जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.105/2008. प्रकरण दाखल दिनांक – 12/03/2008. प्रकरण निकाल दिनांक – 22/07/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायसिंह राणे. अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते सदस्य. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर. सदस्या. 1. युवराज पि.गोविंदराव जाधव, अर्जदार. वय वर्षे 17,धंदा शीक्षण, 2. संतोष पि.गोविंदराव जाधव, वय वर्षे 16, धंदा शीक्षण, अ.पा.क.वडील, गोविंद बालाजीराव जाधव. रा.शिवसाईनगर,तरोडा खु.ता.जि.नांदेड. विरुध्द. 1. व्यवस्थापक, गैरअर्जदार. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मुख शाख, स्टेशन रोड,नांदेड. 2. शाखाधिकारी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा, शिवाजीनगर, नांदेड. 3. सहायक व्यवस्थापक, भारतीय रिझर्व बँक, अयोग व रुण वीभाग, मुंबई क्षेत्रिय कार्यालय, गारमेंट हाऊस,डॉ.एनीबेझंट रोड,वरळी, मुंबई- 400 018. अर्जदारा तर्फे. - अड.जे.एस.पांडे. गैरअर्जदार क्र.1 ते 3 - अड. एस.डी.जाधव. निकालपत्र (द्वारा मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार यांची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराचे वडील यांनी अर्जदार यांच्या नांवे चिंतामुक्त सुयोग मंगल या योजनेमध्ये मुलांच्या भविष्यासाठी दि.18/02/2000 व दि.09/02/2000 ला रु.700/- महिना हप्ता असलेल्या योजनेमध्ये भरले. दि.18/01/2007 ला योजना संपल्यानंतर 15 टक्के व्याजाप्रमाणे रु.1,03,502/- अथवा महिन्याने घेतल्यास रु.1,245/- अर्जदारास मिळणार होते. तसेच रु.500/- महिना असलेल्या वरील योजनेमध्ये दि.09/02/2000 ते दि.09/02/2007 पर्यंत पैसे भरल्यानंतर मिळणारी रक्कम रु.73,930/- अथवा रु.790/- प्रती महिना मिळणार होते. त्याप्रमाणे अर्जदार यांचे नांवे दोन वेगळे पासबुक देण्यात आले व त्यावर नोंदी घेण्यात आल्या. अर्जदार क्र. 1 व 2 यांनी अनुक्रमे 68 वा हप्ता व 69 वा हप्ता पुर्ण भरल्यानंतर एकुण रक्कम रु.94,355/- + रु.67,395/- ही जमा झाली. त्यानंतर आर.बी.आय.ने बँकेवर कलम 35 लागु केल्यामुळे ते पुढील हप्ते भरुन घेतले नाही. अर्जदार यांनी अनेक वेळा विनंती करुन आणि अनेकदा विहीत नमुन्यातील अर्ज भरुन दिल्यानंतर रु.40,000/- मंजुर करण्यात आली. परंतु आर.बी.आय.ने बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घातल्यामुळे सदरील रक्कम गैरअर्जदार यांनी दिली नाही. अर्जदार यांची मागणी आहे की, मंजुर झालेली रक्कम रु.40,000/- आणि रु.1,03,502/- + रु.73,930/- = रु.1,77,432/- सदर रक्कम 15 टक्के व्याजासह देण्याचे आदेश व्हावे आणि अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.10,000/5 आणि दावा खर्चाबद्यल रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन देण्यात यावे. यात गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब संयुक्तरित्या दाखल केले. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार यांनी त्यांच्या मुलांच्या नांवे चिंतामुक्ती (सुयोग मंगल) योजनेमध्ये रक्कमा जमा केल्याची बाब मान्य केली आहे. त्याची मुदत संपल्यानंतर अर्जदार यांना 15 टक्के व्याज दराने सदरील रक्कम मिळणार होती. परंतु गैरअर्जदार बॅकेवर भारतीय रिझर्व बँकेने कलम 35 ए लादण्यात आल्यामुळे ती रक्कम ते देऊ शकत नाहीत. अर्जदाराने अर्जात नमुद केलेली रक्कम त्यांचेकडे जमा आहे. पंरतु आर.बी.आय.च्या निर्देशाप्रमाणे ती रक्कम त्यांना मिळु शकेल. आर.बी.आय.ने अर्जदारास रु.40,000/ देण्याची मंजुरी दिलेली आहे, त्याप्रमाणे ते देण्यास तयार आहेत. अर्जदाराने मागणी केलेली संपुर्ण रक्कम आर.बी.आय.च्या निर्बंधामुळे देऊ शकले नाही, असे केल्याने सेवेतील त्रुटी होत नाही. अर्जदाराने केलेली सर्व विपरीत वीधाने त्यांनी नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा. अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्र व शपथपत्र दाखल केलेले आहे तसेच गैरअर्जदार यांनी आपल्या जबाबासोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाही. त्यांनी शपथपत्र दाखल केलेले आहे. 1. अर्जदार, गैरअर्जदार यांचे ग्राहक आहे काय? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय नाही. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र.1 – अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे चिंतामुक्ती सुयोग मंगल योजनेमध्ये मुलांच्या भविष्यासाठी रक्कम गुंतविलेली होती त्यांबाबतचे ठेव योजना पासबुक अर्जदार यांनी अर्जासोबत दाखल केलेले आहे. सदरची बाब गैरअर्जदार यांनी लेखी म्हणण्यामध्ये व शपथपत्रामध्ये नाकारली नाही. याचा विचार करता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र.2– अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे कडे दि.18/02/2000 ते दि.18/01/23007 या मुदती करीता 15 टक्के व्याज दराने रु.700/- महिना हप्ता याप्रमाणे रक्कम गुंतविलेली होती व आहे तसेच दि.09/02/2000 ते दि.09/02/2007 या कालावधी करीता रक्कम रु.500/- महिना हप्ता याप्रमाणे रक्कम गुंतविलेली होती व आहे. सदर रक्कमेवर गैरअर्जदार यांनी 15 टक्के व्याज देण्याचे मान्य आणि कबुल केले होते व आहे. अर्जदार यांनी दाखल केलेली ठेव योजना पासबुक (चिंतामुक्ती सुयोग मंगल) अनुक्रमे नंबर सी- 97 व सी – 95 या पासबुकाचे अवलोकन केले असता, अर्जदार यांनी नियमित सदर रक्कमेचे योजनेप्रमाणे हप्ते भरल्याचे दिसुन येते. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्रामध्ये अर्जदार यांनी दि.18/02/2000 ते दि.09/02/2007 या तारखेस अर्जदार यांचे मुलांचे नांवे रक्कम भरण्यास सुरुवात केली होती व ही बाब मान्य केलेली आहे. सदरच्या हप्त्याच्या मुदतीनंतर अर्जदार यांना 15 टक्के व्याजासह रक्कम मिळणार होती परंतु गैरअर्जदार बॅकेवर आर.बी.आय.ने निर्बंध लादल्यामुळे अर्जदार यांना सदरील रक्कम 15 टक्के व्याजासहीत देण्यास गैरअर्जदार जबाबदार नाहीत असे म्हटलेले आहे. अर्जदाराचे पासबुकाचे अवलोकन केले असता, अर्जदार यांनी सुरुवातीपासुन नियमितपणे मासिक हप्ते सदरील योजनेनुसार भरल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच अर्जदार यांनी जोपर्यंत गैरअर्जदार यांचेकडे रक्कम जमा केली आहे तोपर्यंत गैरअर्जदार यांचेकडुन सदरील रक्कमेवर 15 व्याजासहीत रक्कम वसुल करुन मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये गैरअर्जदार बॅक ही अर्थीक अडचणीत आल्यामुळे कलम 35 नुसार निर्बंध असल्यामुळे आर.बी.आय.च्या परवानगी शिवाय रक्कम देऊ शकत नाही असे म्हटले आहे. परंतु सदरील निर्बंध उठल्यानंतर जे व्याज ठरले आहे ते व्याज देण्यास गैरअर्जदार तयार आहे असेही म्हटले आहे, याचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्या अर्जातील मागणी एकप्रकारे मान्यच केली असल्याचे दिसुन येत आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे हार्डशिप ग्रांऊडवर अर्ज दिलेला आहे. अर्जदार यांची जमा असलेली रक्कम रु.40,000/- गैरअर्जदार यांनी देण्याचे मंजुर केलेली आहे. परंतु अर्जदार सदरची रक्कम ही 6.5 टक्के दराने घेण्यास तयार नाही असे दिसुन येत नाही. गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यामध्ये सदरची रक्कम मान्यही केलेली आहे. तसेच आर.बी.आय.चे निर्बंध उठल्यानंतर जे व्याज ठरले आहे त्याप्रमाणे गैरअर्जदार सदरील रक्कम देण्यास तयार आहेत हेही नमुद केलेले आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत गैरअर्जदार बँकेचे परिपत्रक दाखल केलेले आहे. सदरच्या परिपत्रकाचे अवलोकन केले असता, सदर परिपत्रक क्लॉज नंबर 3 मध्ये ठेवीदाराकडुन व्याज दरा बाबत लेखी संमती घ्यावी स्पष्टपणे नमुद केलेले आहे याची योग्य काळजी गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडुन व्याजा बाबत कोणतीही लेखी संमती घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अर्जदार हे त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे भरणा केलेल्या रक्कमेवर 15 टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार, शपथपत्र व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद व गैरअर्जदार यांचा जबाब, प्रतिज्ञापत्र व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद यांचा विचार करता, खालील आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदार यांचा अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे. 2. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडुन मंजुर रक्कम रु.40,000/- स्विकारावेत. 3. अर्जदार यांनी त्यांचा लेखी अर्ज त्यांचे हार्डशिप ग्रांऊडवर गैरअर्जदार यांचेकडे पाठवावा, गैरअर्जदार बँकेने सदरचे प्रकरण आर.बी.आय.कडे तातडीने पाठवुन त्यांचा पाठपुरावा करुन मंजुर रक्कम अर्जदार यांना तात्काळ अदा करावी. 4. अर्जाचा खर्च रु.1,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना द्यावा. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.विजयसिंह नारायणसिहं राणे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार लघुलेखक. |