र. 1 आगार प्रमुख यांना अर्जदाराने कळवले व दूसरी बस देण्याविषयी विनंती केली. परंतु त्यांनी टाळाटाळ करुन अर्वाच्य भाषा वापरली. अर्जदाराने दुसरी गाडी करुन नवरदेवासह महत्वाची माणसे पुढे पाठवली व गैरअर्जदार यांची बस दुरुस्तीला मॅकॅनिक आणून दुरुस्त केली पण ती झाली नाही. गाडीचे रेडीएटर खराब झालेले होते व होज पाईप फाटल्यामुळे गाडीत पाणी टीकत नसल्यामुळे गाडी सतत गरम होत होती व ती चालत नव्हती. अशी ही लग्नाचे व-हाड घेऊन गेलेली बस लग्न झाल्यानंतर पोहोचली हे सर्व वृत झाल्यानंतर खरोखरच अर्जदारास किती मानसीक ताण सहन करावा लागला असेल हे लक्षात येते. लग्नासारखी आयुष्यात एकदाच घडणारी घटना त्याही वेळेस जर असा मनस्ताप पैसे व्यवस्थीत भरुनही होत असेल तर यापेक्षा त्रुटीची सेवा आणखी सिध्द करण्याची गरज मंचाला वाटत नाही. गाडी रा.प. मंडळाने अर्जदारास बस देताना व्यवस्थीत चेक करुन देणे गरजेचे होते व साधारणतः नेहमी खराब होणा-या महत्वाच्या पार्टसबद्यल व्यवस्थीत चेकींग करणे आवश्यक होते. किलोमिटर मापक यंत्र चालु असणे गरजेचे होते. एवढयावरही अचानक कांही कमतरता झालीच तर आगार प्रमुख यांनी ताबडतोब दुस-या गाडीची व्यवस्था करणे क्रमप्राप्त होते. चालक धुर्वे यांचा जबाब वाचल्यावरुन अर्जदाराने तक्रारीत लिहीलेली सर्व घटना घडलेली होती हे सिध्द झाले आहे. गैरअर्जदार हयांनी त्यांच्या मांडलेल्या म्हणण्यामध्ये सर्व गोष्टी फक्त नाकारल्या आहेत पण त्याच बरोबर त्यांच्याच चालकाने जो जबाब दिला त्यास अनुसरुन गैरअर्जदार यांचे वकील महाशयांनी आपला जबाब दाखल करावयास पाहीजे होता. सकाळी5.30 ला निघालेली व-हाडी जंगलसृष्टीचा आनंद कसा घेतील त्यांना लग्नाला वेळेवर पोहोयायची गडबड असणार हे उघड सत्य आहे. संध्याकाळी 5.30 ला निघालेली गाडी रात्री 1.25 वाजता येथे पोहोचते म्हणेच गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेली गाडी ही बिघड झालेली होती हे सिध्द होते. अर्जदाराने 210 कि.मी.साठी अनामत रक्कमेसह रु.17,000/- रुपये भरलेले होते 30 कि.मी.च्या हिशोबाने अर्जदारास गाडी दिलेली होती त्याप्रमाणे आगार प्रमुख यांनी अर्जदारास व्यवस्थीत बस देऊन सेवा देणे त्यांचे कर्तव्य होते. लग्नासारख्या मंगल प्रसंगी समोरच्या सोयरे मंडळीसमोर जी मानहानी व मनस्ताप झाला त्याची नुकसान भरपाई खरे तर पैशाचे स्वरुपात मोजता येतच नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे भरलेल्या रक्कमेमधून गैरअर्जदारांनी त्याचा योग्य हिशोब करुन पैसे वळते करुन घेऊन उर्वरीत रक्कम अर्जदारास निकाल कळाल्यापासुन 30 दिवसात वापस करावी तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी गैरअर्जदार क्र. 1 आगार प्रमुख एस.टी.महामंडळ ता.किनवट जि.नांदेड यांनी व्यक्तीशः रु.5,000/- अर्जदारास द्यावेत व दावा खर्च म्हणुन रु.2,000/- अर्जदारास द्यावेत. वरील सर्व रक्कम निकाल कळाल्यापासून 30 दिवसात द्यावेत अन्यथा सर्व रक्कम फिटेपर्यत 9 टक्के व्याज द्यावे. दावा खर्च रक्कम रु.2,000/- राज्य परिवहन महामंडळाने अर्जदारास द्यावे व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- आगार प्रमुख यांनी स्वतः भरावेत. या निर्णयास्तव हे मंच आलेले आहे. आदेश. 1. अर्जदाराचा अर्ज मंजुर करण्यता येतो. 2. अर्जदाराने भरलेली रक्कम रु.17,000/- गैरअर्जदार यांनी त्यांचे झालेले बील वसुल करुन उर्वरीत रक्कम अर्जदारास निकाल कळाल्यापासुन 30 दिवसांत वापस करावी. 3. मानसीक त्रासापोटी गैरअर्जदार क्र. 1 आगार प्रमुख यांनी रु.5,000/- अर्जदारास स्वतःहा निकाल कळालेपासून 30 दिवसांत द्यावेत. 4. दावा खर्च म्हणुन अर्जदारास गैरअर्जदार रा.प.मंडळाने रु.2,000/- निकाल कळाल्यापासुन 30 दिवसांत द्यावेत. 5. वरील सर्व रक्कम अर्जदारास 30 दिवसांत न दिल्यास रक्कम फिटेपर्यंत 9 टक्के व्याज द्यावे लागेल. 6. संबंधीतांना निर्णय कळवण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT | |