जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1303/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 25/09/2008
सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 29/09/2008
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 13/08/2009
श्री.अरुण रतनलाल काबरा,
उ.व.55 वर्षे, धंदाः व्यापार,
रा.561, राममंदीर वॉर्ड, भुसावळ,
जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. एड-मेनम फायनान्स लिमिटेड,
शाखा कार्यालय-जी-25, दुसरा मजला,
गोलाणी मार्केट, जळगांव.
(समन्स ब्रँच मॅनेजर यांचेवर बजवावे)
2. एच.डी.एफ.सी.बँक लि,
डी.एस.पी.चौक, महाबळ रोड, जळगांव.
(समन्स मॅनेजर यांचेवर बजवावे) ....... सामनेवाला.
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 13/08/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री.हेमंत अ.भंगाळे वकील हजर
सामनेवाला क्र. 1 व 2 तर्फे श्री.तानाजी रामचंद्र पाटील वकील हजर.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. तक्रारदार यांचा मालवाहतुकीचा व्यवसाय असुन त्यावर त्यांचा उदरनिर्वाह व चरितार्थ चालतो. तक्रारदार यांना माल वाहतुकीसाठी गाडीची आवश्यकता असल्याने तक्रारदारास सामनेवाला क्र. 1 यांनी गाडी घेण्यासाठी दि.5/5/2006 रोजी रक्कम रु.10,71,000/- इतके कर्ज दिलेले असुन सदरची कर्जाची कालमर्यादा ही 48 महीन्यांची व कर्ज हप्ता रु.28,747/- चा आहे. सदरील कर्ज प्रकरण करतेवेळेस सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या अनेक को-या फॉर्म शिटवर, कागदपत्रांवर सहया घेतलेल्या असुन त्याबाबत त्यांनी तक्रारदार यांना कोठलेही कागदपत्र अगर दस्तऐवज दिलेले नाहीत तसेच तक्रारदाराने कर्जाकरिता सामनेवाला यांना 10 कोरे चेक देखील दिलेले आहेत. तक्रारदाराने कर्ज रक्कम मिळाल्यानंतर अशोक लेलॅण्ड कंपनीचा ट्रक वाहन रजिस्ट्रेशन क्रमांक एम.एच.19/झेड 1514 घेतला असुन त्याचा विमा काढला असुन कर्ज प्रकरणानंतर वाहनाचे हप्ते नियमीतपणे सामनेवाला यांचेकडे भरणा केलेले आहेत. असे असतांना सामनेवाला यांनी तक्रारदाराचा ट्रक जुलै,2008 मध्ये काहीही कारण नसतांना व कोठलीही नोटीस न देता जप्त केला होता तथापी सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दबावात आणुन दि.22/7/2008 रोजी रक्कम रु.65,000/- भरुन घेऊन रक्कम रु.10,000/- सीजींग चार्जेस म्हणुन बेकायदेशीरपणे वसुल केले व सदर रक्कम देतेवेळेसही सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या काही को-या कागदावर सहया घेतल्या आहेत. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडुन घेतलेल्या कर्जापोटी आजपावेतो रक्कम रु.6,27,750/- इतक्या रक्कमेचा भरणा केलेला असुन पुढील हप्ते देखील भरण्यास तयार असतांना सामनेवाला यांनी तक्रारदाराचा ट्रक कुठलेही कारण नसतांना, नोटीस सुचना अगर पत्र न देता दि.13/9/2008 रोजी त्यात असलेल्या मुंबई येथील दिपक फर्टीलायझरचे खताचे मालासह बेकायदेशीररित्या ताब्यात घेतला. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा ट्रक त्यात असलेल्या मालासह बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन तक्रारदारास सदोष सेवा प्रदान केलेली आहे. सबब तक्रारदाराचा ट्रक क्रमांक एम.एच.19/ झेड 1514 बाबत सामनेवाला यांनी कोणतीही कारवाई करु नये असे आदेश सामनेवाला यांना देण्यात यावेत, सामनेवाला यांचेकडुन नुकसान भरपाईपोटी रु.30,000/- मिळावेत, तक्रारदाराचा सामनेवाला यांनी जप्त केलेला ट्रक क्रमांक एम.एच.19/झेड 1514 तक्रारदाराचे ताब्यात देण्याचे तुर्तातुर्त आदेश सामनेवाला यांना व्हावेत, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.15,000/- मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
3. सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदाराचे तक्रार अर्जास नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टी या तत्वाची बाधा येत असुन तक्रारदाराची तक्रार रद्य होण्यास पात्र आहे. ऐड मेनम फायनान्स कंपनी लि. ही कंपनी कायदयानुसार नोंदणीकृत संस्था असुन इंदौर येथे कार्यरत असुन शाखा कार्यालय जळगांव येथे आहे त्यामुळे सदरकामी इंदौर येथील कार्यालयास देखील सामनेवाला म्हणुन सामील करणे गरजेचे आहे. सामनेवाला क्रमांक 1 व 2 यांचेत एकमेकांसोबत चार चाकी वाहनांना सुलभ हप्त्याने वित्त पुरवठा करणेबाबतचा करार झालेला आहे. तथापी कर्जाचा एखादा हप्ता न फेडल्यास किंवा कर्ज फेड न केल्यास त्याचे विरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार सामनेवाला क्र. 2 यांनी त्यांचेतर्फे सामनेवाला क्र. 1 यांना दि.17/11/2005 रोजीचे पॉवर ऑफ ऍटॉर्नी व्दारे प्रदान केलेला आहे. त्यानुसार प्रदान केलेल्या अधिकारानुसार कर्जदार व सदर कर्जास थकीत असलेले जामीनदार यांचेत झालेल्या करारानुसार सामनेवाला क्र. 1 हे थकीत कर्जदाराने एखादा हप्ता थकविल्यास सदर वाहन थकीत कर्जदाराकडुन जप्त करतात. तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांचेमार्फत सामनेवाला क्र. 2 यांचेकडुन अशोक लेलॅण्ड कंपनीचा ट्रक हे माल वाहतुकीचे वाहन फायनान्सव्दारे खरेदी केलेले आहे. सदर वाहनावर सामनेवाला क्र. 1 व 2 यांचा एच.पी.चढविलेला आहे. तक्रारदार यास सामनेवाला क्र. 2 कडुन रक्कम रु.10,71,000/- चा दि.5/5/2006 रोजी कर्ज पुरवठा करण्यात आला होता. तक्रारदाराने कर्जाची परतफेड 48 हप्त्यात करावयाची असुन प्रत्येक हप्ता हा रक्कम रु.28,747/- चा होता. कर्जाचे आवश्यक कागदपत्रावर तक्रारदाराने जामीनदारासमक्ष सही करुन सामनेवाला यांचे अटी व शर्ती मान्य केलेल्या होत्या. तथापी तक्रारदाराने सामनेवाला यांचे अटी व शर्तींचे पालन कधीही केलेले नव्हते व नाही म्हणुन सामनेवाला क्र. 1 ने दि.9/10/2006 रोजी सदर वाहन तक्रारदाराचे ताब्यातून औरंगाबाद येथुन जप्त केले होते त्यानंतर तक्रारदाराने दि.4/11/2006 रोजी थकबाकी हप्त्यापोटी 60 दिवस उशिरा रक्कम रु.28,747/- सप्टेंबर,2006 या महीन्यातील हप्त्यांची रक्कम होती. त्यानंतर देखील तक्रारदाराने वेळोवेळी हप्ते भरण्यास कसुर केली होती म्हणुन सामनेवाला क्र. 1 ने सदर वाहन पुन्हा दि.22/8/2007 रोजी तक्रारदाराचे ताब्यातुन जप्त केलेले होते त्याबद्यल सामनेवाला क्र. 1 ने तक्रारदारास त्याचे जामीनदारास दि.24/8/2008 रोजी रजिस्ट्रर पोष्टाने व यु.पी.सी.ने कळविलेले होते व सदरची नोटीस तक्रारदारास मिळालेबद्यल सामनेवाला यांना पोहोच देखील आलेली आहे. त्यानंतर तक्रारदाराने दि.23/2/2008 रोजी थकबाकी हप्त्यापोटी तब्बल 202 दिवस उशिरा रक्कम रु.28,747/- मात्र ऑगष्ट,2007 या महीन्यातील हप्त्याची रक्कम होती. तक्रारदाराने पुन्हा दि.5/2/2008 ते दि.2/9/2008 या पर्यंतच्या हप्त्यांची थकीत रक्कम भरण्यास सतत कसुर केली आहे म्हणुन सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास व त्याचे जामीनदारास दि.30/9/2008 रोजी रजिस्ट्रर पोष्टाने व यु.पी.सी. ने नोटीस पाठवुन थकीत हप्त्यांची रक्कम भरणा करणेबाबत कळविले होते सदर नोटीसीस तक्रारदाराने दि.3/10/2008 रोजी त्याचे वकीलामार्फत खोटया मजकुराचे उत्तर पाठविले. सामनेवाला यांचेकडुन घेतलेल्या कर्जाचे हप्ते नियमीत भरण्यास कसुर केल्याने तक्रारदार हा डिफॉल्टर ठरल्याने सामनेवाला यांनी तक्रारदाराविरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करुन तक्रारदाराचे कर्जाऊ वाहन जप्त केले आहे. तथापी तक्रारदारास सदर घटनेचे वाईट वाटुन त्याने सामनेवाला यांना त्रास देण्याचे हेतुने प्रस्तुतचा खोटा अर्ज दाखल केलेला आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज तुर्तातुर्त अर्जासह खर्चासह रद्य करण्यात यावा व सामनेवाला क्र. 1 व 2 यांना नुकसानी दाखल तक्रारदाराकडुन प्रत्येकी रु.50,000/- देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी केली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयंतांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1) सामनेवाला यांनी तक्रारदारास त्रृटीयुक्त सेवा दिली आहे
अगर कसे ? नाही.
2) असल्यास आदेश ? शेवटी दिलेप्रमाणे.
मुद्या क्र.1
4. तक्रारदार यांचे तक्रारीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडील कर्ज प्रकरणाचा हप्ता वेळचेवेळेवर भरला नाही त्यामुळे ते थकबाकीदार झालेले आहेत. तसेच तक्रारदार यांनीही तक्रारीत ते सामनेवाला यांचे कर्ज हप्ते वेळचेवेळेवर भरीत होते याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. सबब तक्रारदार व सामनेवाला यांचेत गाडी खरेदीच्या कर्जापोटी झालेल्या हायर परचेस ऍग्रीमेंटचे अटी व शती प्रमाणे तक्रारदार हा थकबाकीदार झाल्याने त्याने नियमीत कर्ज हप्ते न भरल्याने सामनेवाला यांना तक्रारदाराची गाडी जप्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराची गाडी जप्त करुन आपल्या सेवेत कसुर केलेला नाही. असे मंचाचे मत आहे. तथापी तक्रारदाराचे कडे येणे असलेली थकीत हप्त्याची रक्कम वाहन जप्ती चार्जेस, दंड व्याज भरणेस तक्रारदार तयार असेल तर सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे वाहन तक्रारदार यांना ताब्यात देण्यास हरकत नाही असे या मंचाचे मत आहे. सबब मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज फेटाळण्यात येतो.
( ब ) तक्रारदाराचे कडे येणे असलेली थकीत हप्त्याची रक्कम वाहन जप्ती चार्जेस, दंड व्याज भरणेस तक्रारदार तयार असेल तर सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे वाहन तक्रारदार यांना ताब्यात द्यावे.
( क ) खर्चाबाबत आदेश नाही.
( क ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत
निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 13/08/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव