::: आ दे श :::
( पारित दिनांक : 25/11/2014 )
आदरणीय अध्यक्षा, मा. सौ. एस. एम. ऊंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे :-
तक्रारकर्ता हा धोत्रा जहा., ता. कारंजा, जि. वाशिम येथील रहिवाशी आहे व तिथे त्यांची भुमापन क्र. 72 अन्वये 1 हेक्टर 66 आर. एवढी शेती आहे. तक्रारकर्त्याचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. तक्रारकर्ता यांनी करडी पिकाचे भिमा जातिची खरेदी दिनांक 21/09/2011 तथा 22/09/2011 रोजी अनुक्रमे 3 व 2 अशी एकूण 5 पोत्यांची खरेदी केली. लॉट क्र. 3001 नुसार 3 पोते खरेदी केले तसेच दापुरा येथून विरुध्द पक्ष क्र. 2 कडून महाबिज कंपनीचे दोन पोते खरेदी केले. त्यानुसार तक्रारकर्त्याने आपल्या शेतामध्ये करडीची पेरणी केली. परंतु योग्य ती सर्व प्रकारची काळजी घेऊन देखील बियाणे उगवण केवळ 10 % झाली. त्यामुळे तक्रारकर्त्याने तालुका कृषी अधिकारी, कारंजा यांच्याकडे दिनांक 14/11/2011 रोजी अर्ज केला. त्यानुसार कृषी अधिकारी यांनी दिनांक 02/12/2011 रोजी तपासणी अहवाल सादर केला. त्यानुसार सदोष बिज पुरवठा केल्याचे सिध्द होते. अशाप्रकारे विरुध्द पक्षांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला. त्यामुळे तक्रारकर्त्याचा बियाणे खरेदी खर्च रुपये 1,460/-, पेरणी खर्च रुपये 8,060/-, नांगरणी व वखरणी खर्च रुपये 4,000/-, एकरी रुपये 30,000/- प्रमाणे 4 एकराची नुकसान भरपाई रुपये 1,20,000/-, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 5,000/-, अतिरिक्त आर्थिक नुकसान रुपये 5,000/-, असे एकूण रुपये 1,93,520/- चे नुकसान झालेले आहे.
म्हणून, प्रस्तुत तक्रारअर्ज दाखल करुन, तक्रारकर्त्याने विनंती केली की, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 कडून नुकसान भरपाईरुपये 1,93,520/- व त्यावर ऑक्टोंबर 2011 पासुन द.सा.द.शे. 24 टक्के प्रमाणे व्याज देण्यात यावे, विरुध्द पक्षांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला व सेवेमध्ये न्युनता दर्शविली असे घोषीत करण्यात यावे.
तक्रारीचे पृष्ठयर्थ पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्र केले व दस्तऐवज यादीप्रमाणे एकूण 10 कागदपत्रे दाखल केलीत.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 यांचा लेखी जवाब :- सदर तक्रारीची नोटिस मंचातर्फे प्राप्त झाल्यानंतर विरुध्द पक्ष क्र. 1यांनी लेखी जबाब दाखल करुन बहुतांश विधाने नाकबूल केली व पुढे नमूद केले त्याचा थोडक्यात आशय असा, . . . .
विरुध्द पक्ष क्र. 1 ने पुरवठा केलेले लॉट नं. 3001 मधील बियाणे हे दर्जेदार बियाणे असुन, विरुध्द पक्ष क्र. 1 ने वरील बियाण्याची बरीच विक्री केली, परंतु सदर बियाण्याची उगवणक्षमता कमी होती किंवा ते बियाणे 10 ते 15 टक्केच उगवण झाले व सदर करडीचे बियाणे सदोष असल्याबाबत केवळ तक्रारकर्ता वगळता एकही तक्रार आली नाही. संपूर्ण लॉट सदोष असल्यास ब-याच तक्रारी येणे अपेक्षित होते, यावरुन सदर बियाणे सदोष नसल्याचे सिध्द होते. त्याचप्रमाणे कृषी अधिकारी यांचा दिनांक 02/12/2011 च्या अहवालाचे अवलोकन केल्यास तक्रारकर्त्याने 21/09/2011 रोजी बियाणे खरेदी केले व दिनांक 25/09/2011 रोजी पेरणी केल्याचे म्हटले आहे. परंतु तक्रारीत मात्र पेरणी कधी केली, याचा साधा उल्लेखही नाही. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याचे शेतात कोणतीही सिंचन क्षमता नसुन कोरडवाहू शेत आहे. तसेच पेरणी करतेवेळी पुरेशी ओल होती किंवा काय याबाबत काहीही पुरावा उपलब्ध नाही. पुरेशा ओलीअभावी बियाणे कितीही दर्जेदार असले तरी उगवण होणे शक्य नाही, त्याचप्रमाणे पेरणी नंतर जवळपास 68 दिवसांनी तपासणी करण्यात आली. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणास्तव उगवण झाली नाही, याबाबत अहवालात काहीही नमुद नाही. तसेच अहवालानुसार जमीन मध्यम स्वरुपाची आहे. वरील तपासणी अहवालावरुन केवळ उगवण 10 ते 15 टक्के असल्यामुळे बियाणे सदोष होते, हे सिध्द होत नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारिज करण्यात यावी. त्याचप्रमाणे तक्रार मुदतबाहय आहे.
सदर लेखी जबाबासोबत प्रतिज्ञालेख दाखल केला आहे.
3) या प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 2 विरुध्द आदेश पारित करण्यांत आला की, विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी मुदतीत लेखी जवाब दाखल केला नाही. तरी प्रकरण विरुध्द पक्षा विरुध्द लेखी जवाबाशिवाय पुढे चालविण्यात यावे.
4) विरुध्द पक्ष क्र. 3 यांचा लेखी जवाब :- विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी लेखी जबाब दाखल करुन, प्राथमिक आक्षेपामध्ये नमुद केले की, तक्रार मुदतीत दाखल केलेली नाही करिता प्रस्तुत तक्रार खारीज करण्यात यावी. पुढे बहुतांश विधाने नाकबूल केली व नमूद केले की, तालुका कृषी अधिकारी हयांनी हया विरुध्द पक्षाला शेती तपासणी संबंधी कधीही पुर्वसुचना दिली नाही, करिता दिनांक 02/12/2011 चा तक्रारकर्ता हयांनी दाखल केलेला तपासणी अहवाल अमान्य आहे. विशेष हे की, तालुका कृषी अधिकारी हयांनी जिल्हा कृषी अधिकारी हयांना दिलेल्या पत्रात कमी पावसाच्या ओलाव्यामुळे उगवण कमी होऊ शकते असे मत व्यक्त केले आहे. हयाबाबत असे दिसून येते की, तक्रारकर्ता हयांनी पेरणी करण्यापूर्वी योग्य ती काळजी घेतलेली नाही. विरुध्द पक्ष क्र. 3 यांच्या भिमा जातीच्या करडीची पेरणीबाबत इतर कोणत्याही कास्तकाराने तक्रार केलेली नाही. यावरुन, असे दिसून येते की, तक्रारकर्ता यांनी वि. न्यायालयात चुकीचा, खोटा, निराधार व कपोलकल्पीत मजकुराच्या आधारे अर्ज केलेला आहे. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारिज करण्यांत यावी. विरुध्द पक्ष यांनी त्यांचा लेखी जबाब प्रतिज्ञापत्रावर दाखल केला.
5) का र णे व नि ष्क र्ष :::
सदर प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, तक्रारकर्ता यांचा लेखी युक्तिवाद, विरुध्द पक्षाची युक्तिवादाबद्दलची पुरसिस तसेच उभय पक्षांनी प्रकरणात दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ता यांनी दाखल केलेले न्यायनिवाडे, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद केला.
तक्रारकर्ता यांनी करडी पिकाचे भिमा जातिची खरेदी दिनांक 21/09/2011 तथा 22/09/2011 रोजी अनुक्रमे 3 व 2 अशी एकूण 5 पोत्यांची खरेदी केली. लॉट क्र. 3001 नुसार 3 पोते खरेदी केले तसेच दापुरा येथून विरुध्द पक्ष क्र. 2 कडून महाबिज कंपनीचे दोन पोते खरेदी केले. त्यानुसार तक्रारकर्त्याने आपल्या शेतामध्ये करडीची पेरणी केली. परंतु योग्य ती सर्व प्रकारची काळजी घेऊन देखील बियाणे उगवण केवळ 10 % झाली. त्यामुळे ऊपरोक्त बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्यांच्या तक्रारीव्दारे केली.
विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर दस्त निशाणी 15 नुसार अर्ज करुन त्यानुसार ‘‘ बियाण्यात उगवणशक्ती कमी असणे किंवा पिक पेरणीनंतर भेसळ निघाल्याच्या तक्रारींची चौकशी करणेबाबत महाराष्ट्र शासनाचे दिनांक 28/07/2011 रोजीचे परिपत्रक ’’दाखल केले आहे. त्यानुसार अशा तक्रारींची चौकशी करणेकामी शासकीय कमिटी ही नेमण्यात आली आहे व चौकशीच्या वेळी समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणे आवश्यक आहे, तसेच विरुध्द पक्ष यांना देखील या चौकशीची नोटीस जाणे आवश्यक आहे. तसेच समितीचा अंतिम निष्कर्ष स्पष्ट असला पाहिजे, असे नमुद आहे.
तर तक्रारकर्त्याची भिस्त ही तालुका कृषी अधिकारी, कारंजा जि. वाशिम यांनी दाखल केलेल्या अहवालावर अवलंबून आहे. तालुका कृषी अधिकारी, कारंजा जि. वाशिम यांनी दाखल केलेल्या अहवालात असे नमुद केलेले आहे की, ‘ पेरणीचे वेळी शेतामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये ओल होती असे शेतक-याचे म्हणणे आहे. दिनांक 02/12/2011 ला सदर पिकाची पाहणी केली असता 10 ते 15 टक्के बियाण्याचे उगवण झाल्याचे आढळून आले आहे. या वर्षी पडलेल्या पावसाची स्थिती लक्षात घेता,बियाण्याची उगवण कमी ओलाव्यामुळे झाली नाही की, बियाणे सदोष असल्यामुळे होऊ शकली नाही हे निश्चीत सांगता येणार नाही ’ असे नमुद केलेले आहे.
अशास्थितीत तालुका कृषी अधिकारी, कारंजा जि. वाशिम यांनी दाखल केलेला अहवाल हा मोघम स्वरुपाचा असल्याचे स्पष्ट होते व त्यावरुन बियाणे सदोष असल्याचे स्पष्ट होत नाही. तसेच या बियाण्याबाबत अन्य शेतक-यांच्या बियाणे सदोष असल्याबाबत तक्रारी नाहीत.
वरील सर्व कारणमिमांसा विचारात घेता, तक्रारकर्ता हे बियाणे सदोष असल्याबाबत सिध्द न करु शकल्यामुळे त्यांची तक्रार खारिज करण्यायोग्य आहे, असे मंचाचे मत आहे. सबब या प्रकरणात खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येतो.
- आदेश -
1) तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येते.
2) न्यायीक खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
3) आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षास विनामुल्य दयाव्यात.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,वाशिम,(महाराष्ट्र).