द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(10/10/2013)
प्रस्तुतची तक्रार ही ग्राहकाने जाबदेणार यांच्याविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार सेवेतील त्रुटीकरीता दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे आहेत.
1] तक्रारदार हे किरकटवाडी, सिंहगड रोड येथील रहीवासी असून जाबदेणार हे वडगांव शेरी येथे राहतात व व्यवसायाने वकील आहेत. तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार, तक्रारदार यांच्या बीड जिल्ह्यातील, बीड व गेवराई येथील मिळकतींबाबत असलेल्या वादासंबंधी जाबदेणार यांनी करार लिहून दिला होता व रक्कम रु. 25,000/- तक्रारदारांकडून घेतले होते. असा लेख लिहून दिल्यानंतर जाबदेणार यांनी धनादेश तक्रारदार यांचे लाभात लिहून दिला. जाबदेणार यांनी करारनामा झाल्यानंतर रक्कम रु. 25,000/- घेऊन गेवराई कोर्टात वकीलपत्र दाखल करणेशिवाय कोणतेही काम केले नाही. दरम्यानच्या कालावधीत वादग्रस्त जमीन तक्रारदार यांच्या नातेवाईकांनी परस्पर तिर्हाईत व्यक्तीस विकली. अशाप्रकारे जाबदेणार यांनी तक्रारदार यांची फसवणुक केलेली आहे व सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. त्याचप्रमाणे घेतलेली रक्कम रु. 25,000/- परत केली नाही, त्यामुळे सदरची रक्कम वसुल होऊन मिळण्याकरीता व नुकसान भरपाई मिळावी याकरीता तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे.
2] जाबदेणार यांनी या प्रकरणात लेखी कैफियत दाखल करुन तक्रारीतील मजकुर नाकारलेला आहे. जाबदेणार यांच्या कथनानुसार, त्यांचेमध्ये व तक्रारदार यांचेमध्ये कोणताही करार झाला नाही. तक्रारदार यांनी स्वत: त्यांच्याकडे येऊन त्यांची केस चालविण्याची विनंती केली होती. त्यांनी वकील फी रक्कम रु. 25,000/- घेतल्याचे कबुल करुन तसा करार तक्रारदार यांनी दिशाभूल करुन लिहून घेतलेला आहे, असे नमुद केले आहे. जाबदेणार यांनी गेवराई येथील कोर्टामध्ये दि. 11/3/2011 रोजी हजर राहून वकीलपत्र दाखल केले. पुढील तारीख 11/4/2011 असताना, त्या तारखेआधी दि. 6/4/2011 रोजी तक्रारदार यांनी जाबदेणार यांना फोनवरुन शिवीगाळ केली. त्यानंतर तक्रारदार यांनी शिवाजीनगर कोर्टामध्ये येऊन जाबदेणार यांना धमकी
देऊन रोख रक्कम रु. 9,000/- व रु. 16,000/- चा धनादेश दोन वकीलांच्या समक्ष घेतला. याबाबत जाबदेणार यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. सदरचा करारनामा हा जबरदस्तीने लिहून घेतलेला असून तो बेकायदेशिर आहे म्हणून रद्दबादल करण्यात यावा. जाबदेणार यांनी सदरची तक्रार फेटाळण्यात यावी व नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केलेली आहे.
3] तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या लेखी कैफियतीस उत्तर म्हणून रिजॉईंडर-शपथपत्र दाखल केले आहे. त्याचप्रमाणे मुळ करारनामा, खरेदीखत इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदोपत्री पुरावे आणि लेखी कथने विचारात घेता खालील मुद्दे निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र. | मुद्ये | निष्कर्ष |
1. | जाबदेणार यांनी कमी प्रतीची सेवा देऊन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे का ? | होय |
2 . | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते |
कारणे
5] प्रस्तुतच्या प्रकरणातील लेखी युक्तीवाद त्याचप्रमाणे कागदपत्रे व शपथपत्र यांचा विचार करता असे स्पष्ट होते की, तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये ‘वकील’ आणि ‘पक्षकार’ असे नाते आहे. जाबदेणार यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु. 25,000/-
घेऊन त्यांचेमध्ये कामासंबंधी करारनामा झालेला होता. सदरचा मुळ करारनामा तक्रारदार यांनी मंचापुढे दाखल केलेला आहे. सदरच्या करारनाम्यावर जाबदेणार यांचा फोटो असून अॅड. एस. बी. बेल्हे यांच्यापुढे नोटराईज्ड केलेला आहे व त्यावर साक्षीदारांच्या सह्या आहेत. या करारामध्ये जाबदेणार यांनी रक्कम रु. 20,000/- मिळाल्याचे मान्य केलेले आहे. त्याचप्रमाणे सदरच्या धानादेशाची प्रत व तक्रारदार यांच्या बँकेचा खातेउतारा प्रस्तुत प्रकरणामध्ये दाखल केलेला आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्यावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी जाबदेणार यांना रक्कम रु. 20,000/- वकील फी म्हणून दिलेली आहे. जाबदेणार यांच्या कथनानुसार, तक्रारदार यांनी रक्कम रु. 9,000/- रोखीने व रक्कम रु. 16,000/- चेकने स्विकारलेले असून करारनाम्याची पुर्तता केलेली आहे व जाबदेणार हे तक्रारदार यांना कोणतीही रक्कम देणे लागत नाहीत. या जाबदेणार यांच्या कथनावरुन हे स्पष्ट होते की जाबदेणार यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु. 20,000/- घेतलेली होती. अशा परिस्थितीमध्ये सदरची रक्कम परत केल्याबाबतचे पुरावे सादर करणे ही जाबदेणार यांची जबाबदारी आहे. परंतु जाबदेणार यांनी सदरची जबाबदारी सक्षम पुरावे देऊन पार पाडलेली नाही. जाबदेणार यांनी तक्रारदार यांचेकडून रोख रकमेबाबत आणि चेकच्या रकमेबाबत कोणतीही पोच घेतलेली नाही. ज्यावेळी तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडून चेकने रक्कम देताना करारनामा लिहून घेतला होता, त्यावेळी जाबदेणार यांनीही रक्कम परत करताना चेकने रक्कम देणे उचित ठरले असते. त्याचप्रमाणे, रक्कम मिळाल्याबद्दलची पावती घेणेही योग्य ठरले असते. प्रस्तुतच्या पुराव्यावरुन जाबदेणार यांनी तक्रारदार यांचेकडून फीपोटी घेतलेली रक्कम परत केली याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब, जाबदेणार यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे, हे सिद्ध होते. जाबदेणार हे तक्रारदार यांना नुकसान भरपाई
देण्यास पात्र आहेत, असे दिसून येते. वर उल्लेख केलेले मुद्दे, निष्कर्षे आणि कारणे यांचा विचार करता, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कमी प्रतीची
2.सेवा देऊन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे,
2.असे जाहीर करण्यात येते.
3. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 20,000/-
3.(रु. वीस हजार फक्त), त्याचप्रमाणे सेवेतील त्रुटीकरीता,
3.मानसिक व शारीरिक त्रासापोटी व या तक्रारीचा खर्च
3.म्हणून रक्कम रु. 5,000/- (रु. पाच हजार फक्त)
3.या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या
आंत द्यावे.
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
5. दोन्ही पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात
की त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक
महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे
संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट
करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 10/ऑक्टो./2013