जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 301/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-02/03/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 30/11/2013.
श्री.जितेंद्र शिवाजीराव पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः नौकरी,
रा.व्ही.टी.लेन, सदर बाजार, विजय कापड दुकानाजवळ,
चाळीसगांव,ता.चाळीसगांव,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
प्रोप्रा.आदित्य बिर्ला नुवो लि,
जीनीअस कलेक्शन, 171, नवी पेठ,
नटवर सिनेमा जवळ,जळगांव 01. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.नितीन एस.चौधरी वकील.
विरुध्द पक्ष तर्फे श्री.आनंद मुजुमदार वकील.
निकालपत्र
श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः सदोष पॅन्ट विक्री करुन दिलेल्या सेवेतील त्रृटीदाखल तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदाराने वर नमुद दुकानातुन दि.2/9/2008 रोजी रक्कम रु.4,444/- या किंमतीस एकुण सहा कपडे त्यात दोन पँन्ट, 3 शर्ट, 1 टी शर्ट इ.ची रोख खरेदी केली. सदर कपडयात तक्रारदाराने पीटर इंग्लंड या नामांकीत कंपनीची रेडीमेड पँट रक्कम रु.999/- या किंमतीस खरेदी घेतली तिचा रंग निळा असुन सदर व्यवहारापोटी तक्रारदारास विरुध्द पक्षाकडुन बिल क्र.58/831 दि.2/9/2008 पँट आयटम कोर्ड नंबर टी/एन/एनटीसी 881/डीबी/082 असा मिळाला. तक्रारदाराने दि.8/9/2008 रोजी सदरची पँट वापरण्याचे उद्येशाने काढली तेव्हा त्यात निर्मिती दोष ( Manufacturing Defect ) असुन सदरची पँन्ट बदलुन मिळणेकामी तक्रारदाराने दि.9/9/2008 रोजी विरुध्द पक्षाचे दुकानात संपर्क साधुन विनंती केली असता विनंती केली असता तक्रारदाराकडे बिल नसल्याने विरुध्द पक्षाने तक्रारदाराची तक्रार स्विकारण्यास नकार दिला. तक्रारदाराने त्यानंतर अनेक वेळा विरुध्द पक्षाचे दुकानात बिलासह व सदोष पँन्टसह संपर्क साधला विरुध्द पक्षाने तक्रारदारास पॅन्ट बदलुन देऊ शकत नाही असे उत्तर देऊन तक्रारदाराची फसवणुक करुन सदोष सेवा प्रदान केली. सबब 3 वेळा पँन्टची तक्रार देण्याकरिता चाळीसगांव ते जळगांव प्रवासाची एकुण तीन फे-यांची रक्कम रु.198/-, 60/- रु.प्रतीदिन याप्रमाणे जेवणाचा खर्च एकुण रु.180/-, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.5,000/-, तक्रार अर्ज व नोटीस खर्च रु.8,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीस काढण्यात आली.
4. विरुध्द पक्षाने तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदाराने विरुध्द पक्षाचे दुकानातुन केवळ पँन्ट विकत घेतलेली आहे. विरुध्द पक्ष हा पँन्टचा निर्माता नाही त्यामुळे तक्रारदार हा विरुध्द पक्षाचा ग्राहक नाही. तक्रारदाराने दि.2/9/2008 रोजी त्याचे आवडीने व पसंतीने विरुध्द पक्षाचे दुकानातुन वर नमुद पँन्ट खरेदी केली तसेच पँन्टच्या दर्जाची शहानिशा करुन तसा शेरा व्हीजीटर्स बुक मध्ये देऊन तक्रारदार पँन्ट घेऊन गेले. त्यानंतर तक्रारदार हे सदर पँन्टच्या निर्मिती दोषाबाबत विरुध्द पक्षाकडे आले तथापी सदर पँन्ट मध्ये नेमका कोणता निर्मीती दोष आहे याबाबत काहीएक स्पष्टीकरण तक्रारदारास देता आले नाही. सदर पँन्टचे विरुध्द पक्षाने बारकाईने अवलोकन केले असता तक्रारदाराने सदरची पँन्ट ही अल्टर करुन आणली होती त्यामुळे ती बदलुन देता येणार नाही याची कल्पना तक्रारदारास त्याच वेळेस केली होती. तक्रारदारास सदर पँन्ट बाबत कंपनीचे अधिकृत संकेतस्थळावर तक्रार करण्याचेही सुचविले होते. तक्रारदारास सेवा देण्यात विरुध्द पक्षाने कुठलीही कसुर केलेली नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजुर करण्यात यावा व नुकसान भरपाई दाखल रु.10,000/- व खर्चादाखल रु.5,000/- मिळावेत अशी विनंती विरुध्द पक्षाने केलेली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्द पक्षाचे लेखी म्हणणे, तसेच विरुध्द पक्षाचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर
1) तक्रारदाराची तक्रार विरुध्द पक्षा विरुध्द या मंचासमोर
चालण्यास पात्र आहे काय? नाही.
2) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
6. मुद्या क्र. 1 व 2 - तक्रारदाराचे तक्रारीचे बारकाईने अवलोकन करता तक्रारदाराने त्याचे तक्रार अर्ज परिच्छेद क्र.4 मध्ये प्रामुख्याने विरुध्द पक्षाकडुन खरेदी केलेल्या पँन्ट मध्ये निर्मिती दोष ( Manufacturing Defect ) असल्याचे स्वतःहुन नमुद केलेले आहे. विरुध्द पक्षाने याकामी हजर होऊन ते तक्रारदाराने खरेदी केलेल्या पँन्टचे फक्त विक्रेते असुन निर्माते नाहीत असे कथन करुन या तक्रारीकामी त्यांना बेकायदेशीररित्या गोवले असुन उत्पादकाला याकामी सामील करणे आवश्यक होते असे लेखी म्हणणे व युक्तीवादातुन प्रतिपादन करुन या तक्रारीस Miss-Joinder of Parties या तत्वाची बाधा येते असे नमुद करुन तक्रारदाराची तक्रार आवश्यक पार्टी सामील नसल्याने रद्य होण्यास पात्र आहे असे नमुद केले आहे.
7. याशिवाय तक्रारदाराने देखील याकामी तक्रार अर्जातुन त्याने खरेदी केलेल्या पँन्ट मध्ये उत्पादकीय दोष असल्याचे नमुद केले आहे मात्र नेमका कोणता उत्पादकीय दोष आहे याबाबत काहीएक उहापोह केलेला नाही. तसेच पँन्टमध्ये उत्पादकीय दोष असल्याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.
8. विरुध्द पक्षाने याकामी मा.वरिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेतलेला आहे., तो खालीलप्रमाणेः
1 ( 1998 ) सी.पी.जे. 166 जी वथराजन // विरुध्द // स्टॅर्ण्डर्ड इलेक्ट्रीक कंपनी आणि इतर यामध्ये खालीलप्रमाणे न्यायीक तत्व विषद केलेले आहे.
Consumer Protection Act, 1986 -- Section 15 -- Appeal --- Necessary Party -- Refrigeratior --- Manufacturers -- Complainant purchased refrigerator -- Complaint filed alleging manufacturing defect -- Manufacturers not been made a party -- Complaint dismissed -- Appeal -- Whether manufacturers is necessary party ? (Yes).
9. वर नमुद मा.वरिष्ठ न्यायालयाने व्यक्त केलेले तत्वे व प्रस्तुत तक्रारीतील वाद व परिस्थिती ही एकसारखीच असल्याने वरील मा.वरिष्ठ न्यायालयाने व्यक्त केलेले न्यायीक तत्व विचारात घेता तक्रारदाराची तक्रार याकामी उत्पादकाला विरुध्द पक्षकार म्हणुन सामील केलेले नसल्याने तक्रारदाराची तक्रार चालण्यास पात्र नाही, तसेच याउपर तक्रारदाराने त्याची उत्पादनातील दोषाबाबतची तक्रार योग्य पुराव्यानिशी शाबीतही केलेली नाही त्यामुळे तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यास योग्य आहे या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. यास्तव मुद्या क्र. 2 चे निष्कर्षास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो.
( ब ) खर्चाबाबत आदेश नाहीत.
ज ळ गा व
दिनांकः- 30/11/2013. (श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.