(मंचाचे निर्णयान्वये, अधि. वर्षा जामदार, मा. सदस्या) (पारीत दिनांक : 31.10.2011) अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. गैरअर्जदार क्र.1 ही एक मर्यादीत पत संस्था असून, बँकेचा व्यवसाय करते. गैरअर्जदार इतर बँकेपेक्षा चांगल्या व्याज दराने रक्कम परत करीत असल्यामुळे, त्या संस्थेमध्ये लोक पैसे जमा ठेवू लागले. म्हणून, अर्जदाराने सुध्दा गैरअर्जदाराच्या संस्थेमध्ये दि.6.5.2008 ला रुपये 55,000/- रक्कम 36 महिन्यासाठी 12 % च्या व्याज दाराने मुदत ठेव म्हणून गैरअर्जदाराकडे जमा केले. मुदतीनंतर ती रक्कम व्याजासहीत रुपये 74,800/- अर्जदाराला मिळणार होते. सदर ठेवीची मुदत दि.5.5.2011 ला पूर्ण होणार होती. अर्जदाराचे खाते क्र.40 व लेजर क्र.40 आहे. त्याबद्दल, अर्जदारास गैरअर्जदार पत संस्थेने मुदत ठेव प्रमाणपञ दिले व गैरअर्जदारांनी, अर्जदारास इतर कोणतीही दस्तऐवज दिले नाही. अर्जदाराने फेब्रुवारी 2011 ला त्याच्या मुलाचे शिक्षणासाठी पैशाची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे, गैरअर्जदार पत संस्थेत जमा असलेली मुदत ठेव रक्कम परत मिळण्याकरीता गैरअर्जदारांच्या संस्थेमध्ये त्यांचे मुदत ठेवीची रक्कम परत मागितली व त्यांना सांगितले की, व्याज कमी-जास्त झाले तरी चालेल मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशाची गरज आहे. परंतु, पत संस्थेच्या अधिकारी किंवा अध्यक्षांनी योग्य माहिती दिली नाही व कोणताही अर्ज किंवा कागदपञ घेतले नाही, ब-याचदा ही संस्था बंद राहत होती. शवेटी अर्जदाराने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना, या संबंधी तक्रार अर्ज दिला. पण, त्यांनी सुध्दा उत्तर दिले नाही. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.1, 2 यांना अधि.सुरेश पर्वतालु दुर्गम यांच्या मार्फत दि.15.4.2011 ला नोटीस पाठविला. पण, तो नोटीस गैरअर्जदारांनी न घेतल्याने परत आले. गैरअर्जदार क्र.1 ला पाठविलेल्या नोटीसवर ‘‘कोणाचेही नाव नसल्यामुळे सबब सेंडरला परत’’ व इंग्रजी मध्ये “Not known return to sender” असे लिहून परत आले व गैरअर्जदार क्र.2 ला पाठविलेल्या नोटीसवर “Not claim return to sender” असे लिहून परत आले. अर्जदाराला रक्कम मागूनही पैस न मिळाल्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार दाखल केली. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अवलंबलेली पध्दती ही अनुचित व्यापार पध्दती असल्याने, दिलेली सेवा न्युनतापूर्ण सेवा आहे असे ठरविण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अर्जदाराने जमा केलेली रक्कम रुपये 55,000/- व 36 महिन्याची मुदत पूर्ण झाल्यामुळे पूर्ण रक्कम 12 % व्याजासहीत रुपये 74,800/- परत देण्याचा आदेश गैरअर्जदारांविरुध्द देण्यात यावा, तसेच, विद्यमान मंचाचा निकाल लागतपर्यंतचे मुदत ठेव रकमेवर 12 % व्याज अर्जदारास मिळण्याबाबत, आदेश पारीत करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. अर्जदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी रुपये 10,000/- नुकसान भरपाई गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदाराला द्यावी. अर्जदारास आलेला नोटीस व केसचा खर्च रुपये 5000/- गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेवर लादण्यात यावा, अशी मागणी केली आहे. 2. अर्जदाराने तक्रारीसोबत निशाणी क्र.4 नुसार 8 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 नोटीस तामील होऊनही हजर झाले नाही. गैरअर्जदार क्र.2 ने, निशाणी क्र.17 प्रमाणे हजर होऊन, उत्तर देण्यास वेळ मागितला. परंतु, वेळ देऊनही उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे, निशाणी क्र.1 वर गैरअर्जदारांविरुध्द नो डब्ल्यु.एस./नो रिप्लाय आदेश दि.3.10.2011 रोजी पारीत करण्यांत आला. अर्जदाराने नि.22 नुसार मुळ तक्रारीला रिजॉईन्डर/शपथपञ समजण्यात यावे, अशी पुरसीस दाखल केली. गैरअर्जदारानी शपथपञ न दाखल केल्यामुळे, निशाणी क्र.1 वर उपलब्ध रेकॉर्डवरुन तक्रार गुणदोषावर निकाली काढण्याकरीता ठेवण्यात यावे, असा आदेश दि.11.10.2011 ला पारीत करण्यांत आला. अर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज व त्यांचे वकीलानी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष // 3. अर्जदाराने आपल्या तक्रारीत गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 ला जोडले होते. गैरअर्जदार क्र.1 व 2 ला नोटीस तामील झाला. परंतु, गैरअर्जदार क्र.3 चा पत्ता मिळाला नाही व नोटीस तामील झाला नाही. प्रकरण बरेच काळ या कारणाने प्रलंबित असल्याने, अर्जदाराने निशाणी क्र.21 नुसार अर्ज करुन, गैरअर्जदार क्र.3 ला तक्रारीतून वगळण्यात यावे, अशी विनंती केली. अर्जदाराची विनंती मंजूर करुन दि.21.9.2011 ला गैरअर्जदार क्र.3 ला वगळण्याचा आदेश पारीत करण्यांत आला. 4. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.1 कडे दि.6.5.2008 ला रुपये 55,000/-, 36 महिन्यासाठी मुदत ठेव म्हणून ठेवली. त्यावर 12 % व्याज देण्याचे गैरअर्जदारानी कबूल केले. निशाणी क्र.4 अ-1 वर गैरअर्जदार मार्फत देण्यात आलेली रक्कम रुपये 55,000/- ची पावती दाखल आहे. सदर पावती वरुन असे दिसते की, सदर रक्कम दि.5.5.2011 ला व्याजासह रुपये 74,800/- अर्जदाराला देय होती. अर्जदाराला त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी रक्कम परत हवी असल्यामुळे, अर्जदाराने फेब्रुवारी 2011 मध्ये रक्कम परत मागितली व त्यावरील व्याज कमी-जास्त झाले तरी चालेल, असे सांगितले. परंतु, गैरअर्जदार क्र.1 व 2 ने रक्कम परत दिली नाही. नोटीस पाठवून ही गैरअर्जदार क्र.2 ने तो Claim केला नाही, त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदारांविरुध्द सदर तक्रार दाखल केली. गैहरअर्जदार क्र.1 तक्रारीत हजर झाले नाहीत. परंतु, गैरअर्जदार क्र.2 ने हजर होऊन नि.17 प्रमाणे अर्ज सादर केला व गैरअर्जदार 2 चे उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला. ह्या अर्जामध्ये गैरअर्जदार क्र.2 ने संस्थेचे सचीव यांनी अफरातफर केल्याचे म्हटले आहे. सदर अर्जावरुन हे स्पष्ट होते की, अर्जदाराची मुदत ठेव रक्कम संस्थेव्दारे स्विकारण्यात आली होती व त्यानंतर, त्यामध्ये अफरातफर झाली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे म्हणणे उत्तर देऊन कुठेही नाकारले नाही. त्यामुळे, अर्जदाराचे म्हणणे ग्राह्य धरण्याजोगे आहे. गैरअर्जदार क्र.2 ला योग्य संधी देऊनही उत्तर दाखल केले नाही. निशाणी क्र.4 अ-1 वरील पावतीनुसार अर्जदाराला व्याजासह रुपये 74,800/- गैरअर्जदारांकडून घेणे आहे, ही बाब स्पष्ट होते. अर्जदाराने मुदतीच्या आधीच आपली जमा रक्कम परत मागितली होती. परंतु, आवश्यकता असतांना अर्जदाराला ते पैसे मिळाले नाही व नंतर ही मिळाले नाही. त्यामुळे, अर्जदाराला नाहक शारिरीक, आर्थिक व मानसिक ञास सोसावा लागला. त्यासाठी संपूर्णपणे गैरअर्जदार क्र.1 व 2 जबाबदार आहे, ह्या निर्णया पर्यंत हे न्यायमंच आले असून, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर. (2) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने, अर्जदाराला रुपये 74,800/-, 30 दिवसाचे आत द्यावे. न दिल्यास आदेश पारीत दिनांकापासून पदरी पडेपर्यंत 9 % व्याज त्यावर द्यावे. (3) अर्जदाराला शारिरीक, मानसिक व आर्थिक ञासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- गैरअर्जदार क्र.1 व 2 ने संयुक्तरित्या द्यावे. (4) सर्व पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी. |