जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 430/2011
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-10/10/2011.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 23/10/2013.
श्री व्यंकटेश मेडीकल अण्ड जनरल्स तर्फे
प्रो.प्रा.श्री.हर्षल दिलीप झंवर,
उ.व.सज्ञान, धंदाः व्यापार,
रा.व्दारा श्री.विवेक भोरटक्के, जयकिसनवाडी,
जी.एस.ग्राऊंडचे समोर, जळगांव,
ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
अजंता ट्रान्सपोर्ट,
जुन्या बस स्टॅण्डचे मागे,
दाणा बाजार, जळगांव,
ता.जि.जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.सिमती एस न्याती वकील.
विरुध्द पक्ष एकतर्फा.
निकालपत्र
श्रीमती पुनम नि.मलीक,सदस्याः संबंधीत पार्टीकडे ट्रान्सपोर्ट मार्फत पाठविलेला माल न पोहोचल्यामुळे झालेल्या नुकसानीदाखल प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार हे व्यवसायाने औषधाचे विक्रेते असुन विरुध्द पक्ष ही ट्रान्सपोर्ट कंपनी असुन राज्याच्या विविध भागात माल पोहोचविण्याचे काम करतात. तक्रारदाराची जळगांव येथे व्यंकटेश मेडीकल अण्ड जनरल्स या नावाने होलसेल मेडीकल एजन्सी असुन शहरातील तसेच बाहेरगावातील औषध विक्रेते यांना तक्रारदारामार्फत औषधाचा पुरवठा होतो. तक्रारदाराने श्री.मेडीकल एजन्सीज,औरंगाबाद यांना विरुध्द पक्ष ट्रान्सपोर्ट मार्फत दि.25/11/2010 रोजी इनव्हाईस क्रमांक 939 अन्वये रक्कम रु.4,174/- च्या औषधी पाठविल्या. सदरच्या औषधी हया श्री मेडीकल एजन्सीज यांना दुस-या दिवशी मिळणे अपेक्षीत होते व तशी हमी विरुध्द पक्षाने तक्रारदारास दिली होती तथापी सदरचा माल हा औरंगाबाद येथे दिलेल्या पत्यावर पोहोचला नाही अथवा तक्रारदारास परतही मिळाला नाही. तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे माल न मिळाल्याबाबत तक्रार केली असता त्यांनी तक्रारदारास उडवाउडवीची उत्तरे देऊन हाकलुन लावले. तक्रारदाराने सरतेशेवटी विरुध्द पक्षास नुकसान भरपाई देण्यासाठी नोटीस पाठविली तथापी नोटीस स्विकारुनही त्यांनी तक्रारदारास कोणतीही रक्कम दिली नाही. अशा प्रकारे विरुध्द पक्षाने तक्रारदारास सदोष सेवा देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. सबब दि.26/11/2010 रोजी पाठविलेला माल संबंधीत पार्टीकडे न पोहोचविल्यामुळे मालाची एकुण किंमत रक्कम रु.4,174/- बुकींग केलेल्या तारखेपासुन द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह परत मिळावेत, नुकसान भरपाई दाखल रु.10,000/-, बदनामी, मानसिक व शारिरिक त्रासादाखल रु.20,000/-, नोटीस खर्च रु.700/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीस काढण्यात आली तथापी मंचाची रजिष्ट्रर नोटीस प्राप्त होऊनही विरुध्द पक्ष याकामी गैरहजर राहील्याने त्यांचेविरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फा चालविण्यात आली.
4. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, तसेच तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर
1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय.
2) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
5. मुद्या क्र. 1 - ट्रान्सपोर्ट मार्फत पाठविलेला माल इप्सीत स्थळी प्राप्त न झाल्याने प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर तक्रारदाराने दाखल केलेला आहे. तक्रारदाराने औरंगाबादच्या श्री मेडीकल एजन्सीज यांना एकुण रक्कम रु.4,024/- ची औषधी पाठविली असल्याचे तक्रारदाराने नि.क्र.1/9 ला दाखल बिलाचे प्रतीवरुन दिसुन येते. सदरची औषधी ही विरुध्द पक्ष अजंता ट्रान्सपोर्ट, दाणा बाजार,जळगांव यांचेमार्फत दि.25/11/2010 रोजी रिसीट क्रमांक 939 अन्वये पाठविल्याचे नि.क्र.3/10 ला दाखल पावतीचे मुळ प्रतीवरुन दिसुन येते. विरुध्द पक्षातर्फे पाठविलेला माल इप्सीत स्थळी प्राप्त न झाल्याने तक्रारदाराने विरुध्द पक्षास दि.16/3/2011 रोजीचे नोटीसीने नुकसान भरपाईची रक्कम मागणी केल्याचे नि.क्र.3/11 चे नोटीस स्थळप्रतीवरुन स्पष्ट होते. सदरची नोटीस विरुध्द पक्षास मिळुनही त्यांनी तक्रारदाराचे मालाबाबत तक्रारदारास कोणतेही सर्मपक उत्तरही दिलेले नाही अगर नुकसान भरपाईही दिलेली नाही. तसेच या मंचातर्फे पाठविलेली रजिष्ट्रर नोटीस प्राप्त होऊनही ते याकामी गैरहजर राहीले., विरुध्द पक्षाने तक्रारदाराची तक्रार हजर होऊन नाकारलेली नाही., यावरुन विरुध्द पक्षास तक्रारदाराची तक्रार मान्यच आहे असाही निष्कर्ष निघतो.
6. वरील एकुण विवेचनावरुन व तक्रारदाराचे वकीलांनी या मंचासमोर केलेल्या विस्तृत युक्तीवादातुन तक्रारदाराने विरुध्द पक्ष ट्रान्सपोर्ट मार्फत पाठविलेला माल दिलेल्या पत्यावर पोहोच न करुन सदोष व त्रृटीयुक्त सेवा दिल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
7. मुद्या क्र. 2 - दि.26/11/2010 रोजी पाठविलेला माल संबंधीत पार्टीकडे न पोहोचविल्यामुळे मालाची एकुण किंमत रक्कम रु.4,174/- बुकींग केलेल्या तारखेपासुन द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह परत मिळावेत, नुकसान भरपाई दाखल रु.10,000/-, बदनामी, मानसिक व शारिरिक त्रासादाखल रु.20,000/-, नोटीस खर्च रु.700/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे. आमचे मते तक्रारदार हा नि.क्र.3/9 ला दाखल पावतीवर नमुद एकुण मालाची किंमत रक्कम रु.4,024/- माल विरुध्द पक्षाकडे औरंगाबाद येथे पोहोच करण्यासाठी दिला ती दि.25/11/2010 पासुन द.सा.द.शे.11 टक्के व्याजासह विरुध्द पक्षाकडुन मिळणेस पात्र आहे. तसेच मानसिक व शारिरिक त्रासादाखल रु.15,000/- व तक्रार अर्ज तसेच नोटीस खर्चादाखल रु.4,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळण्यास पात्र असल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. सबब मुद्या क्र. 2 चे निष्कर्षास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो.
( ब ) विरुध्द पक्ष अजंता ट्रान्सपोर्ट यांना असे निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास मालाची किंमत रक्कम रु.4,024/- (अक्षरी रक्कम रु.चार हजार चोवीस मात्र ) दि.25/11/2010 पासुन द.सा.द.शे. 11 टक्के व्याजासह या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
( क ) विरुध्द पक्ष अजंता ट्रान्सपोर्ट यांना असे निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासादाखल रु.15,000/- (अक्षरी रक्कम रु.पंधरा हजार मात्र) व तक्रार अर्ज तसेच नोटीस खर्चादाखल रु.4,000/- (अक्षरी रु.चार हजार मात्र ) या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 23/10/2013.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.