जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.129/2008. प्रकरण दाखल दिनांक – 02/04/2008. प्रकरण निकाल दिनांक – 07/08/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायसिंह राणे. अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते सदस्य. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर. सदस्या. विश्वनाथ पि.गोविंदराव जायभाये, अर्जदार. वय वर्षे 30, धंदा शेती, रा.बोरी (खु) ता.कंधार जि.नांदेड. विरुध्द. 1. अधिक्षक अभियंता, गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि, विद्युत भवन, नांदेड. 2. सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि, उपवीभाग लोहा ता.लोहा जि.नांदेड. 3. कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि, माळाकोळी ता.लोहा जि.नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.जी.बी.हांडे. गैरअर्जदार क्र.1 ते 3 - अड.व्ही.व्ही.नांदेडकर. निकालपत्र (द्वारा मा.श्री.विजयसिंह नारायसिंह राणे,अध्यक्ष) यातील अर्जदार विश्वनाथ जायभाये यांची तक्रार थोडक्यात अशी की, त्यांचे घर हे पत्नी रंजनाबाईचे नांवाने आहे. त्यांचे नांवे विज कंपनीचे मिटर असुन ते ग्राहक आहेत. त्यांची थकबाकी नाही, त्यांनी दि.02/02/2008 रोजी रु.9,000/- देवुन एक छोटी पीठाची गिरणी तीन अशवशक्तीची विकत घेतली व दि.20/02/2008 रोजी दुरुस्त करुन घेतली व रु.1,600/- खर्च केला. त्यांचे पत्नीच्या नांवे ग्रामपंचायतकडे नाहकरत प्रमाणपत्र मिळावे म्हणुन अर्ज केला. दि.02/02/2008 रोजी ठराव क्र.6 प्रमाणे नाहरकत प्रमाण दिले तेही त्याच तारखेला दिले. दि.02/02/2008 रोजी त्यांच्या पत्नीने विज कंपनीचे लाईनमन अंगत यांचेकडे विज पुरवठा मिळणेसाठी अर्ज केला, कागदपत्र दिले आणि रु.7,000/- कोटेशन व इतर खर्चासाठी दिले. दि.23/03/2008 रोजी त्यांनी त्यांचेकडे पुन्हा विचारणा केली असता, अद्यापर्यंत विज पुरवठा का चालु करण्यात आला नाही, तेंव्हा विज कंपनीचे संबंधीत अधिकारी तेथे आले व तुमच्या पत्नीचा अर्ज मिळाला आहे, विज पुरवठा चालु करण्यासाठी आम्ही आलो व तीन व्यक्तिंची सही पाहीजे असे सांगुन श्री.गोरख कांबळे, जळबा जायभाये व पंढरी जायभाये यांच्या सहया घेतल्या. परंतु मजकुर वाचुन दाखविला नाही. दि.26/02/2008 रोजी रु.16,828.56 चे व रु.1,00,000/- चे कंपाऊंडींग चार्जेसचे असे पाच अश्वशक्तीचे मिटर दाखवून, बिल दिले. त्यांचेकडे पाच अश्वशक्तीची मोटर नाही व त्यांचा 1890 युनिट वापर नाही. दि.05/03/2008 पर्यंत रक्कम भरण्यास सांगितले, म्हणुन सदरचे बिल बेकायदेशिर व ते भरण्याची त्यांची जबाबदारी नाही. म्हणुन त्यांनी ही तक्रार दाखल करुन तीद्वारे सदरचे बेकायदेशिर बिल खोटे ठरवून रद्य करावे अशी मागणी केली आहेत. यात गैरअर्जदारांना नोटीस देण्यात आली. त्यांनी हजर होऊन आपला लेखी जाबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे असे की, अर्ज गैरकायदेशिर आहे. चुकीच्या व्यक्तिंना यात प्रतिपक्ष करण्यात आले आहे. अर्जदार हे कमी दाबाचे लाईनवर 250 फुट लांबीचे थ्रीफेजचे वायर डायरेक्ट टाकुन कनेक्शन घेऊन त्यानुसार विज वापर पिठ गिरणसाठी करतांना आढळुन आलेला आहे. सदरचे प्रकरण हे रहिवाशी विज जोडणी संबंधात नसुन गिरणीसाठी चोरुन विज घेऊन विज वापर केल्यासंबंधीचा आहे. याबाबत गैरअर्जदारांनी फिर्याद दाखल केलेली आहे. अर्जदाराने विजेच्या खांबावरुन सरळ पिठाच्या गिरणीसाठी अनाधिकृत विज चोरली आहे. अर्जदाराच्या विरुध्द गुन्हा क्र.3129/08 दाखल असुन ते तपासात आहे. ज्या तारखेस मोटर घेतली त्याच तारखेस प्रमाणपत्र घेतले हे सर्वर्स्वी खोटे व चुकीचे आहे. त्यांनी लाईमनकडे अर्ज, कागदपत्र व रु.7,000/- दिले हे म्हणणे खोटे आहे. पत्नीच्या नांवाने विज पुरवठयाची मागणी केल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. दि.23/02/2008 रोजीच्या कथीत घटनेबाबतचा सर्व मजकुर त्यांनी नाकबुल केला. त्यांनी दिलेले बिल बरोबर आहे व कायदेशिर आहे. अर्जदाराची तक्रार सदभावी नाही ती खारीज व्हावी, असा उजर घेतला. अर्जदार यांनी आपल्या तक्राअर्जासोबत यादीप्रमाणे दस्तऐवज दाखल व शपथपत्र दाखल केले. गैरअर्जदार यांनी आपल्या जबाबासोबत यादीप्रमाणे दस्तऐवज व शपथपत्र दाखल केले. अर्जदारा तर्फे युक्तादाच्या वेळी कोणीही हजर नाही. गैरअर्जदार यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. यातील अर्जदार याचे म्हणण्याप्रमाणे त्याने दि.02/02/2008 रोजी पिठाची गिरणी विकत घेतली आहे. विज पुरवठा मिळावा म्हणुन त्याचेच म्हणण्याप्रमाणे त्याच दिवशी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला ग्रामपंचायत सुध्दा अतीशय तत्पर दिसते जीने त्याच दिवशी सभा घेऊन ठराव क्र.6 प्रमाणे नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे ठराव मंजुर केला आणि लगेच त्याच दिवशी विज पुरवठा घेण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले. लगेच अर्जदाराने त्याच दिवशी त्या भागातील लाईनमन अंगद यांचेकडे पिठाची गिरणी चालविण्यासाठीचा अर्ज,नाहरकत प्रमाणपत्र आणि ठराव क्र. 6 ची प्रत जोडुन दिले आणि रु.7,000/- सुध्दा कोटेशन व इतर खर्चासाठी दिले, हा सगळा घटनाक्रम सकृतदर्शनी अविश्वसनीय दिसतो. यातील अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजामध्ये पिठाची गिरणी विकत घेतल्याचे दस्तऐवज हे त्याच दिवशी स्टँम्प पेपरवर नांदेड येथे नोटरी समक्ष केल्याचे दर्शविले आहे. ग्रामपंचायतीने एकाच दिवशी ही कार्यवाही केली, ज्या दिवशी अर्जदाराने पिठाची गिरणी विकत घेतलेली आहे आणि अर्जदाराने त्याच दिवशी विज पुरवठा करण्याचा अर्ज संबंधीत कार्यालयात न देता लाईनमन जवळ दिला. या सगळया बाबीं अविश्वसनीय आहेत हे उघड आहे. हे सर्व तथाकथीत दस्तऐवज अर्जदाराने त्यांचेच म्हणण्याप्रमाणे संबंधीत लाईनमन जवळुन परत घेऊन मंचात दाखल केलेले आहेत. सर्व सामान्य परिस्थितीत असा घटनाक्रम घडत नाही. असे दिसते की, अर्जदार यांनी विजेची चोरी केली याबाबत तक्रार झाल्यानंतर विज कंपनीच्या कर्मचा-यांनी कार्यवाही केली आणि त्यानंतर स्वतःच्या बचावार्थ अर्जदाराने कायदयाचा गैर फायदा उचण्याच्या दृष्टीने हे प्रकरण अशा स्वरुपाचे कथीत पुराव्यासह दाखल केला आहे. तसेच गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या म्हणण्याचे, अर्जदारांनी प्रती उत्तर देऊन गैरअर्जदाराचे म्हणणे खोडले नाही. याप्रकरणांत गैरअर्जदाराने फिर्याद दाखल करुन गुन्हा नोंदविला असे दिसुन येते, यासंबंधीचे दस्तऐवज गैरअर्जदाराने दाखल केले आहे. सदर प्रकरणा अर्जदार हे विज वितरण कंपनीचे ग्राहक नाही. याचे कारण या प्रकरणांत अर्जदार यांनी पिठाची गिरणी चालविण्यासाठी विजेच्या तारेवर आकोडे टाकुन विजेची चोरी केली आहे असा गैरअर्जदाराचा आक्षेप आहे आणि या त्यांच्या आक्षेपात तथ्य आहे हे यापुवीच्या परिच्छेदात नमुद करण्यात आले आहे. थोडक्यात सदरचे प्रकरण सदभावी नाही आणि ग्राहक संरक्षण कायदाचा गैर फायदा उचण्याच्या दृष्टीने अर्जदाराने दाखल केलेले आह हे उघड आहे. अर्जदाराने त्यास देण्यात आलेल्या बिलावर ग्राहक क्रमांक, जो त्यांचा घरगुती विज वापरासंबंधीचा असल्याचा फायदा उचलुन स्वतः ग्राहक संबोधून ही तक्रार दाखल केल्याचे दिसते. वास्तविक पहाता घरगुती वापराचा व या प्रकणांत घडलेल्या घटनाक्रमाचा कोणताही संबंध नाही हे संबंधीत अधिका-यास कळावयास पाहीजे होते परंतु त्यांच्या या चुकीसाठी अर्जदारास ग्राहक समजण्यात येणे शक्य नाही व हे प्रकरण खारीज होण्यास पात्र आहे. वरील सर्व परिस्थितचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज खारीज करण्यात येतो. 2. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांन विशेष नुकसानी दाखल ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 26 प्रमाणे निरर्थक खटला दाखल करुन गोवल्याबद्यल रु.10,000/- द्यावे. 3. आदेशाचे पालन एक महिन्यात करावे. 4. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे)(श्रीमती.सुजाता पाटणकर)(श्री.सतीशसामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार, लघुलेखक. |