निकाल
(घोषित दि. 05.04.2017 व्दारा श्री.सुहास एम.आळशी, सदस्य)
तक्रारदार हा जालना, ता जि. जालना येथील रहिवासी आहे. तक्रारदाराचे राहते घरामध्ये गैरअर्जदार यांच्याकडुन घेतलेले घरगुती वापराचे वीज कनेक्शन आहे. त्याचा ग्राहक क्र. 510030298649 व मिटर क्र. 9803412717 हा आहे. तक्रारदाराचे म्हणण्यानुसार तो नियमितपणे वीज बील भरणारा ग्राहक आहे, त्याचेकडे माहे एप्रिल 2016 पर्यत गैरअर्जदार यांची थकबाकी नाही. त्याला दरमहिन्यात सरासरी 135 ते 155 युनिटचे देयक येते. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास माहे मे 2016 मध्ये 1019 युनिटचे रु. 12909/-.चे देयक दिले, ते त्याला मान्य नसल्याने तक्रारदाराने दि.20/06/2016 रोजी गैरअर्जदार यांना सदर देयक दुरुस्त करुन देण्याची विनंती केली. माहे जुन व जुलै 2016 ची देयके मिटर क्र. 9803412717 याच मिटरवर आधारीत आहे. माहे मे-जुन-जुलै 2016 रोजीचे देयके रिडींगनुसार न आल्याने ती दुरुस्त करुन मिळावीत व गैरअर्जदाराकडुन नुकसान भरपाई रु. 10,000/- मिळावी आणि प्रकरणाचा खर्च मिळावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. तक्रारदाराने अर्जासोबत माहे मे 2016, जुलै 2016 ची देयके, मिटर तपासणी रिपोर्ट दि. 20/6/16, मिटर बदलीचा अहवाल दाखल केले आहेत.
गैरअर्जदार यांनी नि.क्र. 7 वर त्यांचा लेखी जबाब दाखल केला असुन, तक्रारदाराने त्याचे घर श्री. निकाळजे यांचेकडुन सन 2004 मध्ये विकत घेतले आहे, त्यामुळे तक्रारदार गैरअर्जदाराचा ग्राहक नाही. तक्रारदारास देण्यात आलेल्या वीज देयकात कोणतीही चुक नाही, त्याला जास्ती युनिटचे देयक देण्यात आले नाही, त्याचे मिटर तपासण्यात आले व ते ओ.के. आहे त्यात कोणताही तांत्रिक दोष नाही, त्याला दिलेले देयक बरोबर आहे. त्यामुळे तक्रारदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे.
आम्ही तक्रारदाराची तक्रार, दाखल दस्तऐवज, गैरअर्जदार यांनी दाखल केलेला जबाब, याचा विचार केला. त्यावरुन न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) तक्रारदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होय
आहे काय?
1) गैरअर्जदाराने तक्रारदारास सेवा
देण्यास कसुर केला आहे काय? होय.
3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुद्दा क्र.ः- 1) तक्रारदार याने तो राहात असलेले घर श्री. निकाळजे यांचेकडुन सन 2004 मध्ये विेकत घेतले आहे. तेव्हा पासुन तर आपर्यत तो सदर जागेत राहत आहे. तक्रारदार विजेचा वापर करीत असुन मिळणारी वीज देयके भरणा करीत आहे. त्यामुळे सदर मिटरचा उपभोक्ता या नात्याने तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे.
मुद्दा क्र.ः- 2) तक्रारदार व गैरअर्जदार यांचेतील वाद माहे मे-जुन-जुलै 2016 चे देयकांचा आहे. तक्रारदार याचे नावे कोणतीही थकबाकी नसताना गैरअर्जदाराने तक्रारदारास मे 2016 मध्ये 1019 युनिटचे रु. 12909/-.चे देयक दिले, ते जास्त वाटल्याने तक्रारदाराने दि.20/06/2016 रोजी गैरअर्जदार यांना ते देयक दुरुस्त करुन देण्याची विनंती केली. गैरअर्जदार यांनी दि. 20/06/2016 रोजी तक्रारदाराचे मिटरची तपासणी केली व अहवाल दिला. त्यामध्ये लोड बंद केले तरी मिटरचे पल्स पडत आहे, मिटर बदली करावे लागते, असा शेरा दिला आहे. नि.क्र. 11 वर जो तपासणी रिपोर्ट दाखल आहे त्यामध्ये मिटर जंप होऊन रिडींग आल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांचे मिटर सदोष होते हे त्यांनी मान्य केले आहे. तक्रारदारास माहे मे 2016 चे देयक मिटर क्र. 9803412717 नुसार दिले आहे. जुन व जुलै 2016 ची देयके मिटर क्र. 9803412717 नुसार आहेत. त्यामुळे मे 2016 रोजीचे समायोजित युनिट हे जुन व जुलै 2016 ची देयके अंतिम करण्याकरीता ग्राहय मानली जाऊ शकत नाही. तक्रारदाराची मागील 11 महिन्याचे वीज वापराच्या युनिटची सरासरी 170 युनिट प्रतिमाह प्रमाणे आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास सदोष मिटरचे देयक देऊन ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 2(1) ( ) नुसार सेवेत त्रुटी केली आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देऊन हे मंच कलम 3 नुसार खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास माहे मे-जुन-जुलैची देयके रद्द करावीत व
सुधारीत बिले 170 युनिट प्रतिमाह प्रमाणे द्यावीत. त्यावर दंड व व्याजाची
आकारणी करु नये.
3) तक्रारदारास झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.
1500/- व प्रकरणाचे खर्चापोटी रु. 1000/- गैरअर्जदार यांनी तक्रारदारास
द्यावे.
5) वरील आदेशाचे पालन हा आदेश पारीत झाल्यापासुन 30 दिवसांचे आत करावे.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना