जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १८३/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २२/१०/२०१२
तक्रार निकाली दिनांक – ०६/०६/२०१३
श्री. धैर्यशिल धर्मराज गांगुर्डे
वय – ३७, धंदा – वकीली,
रा.८२-अ, आदर्श कॉलनी, नकाणेरोड,
देवपूर, धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
अवसायक,
दि. दादासाहेब रावल को ऑप. बॅंक ऑफ दोंडाईचा लि.
दोंडाईचा जि. धुळे (शाखा शहर धुळे) .............. सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड. डी.डी. शार्दुल)
(सामनेवाला तर्फे – स्वतः)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला ‘दि. दादासाहेब रावल को ऑप. बॅंक ऑफ दोंडाईचा लि., दोंडाईचा, जिल्हा धुळे’ (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावती क्रं.०९०-००४६९० अन्वये ३९ महिने मुदतीसाठी रक्कम रू.४५,०००/- गुंतविले होते. मुदती अंती देय रक्कम रू.५९,१४७/- होती.
२. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे वरील देय रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून मुदत ठेव पावतीची देय रक्कम रू.५९,१४७/- व्याजासह मिळावी. तसेच मानसिक, शारीरीक त्रासापोटी रू.२५,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.५,०००/- सामनेवाला यांचेकडून मिळावा, याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ मुदत ठेव पावतीची छायांकित प्रत दाखल केली आहे.
३. सामनेवाला यांनी आपल्या लेखी खुलाश्यात असे म्हटले आहे की, अवसायनात गेलेल्या सहकारी संस्थेकडुन हक्काने व्याज मागण्याचा त्यांना अधिकार नाही. अवसायनात गेलेल्या सहकारी संस्थेविरूध्द अशा प्रकारचा अर्ज कायदयाने दाखल करता येत नाही. अवसायक यांच्याविरूध्द कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी मा. रजिस्ट्रार सो. यांच्याकडुन परवानगी मीळवावी लागते. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या अधिनियम १९६० चे कलम १६४ प्रमाणे विहीत मुदतीची नोटीस रजिस्ट्रार सो. यांना दिल्याशिवाय सदरची तक्रार कायदयाने चालु शकत नाही.
सामनेवाला यांनी पुढे असे म्हटले आहे की, अवसायक हे सरकारी अधिकारी आहेत. त्यांना सहकार खात्याचा आदेश, रिझर्व बॅंकेचा आदेशाच्या बाहेर जाता येत नाही. त्यामुळे अर्जदाराला त्याचे बाकी असलेले पैसे इतर ठेवीदारांना व घेणेकरांना न देता अर्जदाराला प्राधान्य देवुन कायदयाने अदा करता येत नाही. वास्तविक पाहता सदर बॅंकेस वेळोवेळी रिजर्व बॅंकेचे व सहकार खात्याचे निर्देश येत असतात. त्याप्रमाणेच कार्य करावे लागते. डी.आय.सी.जी.सी. चे क्लेम प्रलंबीत आहेत ते क्लेम सबंधीतांना मिळाल्या नंतर बॅंकेची वसुली झाल्यानंतर कायदयाने प्रथम सदर वसुल रक्कम डी.आय.सी.जी.सी. ला त्यांनी दिलेल्या क्लेम पोटी दयावी लागते. नंतरच या अर्जदाराचा नंबर कायदयाने लागतो. या सर्व गोष्टीचा विचार केला तर कोणतीही सेवेत कमतरता दिलेली नाही. कोणत्याही ग्राहक अनुचित प्रथेचा अवलंब केलेला नाही. अवसायनात गेलेल्या बॅंकेत ग्राहक व विक्रेता संबंध प्रस्थापित होत नाही. सबब सदरची तक्रार कायदयाने चालु शकत नाही. सदरची तक्रार चालविण्याचा या कोर्टाला अधिकार नाही. कायदेशीर कार्यकक्षा नसल्याने सदरची तक्रार कायदयाने चालु शकत नाही. सामनेवाला विरूध्द प्रशासक म्हणुन दाखल झालेली तक्रार चालु शकत नाही. कायदयाप्रमाणे ‘जसे होईल तशी’ योग्य वेळी योग्य रक्कम अवसायक मंडळ सर्व ऋणकोंना रक्कम अदा करेल.
४. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे व विदवान वकीलांनी केलेला युक्तिवाद तसेच सामनेवाला यांचा खुलासा पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
२. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कमतरता केली आहे काय ? होय
३. तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून देय रक्कम
व त्यावरील व्याज मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
४. तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून मानसिक
त्रास व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम वसुल होऊन
मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
५. अंतिम आदेश ? आदेशाप्रमाणे
विवेचन
५. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव पावतीची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या मुदत ठेव पावतीमधील रक्कम नाकारलेली नाही. मुदत ठेव पावतीमधील असलेली रक्कम याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
६. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये रक्कम गुंतविली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे गुंतवलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही सामनेवाला यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावतीमधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला ‘अवसायक, दि. दादासाहेब रावल को. ऑप. बॅंक ली. दोंडाईचा’ यांच्याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे.
वरील बाबींचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाला ‘दि. दादासाहेब रावल को. ऑप. बॅंक ली. दोंडाईचा’ यांचेकडून मुदत ठेव पावतीमधील एकूण रक्कम रू.५९,१४७/- सदर आदेश तारखे पासून रक्कम फीटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दरा प्रमाणे व्याजासह, अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.३ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.४- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावतीमधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला यांच्याकडुन परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना सामनेवाला यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला दि. दादासाहेब रावल को ऑप. बॅंक ऑफ दोंडाईचा लि. दोंडाईचा जि. धुळे यांच्या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुदद क्रं.४ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा क्र.५- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, दाखल केलेली सर्व कागदपत्रे व वकीलांचा युक्तिवाद तसेच वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाला दि. दादासाहेब रावल को ऑप. बॅंक ऑफ दोंडाईचा लि. दोंडाईचा जि. धुळे यांनी, सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात.
(१) मुदत ठेव पावतीमध्ये असलेली एकूण देय रक्कम रू.५९,१४७/- (अक्षरी एकोणसाठ हजार एकशे सत्तेचाळीस मात्र) व या रकमेवर आदेश दिनांकापासुन द.सा.द.शे. ६ टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत व्याज दयावे.
(२) मानसिक त्रासापोटी रक्कम रू.१,०००/- (अक्षरी रू. एक हजार मात्र) व
अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.५००/- (अक्षरी रू. पाचशे मात्र) दयावेत.
३. वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक/ अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्थेचा कारभार पाहात असतील त्यांनी करावी. तसेचक्र.२मधीलरकमेपैकीकाहीरक्कम अगर व्याज दिले असल्यास, त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.