नि. 18 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 200/2010 नोंदणी तारीख - 25/8/2010 निकाल तारीख – 4/11/2010 निकाल कालावधी – 81 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री परशुराम हरी फडतरे, बी-10, विमल गार्डन, राधिका रोड, ता.जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री.धनाजी शेलार) विरुध्द 1. अदिनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोरेगाव ता.कोरेगाव करिता व्यवस्थापक श्री मोना साहील शहा रा.कोरेगाव जि. सातारा 2. श्री संजय हिरालाल गांधी, चेअरमन अदिनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोरेगाव ता.कोरेगाव जि. सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री श्रीनिवास साखरे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये बचत खातेवरती दि.11/10/1994 रोजी पैसे ठेवले होते. परंतु जाबदार यांनी अर्जदार यांना पासबुक दिलेले नव्हते. सदरच्या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली असता जाबदार यांनी अर्जदार यांना व्याजासहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अर्जदार यांनी जाबदार यांना दि.1/4/2010 रोजी वकीलांचेमार्फत रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. सदरची नोटीस जाबदार यांना मिळाली. तथापि जाबदार यांनी नोटीशीला उत्तर दिले नाही अथवा अर्जदार यांची रक्कमही परत दिलेली नाही. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी एकूण रक्कम रु. 6,630/- तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- ची मागणी केलेली आहे. 2. जाबदार क्र.1 व 2 यांनी याकामी नि. 12 ला लेखी म्हणणे दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. जाबदार संस्थेमध्ये रहिमतपूर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.रहिमतपूर हिचे विलीनीकरण झालेले आहे. विलीनीकरण झालेनंतर अर्जदार यांचे सेव्हिंग्ज खाते असलेचे निष्पन्न झालेले नाही. तसा कोणताही कागदी पुरावा नाही. अर्जदारने यापूर्वीच सदरची रक्कम काढली असावी व खाते बंद केले असावे त्यामुळे जमाखर्चात अर्जदारचे खाते नाही. अर्जदार यांनी त्यांचे सेव्हिंग्ज खातेवर रक्कम असल्याचा ठोस पुरावा दाखविल्यास जाबदार मंचाचे आदेशाचे पालन करण्यास तयार आहेत असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे व जाबदारतर्फे अभियोक्त्यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहिली असता असे स्पष्ट दिसून येते की, अर्जदार यांनी रहिमतपूर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. रहिमतपूर या संस्थेमध्ये रक्कम रु.2,600/- भरलेची जमा पावती दाखल केली आहे. सदरचे पावतीवर सेव्हिंग्ज ठेव या शब्दासमोर रु.2,600/- असे नमूद आहे व रक्कम मिळाल्याचा शिक्का व सही आहे. सदरचा कागद पाहता अर्जदार यांनी सदरचे पतसंस्थेमध्ये सेव्हिंग्ज ठेवपोटी रक्कम भरल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे जरी अर्जदार यांनी पासबुक दाखल केले नसले तरी अर्जदार यांनी संस्थेमध्ये रक्कम भरल्याचा पुरावा दाखल केलेला आहे. त्यामुळे जाबदार कथन करतात त्याप्रमाणे आणखी कोणत्याही ठोस पुराव्याची याकामी आवश्यकता नाही. सदरची रहिमतपूर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. रहिमतपूर ही अदिनाथ नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये विलीन झाल्यामुळे अर्जदार यांची रक्कम देण्याची जबाबदारी जाबदार क्र.1 व 2 यांची आहे. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्हणजे सेव्हिंग्ज ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर व्याजासहित देय झालेली रक्कम अर्जदार यांनी मागणी करुनही दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे. 5. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. जमापावती क्र.001072 नुसार सेव्हिंग्ज ठेवीपोटी भरलेली रक्कम रु.2,600/- द्यावी व सदरचे रकमेवर रक्कम भरल्याचे तारखेपासून म्हणजे दि.11/10/1994 पासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत सदरचे खात्याचे नियमाप्रमाणे देय असणारे व्याज द्यावे. ब. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 500/- द्यावेत. क. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 500/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 4/11/2010 (सुनिल कापसे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य अध्यक्ष
| Mr. Sunil K Kapse, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | , | |