::: आ दे श :::
( पारित दिनांक : 27/08/2014 )
आदरणीय अध्यक्षा , सौ. एस. एम. ऊंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे :-
तक्रारकर्त्याने दिनांक 27-06-2013 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्या दुकानातून मायक्रोमॅक्स कंपनीचा, मायक्रोमॅक्स कॅन्व्हास-2 ए-110 हा भ्रमणध्वनी संच विकत घेतला. त्यासंबंधीचा पावती क्र. 19 आहे. नमुद भ्रमणध्वनी संचाची एक वर्षाची हमी कंपनीने दिली आहे. तक्रारकर्त्याने सदरहू भ्रमणध्वनी संच एक महिणा वापरल्यानंतर,त्यामध्ये तक्रारकर्त्यास दोष दिसून आला. सदरहू मोबाईल व्दारे दुस-या व्यक्तीला संपर्क करतांना अचानक, एकाच मिनिटाच्या आंत मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होऊन फोन बंद पडत असल्याचा दोष तक्रारकर्त्याला दिसून आला. म्हणून त्याबद्दलची तोंडी तक्रार तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्ष क्र. 1 कडे केली, परंतु त्यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 कडे जाऊन सदर मोबाईल दुरुस्त करुन घेण्याचा सल्ला दिला. म्हणून तक्रारकर्ता यांनी सदर मोबाईल विरुध्द पक्ष क्र. 2 कडे दिनांक 07/09/2013 रोजी दुरुस्तीकरिता दिला व त्यांनी मोबाईल फोन दुरुस्तीकरिता स्विकारल्याबाबतची पावती तक्रारकर्त्यास दिली. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी सदरहू मोबाईल फोन दुरुस्त होत नसल्यामुळे कंपनीकडे पाठविल्याचे सांगीतले. त्यानंतर तक्रारकर्त्याने बरेच वेळा विरुध्द पक्ष क्र. 2 कडे मोबाईल फोन बद्दल प्रत्यक्षरित्या व फोनवरुन विचारणा केली, परंतु त्यांनी नेहमी उडवा-उडवीचे खोटे व असमाधानकारक ऊत्तरे दिली. त्यानंतर जवळपास तीन महिन्याचा कालावधी पालटुन गेला परंतु तक्रारकर्त्याला त्याचा मोबाईल फोन दुरुस्त करुन मिळालेला नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दिनांक 19/12/2013 रोजी विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांना कायदेशीर नोटीस नोंदणीकृत डाकेने पाठविली तसेच विरुध्द पक्ष क्र. 1 यांना हाताने नोटीस देऊन, त्याची पोच घेतली. परंतु सदर नोटीसला विरुध्द पक्षाने ऊत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक ,शारीरिक, मानसिक व व्यवहारीक नुकसानीस विरुध्द पक्ष हे सर्वस्वी जबाबदार आहेत. करिता तक्रारकर्ता यांनी खालील प्रार्थनेसह सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केलेली आहे.
तक्रारकर्ते यांची प्रार्थना -
1. तक्रारकर्ते यांना, नमुद मोबाईल फोनची किंमत रु. 9,300/- परत करण्याचा आदेश विरुध्द पक्षाविरुध्द पारित करण्यात यावा.
2. मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसानीपोटी भरपाई रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च देण्यात यावा.
तक्रारकर्ते यांनी, सदर तक्रार प्रतिज्ञापत्रावर केली व दस्तऐवज यादी प्रमाणे कागदपत्रे दाखल केलीत.
2. वि. मंचाने या प्रकरणात दिनांक 29/03/2014 रोजी आदेश पारित केला की, विरुध्द पक्ष क्र. 1, 2 व 3 ला नोटीस बजाविल्यानंतर देखील विरुध्द पक्ष गैरहजर. तरी प्रकरण विरुध्द पक्षांचे विरुध्द एकतर्फी चालविण्यात यावे.
कारणे व निष्कर्ष : -
प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, दाखल दस्तऐवज, पुरसिस चे अवलोकन केले व तक्रारकर्त्याचा युक्तिवाद एैकल्यानंतर वि. मंचाने खालील निर्णय कारणे देऊन पारित केला.
या प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 1, 2 व 3 यांना मंचातर्फे नोटीस बजाविल्यानंतर देखील विरुध्द पक्ष हे गैरहजर राहिले, त्यामुळे प्रकरण त्यांच्या विरुध्द एकतर्फी चालविण्यात आले.
तक्रारकर्त्याने रेकॉर्डवर दाखल केलेल्या दस्तांवरुन असे दिसते की, तक्रारकर्ते यांनी दिनांक 27/06/2013 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्या दुकानातुन मायक्रोमॅक्सकॅन्व्हास-2 ए-110 हा मोबाईल फोन रुपये 9,300/- या किंमतीत खरेदी केला होता. या बिलामधील अटीनुसार, सदर मोबाईल फोनची वॉरंटी एक वर्षापर्यंतची आहे. तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर दाखल केलेले दस्त क्र. 12 असे दर्शवितात की, दिनांक 07/09/2013 रोजी तक्रारकर्त्याने हा फोन दुरुस्तीकरिता विरुध्द पक्ष क्र. 2 कडे दिला. त्यातील विवरणानुसार, सदर फोनची बॅटरी डिस्चार्ज होऊन फोन बंद पडत होता, अशी तक्रार, तक्रारकर्त्याची होती. तक्रारकर्त्याच्या मते विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी सदरहू मोबाईल दुरुस्ती होत नसल्यामुळे तो कंपनीकडे पाठविण्याचे सांगुन आजपर्यंत फोन दुरुस्त करुन वापस मिळाला नाही, असे आहे. त्यावर सर्व विरुध्द पक्ष यांनी विरोधाभासी कोणतेही नकारार्थी कथन मंचापुढे मांडलेले नाही. त्यामुळे याचा उलट अर्थ मंचाने काढला आहे.
तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या दस्तावरुन असेही दिसून येते की, मोबाईल दुरुस्त करुन वापस मिळणेकरिता तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्ष यांना कायदेशीर नोटीस दिली आहे. परंतु ती मिळुनही विरुध्द पक्ष यांनी त्यावर काहीही कार्यवाही केली नाही. अशा परीस्थितीत सदरहू मोबाईल फोन वॉरंटी कालावधीमध्ये दुरुस्त करुन वापस न देणे ही व्यापारातील अनुचित प्रथा आहे, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे सर्व विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास या मोबाईल फोनची किंमत रुपये 9,300/- ही सव्याज व नुकसान भरपाईसह देणे बंधनकारक आहे, अशा निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
सबब हे न्यायमंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
1. तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यांत येत आहे.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी एकत्रीतपणे व वैयक्तिकरित्या तक्रारकर्ते यांना मायक्रोमॅक्स कंपनीचा, मायक्रोमॅक्स कॅन्व्हास-2 ए-110 या मोबाईल फोनची किंमत रुपये 9,300/- (रुपये नऊ हजार तिनशे फक्त) ही प्रकरण दाखल दिनांक 15/01/2014 पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत दरसाल, दरशेकडा 8 % व्याजदराने,व्याजासहित दयावी.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी एकत्रीतपणे व वैयक्तिकरित्या तक्रारकर्ते यांना झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान भरपाई पोटी
रक्कम रुपये 3,000/- (रुपये तीन हजार फक्त) व प्रकरणाचा न्यायिक खर्च रुपये 2,000/- (रुपये दोन हजार फक्त) दयावा.
5. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी वरील आदेशाचे पालन निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे, व तसा पुर्तता अहवाल मंचात दाखल करावा.
6. संबंधीत पक्षकारांना आदेशाची प्रत नि:शुल्क दयावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) (सौ.एस.एम.उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.