निकाल
पारीत दिनांकः- 31/07/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांची बेंगलोर येथून पुणे येथे बदली झाल्यामुळे त्यांनी घरातील सामान व फर्निचर जाबदेणारांमार्फत पुणे येथे पाठविण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी जाबदेणारांबरोबर करार केला व रक्कम रु. 25,000/- चा दि. 26/3/2010 रोजीचा चेक जाबदेणारांना दिला. तक्रारदारांनी दि. 29/3/2010 रोजी सर्व सामान जाबदेणारांच्या हवाली केले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी बेंगलोर येथून पाठविलेले सामान जसे दिले होते तसे म्हणजे सुस्थितीमध्ये नव्हते, सामानाचे नुकसान झालेले होते. काही सामान तुटलेल्या अवस्थेमध्ये होते, काहीवर ओरखडे पडलेले होते, तर काही सामान गहाळ झालेले होते. या सर्व बाबींची कल्पना तक्रारदारांनी जाबदेणारांना दिली. जाबदेणार त्यासाठी श्री भुपेंद्र भंडारी यांची सर्व्हेअर आणि लॉस अॅसेसर म्हणून नियुक्ती केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे एकुण रक्कम रु. 1,84,750/- चे नुकसान झालेले आहे, परंतु सर्व्हेअरने मात्र फक्त 18,000/- चेच नुकसान दाखविलेले आहे. तक्रारदारांना सर्व्हेअरचा अहवाल मान्य नाही, म्हणून त्यांनी दि. 22/4/2010 रोजी सदरची बाब जाबदेणारांना पत्राने कळविली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांच्या चुकीमुळे त्यांचे रक्कम रु. 1,84,750/- चे नुकसान झालेले आहे, ती रक्कम तक्रारदार जाबदेणारांकडून परत मागतात. जाबदेणारांनी पाठविलेले घरातील वापराच्या सामानाचे नुकसान झाल्यामुळे तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांना हॉटेलमध्ये रहावे लागले व त्याकरीता रक्कम रु. 70,000/- खर्च आला. ही रक्कमही तक्रारदार जाबदेणारांकडून मागतात. तक्रारदार जाबदेणारांकडून एकुण रक्कम रु. 2,54,750/- द.सा.द.शे. 18% व्याजदराने, तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ त्यांचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिले म्हणून मंचाने त्यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश पारीत केला. तक्रारदारांची बेंगलोर येथून पुणे येथे बदली झाली, म्हणून त्यांनी घरगुती सामान व फर्निचर जाबदेणारांमार्फत पाठविण्याचे ठरविले व तसा त्यांच्याबरोबर करार केला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी सामान व्यवस्थित पोहचविले नाही, काही सामान तुटलेल्या अवस्थेमध्ये, काही सामानावर ओरखडे पडलेल्या अवस्थेमध्ये तक्रारदारांना मिळाले तर काही सामान गहाळ झाले. याची तक्रार तक्रारदारांनी जाबदेणारांकडे केली असता त्यांनी श्री भुपेंद्र भंडारी यांची सर्व्हेअर आणि लॉस अॅसेसर म्हणून नियुक्ती केली. त्यांना तक्रारदारांचे झालेल्या नुकसानीचे अवमुल्यन हे रक्कम रु. 18,000/- इतके केले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे एकुण रक्कम रु. 1, 84, 750/- इतके नुकसान झाले व जाबदेणरांमुळे त्यांना हॉटेलमध्ये रहावे लागले आणि याकरीता त्यांना रक्कम रु. 70,000/- खर्च करावे लागले. यासाठी तक्रारदारांनी कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीबरोबर कुठल्या सामानाचे नुकसान झाले झाले व त्याची किंमत किती आहे, हे नमुद केले आहे, परंतु कोणत्याही तज्ञाचा अहवाल किंवा शपथपत्र दाखल केलेले नाही. याउलट, तक्रारदारांनीच स्वत:च त्यांच्या तक्रारीमध्ये नमुद केले आहे की, जाबदेणारांनी श्री भुपेंद्र भंडारी यांना सर्व्हेअर आणि लॉस अॅसेसर म्हणून नियुक्त केले होते व त्यांनी रक्कम रु. 18,000/- इतके नुकसानीचे मुल्यांकन केले. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीबरोबर श्री भुपेंद्र भंडारी यांचे दि. 16/4/2010 रोजीचे पत्र दाखल केले आहे, त्यामध्ये त्यांनी तक्रारदारांच्या वर्कशीटची पाहणी करुन पुन्हा मुल्यांकन केल्याचे नमुद केले आहे, व त्यांनी केलेले मुल्यांकन कशाच्या आधारे केलेले आहे हे नमुद केले आहे. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये सर्व्हेअर आणि लॉस अॅसेसर यांचे मत/अहवाल हे तज्ञाचे मत आहे व त्यांच्या अहवालास आव्हान करता येत नाही. त्यामुळे, श्री भुपेंद्र भंडारी, सर्व्हेअर आणि लॉस अॅसेसर यांनी तक्रारदारांना झालेल्या नुकसानाचे जे मुल्यांकन केले आहे, ते योग्य आहे, असे मंचाचे मत आहे.
5] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारदारास रक्कम रु. 18,000/-
(रु. अठरा हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळाल्या
पासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावी.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.