जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 102/2011 तक्रार दाखल तारीख –13/07/2011
देविदास पि.किसनराव कूलकर्णी
वय सज्ञान वर्षे धंदा शेती व पेन्शनर .तक्रारदार
रा.मुर्शदपुर आष्टी ता.आष्टी जि.बीड
विरुध्द
आगार प्रमुख (डेपो मॅनेजर)
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सामनेवाला
आष्टी आगार, ता.आष्टी जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.बी.एस.बोडखे
सामनेवाला तर्फे :- अँड.गणेश कोल्हे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार मौजे मुर्शदपूर आष्टी येथील रहिवासी आहे. सध्या तो रिटायर्ड बँक मॅनेजर आहे.
तक्रारदाराच्या मूलीचे लग्न अहमदनगर येथे शुभम मंगल कार्यालयात दि.16.5.2010 रोजी करण्याचे ठरले होते. त्यासाठी तक्रारदाराने आष्टी-कडा मार्गे अहमदनगरला जाणेसाठी सामनेवाले यांचे आगाराची एक बस भाडयाने केलेली होती. त्या अनुषंगाने तक्रारदारांनी सामनेवाले बरोबर दि.10.5.2010 रोजी करार केलेला होता. करारामूळे तक्रारदाराने सामनेवाले यांचे सांगणेप्रमाणे व ठरल्याप्रमाणे रक्कम रु.7600/- बस भाडयाचे म्हणून तसेच डिपॉझीट म्हणून रु.2280/- असे एकूण रु.9880/- चे कोटेशन दिलेले होते. तक्रारदारांनी त्यांच दिवशी सामनेवाला कडे डिपॉझीट म्हणून रक्कम रु.10300/- जमा केले. त्यांची पावती क्र.047750 आहे.
तक्रारदाराच्या मूलीचे लग्न जवळ आलेले असताना सामनेवाला यांनी दि.14.5.2010 रोजी तक्रारदारास भाडेवाढ झालेली आहे दर वाढलेले आहेत तूम्हाला जास्तीचे रु.5400/- कार्यालयात जमा करावे लागतील अन्यथा गाडी देणार नाही. तक्रारदाराच्या मूलीचे लग्न दोन दिवसांवर आलेले असल्यामूळे तक्रारदाराने नाईलाजास्तव सामनेवालेच्या अडवणूकीमूळे रक्कम रु.5400/- पावती क्र.2559983 अन्वये जमा केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ साध्या/निमआराम/ वातानुकूलित सेवेच्या बसेसचे नैमित्तीक कराराचे दर व इतर आकाराबाबत वाहतूक परिपत्रक क्र.13/2010 पत्र क्र.रा.प./वा.ह./चालन/588/ने.क्र./2745 दि.07.05.2010 संदर्भिय पत्रानुसार रा.प. महामंडळाची भाडेवाढ ही दि.11.05.2010 म्हणजेच दि.10.5.2010 ते 11.5.2010 च्या मधील मध्यरात्रीपासून अंमलबजावणी करावी असे संदर्भिय परिपत्रकानुसार स्पष्ट आदेश आहेत.
या संदर्भात परिपत्रकाप्रमाणे स्पष्टपणे आदेश असताना तक्रारदार व सामनेवाला यांचेत करार दि.10.5.2010 रोजी सकाळी 11 वाजता झालेला असताना सामनेवाले यांनी जाणून-बूजून तक्रारदाराकडून जास्तीची रक्कम जमा करुन घेऊन तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रास दिलेला आहे. परिपत्रकानुसारची भाडेवाढ ही तक्रारदारावर बंधनकारक नाही व नव्हती.
तक्रारदाराने सामनेवालाकडे एकूण रु.15700/- जमा केलेले आहेत. तक्रारदार व सामनेवाले यांच्यातील करारानुसार तक्रारदाराकडे बस भाडयाचे रु.7600/- देणे होते. म्हणजेच तक्रारदाराने जमा केलेल्या एकूण रक्कमेतून रु.7600/- वजा जाता सामनेवालाकडे रु.8100/- बाकी आहेत. परत मिळणे तक्रारदारांना आवश्यक होते परंतु सामनेवाला यांनी दि.17.5.2010 रोजी तक्रारदारास फक्त रु.1591/- परत दिलेले आहेत. म्हणजेच तक्रारदाराचे सामनेवालाकडे रु.6509/- इतकी बाकी येणे आहे. ती त्यांनी दिलेले नाही. सेवेत कसूर केलेला आहे. या बाबत दि.21.7.2010 रोजी रजिस्ट्रर पोस्टाने नोटीस पाठविली. दि.6.7.2010 रोजी उडवाउडवीची भाषा वापरुन नोटीसचे उत्तर दिले नाही. तक्रारदारांनी दि.19.7.2010 रोजीच्या नोटीस द्वारे रक्कमेची मागणी केली. दि.24.7.2010 रोजी खोटे उत्तर दिले.
सामनेवाला यांनी करारातील तिस तासांचे भाडे रक्क्म रु.134/- प्रमाणे आकारलेले आहेत.सदरचा करार दोन दिवसांचा प्रांसगीक करार केला हे म्हणणे संयूक्तीक नाही.
सामनेवाला यांचे पाहूणे यांनी यांच तारखेला यांच लग्नासाठी शेवगांव आगाराची बस भाडयाने केली होती. त्यांचेकडून रक्कम रु.10500/- डिपॉझीट भरुन घेतले होते. त्यांचेकडून भांडेपोटी रु.6178/- भरुन घेऊन रक्कम रु.4322/- परत करण्यात आलेले आहेत. शेवगांव आगार व आष्टी आगार हे राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्रामधील आहेत. दोन्ही आगांराना नियम व कायदे हे एकच आहेत. सामनेवाला यांनी जाणीवपूर्वक जास्तीची रक्कम घेऊन हेळसांड केली आहे.
तक्रारदार खालील प्रमाणे नूकसान भरपाईची मागणी करीत आहेत.
1. मानसिक त्रासापोटी रु.50,000/-
2. कायदेशीर सल्ला घेणेकामी आलेला खर्च रु.5,000/-
3. मूळ देणे असलेली रक्कम रु.6501/-
4. वकील नोटीस खर्च रु.2000/-
5. तक्रारीचा खर्च रु.1000/-
6. वकील फिस रु.1000/-
एकूण रक्कम रु.60,509/-
विनंती की, तकारीत नमूद केल्याप्रमाणे रु.60,509/- सामनेवाला यांनी व्याजासहीत देण्याबाबत आदेश व्हावेत. घटना घडलेच्या तारखेपासून सदरील रककमेवर द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज दयावे.
सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा दि.14.12.2011 रोजी दाखल केला. खुलाशात त्यांचे विरुध्दचे सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहत. भरलेल्या रक्कमा व पावती नंबर तकारीत नमूद केलेले बरोबर आहेत. तक्रारदार व सामनेवाला यांचे करार दि.10.5.2010 रोजी झाला हे म्हणणे बरोबर नाही.
तक्रारदारांनी दि.15.5.2010 ते 16.5.2010 असे दोन दिवस भाडे तत्वावर बस भाडयाने घेतली होती. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी नवीन नैमत्तीक दरवाढी बददल तक्रारदार यांनी भाडेवाढ झाल्याची कल्पना दिली. त्याप्रमाणे नवीन भाडेवाढ समजून घेऊन मान्य केली. दि.10.5.2010 रोजी कराराचे वेळी अनामत म्हणून रु.10,300/- पावती नबर 047750 ने भरले होते व दि.14.5.2010 रोजी रक्कम रु.5400/- अदा केलेले आहेत त्यांचा पावती क्र.255983 असा आहे.
वाहतूक परिपत्रक क्र.13/2010 नुसार दि.10.5.2010 व दि.11.5.2010 रोजीच्या मध्यरात्रीपासून नैमत्तीक दरात वाढ केल्यामूळे नवीन दरानुसार तक्रारदाराकडून भांडे वसूल करण्यात आलेली आहे.
तक्रारदाराला दि.15.5.2010 ते दि.16.5.2010 रोजी कराराप्रमाणे दोन दिवस एस.टी.भाडयाने देण्याचे ठरले होते. तसेच नवीन दरवाढीनुसार तक्रारदाराकडून भाडे वसूल करण्यात आलेले आहे.
तक्रारदाराकडून सामनेवाला यांनी अनामत रक्कम रु.15700/- देण्यात आले त्यातून रक्कम रु.1591/- दि.17.5.2010 रोजी अदा करण्यात आलेले आहे. त्यांचे सविस्तर तपशील खालील प्रमाणे आहे,
1. बसचा दोन दिवसांचा किमान आकार रु.10800/-
(नवीन दरानुसार 5400 5400)
2. बसचा दोन दिवसांचा खोळंबा आकार रु.2750/-
3. सेवाकर एकूण बिलांच्या 40 टक्के रक्कमेवर रु.559/-
एकूण प्रासंगीक करार रु.14109/-
तक्रारदाराने दिलेली अनामत रक्कम रु.15700/-
प्रासंगिक करार एकूण बिल वजा रु.14109/-
तक्रारदाराला परत केलेली रक्कम रु.1591/-
परत दिलेली रक्कम बरोबर आहे.सामनेवाला यांनी तक्रारदारांना कोणमाही मानसिक त्रास दिलेला नाही. तसेच एस.टी. ही प्रवाशाचे सेवेसाठी आहे. बहूजन सुखाय बहूजन हिताय हे एस.टी. चे मूख्य ध्येय आहे. आजपर्यत सर्व नागरिकांनी एस.टी. महामंडळाबददल समाधानच व्यक्त केलेले आहे. सामनेवाला तक्रारदारास कोणतीही नूकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.बोडखे व सामनेवाले यांचे विद्वान वकील श्री.कोल्हे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता सदरची तक्रार ही दि.7.5.2010 रोजीच्या परपित्रकावर आधारित आहे. सदरचे परिपत्रक हे सामनेवाला यांनी दि.10.5.2010 रोजी मिळाल्याचे त्यावर शेरा आहे. सदर परिपत्रकाचे बारकाईने अवलोकन केले असता “ सेवा प्रकारानुसार नैमत्तीक करारावर देण्यात येणा-या गाडयाचे एकेरी व दुहेरी फेरीकरिता आकारावयाचे दर पूढीलप्रमाणे असून ते दि..11.5.2010 पासून (दि.10.5.2010) व दि.1.1.5.2010 च्या मध्यंरात्री अंमलात आणावेत.”
या संदर्भात तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराचा करार हा दि.10.5.2010 रोजी झालेला आहे. भांडेवाढ ही दि.10.5.2010 व दि.11.5.2010 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार होती. तक्रारदारांनी जर सदरचा करार हा दि.11.5.2010 रोजी केला असता तर निश्चितपणे त्यांना सदर परिपत्रकाप्रमाणे दर लागू झाला असता परंतु तक्रारदाराने सदरचे परिपत्रक येण्यापूर्वीच दि.10.5.2010 रोजी करार केलेला आहे व ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. सामनेवाला यांनी दि.10.5.2010 रोजी त्यावेळेच्या नैमत्तीक प्रवासी भाडयाप्रमाणे रु.10300/- तक्रारदाराकडून भरुन घेतलेले आहेत.
सदर प्रकरणात जरी बस ही दि.15.5.2010 व दि.16.5.2010 या दोन दिवसात दूहेरी फेरीसाठी देण्यात येणार होती तरी करार हा दि.10.5.2010 रोजी झालेला आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी या प्रकरणात सदर परिपत्रकाचा आधार घेऊन दि.10.5.2010 व दि.11.5.2010 रोजीच्या मध्यरात्रीपासून लागू होणारी दरवाढ सामनेवाला हे तक्रारदारांना लागू करु शकत नाहीत.
करार कायदयातील तरतूदीनुसार कराराची वेळ,तारीख अत्यंत महत्वाची आहे. दि.10.5.2010 रोजी करार रक्कम भरुन पूर्ण झालेला आहे.
तक्रारदारांचे प्रस्तावास सामनेवालेंनी मान्यता देऊन त्यांचेशी करार होऊन रक्कम स्विकारलेली आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी सदर परिपत्रकाचा आधार घेऊन वाढीव भाडे या संदर्भात तक्रारदाराकडून घेता येणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी या प्रकरणात तक्रारदाराचा अर्ज दाखल केलेला आहे परंतु त्या संदर्भाचा करार दाखल केलेला नाही. तसेच सदर करारात वाढीव भाडे वाढीचे संदर्भात सदर करारात नमूद असल्याचे सामनेवाले यांचे म्हणणे नाही. सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून वाढीव भाडे वाढीच्या परिपत्रकानुसार भाडे आकारात तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते.सामनेवाला यांनी तक्रारदारांना सदर परिपत्रक येण्यापूर्वी दि.10.5.2010 रोजी जी प्रस्तावीत भाडे रचना होती त्यानुसारच करार झालेला असल्याने त्यानुसारच रक्कम स्विकारणे आवश्यक होते असे न्यायमंचाचे मत आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि.10.5.2010 रोजीच्या प्रस्तावीत दरानुसार तक्रारदाराच्या दि.15.5.2010 व दि.16.5.2010 या दोन दिवसांचे दूहेरी प्रवासाचा हिशोब करुन तक्रारदारांना उर्वरित रक्कम देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.5,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना तत्कालीन
प्रचलित दरानुसार दोन दिवसांचे दूहेरी प्रवासाचा नियमाप्रमाणे हिशोब
करुन उर्वरित रक्कम आदेश मिळाल्यापासून एक महिन्याचे आंत
अदा करावी.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम मूदतीत
न दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रार
दाखल दि.13.07.2011 पासून देण्यास सामनेवाला जबाबदार
राहतील.
4. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची
रक्कम रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची
रककम रु.5,000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून
30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड