NAMDEV KAVDU RAUT filed a consumer case on 23 Mar 2015 against ADHIKSHAK ABHIYANTA,MSEDC in the Wardha Consumer Court. The case no is CC/61/2013 and the judgment uploaded on 07 Apr 2015.
Maharashtra
Wardha
CC/61/2013
NAMDEV KAVDU RAUT - Complainant(s)
Versus
ADHIKSHAK ABHIYANTA,MSEDC - Opp.Party(s)
ADV.DR.BEHARE
23 Mar 2015
ORDER
निकालपत्र
( पारित दिनांक :23/03/2015)
(मा. अध्यक्ष, श्री. प्रकाश एल. जाधव यांच्या आदेशान्वये)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रारदाखल केलेली आहे.
तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा थोडक्यात आशय असाकी, त.क.ची मौजा बोडखा येथे शेत सर्व्हे नं. 29/1 हया शेतात विद्युत पंपासाठी वि.प.कडून विद्युतपुरवठा करण्यात आला आहे. सन 2011-2012 मध्ये वसंत आगासकांडे यांचे शेतात नविन डी.पी. बसविण्यात आली. त्या डी.पी.साठी गेलेली मोठी लाईन, त्या लाईनचा एक पोल त.क.च्या विहीरीपासून केवळ 20 फुटावर उभारला आहे. दि.19.05.2013 ला तुफानी वादळामुळे खांबावरील मधली तार चिमणीसह तुटुन मध्ये अॅगंलवर पडून होता व लाईन तेव्हा पासून बंद होती. दि.20.05.2013रोजी विद्युत कंपनीचे 2 कर्मचारी बोडखा येथे येऊन शामराव चिंधुजी सोनुले चक्कीवाले यांचे घरासमोर असलेल्या डीपीवर फेस टाकून लाईन सुरु केली. सदर कर्मचा-यांनी त.क.च्या शेतात मधल्या अॅगंलवर पडून असलेली तार न जोडताच डीपीवरुन लाईन सुरु केली व त्यावेळेस ती तार लोखंडी अॅगंलच्या घर्षणात येऊन विद्युत स्पार्कींग होवून आगीच्या ठिणग्या खांबाजवळ वाळलेल्या गवतावर पडल्या व आग लागली. ती दुपारी 1.00 वाजताची उन्हाची वेळ असल्यामुळे आग वेगाने पसरली. त.क.च्या बैलाचा गोठा विहीरीच्या उत्तर भागाला 20 फुटावर होता. त्या गोठयात शेतीचे सर्व साहित्य ठेवलेले होते, त्याला पण आग लागली. गोलु भारत लांबट यानी आग पाहताच झाडाखाली बांधून ठेवलेले दोन बैल मोकळे सोडून दिले व टुव्हीलर गाडीने गावात येऊन, आगीबाबत सर्वांना सांगितले. गावातील लोक घटना स्थळावर पोहचले परंतु विहिरीला पाणी कमी असल्यामुळे व विद्युतपुरवठा बंद असल्यामुळे गुरुनुले व जिवणे यांचे शेतातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात येईपर्यंत त.क.च्या बैलांच्या गोठयातील पूर्ण साहित्य त्यात 2 वखरे, 3 डवरे 1 वखराचे जू दोन पोते बैलाची खुराग, वखराचे जुपने, ठिंबक सिंचन नळया, एक लाकडी नागर सोयाबिन पेरण्याची तिफन, सागाचे 5फाटे, 1 सागवाणी मोठी मयाल, 2 स्प्रे पंप ओलीतासाठी घेतलेले 30 पाईप, गोठयाचे बाजुला असलेले बैलाचा चारा, कडबा 200 पेंडी, 300 पेंडी गवत, 5 गोणे कुटार जळून खाक झाले व गोठयावर असलेली 500 कवेलु फुटुन चुरा झाले, 10 टीन तक्के जळून निकामी झाले आहे. तसेच विहिरीवर पंपाचे बसविलेले मीटर जळून गेले. ठिंबकसाठी घेतलेले फिल्टर व्हाल्व सुध्दा जळून गेले.
त.क.ने पुढे असे कथन केले आहे की, सदर आगीबाबत तहसिलदार समुद्रपूर यांना फोनकरुन सूचना देण्यात आली. तहसिलदार यांनी दि.20.05.2013 रोजी तलाठी यांना मौका चौकशी पाहणीसाठी पाठविले व तलाठी यांनी त्याच दिवशी मौका चौकशी करुन अहवाल तहसिलदार यांना सादर केला. पोलीस स्टेशन समुद्रपूरला सुध्दा सूचना दिली होती. पोलिसांनी घटना स्थळावर येऊन पंचनामा केला. तसेच दि.20.05.2013 रोजी गावातील शेतक-यांनी पाहणीकरुन पंचानामा केला. यात त.क.चे जवळपास 70,000/- ते 75,000/-रुपयाचे नुकसान झाले असे सांगितले.
त.क. ने पुढे असे कथन केले की, दि. 20.05.2013 रोजी विद्युत स्पार्कींगमुळे आग लागली याची सूचना सहा.अभियंता शाखा समुद्रपूर यांना दुपारी 3.00 वाजता फोनवरुन देण्यात आली. परंतु कोणीही चौकशीसाठी आले नाही. म्हणून दि. 22.05.2013 रोजी लेखी अर्ज दिला. तेव्हा ही कुणी चौकशीसाठी आले नाही. त्यामुळे पुन्हा दि.31.05.2013 रोजी अर्ज दिला. मात्र जो तार अॅगंलवर पडून होता तो तार मात्र वीज कंपनीच्या कर्मचा-यांनी दि.22.05.2013 ला केव्हा तरी येऊन जोडून लाईन बरोबर करुन घेतली. विद्युत कर्मचारी येऊन मौका चौकशी करीत नाही व या घटनेला बरेच दिवस झाल्यामुळे दि.10.06.2013 रोजी तालुका ग्राहक पंचायत समुद्रपूर मार्फत पुन्हा सूचना पत्र दिले व नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु वि.प.च्या कर्मचा-यांनी त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे दि.13.06.2013 रोजी तहसिलदार समुद्रपूर यांना अर्ज देऊन शासकीय मदतीची मागणी केली. परंतु वीज कंपनीच्या चुकिमुळे स्पार्कींग होऊन आग लागली म्हणून मदत मिळाली नाही. म्हणून त.क. ने प्रस्तुत तक्रार दाखल करुन वि.प.कडून त.क.च्या जळालेल्या साहित्याची नुकसानीची भरपाई म्हणून 75,000/-रुपये, शारीरिक मानसिक त्रासापोटी 25,000/-रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून 10,000/-रुपये मिळण्याची विनंती केली आहे.
वि.प.ने त्याचा लेखी जबाब नि.क्रं. 14 वर दाखल केला असून तक्रार अर्जास सक्त विरोध केला आहे. त्याचे म्हणणे असे की, त.क. चे हा मौजा बोडखा येथे शेत सर्व्हे नं. 29/1 या शेतात विद्युत पंप असून सन 2011-12 मध्ये वसंत आगसकांडे याच्या शेतात नविन डी.पी. बसविण्यात आली व त्यासाठी गेलेली मोठी लाईनचा पोल त.क.च्या विहिरी पासून केवळ 20 फुटावर उभा केला होता हे मान्य केले असून इतर सर्व आक्षेप अमान्य केले आहे.
वि.प.चे म्हणणे असे की, त.क.च्या गोठयास दि.20.05.2013 ला आग लागली ही बाब त्यांनी वि.प.ला ताबडतोब कळविली नाही व दि. 22.05.2013 रोजी सायंकाळी 5.00 वाजता उपविभाग समुद्रपूर यांचे कार्यालयात अर्ज आणून दिला. त्यामुळे कनिष्ठ अभियंता, समुद्रपूर यांनी स्थळ तपासणी करुन दि. 24.05.2013 रोजी पंचनामा सादर केला. त्यामुळे वि.प.ने पंचनामा करण्यात कोणतीही हलगर्जीपणा केला नाही. पुढे असे कथन केले की, त.क.ला विद्युत पुरवठा करणा-या विद्युत वाहिनीवर दि.20.05.2013 रोजी सकाळी 8.15 पासून ब्रेक डाऊन असल्यामुळे विद्युतपुरवठा खंडित होता. त्यादिवशी सकाळी 9.15 ला समुद्रपूर येथील जिनींग या वाहिनीवरील ए.बी.स्वीच ओपन करुन विद्युत वाहिनीचा पुरवठा फक्त त्याच्याकरिता सुरु केला. त.क.च्या शेतावरुन गेलेल्या वाहिनीचा विद्युतपुरवठा पूर्णपणे बंद होता. तो दुपारी 3.35 वाजता बिघाड दुरुस्त करुन सुरु करण्यात आला. त्यामुळे त.क.च्या शेतात तारेच्या ठिणग्या निघून आग लागण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आग दुस-याच कारणाने लागली असावी.परंतु त.क.ने चुकिचा आरोप वि.प.कंपनीवर केलेला आहे व त्याकरिता वि.प. जबाबदार नाही. त.क.ची नुकसानभरपाई अवाजवी आहे. त.क.ने खोटी तक्रार दाखल केलेली आहे म्हणून ती खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
त.क.ने वि.प.च्या लेखी जबाबास नि.क्रं. 16 वर उत्तर दिले आहे. त.क. त्याच्या कथनाच्या पृष्ठयर्थ नि.क्रं. 23 वर शपथपत्र दाखल केल आहे. वि.प.ने त्याचा लेखी जबाब हाच त्याचे शपथपत्र समजण्यात यावे अशी पुरसीस नि.क्रं. 15 वर दाखल केलेली आहे. त.क.ने त्याच्या कथनाच्या पृष्ठयर्थ एकूण 12 कागदपत्रे वर्णन यादी नि.क्रं. 4 प्रमाणे दाखल केलेली आहे व वि.प.ने त्याच्या कथनाच्या पृष्ठयर्थ एकूण 5 कागदपत्रे वर्णन यादी नि.क्रं. 20 प्रमाणे दाखल केलेली आहे. त.क.ने त्याचा लेखी युक्तिवाद दाखल केलेला नाही. वि.प. यांनी त्याचा लेखी युक्तिवाद नि.क्रं. 21 वर दाखल केलेले आहे. युक्तिवादाच्या वेळेस त.क. व त्यांचे प्रतिनिधी हजर. वि.प. व त्यांचे अधिवक्ताचा तोंडी युक्तिवादाच्या वेळेस गैरहजर. त.क.च्या प्रतिनिधी यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेण्यात आला.
वरीलप्रमाणे त.क. व वि.प. यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील कारणमिमांसा पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्रं.
मुद्दे
उत्तर
1
विरुध्द पक्षच्या त्रृटीपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याच्या गोठयास आग लागून झालेल्या नुकसानीस वि.प. जबाबदार आहेत काय ?
होय
2
तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ?
होय
3
अंतिम आदेश काय ?
तक्रार अंशतः मंजूर
: कारणमिमांसा :-
मुद्दा क्रं.1 व 2 बाबतः- त.क. चे शेत मौजा बोडखा येथे सर्व्हे नं. 29/1 मधील असून त्यास विद्युत पंपासाठी विद्युतपुरवठा करण्यात आला आहे हे वादातीत नाही. तसेच वि.प. कंपनीने सन 2011-2012 वर्षी वसंत आगसकांडे यांचे शेतात नविन डी.पी. बसविण्यात आली व त्याच्या डी.पी.साठी गेलेली मोठी लाईनचा एक पोल त.क.च्या विहिरीपासून 20 फुट. अंतरावर उभारलेला आहे हे वादातीत नाही. दि. 19.05.2013 रोजी तुफानी वादळामुळे खांबावरील तार चिमणीसह तुटुन अँगलवर पडून होती हे सुध्दा वि.प. ने नाकारलेले नाही. दि.20.05.2013 ला त.क.च्या गोठयाला आग लागून त्या आगीत शेतीची औवजारे, कवेलू, टीन व इतर वस्तू जळून त.क.चे नुकसान झाले हे सुध्दा वादातीत नाही.
त.क.ची तक्रार अशी आहे की, तुफानी वादळ वा-यामुळे त्याच्या विद्युत खांब्यावरील मधला तार चिमणीसह तुटुन अॅगलवर पडून होता व लाईन दि. 19.05.2013 पासून बंद होती. दि. 20.05.2013 ला वि.प.चे दोन कर्मचारी मौजा बोडखा येथे येऊन शामराव चिंधुजी सोनुले चक्कीवाले यांचे घरासमोर असलेल्या डी.पी.वर फेस टाकून लाईन सुरु केली. परंतु त्यापूर्वी त.क.च्या शेतात तुटलेले ताराची जोडणी न करता सुरु केल्यामुळे विद्युत स्पार्कींग होऊन दुपारी 1.00 वाजताच्या सुमारास आगीच्या ठिणग्या खांबाजवळील गवतावर पडल्याने आग लागून ती पसरत जाऊन त.क.च्या गोठयाला आग लागली व त्यात त्याचे शेतीचे साहित्य व इतर वस्तू असे एकूण रु.70,000/- ते 75,000/-रुपयाचे नुकसान झाले व ती वि.प. कंपनी देण्यास बांधिल आहे.
या उलट वि.प. चे म्हणणे असे की, त.क.च्या शेतातून जाणारी विद्युत वाहिणीवर दि. 20.05.2013 पासून सकाळी 8.15 पासून ब्रेक डाऊन असल्यामुळे विद्युतपुरवठा खंडित होता व त्याच दिवशी सकाळी 9.45 ला समुद्रपूर येथील जिनींग या वाहिनीवरील ए.बी. स्वीच ओपन करुन विद्युत वाहिनीचा पुरवठा फक्त त्याच्यासाठी सुरु केला व त.क.च्या शेतावरुन गेलेल्या वाहिनीचा विद्युतपुरवठा पूर्णपणे बंद होता. त्यामुळे स्पार्कींगमुळे आग न लागता इतर दुस-या कारणावरुन आग लागली असावी असे नमूद केले आहे. त्यामुळे प्रथमतः हे पाहणे जरुरीचे आहे की, त.क.च्या गोठयाला लागलेली आग ही विद्यूत स्पार्कींगमुळे लागली की, इतर कारणामुळे लागली.
वि.प. कंपनीचे सहा. अभियंता यांनी त.क.च्या गोठयाला लागलेल्या आगीची तपासणीकरुन पंचनामा केला व काही लोकांचा जबाब नोंदविला. त्याची झेरॉक्स प्रत मंचासमोर दाखल केलेली आहे. त्या पंचनाम्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, दि. 20.05.2013 रोजी त.क.च्या गोठयाला आग लागली. परंतु त्याच्या रेकॉर्डवर असे दिसून येते की, त्या दिवशी सकाळी 9.45 वाजता श्री. शेळके यानी जिनींग मधून ए.बी. स्वीच ओपन करुन लाईन स्टँड केली. समोर श्री. एस.पी. चौधरी, तंत्रज्ञ व चंदु बेलकर आऊटसौसींग पर्संन माथुर कॉन्ट्रॅक्टर हे दोघे लाईन पेट्रोलींग फॉल्ट शोधत निघाले. त्यानंतर ए.बी.स्वीच दुपारी 12.15 वाजता ओपन करुन समोर बोडखा लाईनवर फॉल्ट बघण्यासाठी निघाले व दुपारी 15.00 वाजता फॉल्टचे निराकरण करुन लाईन सुरु केली असे नमूद केले आहे. परंतु त्याकरिता वि.प.ने सदरील लोकांचे शपथपत्र मंचासमोर दाखल केलेले नाही. तसेच काही लोकांचे जबाब दाखल केले. त्याची झेरॉक्स प्रत दाखल केली. परंतु त्याला पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही. तसेच डेली लॉग शीट रजिस्टर दि.20.05.2013 ची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. परंतु ते सिध्द करण्यासाठी कोणतेही शपथपत्र किंवा संबंधित कर्मचा-याचे शपथपत्र मंचासमोर दाखल केलेले नाही. त्यामुळे वि.प.ने दाखल केलेल्या झेरॉक्स प्रती हया पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही. त्याचप्रमाणे त्याचा विद्युतपुरवठा खंडित होता असे म्हणता येणार नाही.
या उलट त.क.च्या तक्रार अर्जावरुन तसेच पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यावरुन व त.क.ने दाखल केलेल्या फोटो कॉपीवरुन असे दिसून येते की, त.क.च्या विहिरीजवळ असलेल्या पोलाची मधील लाईन तुटलेली होती व त्या दिवशी वि.प.चे कर्मचारी बोडखा गावातील विद्युतपुरवठा दुरुस्त करुन विद्युतपुरवठा सुरु करुन गेले असे दिसून येत नाही. त.क.च्या विहिरीजवळील पोलवरील मधली तार चिमणीसह तुटुन अॅगंलवर पडून असल्यामुळे ती पोलला लागून स्पार्कींग झाल्याचे दिसून येते. ही बाब पोलिसांच्या चौकशीमध्ये सुध्दा आढळून आलेली आहे. समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सदर अहवाल तहसिलदाराकडे सादर केला. त्यामध्ये असे नमूद केले आहे की, त.क.च्या विहिरीजवळील इलेक्ट्रीक लाईनच्या वरची तार दि.20.05.2013 रोजी चिमणीसह खालच्या ताराचे लोखंडी अँगलवर पडल्याने ताराताराचे घर्षन होवून उद्भवलेल्या विस्तवाची ठिणगी खाली जमिनीवर पडल्याने जमिनीवरील कचरा, गवत जळाले व त्यामुळेच बाजुलाच असलेल्या त.क.च्या गोठयाला आग लागून भस्मसात झाले आहे. त्यामुळे मंचासमोर आलेल्या कागदपत्रावरुन व त.क.च्या शपथपत्रावरुन हे निश्चित सिध्द होते की, सदरील आग ही विद्युत स्पार्कींगमुळे झालेली आहे. तसेच त.क.च्या विहिरीजवळ असलेल्या विद्युत मेन लाईनच्या वरचा तार चिमणीसह तुटुन मधल्या लोखंडी अँगलवर पडून असल्याने तार व लोखंडी अॅगंल याच्या घर्षनाने विद्युत स्पार्कींग झाल्याचे दिसून येते. सदर घटना ही मे महिन्यात झालेली असून दुपारी 1.00 वाजता झालेली आहे आणि उन्हाळयाचे दिवस असल्यामुळे निश्चितच शेतातील खांबाजवळील गवत वाळलेले होते व त्यानी ताबडतोब आग पकडल्याचे दिसून येते. म्हणून मंच या निष्कर्षा प्रत येते की, त.क.च्या गोठयाला लागलेली आग ही विद्युत स्पार्कींगमुळे लागली असून इतर कारणामुळे लागलेली नाही. तसेच इतर कारणामुळे लागण्यासाठी आजुबाजूला वस्ती नाही व दुपारच्या वेळेस आग लागण्याचे कोणतेही कारण नाही. त्यामुळे त.क.च्या म्हणण्याप्रमाणे विद्युत स्पार्कींगमुळे आग लागली असावी या निष्कर्षा प्रत मंच येते.
त.क.ला झालेल्या नुकसानीचा विचार करावयाचा झाल्यास पोलिसांनी केलेला पंचनामा व गावक-यांनी केलेला पंचनामा मंचासमोर दाखल केलेला आहे. यावरुन असे दिसून येते की, त.क.च्या गोठयात शेतीची अवजारे, लाकडी वखार, जुने वखार, तसेच कडबा 150 गोणे, कुटार 5 गोणे, गवत असे जळून खाक झालेले आहे. त्याचप्रमाणे सागवणी फाटे, स्प्रीकलर सट पाईप, ड्रीपचे फिल्टर व्हॉल्व , 2 स्प्रे पंप, कवेल व 10 टिणा जळून खाक झालेल्या आहेत. त्याची किंमत त.क.ने पंचनाम्यात नमूद केली ते एकूण 75,000/-रुपये अशी दर्शविलेली आहे. लाकडी वखार, नांगर याची किंमती संबंधी कागदोपत्री पुरावा येणे शक्य नाही. तसेच कडबा व गवळ संबंधी पुरावा येणे शक्य नाही. परंतु ड्रीपचे फिल्टर व्हाल्व, स्प्रीकलर सट पाईट, स्प्रे पंप याची किंमत 42,000/-रुपये दर्शविलेली आहे. परंतु त्यासंबंधीचा कागदोपत्री पुरावा दर्शविण्यात आलेला नाही. पाईप जवळपास 30 दर्शविण्यात आलेले आहे. त्याची किंमत जो पर्यंत कागदोपत्री पुरावा येत नाही तो पर्यंत काढणे अवघड आहे. तसेच कवेलू व टिनाच्या किंमती संबंधी सुध्दा कुठलाही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आलेला नाही. त्यामुळे त्याची किंमत सुध्दा काढणे अवघड आहे. वरील सर्व वस्तू जुन्या व वापरात असल्यामुळे त्याची किंमत नविन वस्तूप्रमाणे येणार नाही. एक मात्र नक्की आहे की, या सर्व वस्तू जळाल्याने त.क.चे नकसान झालेले आहे. 10 टिनाची किंमत प्रत्येकी 500/-रुपये जरी धरली तर 5000/-रुपये होऊ शकते. सर्व्हीस मोटारचे मीटर याची किंमत 5000/-रुपये दर्शविण्यात आली आहे. परंतु हे साहित्य वीज कंपनीचे असल्यामुळे ते त.क.चे नुकसान झाले असे म्हणता येणार नाही. इतर सर्व जळालेल्या वस्तुची किंमत साधारणतः 40,000/-पर्यंत होऊ शकते असे मंचाला वाटते. पंचनाम्यात दर्शविलेली किंमत ही अंदाजित असून ठोस पुरावा नाही. त्यामुळे त्या वस्तुंची किंमत साधारणतः 40,000/-रुपया पर्यंत त.क.ला देणे न्यायोचित होईल असे मंचाला वाटते. तसेच बैलांचा गोठा सुध्दा पूर्णतः जळून खाक झाल्यामुळे त्याची किंमत रुपये 5000/- धरणे मंचाला योग्य वाटते असे एकूण नुकसानभरपाई म्हणून त.क. 45,000/-रुपये मिळण्यास पात्र आहे व ही सर्व नुकसानभरपाई वि.प. कंपनीच्या कृत्यामुळे झालेली असल्यामुळे सदर नुकसानभरपाई वि.प. त.क.ला देण्यास बांधील आहे या निष्कर्षा प्रत मंच येते.
त.क.चा बैलाचा पूर्ण गोठा व शेतीची साहित्य जळाली व त्याची नुकसानभरपाई वेळेवर न मिळाल्यामुळे त.क.ला निश्चितच मानसिक व शारीरिक त्रास झालेला आहे. त्या पोटी वि.प.ने त.क.ला 3,000/-रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून 2,000/-रुपये तक्रारकर्त्यास देणे संयुक्तिक वाटते. म्हणून वरील मुद्दयाचे उत्तर त्याप्रमाणे नोंदविण्यात आलेले आहे.
सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येते.
आदेश
तक्रारकर्त्याची तक्रार अंशत मंजूर करण्यात येते.
विरुध्द पक्ष कंपनीने तक्रारकर्त्याचे आगीत जळालेल्या साहित्याची नुकसानभरपाई म्हणून 45,000/-रुपये आदेश प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आंत द्यावे.
सदर आदेशाचे पालन करण्यात कसूर झाल्यास तक्रारकर्ता सदर रक्कम प्रत्यक्ष रक्कम तक्रारकर्त्याच्या हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याजासह विरुध्द पक्ष कंपनीकडून वसूल करण्यास पात्र राहील.
विरुध्द पक्ष कंपनीने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये 3,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2,000/- द्यावे.
मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात.
निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित
कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात.
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.