निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार एकाच गावचे रहिवाशी असून, गैरअर्जदार हा विहीर खोदण्याचे काम करतो. अर्जदारास मौजे करजगाव येथे गट क्र. 15 मध्ये शेतजमीन असून, दि. 02/02/2011 रोजी विहीर खोदण्याचे काम ठरावपत्र घेवून साक्षीदारा समक्ष गैरअर्जदारास दिले. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यातील कराराप्रमाणे विहीरीच्या प्रत्येक कामाचे दर पुढील प्रमाणे होते 15 फुटापर्यंत खोली रु. 3,000/- नंतरच्या 20 फुटापर्यंत रु. 4,000/- तळाच्या 15 फुट खोलीला प्रत्येकी रु. 6,000/- प्रमाणे दर होते. अर्जदाराने विहीरीचे खोदकाम करण्यासाठी रक्कम रु. 2,15,000/- गैरअर्जदारास दिले. सदरचे विहीरीचे काम गैरअर्जदारास दिले होते त्यात विहीरीची खोली 50 फुट घेअर 45 फुट व तळाला घेअर 28 फुट काम करुन देण्याचे ठरले होते. अर्जदाराने गैरअर्जदारास ईसार म्हणून रु. 1,000/- दिले. विहीरीचे काम चालु होण्यापुर्वी गैरअर्जदारास एकुण रक्कम रु. 61,000/- दिली होती. गैरअर्जदाराने विहीरीचे 35 फुट खोदकाम केले; झालेल्या कामाची एकुण रक्कम रु. 1,25,000/- इतकी होते. गैरअर्जदाराकडे रु. 1,01,500/- जास्तीचे गेले आहेत. गैरअर्जदाराने विहीचे काम पुर्ण केले नाही. त्यामुळे अर्जदारास शेतीच्या उत्पन्नाचे आर्थिक नुकसान व पाईप लाईन, विदयुत पंपाचा असे एकुण 76,000/- रुपयाचे नुकसान झाले आहे. अर्जदाराने तक्रारी अर्जात गैरअर्जदाराने न केलेल्या रु. 1,01,500/- त्यावर 12 टक्के प्रमाणे एक वर्षाचे व्याज रु. 12,180/- व रु. 80,000/- शेती उत्पन्नाची नुकसान भरपाई पाईपलाईनसाठी रु. 9,120/- तसेच मानसिक शारीरीक त्रासापोटी रु. 40,000/- तक्रारीच्या खर्चापोटी रु. 5,000/- असे एकुण – 2,47,800/- 12 टक्के व्याजासह देण्याची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र व त्यासोबत एकुण – 05 कागदपत्रे दिली आहेत.
गैरअर्जदाराने लेखी म्हणणे दिले आहे. अर्जदाराचे गट नं. 15 मध्ये विहीरीचे दगड, माती काढण्याचे काम गैरअर्जदाराने घेतले होते. सदर कामाचे गुत्ते रक्कम रु. 2,15,000/- ठरले होते. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात ठराव झालेला नाही. गैरअर्जदाराने ठराव पत्र लिहून दिलेले नाही. अर्जदाराकडुन एकुण रक्कम रु. 2,15,000/- गैरअर्जदाराकडे जमा झाली आहे. अर्जदाराने गैरअर्जदारास विहीर खोदण्याचे काम पाहण्यास सांगितले असता, गैरअर्जदाराने अमित पवार यास ब्लास्टींग मिशनचा किराया व ट्रॅक्टरचे भाडे असे एकुण रु. 1,70,000/- अर्जदाराच्या सांगण्याप्रमाणे सदर व्यक्तीस दिले. विहीरीचे काम पुर्ण झाले आहे. अर्जदाराने रक्कम रु. 1,70,000/- बुडविण्याच्या उद्देशाने खोटी तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, व पुरावा म्हणून दिलेले शपथपत्र तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, अर्जदार व गैरअर्जदार यांचा लेखी युक्तीवाद याचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर :- अर्जदाराने गैरअर्जदारास रक्कम रु. 2,15,000/- देवून विहीरीचे काम दिले होते. सदरची रक्कम गैरअर्जदाराने स्विकारल्यामुळे अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत येतो. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर :- अर्जदाराने गैरअर्जदारास रक्कम रु. 2,15,000/- दिल्याचे मान्य असल्याचे लेखी म्हणण्याचे मुद्दा क्र. ब वरुन दिसुन येते. अर्जदाराने दि. 02/02/11 रोजी गट क्र; 15 मध्ये मौजे करजगाव येथील विहीर खोदण्याचे काम गैरअर्जदारास दिले होते हे दाखल केलेल्या ठरावपत्रावरुन दिसुन येते. गैरअर्जदाराने दिलेले वकीलपत्रावरील सही व वेळोवेळी अर्जदाराने गैरअर्जदारास रक्कमा दिलेल्या पावतीवरील सही सारखी असल्याचे दिसुन येते यावरुन असे दिसुन येते की, अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात सदरचे ठरावपत्र झालेले आहे. सदरील ठरावपत्रावर साक्षीदार म्हणून श्रीधर वामनराव जाधव, सतिष बब्रुवान जाधव, नागनाथ मनोहर हळवे, श्रीमंत धोंडीराम जाधव यांचे नावे असून, लिहून देणारा म्हणून जाधव अंगद सुग्रीव यांचे नाव दिसुन येते. यावरुन असे सिध्द होते की, अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात सदरचे ठरावपत्र झालेले आहे. अर्जदाराने विहीरीचे पेमेंट गैरअर्जदारास दिलेली नोंद निशाणी – 2 वरील कागदपत्रावरुन दिसुन येते. अर्जदाराने दि. 25/07/2014 रोजी सतीष बब्रुवान जाधव व नागनाथ मनोहर हळवे यांचे शपथपत्र दिले आहे. सदरील शपथपत्रात गैरअर्जदाराने विहीरीचे काम करण्यासाठी पैसे घेवूनही काम करुन दिले नाही, असे दिसुन येते. सदरील दोन्ही व्यक्तीच्या सहया साक्षीदार म्हणून ठरावपत्रावर असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सांगण्याप्रमाणे ब्लास्टींग मिशनचे भाडे अमित पवार यास दिले याबद्दलचा पुरावा दिलेला नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सांगण्यावरुन ट्रॅक्टरचे भाडे रु. 30,000/- दिले याबद्दलचा पुरावा दिसुन येत नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराकडुन विहीरीच्या कामासाठी ठरल्याप्रमाणे कामाअगोदर व काम सुरु केल्यानंतर वेळोवेळी एकुण रु. 2,15,000/- घेवूनही विहीरीचे काम अर्धवट केले असल्यामुळे अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात झालेल्या कराराचे पालन गैरअर्जदाराने केले नसल्याचे सिध्द होते. गैरअर्जदाराने विहीरीचे काम पुर्ण केल्याबद्दलचा पुरावा दिलेला नाही. अर्जदाराने पाईपलाईनसाठी, विदयुत पंपासाठी, शेती उत्पन्नाचे नुकसान झाले याबद्दलचा पुरावा दिलेला नाही. गैरअर्जदाराने कराराप्रमाणे विहीरीचे काम पुर्ण न करुन सेवेत त्रुटी केल्याचे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे सिध्द होते. मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 3 चे उत्तर :- अर्जदाराने कागदोपत्री पुरावा देवून तक्रारी अर्ज सिध्द केल्यामुळे गैरअर्जदाराकडे अर्जदाराचे रक्कम रु. 1,01,500/- जास्तीचे गेलेले, मानसिक, शारिरीक व तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 6,000/- अनुतोष मिळण्यास पात्र असल्याचे दिसुन येते.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु. 1,01,500/- (अक्षरी
एक लाख एक हजार पाचशे रुपये फक्त)आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या
आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 3,000/-(अक्षरी तीन हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.
3,000/-(अक्षरी तीन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.