जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 01/2011 तक्रार दाखल तारीख- 06/01/2011
निकाल तारीख - 03/ 01/2012
1. अंकुश पि. भगवानराव तौर
वय – 48 वर्षे, धंदा - शेती,
2. सौ.सिंधू भ्र.अंकुश तौर,
वय – 42 वर्षे, धंदा - शेती,
3. अभिजित पि. अंकुश तौर
वय – 22 वर्षे, धंदा – शेती व शिक्षण,
4. अमोल पि. अंकुश तौर
वय – 20 वर्षे, धंदा – शेती व शिक्षण,
सर्व रा.रिधोरी ता.माजलगांव जि.बीड ....... तक्रारदार
विरुध्द
1. अधिक्षक अभियंता,
मंडळ कार्यालय,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. लि.,बीड
2. मुख्य अभियंता,
म.रा.वि.वि.कं.लि.,परिमंडळ कार्यालय, लातूर
3. कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि.कं.लि.,ज्ञानेश्वर नगर, अंबाजोगाई जि.बीड
4. सहाययक अभियंता,
म.रा.वि.वि.कं.लि.,उपविभाग माजलगांव जि.बीड
5. कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
सब स्टेशन, मालीपारगांव,ता.माजलगांव जि.बीड ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – टी.ए.शेख,
सामनेवालेतर्फे – वकील – यु.डी.चपळगांवकर,
।। निकालपत्र ।।
(घोषितद्वारा अजय भोसरेकर – सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हा रा.रिधोरी ता.माजलगाव जि.बीड येथील रहिवाशी असुन तक्रारदार क्र.1 हा एकत्र हिंदु कुटूंबाचा कर्ता आहे. तक्रारदार क्र.1 व 2 हे पत्ती पत्नी असुन 3 व 4 ही त्यांची मुले आहेत. तक्रारदाराचे गट क्रमांक 22 मध्ये 2 हेक्टर 92 आर एवढी बागायत समाईक जमिन असुन गोदावरीच्या जायकावाडी प्रकल्प जलनिसारण बांधकाम क्र.3 यांचेकडून रितसर परवानगी घेवून सामनेवाले यांचेकडून 5 एचपी शेती पंपाचे नियमाप्रमाणे सर्व कागदपत्राची पुर्तता करुन विद्युत कनेक्शन प्राप्त केले. त्याचा ग्राहक क्रं.5865800001551 असा आहे.
तक्रारदाराच्या गट क्रमाक 22 मधुन कवडगावथडी, रिधोरी ते राजेगाव 11 के.व्ही ची मोठी फिडर लाईन गेली असुन त्याचा एक पोल तक्रारदाराचे गट क्र.22 मध्ये आहे. तक्रारदाराने गळीत हंगाम 2010-11 मध्ये ऊसाची लागवड 2 हेक्टर 80 आर मध्ये केली आहे. तक्रारदाराने ऊसाचे उत्पन्न चांगले प्राप्त व्हावे म्हणुन रासायनिक, शेद्रीय खतांचा व औषध, खुरपनी व मशागत आणि पाणी देवून तक्रारदाराचा ऊस हा 25 कांडयापर्यन्त वाढ झाली होती, असे म्हंटले आहे.
दि.27.9.2010 रोजी दुपारी स्पार्किंग होऊन 11 केव्ही लाईनमधील पहिली फेज तार तुटुन उभ्या पिकात पडली. त्यामुळे तक्रारदाराचे 500 टन ऊसाचे एकुण 8,00,000/- रुपयाचे नुकसान झाले. त्यामुळे तक्रारदारांने तहसिलदार, मालजगांव, तालुका कृषि अधिकारी, विद्युत निरिक्षक, व पोलीस स्टेशन, माजलगांव ग्रामीण यांचेकडे लेखी तक्रार केली. तहसिलदार माजलगांव यांनी दि.28.09.2010 घटनास्थळाचा पंचनामा केला. दि.29.9.2010 रोजी तालुका कृषिअधिकारी, यांनी पंचनामा केला. विद्युत निरिक्षक, बीड यांनी 11 केव्ही राजेगाव फिडर लाईन दि.27.9.2010 रोजी एक फेज वायर तुटून दुस-या वायरीस स्पर्श होऊन स्पार्किंग झाली व त्याच्या ठिणग्या तक्रारदाराचे ऊसावर पडल्यामुळे ऊस जळाला. त्यास सामनेवाले जबाबदार आहेत असा अभिप्राय दिला. याचे बाबत दि.1.11.2010 रोजी तक्रारदाराने सामनेवाले यांना कळविले.
तक्रारदाराने ऊस जळीत नकसान भपाईपोटी रक्कम रु.8,00,000/- द.सा.द.शे.12 टक्के तक्रार दाखल तारखेपासुन व मानसिक, शारीरिक, आर्थीक व दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु.2,00,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदारानी आपले म्हणणेचे पुष्ठयार्थ एकुण 13 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले यांनी आपले लेखी म्हणणे दि.30.5.2011 रोजी दाखल केले असुन तक्रारदार हा त्यांचा ग्राहक आहे हे त्यांना मान्य आहे. दि.27.5.2010 रोजी 11 केव्ही राजेगाव फिडर लाईनची तार तुटून एकमेकास स्पर्श होऊन स्पार्कीग होवून तक्रारदाराचे ऊसात ठिनग्या पडून तक्रारदाराचा ऊस जळाल्याची घटना ही मान्य आहे. परंतु तक्रारदाराची नुकसान भरपाई देण्याची कोणतीही जबाबदारी आमच्यावर नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी मागणी सामनेवाले यांनी केलेली आहे.
सामनेवाले यांनी आपले लेखी म्हणणेच्या पुष्ठयार्थ अन्य कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाले यांचे लेखी म्हणणे दोघांचा तोंडी युक्तीवाद ऐकल्या व त्याचे बारकाईने अवलोकन केले.
तक्रारदाराने दाखल केलेला कृषिअधिका-यांचा पंचनामा, पोलीस पंचनामा, तहसिल पंचनामा, विद्युत निरिक्षक यांचे अहवाल बारकाईने आवलोकन केले असता विद्युत निरिक्षक यांनी दि. 27.9.2010 रोजी सामनेवाले यांची 11 केव्ही राजेगांव फिडरची लाईनमधील एक फेजतार तुटल्यामुळे ती दुस-या फेजतारेवर स्पर्श झाल्याने मोठया प्रमाणावर स्पार्किंग होऊन तक्रारदाराचे गट क्रमांक 22 मधील परिपक्व ऊसावर ठिनग्या पडून ऊस जळाला या बद्दल भा.वि.नि.156 च्या नियम क्रमांक 29 चा भंग केला असल्यामुळे सामनेवाले हे तक्रारदाराचे नुकसानीस जबाबदार आहेत असे निष्कर्ष विद्युत निरिक्षक यांनी दि.1.11.2010 रोजी सामनेवाले क्र.3 यांना कळविल्याचे पत्र न्यायमंचात दाखल केले आहे.
तक्रारदार हा जय भवानी सहकारी साखर कारखान्याचा सभासद असुन त्याचे ऊसाची नोंद प्रमाणपत्र दाखल केले आहे. तसेच तक्रारदाराने एकरी उत्पन्न 50 टन घेत असल्या बद्दलचे कारखान्याचे पत्र दाखल केले आहे. त्या ऊसाचा दर प्रतिटन दर रु.1750/- या प्रमाणे 2 हेक्टर 80 आर चे 350 टन याचे एकुण रु.6,12,500/- एवढे नुकसान झाल्याचे प्रमाणपत्र तक्रारदाराने दाखल केले आहे. तक्रारदार हा गोदावरी नदीतील जलनिसारण बांधकाम विभाग क्र.3 यांच्या परवानगीचे मुळ प्रमाणपत्र दाखल केले आहे.
सामनेवाले यांनी तक्रारदाराने उपरोक्त दाखल कागदपत्रास कोणतेही आव्हाण देणारे पत्र या न्यायमंचात किंवा सक्षम न्यायालयासमोर दिल्याचा भारतीय पुरावा कायदयानुसार योग्य असणारा पुरावा या न्यायमंचात दाखल केला नाही. म्हणजेच तक्रारदाराची तक्रार व त्याचे झालेले नुकसानीस सामनेवले हे जबाबदार आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदारास सदर नुकसान भरपाई वेळेत न देवून सेवेत त्रूटी केली आहे सिध्द होते.
सबब, हे न्याय मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांचे स्पार्किंग होऊन जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाईची रक्कम रु.6,12,500/- (अक्षरी रुपये सहा लाख बारा हजार पाचशे फक्त) आदेश प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्रमांक 2 चे पालन मुदतीन न केल्यास त्यावर तक्रार दाखल तारखे दि.6.1.2011 पासुन तक्रारदाराचे रक्कम पदरीपडेपर्यन्त द.सा.द.शे.9 टक्के व्याज देण्यास सामनेवाले जबाबादार राहतील.
4. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/-(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) आदेश मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 कलम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावेत.
( अजय भोसरेकर ) ( पी.बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, लातूर