(घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून गैरअर्जदार क्रमांक 2 कंपनीचे गाजराचे डॉक्टर कंपनीचे बियाणे दिनांक 5/8/2009 रोजी खरेदी केले. तक्रारदारानी त्यांच्या शेतात दिनांक 21/8/2009 रोजी लागवड केली. त्यास पाणी खते, देण्यात आली परंतू त्या गाजर न लागता फुलेच आली व खाली फक्त मूळ तयार झाले. त्यामुळे तक्रारदारानी मे.आदीनाथ कृषी सेवा केंद्र यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानी कंपनीला तसे कळविले. कंपनीचे कर्मचारी, दुकानदार व पंचायत समिती यांच्या समितीने दिनांक 13/1/2010 रोजी येऊन पिकाची पाहणी केली. तक्रारदारास या बियाणामुळे मोठे नुकसान झाले म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून रु 40,000/- नुकसान भरपाई मागतात. तक्रारदारानी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने गाजराचे बियाणे, दिनांक 21/8/2009 रोजी खरेदी केले व दिनांक 21/8/2009 रोजी त्याची लागवड केल्याचे म्हणतात. तसेच पंचनामा दिनांक 13/1/2010 रोजी करण्यात आला. त्यावेळेस पिक 5 महिन्याचे होते. गाजर पीक येण्यास फक्त 75 दिवसाचा कालावधी लागतो. याचा अर्थ तक्रारदाराने नोव्हेंबर महिन्यात लागवड केली असावी. तक्रारदाराने 7/12 दाखल केला नाही. त्यामुळे पीक कुठल्या शेतात पेरले हे समजून येत नाही. चौकशी समितीने रँडम पध्दतीने पिकाची पाहणी केली. 155 रोपांची तपासणी केल्यानंतर, 58 झाडांना फुले आलेली होती व बाकी 98 झाले चांगली होती. पीक आलेल्या गाजराची लांबी 20 ते 22 से.मी. इतकी होती. यावरुन तक्रारदाराचे 62 टक्के पीक चांगले उगवले होते. तक्रारदारानी बियाणावर ट्रूथफुल लेबल लावलेले होते. त्यावर बियाणाची उगवण क्षमता 60 टक्के असे नमूद आहे. त्यामुळे गैरअर्जदारांनी हयात फसवणूक केलेली नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 कंपनीने तयार केलेल्या बियाणाची विक्री करतात. त्यांचा तक्रारीशी कांही संबंध नाही. वरील सर्व कारणावरुन तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी दोन्ही गैरअर्जदार करतात. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेल्या कागदपत्राची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराने दिनांक 5/8/2009 रोजी त्यांनी त्यांच्या शेतात लागवड केली परंतू गाजर न लागता, फुलेच तयार झाली ही तक्रार. यावर तक्रारदाराने मे.आदीनाथ कषी सेवा केंद्राकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर पंचायत समिती, कंपनीचे प्रतिनिधी हे सर्व पाहणी करण्यासाठी आले. तक्रारदारानी बियाणाची लागवड विलंबाने म्हणजेच नोव्हेंबर मध्ये केली होती म्हणून त्यास फुले आली असावी असे म्हणतात. यासाठी कुठलाही पुरावा दाखल नाही. समितीने किंवा कृषी अधिकारीकडे त्यांच्याकडे तक्रार केंव्हा आली हे नमूद करत नाहीत. किंवा मे.आदीनाथ यांनी सुध्दा तक्रारदार, त्यांच्याकडे जानेवारीत आले असेही म्हणत नाहीत. त्यामुळे गैरअर्जदारांच्या या म्हणण्यास कांहीही अर्थ नाही. तक्रारदार गेल्या 30 ते 35 वर्षापासून गाजराचे पिक घेत आहेत असे युक्तिवादाच्या वेळेस म्हणतात. त्यांना त्या हंगामाची माहिती असलीच पाहिजे. पिकाचे नुकसान झालेले कुठल्या शेतक-यास परवडेल. त्यामुळे त्यांनी लगेचच कृषी सेवा केंद्रास कळविले असणार. गैरअर्जदारानी त्या पिकास फुलोरा का आला हयाबद्दल कांहीही माहिती पुरावा म्हणून दिली नाही. (शेती विषयक माहिती व लिटरेचर) . फोटोग्राफ्सवरुन सर्वच पिकास फुले आल्याचे दिसून येते. नंतर कृषी अधिकारी यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये, रँडम पध्दतीने 58 झाडास, फुले आलेली म्हणतात. 98 झाडाना गाजर आले. त्याची वाढ सर्वाधारण आहे असे नमूद आहे. पंचनाम्यात पिकाची अद्याप काढणी केली नाही असे नमूद केलेले आहे. कृषी अधिका-यानी, पिकाचा कालावधी 82 ते 90 दिवासाचा म्हटला आहे. तक्रारदारानी पिकाचा कालावधी संपल्यानंतरही पिकाची काढणी केलेली नाही. त्यामुळे पिकास फुले आल्याचे आढळून आले असा निष्कर्ष काढलेला आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदारानी विलंबाने हे बियाणाची लागवड केली त्यामुळे फुले आली असे म्हणतात. तर कृषी अधिका-याने पिकाची काढणी कालावधी संपल्यावरही केली नाही म्हणून फुले आली असे म्हणतात. हया दोन्हीही विधानास कुठल्याही शेती तज्ञाचा किंवा लिटरेचरचा आधार नाही. कृषी अधिकारी हे शेतीतील तज्ञ असूनही त्यानी असा निष्कर्ष काढावा याचा खेद वाटतो. तक्रारदारानी 80 ते 90 दिवसानी ऑगस्ट 2010 मध्ये पेरणी केली व नोव्हेंबर मध्ये फुले आली म्हणून मे.आदीनाथ कृषी सेवा केंद्रकडे तक्रार नोंदविली. गैरअर्जदारांच्या म्हणण्यानुसार पिकाचा कालावधी म्हणजेच गाजर तयार होण्याचा कालावधी 82 ते 90 दिवसाचा असतो. त्याच कालावधीमध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यात त्यानी पेरणी केली तर, नोव्हेंबर पर्यंत 90 दिवसाचा कालावधी होतोच, म्हणजे त्या कालावधीत, पिकास फुले न येता, खाली व्यवस्थित गाजरेच यायला पाहिजे होती. परंतू तसे न होता, पिकास फुले आली असे दिसून येते. म्हणजेच बियाणात दोष होता असे स्पष्ट होते. मे.आदीनाथ कृषी सेवा केंद्राने तक्रारदाराने नोव्हेंबर महिन्यात तक्रार त्यांच्याकडे नोंदविली नाही असे म्हणत नाहीत. यावरुन कृषी अधिका-याच्या अहवालात काही तथ्य नसल्याचे मंचाचे मत आहे. पंचायत समितीने दिलेल्या पंचनाम्यावरुन फक्त 58 टक्के नुकसान झाल्याचे सिध्द होते. म्हणूनच मंच, गैरअर्जदार कंपनीने तक्रारदारास नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु 15,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु 1000/- द्यावा असा आदेश देत आहे. आदेश - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास रक्कम रु 15,000/- व तक्रारीचा खर्च रु 1000/- द्यावा.
(श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |