निकालपत्र
( पारीत दिनांक :18/09/2013 )
( द्वारा मा. अध्यक्ष श्री.मिलींद बी पवार (हिरुगडे) )
1. तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्ष 1 ते 3 यांच्या विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये प्रस्तुत तकार दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्त्यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, .............
तक्रारकर्ते हे वर्धा येथील रहिवासी असून वि.प. ही फायनान्स कंपनी आहे व ती ठेवी स्विकारण्याचे, कर्ज वितरीत करण्याचे व इतर ही कामे हाताळते. विरुध्द पक्ष 3 ही सदर कंपनीची शाखा आहे. तक्रारकर्त्यांनी खालील प्रमाणे विरुध्द पक्ष यांच्या कंपनीत रक्कम जमा केलेली आहे.
अ.क्र. | नांव | पावती क्रं. | तारीख | जमा केलेली रक्कम |
01 | संघमित्रा लक्ष्मण भुजाडे | 385 | 17.08.05 | 18000 |
02 | लक्ष्मण महादेवराव भुजाडे | 386 | 17.08.05 | 18000 |
03 | संघमित्रा लक्ष्मण भुजाडे | 387 | 18.08.05 | 18000 |
04 | मयूर लक्ष्मणराव भुजाडे | 388 | 18.08.05 | 10000 |
05 | संघमित्रा लक्ष्मण भुजाडे | 389 | 19.08.05 | 18000 |
06 | संघमित्रा लक्ष्मण भुजाडे | 390 | 19.08.05 | 18000 |
| 1,00,000 |
उपरोक्त वरील रक्कम त.क. यांनी 78 महिन्याच्या मुदत ठेवी करिताच ठेवली होती व त्याची परिपक्वता ता. 19.02.2012 होती. त्याप्रमाणे तक्रारकर्त्यांनी परिपक्वता तारखेनंतर उपरोक्त रक्कमेची विरुध्द पक्ष यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी सदर रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. परिपक्वता तारखेनंतर तक्रारकर्त्यांना विरुध्द पक्ष यांनी रु.2,00,000/- परत करणे आवश्यक होते. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याची परिपक्वता तिथी नंतर ही मुदत ठेवीची रक्कम परत न करणे ही वि.प.यांची दोषपूर्ण सेवा दर्शविते.
तक्रारकर्त्यांनी वांरवांर मागणी करुन ही विरुध्द पक्ष यांनी त्यांची ठेवीची रक्कम परत केली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव तक्रारकर्त्याला वकिला मार्फत नोटीस पाठवावी लागली. त्यावर ही विरुध्द पक्षाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आपल्या हक्काची रक्कम प्राप्त करण्यासाठी त्याला सरतेशेवटी मंचासमक्ष तक्रार दाखल करणे भाग पडले.
3 विरुध्द पक्ष यांना मंचा तर्फे नोटीस काढण्यात आली. सदरची नोटीस गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांनी स्विकारली नाही. म्हणून Refused असा पोस्टाचा शेरा मारुन परत आली. ती नि.क्रं. 6/1 ते 6/3 कडे दाखल आहे. त्यामुळे गैरअर्जदार 1 ते 3 यांचेवर नोटीसची बजावणी झाली आहे असे समजण्यात येते. तरीही गैरअर्जदार हे मंचासमक्ष हजर झाले नाही. त्यामुळे प्रकरण गैरअर्जदार यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्यात यावे, असा आदेश निशाणी क्रं. 1 वर पारीत करण्यात आला.
4 अर्जदाराने तक्रार अर्जातील कथनाचे पृष्ठयर्थ निशाणी 5 कडे 6 कागदपत्रे दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश निशाणी 1 वर पारीत केलेला असल्यामुळे उपलब्ध कागदपत्र, तसेच अर्जदाराची तक्रार, त्यांचे वकिलांचा युक्तिवाद व प्रतिज्ञापत्र यावरुन सदर प्रकरण निकाली करणे करिता ठेवण्यात आले.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारकर्त्याच्या वकिलाचा युक्तिवाद इत्यादींचे बारकाईने अवलोकन केले असता सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे गैरअर्जदार ग्राहक होतात काय ? होय.
2. गैरअर्जदार यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात त्रुटी केली आहे काय ? होय.
3. तक्रारदाराने केलेल्या मागण्या मंजूर होण्यास पात्र आहेत काय ? होय, अंशतः
4. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे.
मुद्दा क्र.1 अर्जदाराने निशाणी 7 नुसार प्रतिज्ञापत्रावर पुरावा दाखल केलेला आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार ठेवी ठेवलेल्या आहेत हे नि.क्रं. 5/1 ते 5/6 वरील ठेव पावत्यांचे प्रतीवरुन दिसून येते. गैरअर्जदार यांनी हजर राहून व म्हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार खोडून काढलेली नाही. सबब तक्रारदार 1 ते 3 हे गैरअर्जदार 1 ते 3 यांचे ठेवीदार ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.2 अर्जदार हे एकाच कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी वेगवेगळया नांवे गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांचेकडे दि. 17.08.05 ते 19.08.2005 पर्यंत एकूण रु.1,00,000/- खालीलप्रमाणे जमा केल्याचे नि.क्रं. 5/1 ते 5/6 वरील पावत्यावरुन दिसून येते.
अ.क्र. | नांव | पावती क्रं. | तारीख | जमा केलेली रक्कम | मुदतीनंतर मिळणारी रक्कम | मुदत संपलेली तारीख |
01 | संघमित्रा लक्ष्मण भुजाडे | 385 | 17.08.05 | 18000 | 36000 | 17.02.12 |
02 | लक्ष्मण महादेवराव भुजाडे | 386 | 17.08.05 | 18000 | 36000 | 17.02.12 |
03 | संघमित्रा लक्ष्मण भुजाडे | 387 | 18.08.05 | 18000 | 36000 | 18.02.12 |
04 | मयूर लक्ष्मणराव भुजाडे | 388 | 18.08.05 | 10000 | 20000 | 18.02.12 |
05 | संघमित्रा लक्ष्मण भुजाडे | 389 | 19.08.05 | 18000 | 36000 | 19.02.12 |
06 | संघमित्रा लक्ष्मण भुजाडे | 390 | 19.08.05 | 18000 | 36000 | 19.02.12 |
| 1,00,000 | 2,00,000 | |
वरील प्रमाणे मुदतीनंतर म्हणजेच सर्वसाधारणपणे दि. 19.02.2012 नंतर अर्जदार यांना एकूण रुपये 2,00,000/- मिळणार होते. मुदतीनंतर अर्जदार यांनी देय रक्कम व्याजावर मिळण्याबाबत गैरअर्जदार यांच्याकडे मुळ कागदपत्रे जमा केली व पाठपुरावा केला. परंतु वेळोवेळी गैरअर्जदार यांनी सदर रक्कम देण्यास टाळाटाळ केली. प्रस्तुत प्रकरणाची नोटीस मिळूनही गैरअर्जदार 1 ते 3 यांनी अर्जदार यांची रक्कम तर दिली नाहीच किंवा वि.मंचात हजर झाले नाहीत. त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दोषपूर्ण सेवा दिलेली आहे असे न्यायमंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्रं. 1 याचे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्र.3 अशा त-हेने अर्जदार हे आपल्या न्याय हक्कासाठी व ठेवीची रक्कम परत मिळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे, हे सर्व कागदपत्रांवरुन दिसून येते. मात्र तरीही गैरअर्जदार यांनी रक्कम परत देण्याची कोणतीही कृती केली नाही. एवढेच नव्हे तर वि. मंचाची नोटीस मिळूनही या मंचासमक्ष हजर राहून आपले म्हणणे मांडण्याची तसदी गैरअर्जदार यांनी घेतली नाही. यावरुन गैरअर्जदार यांची नकारात्मक मानसिकता दिसून येते.
सर्वसामान्य नागरीक आपली बचत केलेली रक्कम काहीतरी उद्देशाने मुदती ठेवीमध्ये ठेवत असतात. परंतु मुदतीनंतर किंवा ऐनवेळी गरज पडल्यास सदर रक्कमेची मागणी करताच जर सदर रक्कम मिळाली नाही तर ठेवीदारांचा भ्रमनिरास होतो. या बाबत गैरअर्जदार सारख्या वित्तीय कंपनीवर बंधनकारक असे कडक स्वरुपात कायदेशीर तरतुदीची आवश्यकता आहे.
वरील सर्व विवेचनावरुन मंचाचे स्पष्ट मत आहे की, गैरअर्जदारयांनी अर्जदार यांची रक्कम वेळीच परत केली असती तर ती त्यांचे उपयोगी पडू शकली असती. परंतु गैरअर्जदार यांनी ती रक्कम परीपक्वतेनंतर म्हणजेच मुदतीनंतर वेळेतच न दिल्याने गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दुषित व त्रुटीची सेवा दिली असल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे अर्जदाराचे परिपक्वता रक्कम तसेच परिपक्वता रक्कमेवर परिपक्वता तारखेपासून पासून दरसाल दरशेकडा 10 टक्के दराने व्याज मिळण्यास अर्जदार पात्र आहे, असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
अर्जदार यांना मुदतीनंतर वेळेत रक्कम न मिळाल्यामुळे झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 2000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 1000/- मंजूर करावे, असे मंचास न्यायोचित वाटते.
एकंदरीत वरील कारणे व निष्कर्ष यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात न्यूनता केली असल्याचे निर्णयाप्रत हे मंच आलेले असल्याने खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अं ति म आ दे श //
1. अर्जदार 1 ते 3 यांची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांनी अर्जदार क्रं. 1 ते 3 यांची रक्कम वेळीच परत न करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे.
3. गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्याअर्जदार क्रं. 1 ते 3 यांची मुदतीनंतर होणारी रक्कम रुपये 2,00,000/-(रु.दोन लाख) व त्यावर मुदतीनंतर म्हणजेच दिनांक 19/02/2012 पासून संपुर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे.10% दराने व्याजासह संपूर्ण रक्कम द्यावे.
4. गैरअर्जदार क्रं.1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्याअर्जदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 2000/- (रुपये दोन हजार) व तक्रार अर्जाचा खर्च रु.1000/-(रुपये एक हजार) द्यावे.
5. गैरअर्जदार क्रं.1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्यावरील आदेशाचे पालन, आदेश पारीत झाल्यापासून 30 दिवसात करावे, अन्यथा उपरोक्त कलम 3 मध्ये नमुद केल्याप्रमाणे दिनांक 19/02/2012 पासून पुर्ण रक्कम
देईपर्यंत द.सा.द.शे.10% ऐवजी 13% प्रमाणे व्याज द्यावे लागेल, याची नोंद घ्यावी.
6. मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधीतांनी परत घेवुन जाव्यात.
7. निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व उचित
कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात